डॉ.अशोक राणा लिखीत शोध आदिमायेचा ग्रंथाचे परीक्षण ....
नितीन सावंत,परभणी
9970744142
मानवाने आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी गूढ आणि कल्पना रम्य पध्दतीने कथांच्याद्वारे एका पुढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित केल्या.अशा सर्व चमत्कारिक अतिमानवी कथांना 'मिथके' असे म्हणले जाते. या मिथकाना विविध नावे आहेत. कल्पितकथा, मिथ, दिव्यकथा, पवित्रकथा, पुराकथा, दैवतकथा ही मिथकांचीच समानार्थी नावे आहेत. 'मानवी जीवन, त्याचा इतिहास, त्याचा धर्म, त्याचे सांस्कृतिक जीवन इत्यादींचे चित्रण या मिथकामध्ये येत असल्याने ही मिथके किंवा पुराकथा त्या त्या मानवी समूहाचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करतात.'
म्हणून या मिथकांकडे डोळेझाक करता येणार नाही किंवा अमानवी, चमत्कारिक आजच्या भाषेत अवैज्ञानिक म्हणून त्या कथांना अदखलपात्र ठरवता येणार नाही. या पुराकथा अलीकडील काळात इतिहासाच्या संशोधनाशास्त्रात महत्त्वाच्या मानल्या जाऊ लागल्याने जगभरात 'मायथॉलॉजी' नावाचे शास्त्र विकसित झाले आहे.या धर्तीवर भारतात देखील अलीकडील काळात मोठे काम झाले आहे. मिथकशास्त्राच्या आधारे सत्य इतिहासाचे धागेदोरे उलगडणाऱ्यांमध्ये धर्मनांद कोसंबी, कॉ.शरद पाटील, इरावती कर्वे, रा.ची.ढेरे, रोमिला थापर, सुकन्या आगाशे आदींची नावे अगक्रमाणे घ्यावी लागतात.
या मिथकशास्त्राला इतिहास संशोधनाच्या, विविध, विधायक अन्वेषण पद्धतीद्वारे विकसित करण्याचे काम कॉ शरद पाटील यांनी केले आहे. याचं धर्तीवर वेद, पुराणे, उपनिषदातील विविध मिथकांचा उलगडा करून, भारताच्या अत्यंत प्राचीन, आर्वाचीन मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक वारशाची ओळख करून देण्याचे काम गेली 25 ते 30 वर्षापासून डॉ.अशोक राणा करत आहेत.त्यांच्या विविध ग्रंथापैकी मातृसत्ता तथा स्त्रीसत्तेचा वारसा सांगणारा महत्वाचा ग्रंथ म्हणुन 'आदिमाया' चा आवर्जून उल्लेख करावा लागतो. प्राजाक्त प्रकाशनाने प्रकाशित केलेला 26 मातृदेवांचा हा ग्रंथ अतिशय महत्वपूर्ण, प्रेरणादायी इतिहास पुढे ठेवतो.
आपल्या सभेवतालचे संपूर्ण मानवी जीवन विविध संस्कारांनी वेढलेले आहे. हे संस्कार बहुतांश धर्मग्रंथील मिथक कथाचेच आहेत. रामायण, महाभारत या महाकाव्याचा तर समाज मनावर प्रचंड मोठा पगडा आहे. आपण काही शिकलेले लोक, विज्ञानवादी जरी बनलो असलो तरी आजूबाजूचे लोक जुनेच सणवार, उत्सव करताना दिसतात.या सर्वच सणवार उत्सव तथा मानवी मनावर राज्य करणाऱ्या काल्पनिक कथांचा उलगडा करून वास्तवापर्यंत नेण्याचे काम डॉ अशोक राणा हे आपल्या ग्रंथातून करताना दिसतात.
कॉ शरद पाटील म्हणतात, 'श्रुतिशच् द्विविधा , वैदिकीच तंत्रिकीच !' म्हणजे श्रुती (एक नाही तर) दोन आहेत, (एक) वैदीकी व (दुसरी) तांत्रिकी, तांत्रिकी म्हणजे स्त्रीसत्तावादी. चातुवर्ण पितृसत्ताक वैदिकीने हिंसक विजय मिळवल्यानंतर तंत्रिकीला नामशेष करण्यात यशस्वी झाल्यानंतर तिने तंत्रिकीला बदनाम केले.
तांत्रिकी श्रुतीचा प्रवाह हा भारतीय भूमिपुत्रांचा आहे. फुलेंच्या भाषेत हा अब्राम्हणी प्रवाह आहे. याला वैदीकी श्रुतीच्या ब्राम्हणी म्हणजे पुरुषवर्चस्ववादी वारसदारांनी अत्यंत निच पातळीवर बदनाम केल्याने भारतीय लोक गुलाम बनले. यात बदनाम केलेल्या तांत्रिकी श्रुतीच्या मातृदेवांना डॉ.अशोक राणा यांनी विस्ताराने उजेडात आणले आहे. आणि त्या मातृदेवतांचा मूळ व खरा इतिहास जगापुढे ठेवला आहे. आजही या तांत्रिकी श्रुतीच्या प्रचारक मातृदेवतामध्ये निऋती, दिती, होलिका अलक्ष्मी, सटवी, माया, पुतना, हिंडीबा आदी मातृदेवता जनमानसात बदनामच आहेत.डॉ अशोक राणा म्हणतात, 'दोन प्रकारच्या संस्कृती मधील संघर्ष भारतात गेल्या पाच हजार वर्षापासून चालूच आहे. त्यापैकी एक आर्य संस्कृती तर दुसरी द्रविड संस्कृती.'
कपटाने जिंकत गेलेल्या आर्य संस्कृतीच्या वरसदारांनी हरवलेल्या द्रविड सांस्कृतिला तिरस्कारनिय ठरवून नेणिवेत दफन केले. तरीही इतक्या नेणिवेच्या दफन भूमीतला इतिहास शब्दांच्या , अदीबंधांच्या उकलीतुन डॉ अशोक राणा आपल्या पुढे ठेवतात. या आदिमाया ग्रंथात त्यांनी जागतिक मातृदेवांचाही आढावा घेऊन, मातृपूजन, भुमिपूजन जगभर होत असल्याचे मांडले आहे.
'बॅबिलोनिया, असिरिया, इजिप्त याही देशात एकेकाळी मातृसत्ताक समाजरचना अस्तित्वात होती.आणि साहजिकच तेथे स्त्री- पुरोहितांना महत्वाचं स्थान होत.'
एकंदरीत डॉ अशोक राणा यांनी घेतलेला हा जागतिक मातृदेवतांचा आढावा डाव्या, पुरोगामी इत्यादी चळवळीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मानवी विकासाच्या टप्यात मातृसत्ताक तथा स्त्रीसत्ताक समाजव्यवस्था ही जगभरात असल्याने आदिम साम्यवादाची मांडणी करणारे डावे आणि आंबेडकरवादी मात्र याकडे अजूनही दुर्लक्ष करताना दिसतात. एवढेच काय डॉ.अशोक राणा यांनी भारताचा गौरवशाली जो इतिहास आपल्यामुळे ठेवला आहे. या इतिहासाची साधने म्हणून वापरली जाणारी वेद, पुराणे, स्मृती याकडे नकारात्मक भावनेने पाहणाऱ्या चळवळी अजूनही विधायक बदल स्वीकारायला तयार नाहीत.रा.ची.ढेरे सुद्धा म्हणतात.'पुराणे ही धर्मेतिहासाच्या आणि मुख्यतः दैवतशास्त्राच्या अभ्यासात आद्य महत्वाची साधने आहेत याचे भान आमच्या अभ्यासकाना अजूनही घडत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.'
क्रृरे घोरे म्हणून जिची यज्ञातून हकालपट्टी केली, जिला नरकदेवता म्हणून बदनाम केले गेले त्या निऋतिला 'वैराज' स्त्री राज्याची गणराणी म्हणून कॉ शरद पाटील यांनी उजेडात आणले आहे.त्यानंतर विविध मिथकांत बंद केलेल्या निरुतीला डॉ. अशोक राणा यांनी सुद्धा सखोल संशोधनाद्वारे विधायकरित्या पुढे आणले आहे. विविध नावाद्वारे धर्मग्रंथात, लोकसाहित्यात वावरणारी निऋती एवढ्या विस्ताराने मांडली ती डॉ अशोक राणा यांनीच. अलक्ष्मी, श्री, षष्टी, सखी, सिरिमा,गजलक्ष्मी, शालभंजिका, असुरलक्ष्मी, जेष्ठा या विविध नावाने विस्तारात गेलेली निऋती डॉ.अशोक राणा यांनी या ग्रंथात मांडली आहे.
ही सर्व नावे, या सर्व मातृका निरूतीचेच विविध रूपे असल्याचे डॉ.अशोक राणा मांडतात. उत्खननात सापडलेल्या शिल्पांच्या, पुराव्यांच्या द्वारे रा.ची. ढेरे यांनी जी लज्जगौरी मांडली आहे ती उर्वशी असल्याची मांडणी स्वीकारण्यात अथार्थता आहे. कारण सुंदर मांड्या असलेली उर्वशी असा अर्थ नावातच ध्वनित होतो. लज्जगौरीची सर्व शिल्पे तशीच आहेत.
अमावष्येच्या संदर्भात जनमानसात पसरवण्यात आलेल्या अफवा आणि अंधश्रध्दा यांचा विचार करता डॉ.अशोक राणा यांनी 'अमावास्या' नावाचे प्रकरण लिहले आहे ते अत्यंत महत्वाचे वाटते. ही अमावास्या का बदनाम झाली तर 'जैनांच्या
कल्पसूत्रानुसार अमावस्या ही स्वतः निऋतीच होती.'
ग्रामीण भागात, लोकबोलीत गाढवावरून शिव्या देण्याचा प्रघात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, गाढवावरून धिंड काढणे असो किंवा शिल्पशास्त्रातील गधेगाळ असो, गाढव एवढा बदनाम का तर 'शितला, जेष्ठा आणि निऋती या तिन्ही अशुभ व विघ्नकार देवतांशी गाढवाचा संबंध आहे.' वरील रा.ची.ढेरे यांची विधाने निऋती आणि गाढवांचा संबंध स्पष्ट करतात. विधायक उकलाची उन्वेषण पद्धती अवगत नसल्याने रा.ची.ढेरे मात्र निऋतीला अशुभ आणि विघ्नकारच म्हणतात.
म्हणजे ग्रामीण भागात आजही निऋती शिव्यांच्या द्वारे बदनामच आहे.ही निऋती विधायक ऊकली तुन अशोक राणा यांना कशी प्राप्त झाली? डॉ.अशोक राणा यांच्या संशोधनाच्या अन्वेषण पद्धतीत याचे ऊत्तर आहे. रा.ची.ढेरे यांनी मांडलेली निरूती नकारात्मकच राहिली. जोतीराव फुले गणपतीला ढंबुढेऱ्या म्हणतात. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राम-कृष्णाचे कोडे हे पुस्तक हिंदुत्ववाद्यांत नकारात्मक प्रभाव गाजवत आहे. यातून विधायक प्रबोधनाची वाट काढली ती कॉम्रेड शरद पाटील यांनी. याद्वारे डॉ.अशोक राणा यांच्या लिखाणाची मेथोड म्हणजे अब्राम्हणी बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धती होय. नकारात्मक मांडणी करत जाण्याऐवजी आपली विधायक मूल्ये वाढवत जाणे हा त्यातला महत्वाचा गाभा. या मेथोडद्वारे डॉ.अशोक राणा यांनी संपूर्ण 'आदिमाया' विधायक रीतीने मांडली आहे.
'स्वर्ग हा आकाशातला नसून, तो तिबेटचा भाग आहे.देव म्हणजे गॉड किंवा ईश्वर नसून आर्य टोळ्यातील एका गटाचे नाव होते.दानव,राक्षस,असुर, दैत्य, पिशाच्य, भूत हे वाईट, अक्राळविक्राळ नसून भारतीय भूमिपुत्र अर्थात चांगली माणसे होत.' अशी अत्यंत महत्वाची मांडणी डॉ.अशोक राणा 'आदिमायेत' करतात.
भारतीय स्त्रीयांच्या मनावर सर्वात खोलवर रुजवलेले पौराणिक पात्र म्हणजे सीता होय. पण या पौराणिक साहित्यातील सीता ब्राम्हणी साहित्याने दुय्यम दर्जा देऊन शोषित मांडली. या सीतेबद्दल डॉ.अशोक राणा सीता नावाच्या 18 व्या प्रकरणात जी माहिती देतात ती भारतीय स्त्रीयांना प्रेरणादायी आहे. सीता म्हणजे रामायणाची मुख्य नाईका. मातृसत्ताक-स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेतून प्रवास करत आलेला अहल्येचा गण मखादेव नावाचा जनक सीतेला पुरुष गणात नांदायला पाठवून आपल्या ताब्यात घेतो. सीतेच्या रूपाने द्विवर्ण व्यवस्था संपवून, रामाच्या रूपाने चातुर्वण्याची स्थापना होते. राम चतुर्वण्याच्या स्थापणेसाठी दक्षिण भारतातली स्त्रीराज्ये नष्ट करून पुरुषसत्ता स्थापित जातो. या जाचक पुरुषसत्तेला कंटाळून शेवटी सीता यज्ञात उडी घेते या बद्दल कॉ.शरद पाटील म्हणतात, 'महाकवी असत्य बोलला ! भूमीकण्या सीतेने पुरुषोत्तम रामाच्या अंतिम विटंबनेला वैतागून आत्महत्या केली.'
डॉ.अशोक राणा यांनी अगदी संक्षिप्त मांडलेली सीता विस्ताराने विधायक रित्या मांडली पाहिजे. सीतेचे दुय्यमत्व नाकारून तिचे नायकत्व तिला परत मिळवून दिले पाहिजे. रा. ची. ढेरे यांनी श्री. आनंदनायकी या ग्रंथात शेवटचे प्रकरण सीतेची मांडणी करणारेच लिहले आहे. ते म्हणतात, 'सीतेच्या मिथकांत कारणीभुत झालेली भारतीय स्त्री ची वेदना, सीतेच्या विद्रोही हौतात्म्यातून रामाचा मूल्यविवेक सावरला तर संपू शकेल. हौताम्य स्वीकारणारी 'सत्यक्रिया' आचरून त्या रामायनीय सीतेने युगसापेक्ष शक्तीच्या कक्षेत बसणारा विद्रोह केला आहे.
डाव्या चळवळीतुन आलेला पाश्चिमात्य स्त्रीवाद असून सामाजिक सर्वहारातील स्त्रीयांचे शोषण, पिंडन समजून घेऊ शकलेला नाही. आपले वर्तन पाश्चिमात्य पद्धतीने मुक्त जगणारे बनवले की आपण स्त्रीवादी बनलो किंवा स्त्रीयांनी बॉबकट करून पुरुषी वर्तन केल्यानेही आपण स्त्रीवादी बनलो असे होत नाही. तर भारतीय स्त्रीवाद हा अत्यंत भिन्न आहे. भारतीय स्त्रीयांची दास्यत्वाची, गुलामीची मुक्ती भारतीय स्त्रीवादानेच होणार आहे. या भारतीय स्त्रीवादाची प्रतीके आणि प्रेरणा उभे करण्याचे काम डॉ. अशोक राणा यांच्या साहित्याच्या रूपाने होणार आहे. भारतीय स्त्रीवादाचा पाया घालण्याचे काम कॉ.शरद पाटील यांच्या नंतर डॉ.अशोक राणा करत आहेत.
आदिमायेतल्या प्रत्येक मातृदेवता ह्या स्वतंत्र, मित्रता आणि समतेच्या प्रतीक आहेत. या मातृसत्ताक स्त्रीसत्ताक गणराण्यांच्या उकलीतूनच भारतीय स्त्रीवाद सुरू होतो. त्यावर आपले आयुष्य वेचून डॉ.अशोक राणा यांसारखे विद्वान काम करत आहेत हे अत्यंत प्रशंसनीय आहे.
खरे तर अशोक राणा यांचे समग्र साहित्य पुरोगामी तथा डाव्यांनी आपल्या चळवळींचा बेसिक अभ्यासक्रम म्हणून स्वीकारला पाहिजे.आदिमाया तर सांस्कृतिक चळवळ उभी करण्यासाठी दिशादर्शक ग्रंथ ठरणार आहे.यात कुठलीही शंका नाही.
लोकभावना श्रद्धा, आस्था ह्या प्रबोधनाच्या चळवळी चलवणार्यानी समजावून घेतल्या पाहिजेत .डॉक्टर अशोक राणा यांची मांडणी लोकमानाचा, श्रद्धा, अस्थांचा विचार करते. कठोर मांडणी करून लोक मने दुखावणारे काम त्यांनी कधीही केलेले नाही आणि चिकित्सा तर्क करताना मात्र आस्थेपेक्षही संसोधनाला पुरव्याना महत्व दिलेले आहे. हा आदिमाया ग्रंथ भविष्यात नक्कीच लोकमानाची व साहित्तीकांच्या मांडणीची पकड होईल यात किंतू परंतु बाळगण्याचे कारण नाही
पुराणकथा आणि वास्तवता या ग्रंथात धर्मानंद कोसंबी म्हणतात "भारतीय धार्मिक तत्वज्ञानाची मुळे आदिम समाजव्यवस्थेत आहेत हे मान्य करण्याची आणि आदिम काळातून टिकून राहिलेल्या श्रद्धांचे अस्तित्वास सामोरे जाण्यास असणारी देशातील भारतीय विचारवंतांची स्वाभाविक नाखुशी ही बहुदा साम्राज्यशाही काळात सहन करावे लागलेल्या आणि अद्यापही तिची स्मृती जिवंत आहे अशा दडपशाहीची सहज प्रतिक्रिया असणे शक्य आहे."
कोसंबी मंहतात ती विधाने आज तंतोतंत लागू झालेली आहेत. देशभर चाललेला धार्मिक उन्माद,धर्माच्या नावाखाली चाललेल्या दंगली हे पुरोगामी वर्गाने धार्मिक तत्वज्ञानाकडे डोळे झाक केल्याने उदभवले आहे.महत्वाचे म्हणजे याच धार्मिक तत्वज्ञानाकडे डॉ अशोक राणा वळले आणि त्यांनी कोसंबी ची खंत भरून काढली. त्याबद्दल डॉ.अशोक राणा यांचे अभिनंदन ! त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा आणि 'आदिमाया' सर्वांनी अवश्य वाचावी असे वाचकांना नम्र निवेदन...
*********************************
No comments:
Post a Comment