Saturday, 29 December 2018

♦बुद्ध एक चिंतन ♦

बुद्ध एक राजघराण्यातील लाडका तरुण.ग्रहत्याग करताना आपन सर्वसंगपरित्याग करत आहोत हे बुद्धाने जाहीर केले होते आणि त्यांनी तसे केलेही.आपला घोडा व आंगावरील राजवस्त्र त्यागुन त्यांनी सोबत आलेल्या सेवकाला माघारी पाठवले होते.पुढे त्यांनी चिंध्यांपासून,गोणपाटापासून बनवलेले चिवर धारण केले.पुर्वीप्रचलीत असलेल्या अनेक पंथ प्रवाहांशी चर्चा करुन,मुनी साधु यांच्याशी तात्विक घुसळण करुन पुढे तथागतांनी स्वतंत्र धम्ममार्ग निर्माण केला.आणि भिख्खुसंघासाठी एक आदर्श नियमावली बनवली.

प्रश्न असा आहे की.भिख्खुसंघासाठी बनवलेली नियमावली तथागत बुद्धांनाही लागू होती की नाही ? असायलाच पाहिजे.कारण बुद्ध कधीही भेद करत नसत.
मग संपूर्ण भिख्खूसंघ हा मुंडण केलेला दिसतो.दाखवला जातो.पन बुद्ध मात्र सुंदर केसांचा बुचुडा बांधलेले दाखवले जातात.म्हणजे केवळ दगडीमुर्ती कोरताना ती सुंदर दिसावी कुरुप वाटु नये म्हणून मुर्तीकारांनी बुद्धाच्या डोक्यावर कुलुपे कुलुपे असनारा कुरुळ्या केसांचा बुचुडा तयार केला. लहान मुलांचे केस सौंदर्याचे प्रतिक आहेत.म्हणून बुद्धाला मुर्तीत त्या लहान मुलांच्या कुरुळ्या केसांचा बाज चढवलेला दिसतो .

संपूर्ण आयुष्यभरात बुद्धाने धम्मात स्वतःच्या जीवनचरित्रावर चर्चा होऊ दिलेली नाही . ते धम्मच मुख्य प्रधान मानायचे व्यक्ती नव्हे.बुद्ध म्हनायचे मोहात पडू नका.कुठल्याच तृष्णेत आडकू नका.मग ती तृष्णा व्यक्तीची सुद्धा असू शकते.शास्ता मार्गदाता म्हनुनही कुनाला सर्वस्व मानू नका. रुपाची तृष्णा,व्यक्तीची तृष्णा ही सुद्धा गुलामीकडे नेते.म्हणून बुद्ध असे पर्यंत तुम्हाला कुठेही बुद्धमूर्ती दिसनार नाहीत.बुद्धांच्या पश्चात बुद्ध जे नका करु म्हनाले ते करायला सुरुवात झाली.बुद्ध म्हनाले मुर्तीपुजा करु नका.जगभरात बुद्धी मुर्ती उभ्या राहिल्या.लोक धम्मदायाद व्हायचे सोडून अमिष (मुर्तीला बळी पडले ) दायाद झाले.

बुद्धमूर्ती सौंदर्याचे प्रतीक आहे .त्याने असक्ती निर्माण होते.व्यक्ती गुंतततो .आडकतो,मोहित होतो.आणि बुद्ध म्हनायचे मुक्त व्हा ! आडकू नका ! पक्षाप्रमाणे स्वच्छंद व्हा.म्हणून बुद्धविचार सोडून बुद्धमुर्तीची असक्ती हा बुद्धाचा अपमान आहे.हा धम्म नव्हे.तो फक्त सिद्धार्थवादी झाला.धम्मवादी नव्हे.तुम्हाला सिद्धार्थाचे भक्त पावला पावलावर दिसतील,भेटतील पन धम्माचे आचरणकर्ते महतप्रयासाने शोधुनही सापडतील की नाही मोठा प्रश्न आहे .
आणि आभूषने तर बुद्धांनी कधीही घतलेली नाहीत.आभूषणे घातलेला सुंदर बुद्ध हा मार आहे.बुद्ध नव्हे . लोक हुशार आहेत बुद्धाला दागदागिने  घातले की यांनाही सुखासीन जगायला आभूषणे वापरायला मोकळीक मिळते.जैनांचे नाहीका महावीर त्याग करा म्हनाले.त्यांच्या चेल्यांनी महाविरांच्या मुर्तीला खुप सजवले दागदागिने घातले.म्हणजे जैनांना तसे वागायला मोकळीक.जे महाविर त्याग करा म्हनाले त्यांच्या धर्माचे लोक सर्वात जास्त संपत्तीला चिकटून बसले.भोगी बनले.तुम्हाला हवा तसा महावीर नाही.तुम्हाला हवा तसा बुद्ध नाही.बुद्ध बुद्धच आहेत.

नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Monday, 17 December 2018

♦बसवधर्म महासभा ♦


बसवधर्म महासभा
बसवधर्म महाभेची भूमिका लिहीत असताना हे मुख्य उद्देश पुढे ठेवत आहोत.

★ बसवधर्म महासभा ★

   बाराव्या शतकात बसवादी शरण व शरणींनि जात्यंतक- स्रीदास्यांतक क्रांती केली त्या क्रांतीला "कायक क्रांती" अथवा "सर्वहारांची क्रांती" म्हणतात.  सर्व कायक "सामाजिक सर्वहारा" म्हणजे 'माजी अस्पृश्य जाती व आदिवासी जमाती' व "आर्थिक सर्वहारा" म्हणजे 'शेतकरी जातीतील गरीब व कारागिर जाती' आहेत.

प्रतिक्रांती होऊन लिंगायत जातिग्रस्त झाले व नवीन जाती जन्माला आल्या. आजच्या काळात आम्ही ह्या दोघांमध्ये दोस्ती घडवून क्रांतीची मशाल पेटवू इच्छितो.

◆ ध्येय ◆

जात - वर्ग - स्रीदास्य अंतक क्रांती घडवून आणण्यासाठी सामाजिक व आर्थिक सर्वहारा मधील दुरी मिटवणे, हे सौतांत्रिक मार्क्सवाद करू शकतो, ह्यावर आम्ही अभ्यासाअंती ठाम आहोत. विधायक चर्चेसाठी आम्ही आव्हान करत आहोत.

◆ धोरण ◆

१.  बसव साहित्य चळवळ उभी करणे,
बसवादी वचन साहित्याचा नव्याने बहुप्रवाही, अब्राम्हणी, विधायक भौतिकवादी अन्वेषण पद्धतीने मांडणी करणे. सुलभीकरण व निरूपण करणे.  प्रबोधन करणे

२.  विवाहसंस्था पितृसत्ताक असल्याकारणाने तीने पुरुषांना अमानवीय बनवून टाकले आहे, घरातील स्त्री कुटुंबप्रमुख असली तरी तिचे अधिकार अबाधित असणे आवश्यक आहे. स्त्रीपुरुष समता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न सोहळ्याना प्रोत्साहन देणे, अशी लग्न केलेल्या कुटुंबाचा ' प्रशिक्षण मेळावा' घेण्यात यावा. जेणेकरून त्यांच्या पिढ्या समतावादी चळवळीत सातत्याने काम करत राहतील.
किन्नर व हिजडा हे मानवसमाज चा अविभाज्य घटक आहेत. इतिहासात किम-नर, वा-नर, वैश-वा-नर, किम-पुरुष इ. लिंगभेदांना मान्यता होती. आजच्या काळातही त्यांना समान वागणून व समान संधी साठी अविरत काम करणे.

३.  युवा प्रचारक घडविणे
कम्युनिस्टांनी धर्माचे काहीच प्रबोधन केले नाही ह्याचे कारण कार्ल मार्क्सचे पुढील वाक्यात 'धर्म लोकांसाठी अफूची गोळी आहे' ही अर्धसमजून कारणीभूत आहे.

"धर्म हे जगाचे सामान्य सिद्धांत आहे, त्याचे तर्क लोकप्रिय स्वरूपात, त्याचे उत्साह, नैतिक मंजूरी, त्याचे गंभीर पूरक आणि सांत्वना आणि औपचारिकता यांचे सार्वभौमिक आधार आहे. मानव सारख्या अत्युत्तम सत्याची खरी कल्पना नसल्यामुळे ही मानवी अत्युत्तम कल्पना आहे. धार्मिक दुःख, एकाचवेळी आणि त्याच वेळी, वास्तविक दुःख आणि वास्तविक दुःखांविरूद्ध निषेधाची अभिव्यक्ती आहे. धर्म हे अत्याचारी प्राणी, हृदयहीन हृदयाचे हृदय आणि सौम्य परिस्थितीचा आत्मा आहे. हा लोकांचा अफीम आहे."
"धर्माचे प्रबोधन सौतांत्रिक मार्क्सवादच करणार"

४.  'गाव तेथे अनुभव मंडप' ह्या संकल्पेतून लोकशाहीवादी संस्कृती रुजविणे.

५.  दक्षिण भारतातील समतावादी अब्राम्हणी क्रांतिकारकांचे साहित्य मराठी मध्ये प्रकाशित व्हावे ह्यासाठी 'दक्षिण भारतीय व मराठी साहित्यिक अभ्यासक  टीम' बनवून अब्राम्हणी कला व साहित्यात वाढ करने.

मानवमुक्ती मिशनच्या *बसवधर्म महासभेची टीम* अनुभव मंटपच्या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक मध्ये
*जात वर्ग स्रीदास्य अंतक काम करेल*,
ह्यासाठी आपले मार्गदर्शन व सहकार्य आवश्यक आहे.

♦मुख्य मुद्दे♦

१. एकूण दहा जणांची टीम असणार

२. अध्यक्षीय पीठ स्त्री अथवा तृतीय पंथी यांना असावे,
हा सामाजिक सर्वहारा(SC/St/NT)असावा.मानवमुक्ती मिशनच कार्यकर्ता असावा

३.  आर्थिक सर्वहारा वर्गातील ( शेतकरी व सधन वर्गातील)
४. पत्रकार/राजकीय विश्लेषक
५. मानववंशशास्त्रज्ञ अभ्यासक
६. शिक्षणतज्ञ
७. मुक्त चिंतक

*संशोधक व अभ्यासक वर्गाचे तातडीचे काम*

१. बसवधर्म महासभेचे स्वतःचे ग्रंथालय असावे,त्यातुन सर्वत्र विद्रोही/परिवर्तनवादी पुस्तके,संदर्भ ग्रंथ वाचक वर्गास उपलब्ध होतील.

२. तातडीचे काम म्हणजे *४ते५ बुकलेट्स तयार करून प्रकाशित करणे*
ह्यातून भविष्याचा वेध घेणारी भूमिका मांडणे,भविष्यात आपल्याला कोणकोणत्या विषयांवर उपाययोजना करून काम करायचे आहे ह्यावर लिखाण करणे.नवीन लेखक,कवी घडविणे,वाचक वर्ग मिळविणे. सौतांत्रिक बसवादी भूमिका मांडणी साठी कुशल लेखक,कवी यांच्या इथे नेमुणका होणे आवश्यक आहे. बसव साहित्य चळवळीचे काम ह्या माध्यमातून पुढे नेने.

३. *कार्यशाळांचे आयोजन करणे*
सर्वहारा समाजाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी कार्यशाळा आवश्यक आहेत. इतिहास,धर्मशास्त्र,संस्कृती, विज्ञान,समाजकारण ह्या विषयावर प्रबोधन करणे.
बुद्धकालीन नालन्दा,तक्षशिला, विक्रमशीला,सन्नती सारखी विद्यापीठे बहुजन समाजाची ज्ञानकेंद्रे होती त्याच पद्धतीने ही चळवळ उभी करणे.

४. संशोधन
हा विषय अतिसंवेदनशील व महत्वाचा आहे.अब्राम्हण समाजाचे, अब्राम्हणी कला व साहित्याचे मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन करून समाजाला ज्ञानदासोह अर्पण करणे.

५. लिंगायत मधील ३५० जातींचा शोध आणि पडताळणी करणे व त्यांना जाती अंतक बनविणे.

आपल्या भूमिका नेहमी जाणकार व विषेशज्ञ कडून पडताळणे.

बसवधर्म महासभा धर्मामध्ये अडकून काम करणार नाही
व्यापक भूमिका घेऊन संपूर्ण वंचित सर्वहारा समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार आहे.
त्याग आणि आत्मसमर्पित कार्यकर्ते बसवचळवळीचे चे बलस्थान आहे आणि त्यांच्या माध्यमातून *सौतांत्रिक बसवतत्व* पुढे नेतील.

*जय बसवेशा जय भारत*

प्रदेशाध्यक्ष : कॉ.आशिष सुगत्यायण (गोवा )
8668973467

सचिव: कॉ. अभिषेक देशमाने.(सांगली)
9822054291.

समन्वयक : कॉ.नितीन सावंत (परभणी )
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦

Wednesday, 21 November 2018

आकाक्षांना मुरड घालणारी धग

   आकाक्षांना मुरड घालणारी 'धग'

        धग ही उद्धव ज शळके यांची सत्तरीच्या दशकातील स्त्रीवादी कादंबरी.आशा काळातील ही कादंबरी आहे की जिथे भांडवलशाहीचा स्पर्शही झालेला नाही.इग्रंजांच्या आगमनाने भांडवलशाही अवतरली असेल पण विदर्भ आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळुनही बरीच वर्षे तिचा स्पर्शही झाला नाही.धग चे संपूर्ण जीवन ग्रामीण आहे.हे ग्रामीण जीवन सरंजामशाही ने निहीत आहे.जिथे सरंजामशाहीची नियमावली पूर्णपणे कार्यरत आहे.आशा वातावरणात धग आकाराला येते. सरंजामशाहीत एका अल्पसंख्य असणाऱ्या शिंपी जातीच्या कुटुंबाला वेळोवेळी आपल्या स्वप्नांना,आकांक्षांना कशी मुरड घालावी लागते याचे उत्तम चित्रण धग ने केले आहे. या सरंजामशाहीच्या नियमावलीच्या खुणा धग मधे जागोजागी दिसतात.भाऊकी काय म्हनेल ? जातीतले लोक वाळीत टाकतील की काय ? पती परमेश्वर असतो, तो नेइल द्या वाट्याने जावे , नाही गेल्यावर जग काय म्हनेल ही धग अप्रत्यक्षपणे मनाला लागलेली आसते.

                  कादंबरीची नाईका कौतिक आहे.तिच्या सासऱ्याला शेवटपर्यंत जेवण पुरवल्याच्या कारणावरून गावच्या श्रीमंत सरंजामदाराने तिचे घर बळकावले आहे.हे घर गहाण म्हणून लिहुन घेतल्याचे कौतिकचे शेजारी सिता आणि सिताचा पती सुखदेव कौतिककला खात्रीने सांगतात.
तेव्हा कौतिक सिताच्या नवऱ्याला म्हणजे सुखदेवला म्हनते की तुम्ही माझ्या सोबत चला आणि त्या बाखड्याच्या समोर ही जबानी द्या. पण गावचा बखाड्या मोठा श्रीमंत त्याच्याकडे वारंवार काम पडते म्हणून सिता आणि सुखदेव कौतिकच्या बाजुने बोलण्यास नकार देतात.ही सरंजामशाही कौतिकवर अन्याय करते.तिच्या बाजुने कुणीही उभे रहात नाही.ग्रामीण भागात अल्पसंख्याक जातीचे हे नेहमीचे मुख्य दु:ख आहे.शेवटी गहाण म्हणून लिहुन घेतलेले घर गावचा उच्चभ्रू मिरासदार शेतकरी बखाड्या बळकावतो.गावगाडा पोसणारी प्रवाही ठेवनारी एकेकाळीची सरंजामशाही नंतर नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे ती आडगळ ठरते.ती शोषण करणारी जाचक व्यवस्था बनते. 
                          नामदेव हा कौतिकचा नवरा आहे.तो पुरुष असूनही खंबीर मनाचा नाही.परिस्थीला लवकर शरण जानारा,हलक्या काळजाचा आहे.वारंवार तो परिस्थीती समोर गुढगे टेकतो.त्याला शेतातली श्रमाची कामे करण्याचा कंटाळा आहे.किंवा त्याच्याच्याने ते होत नाही.त्यामुळे तो वारंवार आपली बायको कौतिकच्या भोवती तगादा लावून कधी कपड्यांचा व्यापार करण्यासाठी पुढाकार घेतो तर कधी मिशनकाम करण्यासाठी गावे बदलायला लावतो.पहिल्यांदा महादेव आपल्या सासुरवाडीहुन आपल्या मुळ गावी तळेगावला आपल्या बायको पोरांसह येतो.तिथे तरी मिशनकाम करुन घर चालवावे असा त्याचा मानस आहे. परंतू तिथेही त्याचा बाप स्वताच्या मिशनीला हात लावु देत नाही.महादेव काही दिवस आपल्या बायको सोबत शेतात काम करुन नंतर कपड्यांचा व्यापार सुरु करतो.तो छोट्या छोट्या जत्रांमधे,आठवडी बाजारात तो कपड्यांची दुकान लावायला लागतो.एकदा तो उधारीवर भरपूर माल अनतो.तो काही कटेना म्हणून आणि मोझरीचा नत्थुसेट जुनी मशीन आणि रहायला घर देतो म्हनला म्हणून महादेव पुन्हा बायका पोरांसह तळेगाव सोडुन मोझरीला येतो.तिथे गावचा नत्थुसेट सरंजामी तोऱ्यात नोकराला मशीन दाखवायला सांगतो.आणि पोळ्याला कामावरल्या गढ्यांचे फुकट कपडे शिवुन घेण्यासाठी महादेवला लवकर कामाला सुरुवात करण्याचे आव्हान करतो.महादेवच्या पदरी पुन्हा निराशाच पडते.ती मशीन खुप गंजुन गेलेली खराब निघते आणि नत्थुसेटकडे निवाराही न मिळाल्याने हे कुटुंब शेवटी एका घिसड्याच्या आसर्याला जाते.मुस्लिम असनारे हे घिसडी कुटुंब शेवटपर्यंत कौतीकच्या संसाराचा आधार बनते.म्हणजे शिंपी आणि मुस्लिम या दोन सर्वहरा कुटूंबांची क्रांतिदोस्ती होते , परिस्थीतीशी झुंजण्यासाठी.

              खचलेला महादेव मोठ्या महादेवाच्या जत्रेला जातो आणि तिकडेच त्याला महारोग होतो.हि रघतपिती आम्ही दुरुस्त करु म्हणून त्याला ख्रिश्चन मिशनरीचे लोक उपचाराला घेवून जातात.
कौतिक आणि महादेवला नामा आणि भिमा ही दोन मुलं आहेत.भिमा हा कुनालाही न जुमाननारा उनाड आहे.तो कौतिक आणि महादेवच्या हाताबाहेर गेल्याने पुढे तो जुगार खेळणे,चोरी करणे,उद्धट बोलणे अशा वाईट सवई लावून घेतो.या भिमाचा त्रास कौतिकला सर्वाधिक भोगावा लागतो.एकदा हा उनाड भिमा ज्यांनी आसरा तिला त्या खिसड्याच्या कुटूंबातील बानोवर हात टाकतो.बानो घरी सांगते.त्यामुळे कौतिकला घर सोडायची वेळ येते.शेवटी बानोची आई सकीना आणि वडिल कासम मध्यरात्री घर सोडुन जाणाऱ्या कौतिकला पुन्हा असरा देतात.तिला घर सोडु देत नाहीत.
महादेव आणि कौतिकचा लहाना मुलगा नामा आहे.अगदी आईचा शब्द पाळणारा,निरागस स्वभावाचा नामा आहे.इंग्रजी शाळेत जाऊन खूप शिकायचे त्याचे स्वप्न आहे.परंतु त्याची गरीबी त्याच्या आकांक्षांना मुरड घालायला लावते.बाप रघतपीती आल्याने तिकडेच गेला.आपल्या मुलाला नामाला आपण त्याच्या पायावर उभे करू न शकल्याने,शाळेत न पाठवु शकल्याने, आपले हक्काचे घर गेल्याने,आणि विशेष म्हणजे नवऱ्याचा आधार गेल्याने कौतिक वेडी होते. प्रचंड हालअपेस्टा झेलून , सतत कसाबसा संसार उभा करायचा प्रयत्न करणारी कौतीक वारंवार संसारात कोसळते , तिच्या पदरी सुख लागत नाही.संसार धुळीला मिळालेली ती स्त्री शेवटी वेडी होते. शेवटी घर चालवण्याची जबाबदारी नामावर येते.नामाची लहानी बहिण यसोदी बानू च्या जागेवर भाता फिरवायला लागते,तर नामा हॉटेलात कामाला लागतो.तो आईला खिशात भजे घालून आणतो, तर कधी मालकाने दिल्यावर उजागर आणतो. कौतिक आणि यसोदीच्या पालनपोषणाची जबाबदारी नामावर येते.
अशी एकंदरीत आशा-आकांक्षांना मुरड घालणारी कौतिक नावाच्या शिंपीनीची कहानी.ग्रामीण जीवन काबाडकष्ट उपसणारे आहे.ग्रामीण भागात मैल दोन मैल चालणे ग्रामीण लोकांना काहीच वाटत नाही. प्रचंड पायी प्रवास करणारी ही माणसं,जितकी गरिबी तितका पायी प्रवास,कारण गरिबांना कुठे मिळणार बैलगाडी.मोटारी, बस आल्याही होत्या पन त्या मोठ्या शहर आणि तालुक्यात, म्हणून नामा पाइच शाळेत जातो.महादेव कपडे विकायला गठ्ठा डोक्‍यावर घेऊन पायी जातो.आपल्या मूळ गावाहून मोझरी ला डोक्यावर शिलाई मशीन आणि पाटा आणणारी कौतिक आणि नामा इतके व्याकूळ होतात की, अवसान गळल्याने मशीनचा पाटा ही फुटतो.इतका पाई प्रवास करनारी ही ग्रामीण माणसं जगण्याची धडपड काही सोडत नाहीत...
कौतिक प्रचंड कष्ट उपसणारी आहे.एवढे कष्ट उपसूनही ती फारशी कुणावर खेसकत नाही.चुका करणाऱ्या भीमाला ही पदराखाली घेते.कपड्यांचा गठ्ठा चोरांनी लुटल्यानंतर नवरा घरी न येता अमरावतीला भिकाऱ्या गत जीवन जगतो.तर त्याला शोधून त्याची समज काढून त्याला घरी आणणारी कौतिक आहे.तरीही तिच्या वाट्याला संकटांचे डोंगर उभे आहेत.एक संकट गेले की दुसरे संकट तयारच आहे.कधी भीमा तिचा मोठा मुलगा घरात चोरी करून सारे पैसे घेऊन पळून जातो,कधी मुलगी यसोदी आजारी पडते,कधी नवरा खचतो तर कधी अचानक गायब होतो.तरीही संकटांना धीराने तोंड देत कौतिक नवऱ्याने मांडले तिथे संसार उभी करणारी खंभीर आहे.तरी हा तिचा खंबीरपणा टिकेल कुठपर्यंत ? शेवटी ती परिस्थितीपुढे हतलब होते.नवरा महारोगाने ग्रस्त झाल्याचे समजून ती आतुन तुटत जाते शेवटी ती वेडी होते.

                           या कादंबरीचे उठावदार मोठेपण म्हणजे वऱ्हाडी भाषा.'धग' ही मराठीतली सर्वात सुंदर वास्तवदर्शी कादंबरी आहे.त्यातल्या त्यात 'स्त्रीवादी' कादंबरी.या भूमिकांना घेऊन आणि समीक्षकांनी म्हणावी तेवढी दखल घेतलेली दिसत नाही.उलट अभिजनांनी  लॉबिंग करून उद्धव शेळके यांचे साहित्य चर्चेलाही घेतले नाही.पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात शेळके यांची पुस्तकेही मिळत नाहीत.'नाळ' हा वऱ्हाडी बोलीवर चित्रपट काढताना नागराज मंजुळे यांचे 'धग' वर का लक्ष गेले नसेल हा प्रश्न पडतो? कारण नाळ हा तितका चर्चीला गेला नाही.धग वरचा चित्रपट नागराजला नाळपेक्षाही उंचीवर घेवून गेला असता.धगवर अजूनही चित्रपट येऊ शकला नाही हे मोठे गूढच आहे.
कौतिक च्या वाट्याला जे आले ते उद्धव शेळके यांच्या वाट्याला ही उपेक्षित जगणे आले की काय हा प्रश्न पडतो? कारण महाराष्ट्रात लॉबिंग करून समीक्षा लिहुन घेण्याचा प्रघात जुनाच आहे.
भाषिक सौंदर्य मूल्य,शिगेला पोहोचवणारे उत्कट प्रसंग आणि दुःखद शेवट हे या कादंबरीचे खास पैलू आहेत.
कौतिककडे बघून आपले दुख तर छटाकभरच आहे याची जानीव वारंवार कादंबरी वाचताना होते. उद्धव शळके हे स्त्रीयांचे जगणे,त्यांची सहनशीलता अगदी खुप सुंदरपणे क्याच करतात.ती बारिक सारीक अभिव्यक्ती ते सोडत नाहीत.शिंपी समाजाच्या कुटुंबाचा सांस्कृतिक देव आणि संकटांच्या समयी कौतिकच्या नेनीवेतून ज्याचा धावा होतो तो शादुलबाबा एक मुस्लिम सुफी संत आहे. एकदा शेतात रोजंदारीचे काम जास्तवेळ करता यावे.आपल्या लहान मुलीने त्रास देवु नये,झोपुन रहावे म्हणून कौतिकने आपली मुलगी यसोदीला रोजच्यापेक्षा जास्त अफु चारला.ज्यामुळे यसोदी हालचालच करेनासी झाली म्हणून कौतिकने भीतीपोटी आकाशाकडे हात करत नवस बोल्ला होता तो असा की " देवा शादुलबुवा,मह्या यडीबांगडीच्या हातानं काही चुकभूल झाली असनं त मले उचलून ने एक्का रातीतून,पन मह्य फय अस्स कच्च तोडुन नोको नेवू ,लागनं त मी तुह्या नावानं पाच बस्तरवार करिन पुडच्या बस्तरवार पासुन "

नंतर कौतिकने मोहरमच्या दिवसी आपला दोन नंबरचा मुलगा नामाला पाच घरे मागायला लावून हा नवस फेडल्ला.तो प्रसंग असा 
मोहरमच्या दिवशी कौतिकने नामाला आंघोळ घातली. घासून पुसुन अंग स्वच्छ केल.डोक्याला खोबरेल तेल चोपडलं.भांग पाडुन दिला.नवं कुडत घालायला सांगितले.चड्डी नेसायला लावली.नंतर महादेवाच्या मालातल्या कोऱ्या करकरीत दुपट्ट्याची झोळी कीली.ती नामाच्या खांद्यावर अडकून दिली.तांबडा पिवळा नाडा गळ्यात घातला.हतात वाटी दिली.समजावून सांगितलेलं सारं काही त्याच्या डोक्यात शिरलं की नाही,हे पहाण्यासाठी विचारु लागली. 
" किती घर मांगसिन ? " 
" पाच." 
" अन् काय मन्सिन?" 
"हुसेन हुसेन धुल्ला " नामा लाजुन म्हनाला, 
पण काओ मा,पाच घरं नाई हिंडलो त ? " 
" नाई बाप्पा,हिंडाच लागते.त्याच्यात कायची लाज आये.आपल्या देवाचं आफुन नाई त कोनं कराव् ..." 
" पन गुजी - जानराव हासन्नाओ." 
" हासू हसले त.आमच्या शादलबुवानं आमाले असंच फकीर व्हाले सांगितलं मना.मंग कोनी नाई हसत... " 
मग तू आगूदर त्याईले सांगनं,का हासू नोका मनू .. " 
" हो जा सांगतो." 
"आगूदर सांगनं. " 
" सांगतो मंतो तं." पहिल्यांदा खेकसुन बोलल्यवर मग कौतिक शांतपणे म्हनाली. 
" आन् कोनी काई देल्लं त थें हाती नौको घेऊ.वाटीत घेऊन झोईत टाकजो."

खांद्यावर झोळी घातलेला नामा लाजतमुरकत शेजारची पाच घरं हिंडला.पैकी कुणी गहू, कुणी तांदूळ,कुणी जोंधळे दिले.वर एकेक- दोनदोन पैसे.शेवटी सारं घेवून नामा सुटकेच्या अनंदात घरी आला. 
कौतिकानं सारं धान्य एकात दळून काढलं.खिचडाच तो. भिक्षावळीतल्या पैशांचं गुळ दुध आणलं.खिचड्याच्या पिठाचे रोडगे झाले.महादेवने गुळदुधात कुस्करले. त्याचे लाडु बांधले.शादलबुवाला त्या लाडवांचा नैवेद्य दाखवला.ऊद जाळला. अबीर वाहिला.नंतर महादेवनं शादलबुवापुढं डोकं टेकलं नामालाही टेकायला लावलं. शेवटी कौतिक आली.तिनं यसोदिला उघडं केलं.शादुलबुवापुढं उपडं केलं.तिच्या नामाच्या व स्वताच्या गळ्यापोटाला अंगारा लावला.स्वता डोकं टेकुन नमस्कार करताना पुटपुटली. 
" बाप्पा शादलबुवा,मले यडीबांगडीले काई नाई समजत. चुकलंमाकलं थें पोटात घाल. ह्या सर्वा तुहाच फापटपसारा आये.तारसीन त तारजा आन् मारसीन त मारत जा ! "

                कौतिकचे कुटुंब म्हणजे शिप्यांचे आर्थिक सर्वहरा जातीतले शेतमजूर कुटुंब आहे.तिची संकटकालीन नेनीव  कोण्यातरी सुफी मुस्लिम संताचा धावा करते.आणि त्या मुस्लिम संतालाच ती जगाचा सर्वेसर्वा करुन टाकते.हे सर्व जग तुझाच फापटपसारा आहे.तुच सर्व निर्माण केले आणि तुच विनाश करणार अशी तिची भूमिका आहे.आमच्या या कौतिकच्या तत्वज्ञानातला सर्वेसर्वा शादलबुवा आहे.

आजच्या सारखी ग्रामीण भागात हिंदू मुस्लिम वगैरे अशी भांडणेही नाहीत.सर्वांचे राबने पोटासाठी आहे.म्हणून राबनारे मुस्लिम कुटुंब कौतिकला आधार देते.कौतिकचा धावाही एका मुस्लिम संताचा आहे.येथे कौतिकसाठी स्वजातीय परके आहे तर परधर्मीय मुस्लिम आप्तस्वकीय आहेत.तिचा धर्म तिला मदतही करत नाही की तिची चौकशी सुद्धा करत नाही. तिचा धर्म तिला लुटतो.आणि मदतीला येतात परधर्मीय. ही ग्रामीण भागातील माणुसकी आहे.जी आज भांडवलशाहीने संपत चाललेली आहे.

उद्धव ज.शळके यांच्या मांडणीला,निरिक्षणाला,सलामच 

नितीन सावंत,परभणी 
9970744142

Saturday, 10 November 2018

हस्तश्रमाने राबनार्यांच्या श्रमाचे मोल करा ..

"ताई कितीला दिला हा फडा?"
" भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला"
त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला
"दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?"
" भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून"

मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने.
त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला.

रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे.

" भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले"
"अहो ताई मी किंमत कमी करनार नाही "

त्या रखुमाईला वाटले, मी किंमत करनार नाही म्हणजे आता मी निघून जातो का काय की.शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित मी घेनार नाही असा तिचा समज.

परत ती म्हणाली "भाऊ मया स्वता हताने बनवलेले फडे हाइत.एक भी खराब नाही."

"अहो मी त्या फड्याच्या पानोळ्या नाही बघत.त्या झिजूनच जानार आहेत ना.मी बघत आहे मुठ मजबूत असावी."
"भाऊ मी स्वता बळ लाऊन आवळल्यात मुठी.. "

" भाऊ कोनता घेता मग ? "
"ताई दोनीबी"
तिच्या चेहऱ्यावर हस्य उमलले.
"हे घ्या एकशे दहा रुपये" 
भाव न करता फडे घेवून मी माझ्या घरी निघालो आणि ती तिचा पसारा आवरायला लागली .. घरी जाण्यासाठी ..

मी विचार करत होतो. कुठल्यातरी डोंगराळ भागातुन डोक्यावर भारे आना.मग त्या पानांचे बारिक बारिक पाते कट करा. त्याला एका गोलाकार पध्दतीने विना.ते कितीतरी वेळा हताला टोचते.नखात टोचल्यावर जिभाळी लागते.कुठेच जीव लागत नाही इतकी आग होते.तळहावर ते सर्व विनायचे.मग मुठीला घट्टपणे दोरी बांधायची.यावेळी स्त्रीयांना सर्व जीव एकवटून ती मुठ बांधावी लागते. त्या मुठेला नायलॉनची दोरी.मुठ ढिली असेल तर गिर्हाइक निघून जाते.
एवढ्या बेजारीतुन त्या फड्याची किंमत किती तर
पंन्नाससाठ रुपये..
आन यांच्या मॉल मधला झाडु कितीला तर एकशे दहा पासुन बोली ...

एका दिवाळीत भाव न कमी करता तुम्ही सुद्धा एखाद्याच्या श्रमाचे मुल्य करु शकतात ...

फार सोपी कृती आहे. करुन बघा.
थेटु शेतात पिकवलेले माळवं भाजीपाला घेवून आलेले शेतकरी पहाटेच रोडच्या कडेला बसतात.भाव न करता घ्या बर .. काय बिघडत नाय..

उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज घेवून बसलेले कुंभार... हंडा घेताना भाव कमी करु नका,  काय बिघडत नाय ..

लोहाराकडुन विळा, कुऱ्हाड शेवटुन घेताना .. कुलपाची नवी चावी बनवुन घेताना भाव कमी करु नका काय बिघडत नाही ..

भाव कमी करायचा प्रयत्न मॉल मधे करुन बघा बरे ..

दोन रु सुट्टे नाहीत म्हणून चॉकलेट का घेतो आपन .. त्याला ते दोन रुपयेच दे म्हनावे .. वाटलेच तर घेतलेले सामान वापस करा ..
दुसरीकडे घ्या ..
पन हस्तश्रमाने राबनार्यांच्या श्रमाचे मोल करा ..

नितीन सावंत परभणी
9970744142

Saturday, 13 October 2018

ll हुसेन हुसेन धुल्ला ll

कौतिक ही उद्धव ज.शेळके यांच्या कांदबरीची नाईका.शिंपी समाजाचे ग्रामीण वऱ्हाडी जीवन या कादंबरीत चित्रीत आहे.

यात एकदा शेतीचे काम जास्तवेळ करता यावे.आपल्या लहान मुलीने त्रास देवु नये म्हणून कौतिकने आपली मुलगी यसोदी ला रोजच्यापेक्षा जास्त अफु चारला.ज्यामुळे यसोदी हालचालच करेनासी झाली म्हणून कौतिकने भीतीपोटी आकाशाकडे हात करत नवस बोल्ला होता तो असा की " देवा शादुलबुवा,मह्या यडीबांगडीच्या हातानं काही चुकभूल झाली असनं त मले उचलून ने एक्का रातीतून,पन मह्य फय अस्स कच्च तोडुन नोको नेवू ... लागनं त मी तुह्या नावानं पाच बस्तरवार करिन पुडच्या बस्तरवार पासुन "

नंतर कौतिकने मोहरमच्या दिवसी आपला दोन नंबरचा मुलगा नामाला पाच घरे मागायला लावून हा नवस फेडल्ला.तो प्रसंग असा ...

मोहरमच्या दिवशी कौतिकने नामाला आंघोळ घातली. घासून पुसुन अंग स्वच्छ केल.डोक्याला खोबरेल तेल चोपडलं.भांग पाडुन दिला.नवं कुडत घालायला सांगितले.चड्डी नेसायला लावली.नंतर महादेवाच्या मालातल्या कोऱ्या करकरीत दुपट्ट्याची झोळी कीली.ती नामाच्या खांद्यावर अडकून दिली.तांबडा पिवळा नाडा गळ्यात घातला.हतात वाटी दिली.समजावून सांगितलेलं सारं काही त्याच्या डोक्यात शिरलं की नाही,हे पहाण्यासाठी विचारु लागली.
" किती घर मांगसिन ? "
" पाच."
" अन् काय मन्सिन?"
"हुसेन हुसेन धुल्ला " नामा लाजुन म्हनाला,
पण काओ मा,पाच घरं नाई हिंडलो त ? "
" नाई बाप्पा,हिंडाच लागते.त्याच्यात कायची लाज आये.आपल्या देवाचं आफुन नाई त कोनं कराव् ..."
" पन गुजी - जानराव हासन्नाओ."
" हासू हसले त.आमच्या शादलबुवानं आमाले असंच फकीर व्हाले सांगितलं मना.मंग कोनी नाई हसत... "
मग तू आगूदर त्याईले सांगनं,का हासू नोका मनू .. "
" हो जा सांगतो."
"आगूदर सांगनं. "
" सांगतो मंतो तं." पहिल्यांदा खेकसुन बोलल्यवर मग कौतिक शांतपणे म्हनाली.
" आन् कोनी काई देल्लं त थें हाती नौको घेऊ.वाटीत घेऊन झोईत टाकजो."

खांद्यावर झोळी घातलेला नामा लाजतमुरकत शेजारची पाच घरं हिंडला.पैकी कुणी गहू, कुणी तांदूळ,कुणी जोंधळे दिले.वर एकेक- दोनदोन पैसे. शेवटी सारं घेवून नामा सुटकेच्या अनंदात घरी आला.

कौतिकानं सारं धान्य एकात दळून काढलं. खिचडाच तो. भिक्षावळीतल्या पैशांचं गुळ दुध आणलं.खिचड्याच्या पिठाचे रोडगे झाले. महादेवने गुळदुधात कुस्करले. त्याचे लाडु बांधले.शादलबुवाला त्या लाडवांचा नैवेद्य दाखवला.ऊद जाळला. अबीर वाहिला.नंतर महादेवनं शादलबुवापुढं डोकं टेकलं नामालाही टेकायला लावलं. शेवटी कौतिक आली. तिनं यसोदिला उघडं केलं. शादलबुवापुढं उपडं केलं.तिच्या नामाच्या व स्वताच्या गळ्यापोटाला अंगारा लावला. स्वता डोकं टेकुन नमस्कार करताना पुटपुटली.
" बाप्पा शादलबुवा,मले यडीबांगडीले काई नाई समजत. चुकलंमाकलं थें पोटात घाल. ह्या सर्वा तुहाच फापटपसारा आये.तारसीन त तारजा आन् मारसीन त मारत जा ! "

कौतिकचे कुटुंब म्हणजे शिप्यांचे आर्थिक सर्वहरा जातीतले शेतमजूर कुटुंबआहे.तिची संकटकालीन नेनीव  कोण्यातरी सुफी मुस्लिम संताचा धावा करते.आणि त्या मुस्लिम संतालाच ती जगाचा सर्वेसर्वा करुन टाकते.हे सर्व जग तुझाच फापटपसारा आहे. तुच सर्व निर्माण केले आणि तुच विनाश करणार अशी तिची भूमिका आहे. आमच्या या कौतिकच्या तत्वज्ञानातला सर्वेसर्वा शादलबुवा आहे.

नितीन सावंत परभणी
9970744142

Wednesday, 10 October 2018

ll काल मला अचानक सितामाय भेटली ll

नितीन सावंत परभणी
9970744142
यांची एक कविता

काल मलाही आचानक सितामाय भेटली.
अनवानी एकटीच जरा उदासच वाटली.

जवळ गेलो चौकशी केली
म्हनल माय खुशाल का ?
उदास चेहरा कोरडे ओठ म्हनली जरा बसाल का ?

काय बोलणार मी ओटा धरला लगेच..
माय जरा पटकण आवर काम हाइत लैच...

बाबा  माझ चुकलच परिक्षा उगीच दिली.
धिटपणा पाहिजे होता आतुनच मी मेली.

रामाच्या पायाने दगडाची आहिल्या झाली.
त्याच रामापाइ राजा ही सिता मातीत गेली.

कोर्ट नाय कचेरी नाय गप्प गुनान गेले वनात.
धोब्याचे ऐकणारा राम तुमच्या कसा मनात.

ना सितेची जयंती ना सितेची ऱ्याली.
रामाच्या बोभाट्यची मर्यादाचा झाली.

सुर्पनखेचे नाक रावनाची बहीण.
गुन्हा काय सांग बा मी ही जयंतीत येइल.

चप्पला देवून गाधी सांभाळ हेच बंधू प्रेम का ?
शंबुकाचा खून कारण काय कळेल का ?

कोनता न्याय कोनती निती कोनते रामराज्य .
बायका पोरे वनात हेच का रामराज्य .

माझे भाग्य खोटे माझी तिथी खोटी.
आर्यपुत्र राम त्याचीच जयंती मोठी.

सोड बा ढोंग सोड रामराज्य .
बळी तुझा आदर्ष येवू दे त्याचे राज्य .

सितामाय रडली आश्रू आले गाली.
बळीराज्याची आता तिनेच घोषणा केली.

इडा पिडा टळो दे आणि बळीचे राज्य येवू दे !!
इडा पिडा टळु दे आणि बळीचे राज्य येवू दे !!

********************************

♦️सितायण - सिताजयंती घटस्थापनेचा पहिला दिवस ll

♦️घटस्थापनेचा पहिला दिवस

     सितायण - सिताजयंती

                                सिता,सदैव दु:ख आणि यातना भोगलेले एक पौराणिक पात्र. रामायण हे रामायण नव्हे तर ते सितायण आहे.सदैव पती आज्ञेत राहिलेली रामायणाची नायिका म्हणजे सिता होय.मर्यादेची रेषा सदैव तिलाच घालून दिलेली आहे.पदोपदी परिक्षाही तिच्याच वाट्याला येते.ती चारित्र्यसंपन्न असल्याचे तिनेच सदैव सिद्ध करयाचे, कारण ती स्त्री आहे.पुरुषांना चारित्र्य संपन्नतेच्या कुठल्याही कसोट्या येथील धर्मव्यवस्थेने ठेवलेल्या नाहीत.

                            सिता म्हणजे जमीन,सिता म्हणजे भुमाता.प्राच्यविद्यापंडीत कॉ.शरद पाटील म्हणतात,अ-हल्या म्हणजे नांगरलेली जमीन म्हणून सिता ही भुकन्या ठरते.ती विदेहच्या स्त्रीराज्याची गणपुत्री आहे.तिचा काळ वंशसमाजाचा , मातृसत्ताक स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेचा. साधारणतः इ.स.पु. ९०० ते १००० चा. सिता ही जिने शेतीच्या शोध लावला त्या अद्यगणमाता निऋतीच्या त्रिअंबेच्या ज्ञातीची वारसदार.आईकडून मुलिकडे जाणारे राजपद सितेकडे जावू नये म्हणून आणि ती गणराज्ञी  होऊ नये म्हणून तथा सर्वराज्य तिच्या ताब्यात जावू नये म्हणून,जनकाने सितेला पुरुषसत्ताक गणव्यवस्थेच्या रामाला बहाल केले.तिचे लग्न लावुन देवुन तिला रामाच्या गणात नांदायला पाठवले होते.कुलाचा पवित्र त्र्यंबक धनुष्य मोडुन तो मातृसत्ताक स्त्रीसत्ताक गण जनकाने पितृसत्ताक बनवायला रामाची मदत घेतली.अशी रामायणाची कथा आहे.पितृसत्ताक पुरुषवर्चस्वाच्या राज सत्तांची सुरुवात राम करतो तर मातृसत्ताक स्त्रीसत्ताक समाजव्यवस्थेच्या राज्यांच्या मावळतीची सिता पहिली प्रतिनिधी ठरते. 

                           नवरात्रोत्सव हा निऋतीपुत्री दुर्गेचा उत्सव मानला जातो.हा सण शाक्तसंस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो.भारतीय संस्कृतीतला सर्वात जुना हा सण आहे.या नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते.ही  घटस्थापना म्हणजे भुमातेचे पुजन होय. शेतीच्या शोधाचे श्रेय निऋतीला जाते.तिचे स्मरण करणारा हा सण आहे. दुर्गा ही निऋती मुलगी.तिच्याही नावे हा सण साजरा होतो.पश्चिम बंगाल मधे सर्वात मोठा नवरात्रोत्सव होतो.देशभरात सर्वत्र स्त्रीराज्ये होती.स्त्रीराज्यांत सुरु झालेले हे सण पुढे स्त्रीयांनी पिढीदरपिढीगत जीवंत ठेवले आहेत.आजही घटस्थापनेच्या पुर्वी तयारीसाठी स्त्रीया घर सारवतात.संपूर्ण घर स्वच्छ करुन घेतात. रंगरंगोट्या करतात.आणि त्यानंतर घरात घटस्थापना करतात.त्या दिवाळीसारखीच आपल्या सणाची जय्यत तयारी करतात.अनेक स्त्रीराज्यातून हा सण पिढीदरपिढीगत मार्गक्रमण करत आल्याने त्यावर अनेक परंपरांची पुटे चढलेली आहेत.रेणुकामातेच्या चरित्रातही घट किंवा पाण्याचा घडा घेवुन येतानाची कथा आहे.रेणु म्हणजे माती.ओलीताची सरकती शेती करणारी ती रेणुका.रेणुकेच्या धडावर नंतर बसवलेले डोके मातंग स्त्रीचे असल्याची एक लोककथा असल्याने नवरात्रोत्सवात मातंग स्त्रीयांची परडी भरल्याशिवाय सवर्णस्त्रीया जेवन सुद्धा करत नाहीत.देशभरात जेवढ्या मातृदेवता , स्त्रीदेवता किंवा लोकदेवता आहेत , त्या सर्व एकेकाळी जन्माला येवुन गेलेल्या शुर,धाडसी , समन्यायी , समतावादी ग्रेट स्त्रीया होत्या.त्यांची आठवण कोण्यान कोण्या मार्गाने जपून ठेवण्यासाठी त्यांच्या नावे सणवार उत्सव सुरु झाले आहेत. लिखानाची कला अवगत नसल्याने भारतीय स्त्रीयांनी आपल्या पुर्वजांचा इतिहास आकरहिन दगडांत , लोककथांत , मिथकांत जीवंत ठेवला आहे.मरीआई , पोचीमाय , यल्लम्मा, यडुआई , तुळजाई , रेणुका , सटवाई ,यमाई , मावळाई , इंद्रायणी, शितलाई , जाखाई , जोखाई , शाकंभरी, सप्तशृंगी, त्रिपुरसुंदरी, भवानी , रंडी , चंडी ,काली , दुर्गा यांसारख्या असंख्य स्त्रीदेवता पुर्वाश्रमीच्या आपल्याच पुर्वज आहेत.कुलटा , रंडकी , चंडकी , भटक भवानी , मऱ्यामाईचा गाडा यांसारख्या शिव्यांत देखील पितृसत्ताक समाजव्यवस्थेने त्यांचा नकारात्मक इतिहास जीवंत ठेवला आहे.ज्याला विधायक सकारात्मक पध्दतीने अभ्यासावे लागते.या सर्व स्त्रीया लोकदैवता कुठल्या न कुठल्या कला किंवा विद्येत पारंगत होत्या.कुनी फळे भाज्यांचा शोध लावला तर कुनी अस्त्रशस्त्रांचा , कुनी औषधोपचार करण्यात पारंगत होते तर कुनी प्रशासणात.म्हणून चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या मुख्य जनक या स्त्रीया आहेत.मध्यप्रदेशातील मुरैना येथील ६४ योगीनींचे गोलाकार सभागृह आज घडीला आपली संसदेची प्रतिकृती आहे.मोदी सरकार जानीवपुर्वक ती प्रतिकृती नष्ट करुन नवी संसद बांधत आहेत.मातृसत्ताक सामाजव्यस्थेचे मारेकरी आणि पितृसत्ताक सामजव्यवस्थेचे वाहक आजचे राज्यकर्ते आहेत.भारतीय इतिहासाचे कालचक्र विकृत आणि उलटे फिरले आहे.स्त्रीयांचे पुजन आणि सन्मान करणाऱ्या देशात पुढील काळात सतीप्रथेच्या नावाखाली जीवंत जाळण्यात आले.संपूर्ण कारभार करण्याऱ्या स्त्रीला भोगवस्तू दासी बनवण्यात आले.सृजनाचा स्त्रोत नवनिर्मीतीची प्रमुख असलेल्या स्त्रीला धर्मग्रंथ नरकाचे द्वार मानतात. कॉ शरद पाटील म्हणतात नदी स्त्री आणि अग्नी सदैव पवित्र असते.स्त्री तर दर मासिक पाळीला अधिक पवित्र होत जाते.आसाम कडे आजही स्त्रीचा पहिला मासिक पाळी दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो.परंतू ब्राम्हणी परंपरेने मात्र मासिक पाळी अपवित्र म्हणून सांगितले. विटाळ म्हणून स्त्रीला बेदखल केले गेले. वारकरी परंपरेत संत सोयराबाई यांनी विटाळाचे अभंग लिहुन तर महानुभावांच्यात चक्रधर स्वामींनी मराठीतून उपदेश करुन  विटाळ धुडकावुन लावला.

                         निऋतीच्या त्रिअंबेच्या ज्ञातीच्या शाखेतील पुढील वंशजा सिता आहे.मातीच्या गाळात कडधान्य  मिसळून त्यावर पाण्याने भरलेले गाडगे ठेवले जाते.हेच सिता-पुजन आहे.सितेच्या अागमनाचा हा सोहळा आहे.हिच सिता जयंती आहे.घट म्हणजे गाडगे.स्त्रीच्या गर्भाशयाच्या आकाराकडे बघुन गोलाकार गाडगे पवित्र मानने सुरु झाले होते.त्याला कुंभ असेही म्हणतात.कुंभाला अकार देतो तो कुंभार.घट किंवा कुंभ हे सृजनाचे नवनिर्मितीचे प्रतिक मानले जाते.लग्नसोहळ्यात देखील धान्य उगवलेले गाडगे वधूवरांच्या सोबत असते.पतीपत्नीने संसारातून विभक्त होण्यालाही घटस्फोट म्हणतात.घडा फुटने हे अशुभ आहे.म्हणून दोघांनी विभक्त होने म्हणजे घटस्फोट होय. गर्भाशयातून आई जेव्हा बाळाला जन्माला घालते त्याप्रमाणे घटातून पाझरलेल्या पाण्यावर धान्य उगवते नवनिर्मिती होते. ही कल्पना घटस्थापनेमागे आहे.सृजनाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे घटस्थापना आहे.नुकत्याच नांगरलेल्या जमीनीत पेरणी करणे म्हणजे सिता जयंती होय.सिता म्हणजे काळी जमीन.पेरणीस युक्त जमीन.

                      हजारोवर्षापासून आमच्या मायमाऊल्यांनी सितेची व्यथा एका सणाच्याद्वारे सांभाळून ठेवली.सितेचे दु:ख आपल्या उरी कवटाळून ठेवले. म्हणूनच आजही खेड्यातली मायमाऊल्या जात्यावर दळताना म्हनतात,

ऱाम म्हणून राम नाही ग सिता मातेच्या तोलाचा l
सिता मोठी हिरकणी राम हलक्या दिलाचा ll

                         सितेसारखे दुख: वेदना ,शोषन , पिडन कोण्याही स्त्रीच्या वाट्याला न येवो ! याप्रकारचा संदेश ग्रामीण महिला देत आल्या आहेत. तांत्रिक श्रृतीला गतिमान करण्याचा हाच काळ आहे .
म्हणून सिता जयंती सर्वत्र साजरी करावी.स्त्रीयांनी यात पुढाकार घ्यावा.
निऋतीच्या हस्ते शेतीच्या शोधाने सुरु होणाऱ्या घटस्थापनेच्या आणि सिता जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !..

नितीन सावंत परभणी
9970744142