Wednesday, 22 December 2021

♦️दुजाभाव आणि भेदभाव मांडणारा संत ( जात वर्गीय ) प्रकरण ७ वे

♦️दुजाभाव आणि भेदभाव मांडणारा संत ...
प्रकरण ७ वे 

काही केशिराजा दुजे पै धरिता।
हें तो आश्चर्यता वाटे मज ll
एकासी आसन, एकासी वसन l
एक तेचि नग्न फिरताती ll
एकासी कंदान्न एकासी मिस्टान्न l 
एका न मिळे कोरान्न मागतांची ll 
एकासी वैभव  राजाची पदवी l 
एका गावेगावी भीक मांगे ll 
हाची न्याय दिसतो तुमचे की घरी l
चोखा म्हणे कर्म माझे।।
               - संत चोखोबाराय 

            संत चोखोबारायांचा जन्म सामाजिक सर्वहरा वर्गातील माजी अस्पृश्य जातीतला.त्यामुळे संत चोखोबारायांचे विचार,अभिव्यक्ती आणि तत्वज्ञान भौतिकवादी असल्याचे दिसून येईल.ज्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत आणि जे उच्च जातीय सधन घरात जन्माला आलेले आहेत.अशांना फावळ्या वेळात धर्म हवा असतो.आणि अशेच सुबत्तेत जगणारे अध्यत्मात रमतात.हेच लोक आत्मा,परात्मा,पुनर्जन्म,मोक्षाच्या मागे लागतात. आध्यात्माचे अवडंबर हेच माजवतात.याला पर्यायी विचारधारा आणि मुक्ती मार्ग संतांनी दिला.ते तसे करु शकण्याचे कारण सर्वच संत सर्वहरा होते.उच्चभ्रू नव्हते. म्हणून संताच्या दृष्टीने इहलोकीचे जीवन आणि विठ्ठल भक्तीच मोक्ष! ते ब्राम्हणी विधारचारेचा आत्मा परमात्मा मोक्ष नाकारतात.

             संत चोखोबाराय पिढीजात,मानवनिर्मित गरीब घरात जन्माला आल्याने ते अभिव्यक्त होताना सभोवतालच्या विषमतेच्या विरुद्ध प्रथम प्राधान्याने अभिव्यक्त होतात.सभोवतालच्या भौतिक जगतातला वर्गीय भेदभाव ते स्पष्ट मांडतात.जात आणि लिंगभावची विषमता दाखवनारी मांडणी त्यांनी करणे सहाजिकच आहे.परंतू ते इतरांची बाजु घेऊन वर्गीय दरीही निदर्शनास आनुन देतात. हे खऱ्या अर्थाने मोठेपणाचे आहे.

            कार्ल मार्क्स यांनी 'मार्क्सवाद'   मांडून जागतिक पटलावर वर्गसंघर्ष  अधोरेखित केला.या वर्गसंघर्षातून मार्क्स यांनी 'साम्यवादाचे'उद्दीष्ट जगासमोर ठेवले.सगळे समान असावेत,कुणावरही भेदभाव अन्याय होऊ नये,गरजेनुसार,कुवतीनुसार,पात्रतेनुसार सर्वाना समान मिळावे हे मार्क्सवाद सांगतो.मार्क्सच्या आधी सुद्धा भारतात अनेक तत्वज्ञ,महापुरुष भौतिकवादाचा आग्रह धरत असल्याची मांडणी कॉ. प्रभाकर संझगिरी यांनी चार्वाक ते मार्क्स हा ग्रंथ लिहून केलेली आहे.संझगिरी यांच्या मते मार्क्सपुर्व काळात भारतात मार्क्सवादी मांडणी चार्वाकांपासून झालेली आहे. 

           म्हणून मार्क्सपूर्व कालखंडात भौतिकवादाचा आग्रह धरत अध्यात्माला विरोध करण्यात संत चोखोबारायांचे सुद्धा नाव घ्यावे लागेल.आपल्या आजूबाजूला असलेली सामाजिक विषमता परखडपणे मांडणे हे मध्ययुगीन भारतीय सरंजामशाहित महाजीकरीचे,धारिष्ट्याचे काम आहे.हे धाडसाचे काम संत चोखोबाराय करतात. 

          जाती व्यवस्थेत अगदी हीन मानलेल्या जातीतल्या व्यक्तीने आर्थिक भेदाची दरी स्पष्टपणे मांडणे महत्वपूर्ण आहे.सरंजामशाहित आपले म्हणने राजा,सरदार,पाटील,कुलकर्णी,देशमुख यांच्या समोर मांडता येत नाही. तसे करायला गेल्यास शिरच्छेद होतो.प्राणदंडाच्या शिक्षा होतात.म्हणून संत चोखोबाराय आणि सर्वच संत आपली कैफियत विठ्ठलच्या दरबारात मांडतात.हा भेदभाव,बाजूचे अमानवीय वर्तन सर्व संत विठ्ठल या प्रतिकाला पुढे करून मांडतात.

            संत चोखोबाराय म्हणतात " हे केशवराजा तुम्ही दुजाभाव बाळगता, भेदभाव करतात याचे मला आश्चर्य वाटते.तुमच्या राज्यात आर्थिक भेदाची दरी असावी हे खेदाचे आहे. एकाला मोठे आसन आहे तर एकाला काहीच नाही.काहीजण तर नग्न फिरतात.हे केशवराजा तुमच्या राज्यात अशी भेदाची दरी का असावी? कुणाला मिष्टान्नन मिळते तर कुणाला कच्चे,अपरिपक्व अन्न खावे लागते.काहींना तर कोरभर मागूनही मिळत नाही.काहींना वैभव,संपन्नता मिळते.राजगादी मिळते तर काहींना गावोगावी भीक मागत फिरावे लागते.हाच न्याय तुमच्या राज्यात दिसतो. इतका भेदभाव देवा तुमच्या राज्यात का असावा बरे ? कर्म आमुचे अश्या राज्यात आम्ही वावरतो." 

          येथे संत चोखोबाराय 'केशवराजा' नावाच्या सरंजामदाराला सुनावत आहेत.या शासनकर्त्याला ते भेदभाव लक्षात आणून देत आहेत.याच नव्हे अनेक अभंगाच्या द्वारे मध्ययुगीन भारतातील आर्थिक भेदाची दरी चोखोबारायांनी उभी केली आहे.चोखोबारायांनी वर्णन केलेल्या सरंजामशाहित जातीव्यवस्था मुख्य आहे.लोक गरीब आहेत ते कमी उत्पादनामुळे नव्हे तर विशिष्ट जातीने कितीही काम केले तरी त्यांना योग्य मोबादलाच दिला जात नाही.महार असलेल्या चिखोबांना गावकीचे कामे वाटून दिली आहेत पण मोबदला मात्र उरलेले उष्टे अन्न या स्वरूपात आहे.अस्पृश्य आणि भटक्या जातींना श्रमाचा मोबदला जात बघून दिला जातो.ही भारतीय सरंजामशाही वर्गीय नव्हे तर  जातवार शोषण करते.म्हणून संत मंडळींनी भौतिक जगातील सुखकर जीवनाचा आग्रह धरलेला आहे.संत इहलोकीचे जीवन सुखकर बनावे यासाठीच राबतात.

           चोखोबारायांचे संपूर्ण जीवन सरंजामशाहिच्या जाचक नियमांनी बंदिस्त आहे.त्यातूनही नामदेवांच्या संत मंडळात सहभागी होऊन चोखोबा कवित्व करतात.चोखोबारायांचे भौतिक जीवन त्यांनी 'जोहार' घालणाऱ्या अनेक अभंगात मांडले आहे.

         त्यांना दररोज सकाळी उठल्याबरोबर गाव झाडावे लागते,केरकचरा उचलावा लागतो.पाटी घेऊन दारोदार उष्टे मागुन खावे लागते.दिवसा तुकडा मागून खाणे आणि रात्रीला रात्रभर जागून गाव सांभाळावा लागतो.ते वेसकरकी करतात.गावात चोऱ्या होनार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.त्यासाठी धन्याच्या आर्थात मालकाच्या पश्च्यात काठी घेऊन पाहारा द्यावा लागतो.अशाप्रकारे दिवसरात्र चाकरी करून 'चोखोबांना' भाकरी तेवढी मिळते.कधीकधी त्यांना कष्टाचा मोबदला म्हणून उष्टे , उरलेले अन्न दिले जाते.

        "बहू भूकेला झालो,तुमच्या उष्ट्यासाठी आलो. किंवा 
       चोखा म्हणे पाटी,आणली तुमच्यासाठी."
हा सरंजामशाहितला चोखोबारायांचा कामाचा मोबदला आहे.हे प्रचंड अन्यायकारक आहे.श्रमाचा मोबदला उष्टे,उरलेले देने हे जगात सर्वात हीन कृत्य आहे.हे नीच वर्तन भारतीय जातिग्रस्त सरंजामशाही आत्तापर्यंत करत होती.हे पुरावे संत चोखोबाराय यांनीच देऊन ठेवलेले आहेत.याबद्दल उच्चजातीय समाजव्यवस्थेला जराही पाझर फुटल्याचे दिसत नाही.अस्पृश्य जातींवरील हा अन्याय स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालुच होता.

         आशाप्रकारे भारतीय सारजांमशाहितली आर्थिक आणि सामाजिक भेदभावाची दरी स्पष्टपणे मांडणारा पहिला संत,संत चोखोबाराय होत.आणि हा भेद,ही विसंगती मांडून वंचित,उपेक्षित घटकाची बाजू घेण्याचे धाडस संत चोखोबाराय करतात.माजी अस्पृश्य जातीचा बुद्धिजीवी,सामाजिक सर्वहारांचा थोर बुद्धिजीवी म्हणून चोखोबारायांकडे पहावे लागेल.याच पहिल्या संताने अस्पृश्य किती काबाड कष्ट करतात हे मांडले आणि याच पहिल्या संताने कामाचा मोबदला उष्टे अन्न दिले जातो हे जगजाहीर केले.याच संताने भेदभावाची दरी साहित्यातून जागतिक पटलावर मांडली. शोषण केलेले दिसते पण पिडन कसे मोजनार ? हे पिडन दाखवून दिले ते संत चोखोबारायांनी. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

Friday, 17 December 2021

ll संत चोखोबाराय चरित्र ll ll प्रकरण २ रे ll ll हिन यातीतला जन्म ll

 ll संत चोखोबाराय चरित्र ll 
ll प्रकरण 2 रे  ll

ll हिन यातीतला जन्म ll

हिन याती माझी देवा l कैसी घडे तुझी सेवा ll 
मज दुर दुर हो म्हनती l तुज भेटु कवण्या रिती ll 
माझा लागताची कर l सिंतोडा घेताती करार l 
माझ्या गोविंदा गोपाळा l करुणा भाकी चोखामेळा 
                       - संत चोखोबाराय 

                   भारतीय जातीव्यवस्थेतल्या महार या अस्पृश्य ठरवलेल्या जातीतला संत चोखोबारायांचा जन्म.आजपासून साधारणत: साडेसातशे वर्षापूर्वीच्या सामंतशाहीत गावकुसाबाहेर हिन , कलंकित , दास्यत्वाचे जीने संत चोखोबारायांच्या वाट्याला जन्मताच आले होते.तो काळ अत्यंत कठोर नियमावलींच्या आमलाचा होता.त्यावेळी कुठलाही स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार अस्पृश्य जातींना नसत.म्हणजे स्वत:चे मत सुद्धा व्यक्त करण्याची कुठलीच मुभा , परवानगी अस्पृश्य जातींना नसे.प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात कुठलाही विचार आणि मत मांडण्याचे आधिकार तर नव्हतेच परंतू असे केल्यास प्राणदंडाच्या कठोरातील कठोर शिक्षा दिल्या जात असत.आशावेळी अंतरीच्या भावना आणि विद्रोह आध्यात्मिक भक्तिमार्गाच्याद्वारे मांडण्याचे कौशल्य नामदेवादी संतांनी विकसीत केले होते.याच आध्यात्मिक भक्ती मार्गाने अभिव्यक्त होऊन अस्पृश्यांचे पुढारपण संत चोखोबारायांनी केले होते. 
                   देवाच्या दारात सर्व समान असतात ना ! भक्त आणि भक्तित कुठे भेदभाव असतो का ? आत्मा जर या देहातून त्या देहात जात असेल तर वरवरचा विटाळ पाळणे ईश्वर भक्तीत आध्यात्मात बसत नाही.म्हणून भौतिक जगतातले अमानवीय वास्तव आध्यात्माचा आधार घेऊन, उघड करण्याचे धाडस नामदेवांच्या संत मंडळातून चोखोबादी संतांनी केले होते. 
                   एखाद्या राजाला , सरंजामदाराला हे सर्व बोलुन दाखवावावे, आपले अंतरिचे विचार मांडावे तर रित मोडायला निघालास , धर्माला आव्हान देतो आहेस,या आरोपावरून देहदंडाची शिक्षा होऊ शकते. जीवे मारले जावु शकते. म्हणून आपल्या अंतरीचे दुःख विठ्ठलाला सांगायचे, हा संत चोखोबारायांच्या अभिव्यक्तीचा मार्ग आहे. आम्ही देवाला भांडतोत , आमचे दुख सांगतो आहोत अशी युक्ती संतांची आहे. अध्यात्मिक तत्वज्ञानात सर्व जीव समान असतात, तर मग भौतिक जगतात आमच्याशी भेदभाव का करता ? हा धागा पकडून संत भांडत असतात. म्हणूनच त्यांच्या देवाला सर्व संत भौतिक जगतातील सर्व  कामे करायला लावून भौतिक समतेचा आग्रह धरतात. संत चोखोबारायांनी आपल्या एकूण 358 अभंगात बऱ्याच वेळा आपल्याला हिन यातीत जन्माला येण्याचे, अस्पृश्य असण्याचे दुख,हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या आंतरिक मनावर सर्वात मोठा आघात आहे, तो म्हणजे ते अस्पृश्य असणे. लोकांनी त्यांच्याशी भेदभाव करणे. त्यांना हीन लेखणे.त्यांना दूर हो म्हणने. आपल्या अंतरीची सल बोलून दाखवताना चोखोबाराय म्हणतात. 
                   आधिकार माझा निवेदन पायी l 
                   तुम्ही तो गोसावी जानतासां ll 
                   अवघ्या वर्णामाजी हिन केली जाती l
                   विटाळ विटाळ म्हनती क्षणोक्षणी l
                   कोणीही अंगिकार न करती माझा ll 
                   दुर हो जा आवघे म्हनती l 
                   चोखा म्हने तुम्ही घ्याल पदरी l
                   तरिच मज हरिसुख होय ll  
मी माणसासारखा माणूस असून सुद्धा हे मला स्वीकारत नाहीत. दूर हो म्हणतात.माझा स्पर्श झाला तर अंगावर पाणी शिंपडून शुद्ध होतात. मला कोणीच स्वीकारत नाही.यांच्या वर्णव्यवस्थेप्रमाणे सर्वात हिन माझी जात आहे , असे त्यांचे म्हनने आहे. विटाळ, विटाळ म्हणू म्हणू  दूर करतात. या पद्धतीचे अनेक आत्मनिवेदने चोखोबांनी केलेले आहेत.
                     आजच्या टोकाच्या विद्रोहाच्या संकल्पनांतून वावरणाऱ्यांना अस्पृश्यतेचा,भेदभावाचा विचार बोलून दाखवणारे चोखोबा कदाचित विद्रोही वाटणार नाहीत,पण त्या काळातील आजूबाजूची जाचक परिस्थिती लक्षात घेता अस्पृश्यता, भेदभावाचे आत्मनिवेदन जाहीर प्रगट करणे ,लोकांत मांडणे धाडसाचे काम आहे.इथे आवर्जून विचारात घेण्याजोगी गोष्ट अशी की भेदाभेद अस्पृश्यता ही  मानवनिर्मित आहे हे ,चोखोबाराय जाणतात. अस्पृश्यता ईश्वर निर्मित नाही हे नामदेव , संत जनाबाईने सुद्धा ठणकावून सांगितले आहे. चोखोबारायांचा स्पर्श देवाला झाल्यानंतर देव बाटतो, या ब्राम्हणी संकल्पनेचे जनाबाईला हसू येते. अख्खे जग,सर्व मानव आणि देव विटाळात जन्माला येतात तर मग आमचा बाट, विटाळ का मानला जातो ?  हे सुद्धा संत चोखोबाराय आणि त्यांच्या पत्नी संत सोयराबाई यांच्या आत्मनिवेदनात आहे.  
                     १४ व्या शकतकात सबंध भारतातील अस्पृश्यांचे पुढारी म्हणून संत चोखोबाराय साहित्यिक ,सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात नेतृत्व करत होते.जातीव्यवस्था,अस्पृश्यता व गैरबराबरीच्या विषमतेची दरी त्यांनी जाहीर बोलून दाखवली होती. विटाळाचे ,अस्पृश्यतेचे अभंग त्यांनी अभिजनांच्या ,उच्चजातीयांच्या साहित्यविश्वात आणून मांडले होते. भारतीय ब्राह्मणी व्यवस्था एवढी खोटारडी आहे की इतिहासात घडलेल्या चुका तर मान्य केल्या जात नाहीतच ,उलट असे घडलेच नाही म्हणून हात वर केले जातात. बरे झाले संत चोखोबा यांनी अशा समस्या साहित्यिक पटलावर आणून ठेवल्या, नाहीतर या देशात भेदाभेद नव्हताच असे म्हणायला उच्च जातीयांनी कमी केले नसते. भारतातील अमानवीय  प्रथा,परंपरांचा संत चोखोबाराय पुरावा आहेत. संत चोखोबारायांनी अभिव्यक्त होणे, हे फार मोठे डॉक्युमेंटेशन आहे. भारतीय संस्कृती ग्रेट  म्हणविनार्यांच्या संस्कृतीवर चोखोबाराय यांनी मांडलेले अस्पृश्यतेचे अभंग काळ्या डागा सारखे आहेत. माणसांना माणसासारखं न वागवणाऱ्या अमानवी संस्कृतीच्या लोकांत संत चोखोबा निर्भीडपणे अभिव्यक्त झाले हे क्रांतिकारी आहे. 
                     आजही जातिभेद, अस्पृश्यता पाळणाऱ्या रानटी मानसिकतेच्या झुंडींच्या झुंडी गावोगाव शहराशहरात अस्तित्वात असतील तर संत चोखोबारायांचा काळ किती भयावह असेल याची कल्पना करून पहावे. विदर्भातील आर्वी या गावी मातंगाचा आठ वर्षाचा पोरगा मंदिरात गेला म्हणून त्याला भर दुपारच्या उन्हात ॲसिड  टाकलेल्या फरशीवर बसवण्यात आले होते. त्याचा ढुंगनाचा भाग प्रचंड भाजला गेला होता.ही घटना मे 2019 ची आहे .जातीव्यवस्था,अस्पृश्यता संपली म्हणणाऱ्यांनी हे उदाहरण लक्षात घेतले पाहिजे.युटुबला अमिर खान यांचा सत्यमेव जयतेचा अस्पृश्यतेवरला ॲपीसोड ही पहावा म्हणजे आजाही अस्पृश्यता पाळली जातअसल्याचे लक्षात येइल. 
                     म्हणून सामाजिक सर्वहरांच्या साहित्यनिर्मितीचा आद्य पूर्वज म्हणून संत चोखोबारायांचे नाव घ्यावे लागेल. सामाजिक सर्वहरांचा बुद्धिजीवी बनण्याचे ऐतिहासिक मोठेपण संत चोखाबा यांच्या वाट्याला आले. सामाजिक सर्वहरांचा पहिला बुद्धीजीवी म्हटलं तरीही चालेल. पुढल्या काळात कितीतरी अस्पृश्य जातीतले किर्तनाला उभे राहिले, निर्भीडपणे व्यक्त व्हायला लागले,साहित्य लिहायला लागले. अशा अनेक लोकांना संत चोखोबा शतकानुशतके प्रेरणा देत राहिले. त्यांची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या सामाजिक सर्वहरांच्या  टॉपच्या बुद्धीजीवीला सुद्धा मिळाली होती. 
                     विद्रोही परंपरेचा अभिव्यक्त होण्याचा आशादाई पायंडा संत चोखोबारायांनी पाडला.एक पायवाट या ग्रेट संताने सुरु करुन दिली.  

नितीन सावंत परभणी 
9970744142
दिनांक १६ डिसेंबर २०२१