♦️पन्हाळ्याचे सादोबा (सुफी संत हजरत शाहदुद्दीन कत्ताल वली)
"या जगातील सर्व गोष्टी नष्टत्व पावतात
देव मात्र एकटा अक्षय रहातो"
- सादोबा दर्ग्यातील कबरीवरील लेख,
निसर्गाच्या समृद्ध वारश्याने संपन्न असलेली ही भारतीय भुमी, बौद्ध चिनी प्रवासी हयून त्सांग आणि फाहियान पासुन तर अरबस्तानातून आलेल्या अनेक सुफीपर्यंत सर्वांना अत्यंत मोहित करणारी ठरलेली आहे. भारतीय भुमीला सर्वोच्च असे स्वर्गाचे विशेषण वापरणे, या भुमीला स्वर्ग म्हणून संबोधने, या देशासाठी अत्यंत गौरवाचे आहे. भारतीय भुमीबद्दल अमिर खूसरो म्हणतात
" हस्त मेरा मौलीद व मावा वत्तन
किश्वरे हिंद बहिश्ते बर जमीन "
( हिंद माझी जन्मभुमी आणि हिंद माझा देश आहे. आणि तो पृथ्वीवरील स्वर्ग आहे." )
एवढेच काय सुफी संतांनी वसवलेल्या शहराला जन्नतचे शहर (खुल्ताबाद) हे नाव देने हे या भुमीचे मोठेपण सांगणारे तर आहेच शिवाय ही उदार, व्यापक, सर्वव्यापी दृष्टी लाभलेले ते महान सुफी देखील किती मोठ्या मनाचे होते, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागते. नाहीतरी शेतक-यांना 'नागरगट्ठे' म्हणून हिनवनारे समुह देखील या देशात आहेतच.
हजारो किलोमिटरचा प्रवास करून भारतीय भुमीची, येथील गोरगरीब जनतेची सेवा करून, या मातीत देह ठेवणाऱ्या अनेक सुफींच्या मजारी, दर्गे, पीर आपल्याला इतिहाच्या पाऊलखुणा दाखवत आहेत.
कोल्हापुरच्या मजारी, पिर, दर्ग्याच्या विश्वात पन्हाळा किल्ल्यावरील "सादोबा' दर्गाह असेच आपले लक्ष वेधुन घेतल्याशिवाय राहत नाही. कोल्हापुर शहरापासून साधारणतः २० कि.मी अंतरावर पन्हाळगडाच्या प्रवेशद्वार चार दरवाजाच्या जवळ हा सुंदर, मनमोहक दर्गाह आहे. हा दर्गा अंदाजे १५ गुंठे परिसरात असुन बाजुला असणा-या दोन्ही ऐतिहासीक तलावांच्या मध्ये हा दर्गा तत्कालीन राज्यकर्ता इब्राहिम आदिलशाहच्या कारकिर्दीत त्याचा मुख्य वजीर खिजर खान याने बांधलेला आहे. दर्गाच्या प्रवेशद्वारा समोरील पराशर तलाव अत्यंत जुना मानला जातो. त्याचे बांधकाम बहामनी, शिलाहार राजांच्या राजवटितही झाल्याचे समजते.
दर्गाहच्या कमाणीवर लिहलेले " हजरत पीर शहादुदीन कत्तालवली रहे. दर्गाह पन्हाळा." हे पाहताच क्षणी आपले लक्ष वेधून घेते. हे नाव लिहीलेल्या छोट्या दरवाजावजा कमानीतून आत प्रवेश केला की अत्यंत सुंदर दगडी नक्षीकाम केलेल्या अनेक मजारी आपल्याला दिसु लागतात. महाराष्ट्रतील इतर मजारींपेक्षा या मजारीवरील दगडावर केलेले नक्षीकाम आणि रचना अत्यंत वेगळी असल्याचे आपल्या लक्षात येईल. अधिक माहिती घेतली असता त्या तुर्की पद्धतीच्या असल्याची माहिती स्थानिक मुस्लिमांकडून मिळाली. उंच दगडी चबूतऱ्यावर बऱ्याच मजारी अर्थात समाध्या आपल्याला दिसतील. या मजारी मुख्य दर्गाच्या समोरील भागात आहेत. दर्ग्यात प्रवेश केल्याबरोबर आतमध्ये एकुण तिन मजारी आहेत. डाव्या हाताकडील मुख्य मोठी मजार हज़रत शाहदुदीन कत्ताल वली रहे.अ. यांची आहे. मधली छोटी मजार त्यांचे सुपुत्र मासुम साहब यांची आहे. फार वर्षांनी हजरत शाहदुद्दीन कत्ताल वली यांना ही पुत्रप्राप्ती झाली होती परंतु लहान वयातच मासुम सहाब यांचा मृत्यु झाला होता. फारशी भाषेमध्ये मासुम साहब यांच्या माजारीवर सुफी संत शाहदुद्दीन कत्ताल वली यांना त्यांच्या अकाली मृत्यूनंतर अतिव दुःख झाल्याने त्यांची पुत्रप्रेमापोटी लिहलेली कवणे आहेत ती अशी की "परमेश्वराने जोपर्यंत त्याला वाटले तोपर्यंत त्याला या जगात ठेवले नंतर त्याला आपल्याकडे बोलावून घेतले आणि आम्हाला अतिव दुःखी केले". तिसरी शेवटची मजार त्यांच्या पत्नी माँसाहेबी यांची आहे.
या दर्गाहची लांबी 25 फुट लांब आणि 29 फुट रुंद तर 50 फुट उंच अशी रचना आहे. स्थानीक लोकभाषेत याला सादोबा (साधुबाबा ) म्हणुन प्रसिद्ध असणारे हे सुफीसंत इराण या देशातील जनानण प्रांतातून १२ व्या शतकात साधारणतः ९ शे वर्षापूर्वी संपुर्ण कुटुंबासह पन्हाळगडावर आले होते. त्यांचे नाव सुल्तानुल मा. शेख सय्येदुल सादात, हजरत शाहद्दुदीन कत्ताल वली जनजानी आहे. स्थानिक लोकांनी त्यांना साधुबाबा हे संबोधन वापरल्याने नंतर अपभ्रश होऊन ते सादोबा नावाने ओळखले जावू लागले. ते चिश्तीया-निजामीया-अलफिया परंपरेतील सुफी होत. त्यांच्या वडीलांचे नाव सुल्तानुल आरिफिन सिराजुस सालीकीन हजरत हिसामुद्दीन कत्ताल जनजानी होय. त्यांची मजार पुण्यात शनिवारवाड्याच्या समोर आहे. तर आईचे नाव आबीदा झाहिदा बी सय्यदा माँ साहेबा (र.अ.) आहे. यांची मजार पुण्यात आहे. सादोबा साहेबांच्या भावाचे नाव सय्यद शहाबुद्दीन कत्ताल वली होय. यांची मजार कर्नाटक राज्यातील बेळगाव शहरात (सिमाभागात) आहे. बहीणीचे नाव ताहिरा झाकिराह खातून सय्यदा आहे, यांची मजार देखील पुण्यात आहे.
सादोबा यांचे वडील इराण देशातील जनजाण प्रांताचे बादशाह सुलतान होते. एकेश्वरवादाच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी आपल्या बादशाहीचा , शाही जगण्याचा त्याग केला आणि ते महाराष्ट्रात आले. सादोबा यांचे घराणे मुहम्मद पैंगंबर (स.) यांचे जावाई चौथे खलिफा हजरत अली यांच्या घराण्याचे वंशज असल्याचे सांगिले जाते. मिरज शहरातील मिरासाहेब हजरत ख्वाजा मोहम्मद मिरा हुसैनी चिश्ती (रहे) हे साधोबा यांचे आजोबा आणि हजरत शमशुद्दीन वली यांना मामा लागतात, त्यांच्या आईकडून नातलग असणारे मिरजेचे मिरासाहेब होत अशी माहिती स्थानिक मुजावर यांच्याकडून मिळाली.
पन्हाळगडावरील सादोबा यांच्या कबरीवर, सदरच्या भिंतीवर आणि आजुबाजुलाही फारशी भाषेतील अनेक शिलालेख आहेत. या शिलालेखांचे मराठी भाषेत भाषांतर तथा वाचनही झाले आहे.
सादोबा यांच्या दर्गाहचे बांधकाम विजापुरचे बादशाह इब्राहिम आदिलशाह दुसरा यांचे वजीर खिजर खान यांच्या देखरेखीत झाले आहे. पुढील काळात पन्हाळा मोगलांकडे गेल्यानंतर मुघल बादशाह औरंगजेब
याने दर्ग्याला भेट दिल्याचे इतिहासात दाखले मिळतात. मराठा राजवटीत हा दर्गाह पन्हाळा परिसराचे ग्रामदैवत बनला आणि या दर्गाहच्या उरुस उत्सवाला लोकाश्रय मिळाला. सर्वसामान्य जनतेपासून राजघराण्यातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजन या उरुस उत्सवात सहभागी होत असत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या मंदिरातून दरवर्षी उरुसाच्या काळात सादोबा दर्ग्यास गलेफ चढवण्याची प्रथा आहे. छत्रपती घरण्याकडुन सुफी संत सादोबा यांना तो मान असून ती प्रथा आजतागायत सुरू आहे. आज घडीला दोन मानाचे गलेफ (चादर) मजारींवर चढवले जातात. त्यातला पहिला गलेफ मुजावरांच्या वतीने चढवला जातो तर दुसरा गलेफ पन्हाळगडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या मंदिरातून निघतो. तो पन्हाळा तहसीलदार यांच्याकडून सरकारी गलेफ म्हणून चढवला जातो. या दर्गाच्या देखभालीसाठी लोकराजा
राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी पन्हाळा पायथ्याशी असणारे गुढे येथील जमीन इनाम म्हणून दिले होते. शिवाय त्यांनी या दर्ग्याला सोन्याचा नारळही दान दिला आहे. मुस्लिम हिजरी दिनदर्शिकेप्रमाणे रज्जब महिन्याच्या २४ तारखेला सादोबा दर्गाहचा भर उरूस भरतो. भर उरुसच्या आदल्या दिवशी सर्व धर्मीय महिलांच्या हस्ते माँसाहेबांची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. रज्जब महिन्याच्या २४ तारखेच्या पहाटे ०२.०० ते ०४.०० या वेळेत दर्ग्यातील मजारींना दर्ग्याचे मानकरी मुजावर लोकांकडून चंदनचा लेप म्हणजे संदल लावून गलेफ चढवला जाऊन प्रार्थना केली जाते. उरुसाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रज्जब महिन्याच्या २५ तारखेला पन्हाळ गडावरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मंदिरातून सरकारी गलेफ मिरवणुकीने आणून तहशिलदारांच्या हस्ते दर्ग्यास अर्पन केला जातो. या उरुसाला हिंदू-मुस्लीम तसेच स्थानिक सर्व जाती जमातींचे लोक उपस्थित असतात. सामाजीक ऐक्याचे, बंधुभावाचे प्रतिक म्हणून हा दर्गा आदिलशाही आणि शिवकाळापासून आजही सर्वसामान्य जनतेच्या मनात पुजनीय, वंदनीय आहे. कोल्हापुर शहर तसे सलोखा आणि समतेचे शहर म्हणून ओळले जाते. कोल्हापुरच्या अंबार्बाइपासून ते महाराणी ताराराणी पर्यंत आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पासून ते लोकराजा राजर्षी शाहु महाराजांपर्यंत येथे समतेचे, ऐक्याचे, माणुसकीचे दर्शन घडवणारी हजारो महापुरुष, संत पुरुष होऊन गेले आहेत, आणि सुफी परंपरेनेही या शहरात शहावल्ली साहेब, सय्यद सादाद औलीया.ह.पीर. बुराणद्दीन कादरीया , हजरत सय्यद मुबारक घुडाणपीर, हजरत पीर लाल शहाबाज कलंदर, हजरत पीर बाबुजमाल साहेब, हजरत पीर नंगी शाह वली, हजरत पीर शाह कुली (साकोली), हजरत पीर हूसेन जहांगीर लगोड बंद बाबा अशा अनेक सुफी संतांनी माणुसकीचा आणि समतेचा विचार पेरला, सुफींनी कधीही भेदभाव पाळला नाही. त्यानीं अस्पृश्यता नाकारली. सर्वांना एका ताटात, एका पंगतीत घेऊन ते जेवत असत. दुर्धर रोगांवर त्यांनी औषोधोपचार केले. जखमांवर मलपट्टी केली. अनेकांच्या घरातील गृहकलह त्यांनी सोडवला. माणुसकीचे बंधुभावाचे सल्ले त्यानीं दिले. निर्गुण निराकर ईश्वर सांगितला. गोरगरीब जनतेला त्यांनी पोटाशी धरले. म्हणूनच आजही जनता म्हणते की बाबांच्या दरबारात गेलो की सर्व समस्यांवर उपाय निघतोच. शेवटी हजरत पीर शाहदुद्दीन कत्ताल वली यांच्या कवनाप्रमाणे या जगातील सर्व गोष्टी नष्ट पावतात, परमेश्वर तेवढा अक्षय्य राहतो
हा सुफी संतांचा आधार आहे असेच म्हणावे लागेल.
नितीन सावंत परभणीकर
9970744142