जगभरातील समाज विकासाचा क्रम हा भटकंती करणाऱ्या टोळी समाजाकडून जमाती वा मातृसत्ताक समाज व्यवस्थेकडे, आणि समतावादी स्त्रीसत्ताक समाज व्यवस्थेकडून विषमतावादी पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेकडे वा संस्कृतीकडे झालेला आहे. प्रारंभीक समाज विकासक्रमात अग्रभागी असणारी स्त्री ही पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत दुय्यम ठरवली गेली. शेतीक्षेत्र, कलाक्षेत्र, राजशासन हातात असणारी स्त्री पुरुषांनी शेतीसाठी केलेल्या नांगराच्या शोधानंतर आलेल्या पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत परावलंबी, गुलाम बनत गेलेली आपल्याला दिसुन येईल. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या उदय काळानंतर पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रीयांचे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे, संस्कृतीचे दुष्ट नेनीवेकरण सुरु झाल्याने स्त्रीविरोधी प्रथांचा उदय, स्त्रीयांना हिनत्वदर्शक वागणुक देण्याची सुरुवात याच म्हणजे वैदिक काळापासून मोठ्या प्रमाणावर सुरु झाली होती. पुढील काळात स्त्री म्हणजे अधम योनी, स्त्री म्हणजे नर्काचे द्वार, स्त्रीयांना मोक्षाचा अधिकार नाही. ही भुमीका वैदिकांच्या सांगण्यावरून जनतेने सुध्दा स्विकारल्याचे आपल्याला दिसून येईल. यातुन स्त्रीयांची टिंगलटवाळी सतत होत राहीली. त्यांच्या गौरवशाली वारस्याबद्दल सतत हिनत्वदर्शक बोललं गेलं. याद्वारे स्त्रीयांवरून शिव्या देण्याचा प्रघात मोठ्या प्रमाणावर रुढ झाला. आज घडीला सर्वात जास्त शिव्या स्त्रीयांवरून आहेत. आज आपल्या अवती भोवती बोलताना सहजरीत्या आयला, मायला, मायघाल्या, छिनालिच्या या प्रकारच्या शिव्या वाक्याच्या सुरुवातीला किंवा शेवटीला वापरल्या जातात. यामागे संताप व्यक्त करण्याची भावना जरी नसेल तरिही शिवी मात्र वापरली जाते. आणि ही शिवी स्त्रीवरून असते. बाई वरची शिवी सहज वापरताना त्याबद्दल कुणाला काहीही वाटत नाही.एखादा व्यक्ती कुठल्याही कारणाने पराभुत होत नसेल तर त्याला आई, बहीणीवरून शिवी देऊन घायाळ केले जाते. स्त्रीयोनीवरून शिव्या आाणि पवित्र अपवित्रतेच्या संकल्पना ही पितृसत्तेची देन आहे. आपल्या आजूबाजूचा समाज ही देन, हा वारसा आवर्जून पाळतो.
आज घडीला स्त्रीयांवरून ज्या शिव्या आहेत, त्यातही इतिहासाचे काही तथ्यांश आणि पुरावे असल्याचे आपल्या लक्षात येते. स्त्रीप्राधान्याच्या इतिहासात जे काही उदात्त, उन्नत आणि नवनिर्मीती प्रधान होते, त्याला पुरुषप्रधान संस्कृतीत नकारात्मक, हिनत्वदर्शक उल्लेखले गेले आहे. कमरेखालची भाषा, अभद्र बोलणे, संतापजनक बोलणे, लैंगिक शब्दांचा वापर करून नकार व्यक्त करणे, यांसारख्या बोलीला आपण 'शिवी' संबोधतो. याप्रकारच्या भाषेसाठी वापरलेली शिवी ही संज्ञा शिवाची पत्नी 'शिवी' अर्थात पार्वतीचे ते नाव आहे. पार्वती म्हणजे आदीशक्ती, आदीमाया होय. तिच्या नावावरून 'शिवी' हा शब्द रूढ करणे हे आपल्या मातृसत्ताक वारस्याचे व्यक्तीगत दुष्ट नेनीवेकरण आहे.कमरेखालच्या भाषेसाठी 'शिवराळ भाषा' हा शब्दप्रयोग सर्रास केला जातो. म्हणजे शिवाची भाषा ती शिवराळ भाषा होय. असा त्यामागचा अर्थ असतो. जेते जेव्हा स्थानिकच्या संस्कृतीवर आक्रमण करून विजय प्राप्त करतात. त्यानंतर ते स्थानिकच्या मुलनिवासींच्या पूर्वजांचे, प्रथापरंपरांचे, सभ्यतेचे विकृतीकरण करतात. हरलेल्यांनी कुनाचीच प्रेरणा घेऊ नये म्हणून त्यांच्या पुर्वजांचा वारसा बदनाम करतात. हरलेल्या मुलनीवासींच्या संस्कृतीचे, त्यांच्या महापुरुषांचे विकृतीकरण करून त्यावर जेते सांस्कृतीकरित्या स्वार होतात. स्थानिकच्या मुलानिवासीयांच्या भाषेवर जेते त्यांच्या भाषेचे आधीपत्य निर्माण करतात. जेते हरलेल्यांच्यासाठी हिनत्वदर्शक शब्दप्रयोग करतात. आणि या प्रकारची बोली ते परंपरागत रूढ करून टाकतात. जसे की आर्यांच्या टोळ्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांना या देशात नागरगठठे म्हटलेलं आहे. भारतीयांचा आद्य कुलपुरुष शिव आणि पार्वती यांनाही शिवी आणि शिवराळ शब्दांद्वारे नकारात्मरित्या प्रस्तुत केले गेले आहे.या प्रकारे भाषिक आक्रमणे, सांस्कृतिक अधिपत्यवाद जगभरात झालेला आहे. हे आपल्याकडे भारतातही झालेले आहे. अजूनही होत आहे.भारतात मुळच्या शाक्त, शैव संस्कृतीवर वैदिक इंद्रप्रधान संस्कृतीचे हल्ले झालेले आहेत. त्यातून आर्यांच्या टोळ्यांनी त्यांची प्रतिके, भाषा, संस्कृती द्रविड, शैव, शाक्तांवर लादली होती. किंबहुना आजही लादलेली आहे. त्याचे पुरावे जागोजागी आपल्याला सापडतात. म्हणून भारतीयांच्या गौरवशाली इतिहासाचे पुरावे आज घडीला नकारात्मक रित्या जागोजागी, भाषेत, धर्मग्रंथांत सापडतात. त्याला आपल्याला विधायक उकल करून मांडावे लागेल.
म्हणुन शिव्यांमधुन आलेला नकारात्मक इतिहास आपण विधायक उकल करून सोडवणार आहोत. शिव्यांचा अभ्यास यापूर्वीही अनेकांनी केलेला आहे. हजार हातांचा आक्टोपस या ग्रंथात सुधीर बेडेकर यांनी समाजवादी शिव्यांचा शोध एक आर्टिकलच लिहिला आहे. परंतु शिव्यांमधला मातृसत्ताक स्त्रीसत्ता संस्कृतीचा नकारात्मक भाव आदीबंधात्मक मार्गाने सकारात्मक मांडण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आणि हा आदीबंधात्मक मार्ग वास्तवाच्या अधिक जवळ जाणारा आहे. हा मार्ग इतिहासाची पुनरमांडणी करणारा आहे. त्यापैकी काही शिव्यांचा ऐतिहासीक मार्गाने धुंडोळा घेऊया.
भटक भवानी :-
मराठी भाषेत, ग्रामीण भागात कुठे कुठे वापरली जाणारी ही शिवी आहे. सतत फिरणाऱ्या स्त्रीला, मुलीला खेड्यात भटक भवानी म्हणतात. उग्र वागणाऱ्या,स्वभावाने तापट असणाऱ्या स्त्रीलाही 'भवाने' ही शिवी दिली जाते. दोन स्त्रियांची भांडणे शिव्यांच्या तीव्र टोकावर गेल्यावरही भवाने म्हणून शिवी दिली जाते. मराठी चित्रपट सृष्टीतही ही शिवी वापरून झालेली आहे. एकूण या शिवीचा केंद्रबिंदू तपासायचा झाल्यास. उनाड, कजाग, मुक्त भ्रमन करणारी, निर्भीड, निडर स्त्री म्हणजे भवानी होय. पितृसत्तेत हे गुण असणं काही चांगलं नाही. म्हणून हे चांगले असणारे गुण शिव्या बनल्या आहेत.
शिवी बनायला कुणाचा तरी संदर्भ असावा लागतो. शिवी सहजरीत्या बनत नाही. म्हणून ही शिवी स्वतंत्र राज्यकारभार करणाऱ्या 'भवाणी' गणराज्ञी वरून बनलेली आहे. महाराष्ट्रात 'भवानी' हे संबोधन तुळजेच्या नावा मागे लागते.तुळजा भवाणी याद्वारे महाराष्ट्रात तरी भवाणी शब्द 'तुळजाई' साठीचाच असल्याचे निश्चीती होते. त्यामुळे भटक भवानी ही ग्रामीण बोलीतील शिवी ही स्वतंत्र, स्वावलंबी, निर्भीड, सतत दौऱ्यावर फिरस्ती असणाऱ्या तुळजा भवानीच्या गुणवैविष्ट्यांना नकारात्मक अर्थाने सादर करणारी भाहे.
आजच्या पितृसत्ताक समाजव्यवस्थेत बाईने चाचपून चोचपुन धाकात रहावे, उनाड, निर्भीड असु नये, स्त्री स्वतंत्र असु नये. हा अघोषीत नियम आहे. त्यामुळे मुक्त, स्वतंत्र वागणाऱ्या 'भवणी' मातेवरून पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला हीनवने सुरु झाले होते. आजच्या 'भवणी' या शिवीवरून भवाणीमातेच्या कालखंडातील तिचे गुणवैशिष्ट्ये आपल्या हाती लागतात. भगणी या शिवी बनलेल्या नकारात्मकतेला विधायक सकारात्मक अन्वेषणाने पाहिले की आपल्याला सत्य इतिहास, आपला वारसा हाती लागतो. निर्भिड, निडर, स्वतंत्र नेतृत्व करणारी गणराज्ञी म्हणजे भवानी माता होय. म्हणजे थोडक्यात काय तर शुरविर, धाडसी असणाऱ्या भवानी मातेला आज शिवीच्या रुपाने नकारात्मकतेत लोटले गेले आहे.
रंडकी - चंडकी :-
मराठी भाषेत ग्रामीण भागात रंडकी चंडकी ह्या शिव्या प्रचलीत आहेत. ह्या शिव्या रंडी आणि चंडी ह्या दोन मातृदेवतेवरून रूढ झालेल्या आहेत. संत तुकोबाराय यांच्या एका अभंगात या दोन मातृदेवतांचा उल्लेख आहे. संत तुकोबाराय म्हणतात
" रंडी चंडी शक्ती, मदय मांस भक्षीती "
हया लोकदेवता उग्र स्वरूपाच्या धाडसी निर्भीड होत्या. चंडी कींवा चंडीका तर उग्रदेवी मानली जाते. त्यांच्या स्वभाव गुणावरून रंडकी चंडकी ही शिवी रूढ झाली आहे. तुझा नाश होऊ दे! मागे काहीच न उरु दे! तुझे सर्वकाही संपून जाउ दे! या प्रकारची शापवाणीसाठी तुझी रंडकी होवो ! तुझी चंडकी होतो! अशी शिवी दिली जाते. म्हणजे हया लोकदेवता शत्रुपक्षावर तुटून पडल्यातर त्यांचा सुपडासाफ करत असाव्यात. त्या काहीच शुल्लक ठेवत नसाव्यात. म्हणून पितृसत्ताक समाजव्यवस्थेत त्यांचे कार्यकतृत्व शिवीच्या रूपाने रुढ झाले आहे. युद्धामध्ये आपल्या पराक्रमाच्या जोरावर प्रतिपक्षाची धुळधाम करणाऱ्या स्त्रिया म्हणजे रंडी चंडी होत.
मऱ्या माईचा गाडा येवो :-
मरी आई निऋतीचे एक प्रतिरूप. मरी आई ही प्रत्येक खेड्यात असणारी ग्राम देवता आहे. मरीआई ही लोक परंपरेने जतन केलेली लोक देवता आहे. ती कोणत्याही धर्मग्रंथात नाही.मऱ्या आईचे ठाणे मातंग वस्तीत असते. जरी-मरी हया रोगराई निवारण करणाऱ्या वैदू देवता आहेत. मरी आई ही लिंबाचा पाला, लिंबू, हळद याद्वारे काही रोगांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाली होती. काही साथीचे रोग, हगवन, खरूज यांसाख्खे काही आजारही थांबवण्यात तिला यश आले होते. तिने आपला गणसमाज रोग आणि आजारांच्या खाईतून वाचवला होता. या रोग निवारण करणाऱ्या वस्तू घेऊन ती प्रत्येक गावात जात असे. आणि आपल्या गण समाजातील त्या गावांमध्ये या औषधी जडीबुटींचा वापर करून रोगराई थांबवत असे. पुढील काळात तिच्या प्रचारक स्त्रिया लिंबाचा पाला, लिंबोळ्या, लिंबू, हळद वगैरेंचा गाडा घेऊन याप्रकारे गावात जावून प्रचार करायला लागल्या होत्या. एखाद्या वैदू म्हणजे डॉक्टर प्रमाणे अनेकांच्या घरात जाऊन ही मरी आई उपचार करे. मरणाच्या दारातून आपल्या आपत्यांना वाचवणारी ती मरी आई होय. पुढे तिचे प्रचारक पोतराज आणि देवकरीन स्त्रिया बनल्या. हे पोतराज डोक्यावर मऱ्यामाईचे छोटेसे मंदिर घेऊन गावोगाव फिरत असत. तर देवकरीन स्त्रिया हातात हळदीचा पिवळा डब्बा घेऊन प्रचाराला निघत असतात.कुनाला काही झाजार झालेला असेल तर ते स्वतःजवळील जडीबुटीने औषोधोपचार करत असत. पूर्वी मरीआई भाणि नंतर तिचे प्रचारक देवकरीन व पोतराज, गावावर साथीचा रोग येवू नये म्हणून लिंबाचा पाला आणि वनस्पती मिश्रीत पाणी गावभर शिंपडत असत. हे सर्व विधी वाजत-गाजत होत असत. इतकी स्पष्ट स्वरूप असणारी आरोग्याची देवता पुढे विनाशाचा, रोगराईचा गाडा होऊन येणारी म्हणून नकारात्मरित्या प्रस्तुत केली गेली आणि शिवी बनली मऱ्यामायचा गाडा येवो. म्हणजे तुझी बरबादी होतो. पूर्वी मऱ्यामाईचा गाडा आल्यावर चांगलेच होत असे. सर्वांचे भले होई. लहान मुलांसाठी तर ही जीवदान देणारी डॉक्टर होती. पुर्वी लेकरं वाचत नसतील तर ती मातंग स्त्रीच्या ओटित टाकली जात असत. मातंग आईला स्तनपान पिलेले बाळ निरोगी राही. मरी आईच्या प्रचारक स्त्रिया म्हणजे या मातंग समाजाच्या स्त्रिया होत. त्यांच्याकडे परंपरागत औषधी वनस्पती आणि रोग निवारणाबद्दलचे कला कौशल्य आलेलं होतं. गावातील आडल्या नडल्या स्त्रियांचे बाळंतपण करण्यासाठी या मारी आईच्या प्रचारक स्त्रिया धावून जातात. त्यामुळे मरीआई, तीची परंपरा पाळणारे मातंग हे पितृसत्ताक जातीयवादी समाज व्यवस्थेत अस्पृश्यतेत लोटले गेले. स्वातंत्र्यानंतर तरी ज्यांना प्राथमिक उपचार करण्यात तरबेज असल्याबद्दल डॉक्टरकीचे सर्टिफिकेट द्यायला पाहिजे होते. त्यांना अस्पृश्यतेत लोटलेजाणे हा उलटा सुड आहे. चांगल्या उपकाराची परतफेड उलटा सुड घेऊन करणे दुर्दैवी आहे. अगदीच मऱ्यामायचा गाडा येओ या शिवी प्रमाणे.
संक्रांत कोसळणे :-
संक्रात कोसळणे म्हणजे नुकसान होने होय. 'अमुक व्यक्तीवर संक्रात कोसळली ' या प्रकारच्या वाक्यप्रयोगातून त्या व्यक्तीचे नुकसान झाले, हे आपण मांडत असतो.
आज या शब्दाला प्राप्त झालेला अर्थ तसाच आहे का ? पुर्वर्वीही या शब्दाचा अर्थ तसाच होता का? याचे उत्तर नाही दयावे लागेल. संक्रांत हा शब्द अत्यंत सुबत्तेचा द्योतक आहे. संक्रांत म्हणजे नुकसान होने, बरबाद होने नसुन 'आबाद' होने हे आहे. संकर म्हणजे मिळणे,मिसळणे होय. संकरित शब्दापासून संक्रांत शब्द बनलेला आहे. ती अनेक भाज्यांचा शोध लावत त्या भाज्यांना मिसळून मिक्स व्हेज बनवून वाटत येते.
संक्रांत हा शाकंभरीचा उत्सव आहे. कर्नाटक, आंध्र,तेलेगंणा, महाष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो. संक्रांत हा विविध भाज्या आणि बि-बियान्यांच्या आदान-प्रदानाचा सण आहे. शाकंभरीच्या गणातील प्रचारक स्त्रीयांनी शोधलेल्या नवनवीन भाज्या एकत्र करून शिजवून खाल्या जात असत. या भाजीचा भोगी' नावाचा सण आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी करतो. शोधलेल्या भाज्यांचा भोग घेणारा सण तो भोगी होय. आदल्या दिवशी त्या शोधलेल्या भाज्या शिजवून खायच्या तर दुसऱ्या दिवशी काही फळे भाज्यां व बिया एकमेकींची ओटी भरून संक्रांत साजरी करायची हा रिवाज होता. म्हणून एकमेकींना बी बियाणे, भाज्या भेट देण्याचा संक्रमणाचा सण संक्रांत म्हणून विकास पावला आहे. संक्रांतीला हया भाज्यांच्या बिया आणि काही फळे ओटीला घातले जातात. गाडगे हे सुबत्तेचे, गर्भशयाचे प्रतिक आहे. असे छोटे गाडगे ज्याला 'सुगडे' म्हणतात. आलेली 'सुगी' त्या गाडग्यात भरून स्त्रीया सुगडे घेतात. उखाणे,नावे घेऊन उत्सव साजरा करतात. पर्यायाने त्या स्त्रिया ती सुगी वाटून घेतात. हा सण केवळ आणि केवळ स्त्रियांचाच आहे. पुरुषांचा नाही. ही सुबत्ता, सुगी वाटण्यासाठी, पुर्वी शाकंभरी यायची जीला संक्रांत असे म्हटले आहे. बनशंकरी,संक्रांत ही शाकंबरीचीच नावे आहेत. ही संक्रांत आनंद,उत्साह घेउन सुगी वाटत येत असे. फळे - भाज्या वाटत येत असे . ती मिळवलेल्या ज्ञानाचे वाटप करत येत असे. संक्रमण करत येत असे. म्हणजे नवे ज्ञान ती संक्रमीत करत येते.
म्हणून या एकूण प्रक्रियेत संक्रांत येणे हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. हा शब्दप्रयोग सुरुवातीला विधायक सकारात्मक अर्थाचा होता. नंतर या शब्दाला नकारात्मक भाव प्रदान करण्यात आला.
म्हणून संक्रांत येणे सुबत्तेचे प्रतिक आहे. संक्रांत कोसळणे म्हणजे वाईट होणे, बरबाद होणे, हे चुकीचे आहे. हा अर्थ ब्राम्हणी पितृसत्तेचा खोडसाळपणा आहे. संक्रांत येणे चांगले आहे. वाईट नव्हे. सुबत्तेच्या उत्सवाला बरबादीचा अर्थ प्राप्त करून देने भाषीक षडयंत्र आहे. अभिजनांच्या तुच्छतादर्शक नेनीवेतून या प्रकारच्या शब्दांचे प्रत्यारोपण करण्यात येत असते. पुर्वीच्या शब्दांना तुच्छतादर्शकपणे वापरून नवे आणि चक्क उलटे, विरोधाभाषी अर्थ प्राप्त करून दिले जातात.
बाजार बसवी :-
मातृसत्तेत, स्त्रीसत्तेत स्त्रीयांचे मेळावे भरत असत. सुरवातीला गणवृध्द स्त्रीया रात्रीच्या वेळी सामुहीक संघायण करत असत. अमावस्या, पौर्णिमेला पुष्करणीच्या काठावर बसून शेतीच्या ऋचा आणि काही भौतिक ज्ञानाचे त्या सामुहीक पाठांतर करत असत. मिळवलेले ज्ञान या पिढीकडून पुढच्या पिढीकडे सुपूर्त करण्यासाठी सामूहिक पाठांतराशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या काळी उपलब्ध नव्हता. म्हणून स्त्रिया मिळावे भरवत असत.पुढील काळात हे स्त्रीयांचे मेळे औषोधोपचार, गायण, वादन, नृत्य, जोडीदार निवडण्याठी भरत असत. स्त्रीयांचा मेळा म्हणजे सल्ला, मशवरा आणि सर्वच गोष्टीवर विलाज असे. या मेळ्यात सर्वच गोष्टीवर तोडगा निघत असे. ६४ योगीनींचा काळही बहुतांश भटक्या, प्रचारक स्त्रीयांचा होता. विविध ठिकाणी प्रचार करत भटकणाऱ्या स्त्रीया नवनवीन ज्ञानाचं संकलन करत असत. आणि मग काही महत्त्वाच्या सण-उत्सवांना एकत्र येत मिळविलेले ज्ञान त्या इतरांना वाटून देत असत. यासाठी त्या मेळा भरवत असत. त्यातून त्या ज्ञानाचे आदन प्रदान करत असत.दक्षिण भारतात, महाराष्ट्रात हे स्त्रीयांचे मेळे भरत असत. सौदंती, महुर, वणी, तुळजापुर आदी ठिकाणी स्त्रियांचे मेळे आजही भरतात.
बाजार हा शब्द फारशी भाषेतून मराठीत आला आहे. मेळ्या ऐवजी बाजार शब्द वापरून 'बाजार बसवी' ही शिवी मराठीत रूढ झाली आहे. जी मेळा भरवते, मेळा बसवते ती मेळा बसवी होय. पण 'बाजार बसवी' हा शब्दाचा अर्थ कुत्सित आहे. 'बाजार बसवी' म्हणजे चारित्र्यहीन, स्वताला बाजारत उभी करणारी स्त्री होय. मान मर्तब न ठेवता प्रदर्शन मोडणारी या अर्थाने 'वेश्या' ठरवण्यासाठी बाजार बसवी ही शिवी मराठीत आहे. मेळा बसवणारी एवढी चांगली कृती 'बाजार बसवी' या च्यारित्र्यहीन ठरवण्यापर्यंत का अली, तर पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांनी गुलाम रहावे, घराच्या बाहेरही जाऊ नये हा रिवाज बनला होता.तीने बाजार बसवणे तर दुरची गोष्ट.
आज घडीला जे बाजार भरतात त्याची अदय जननी स्त्रीच आहे. फळे भाज्यांचे बाजार स्त्रीयाच भरवतात. आजही ग्रामीण भागात भाजीपाला व अन्य हस्तश्रमाच्या वस्तु विक्रीला घेऊन बसलेल्या स्त्रीयाच असतात. म्हणून स्त्रीने बाजार बसवणे काही वाईट नाही. किंवा एखादी स्त्री बाजारबसवी असणे हा तिच्या कशी वागते याचा नव्हे तर पुर्वीच्या स्त्रीपरंपरेचा गौरव करणेच होय.
बाजार बसवी ही शिवी केवळ स्त्रियांसाठी आहे पुरुषासाठी नाही. बाजार बसव्या हा शब्दप्रयोग मराठी भाषेमध्ये नाही. म्हणजे पुरुषांचा बाजार बसवण्याशी काही संबंध नाही. खरेदी विक्रीचा बाजार भरवण्याच्या आद्य स्त्रियाच आहेत. शिवाय चारित्र्यसंपन्नतेची कसोटीही स्त्रियांनाच. पुरुष चारित्र्यहीन असला तर त्याला बाजार बसव्या म्हटलं जात नाही. कमालच आहे ना !
कुलटा :-
कुलटा, कुंटिण, कुंटण हया ' चारित्र्यहीन स्त्री' ठरवनाऱ्या शिव्या आहेत. कुंटण म्हणजे वैश्या आणि कुंटणखाना म्हणजे वैश्यागृह होय. कुंटण शब्दाचा अनखी एक अर्थ होतो - मध्यस्थी घडवून आननारी स्त्री. हाही अर्थ तसाच नकारात्मक अर्थाने आहे. व्याभिचारासाठी मध्यस्थी घडवून आणणारी स्त्री म्हणजे कुंटण.
कुंटण, कुटिण, कुंटनखाना या शिव्या कुल्टा या शिवीच्याच अलिकडील काळातील प्रतिरूपे दर्शवणाऱ्या आहेत. 'कुलटा' या शिवीचा अर्थ होतो, दुराचारिणी स्त्री, व्याभिचारीणी स्त्री. किंवा अनेक पुरुषीसोबत संबंध ठेवणारी स्त्री. कुलटा ही शिवी कशी बनली ? आज जो या शब्दाला अर्थ प्राप्त झालेला आहे. पूर्वीलाही तोच अर्थ या शब्दात अंतर्भुत होता का ?
याबद्दल प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील यांनी " दासशुद्रांची गुलामगिरी " या आपल्या खंड १, भाग 1 मध्ये कुलटा ने गणिका नावाचे एक प्रकरण लिहीले आहे. त्यात त्यांनी या शब्दीचे मुळ अर्थ स्पष्ट केलेले आहेत. त्यांनी दिलेले अर्थ असे की " कुलाचा अर्थ गाव असा होतो " तसेच " कुलाचा अर्थ नदीकिनारा असाही होतो." अजून पुढे कॉम्रेड शरद पाटील म्हणतात.
"कुल (कुटुंब) हा शब्द कुष या धातू पासुन निघाला आहे. त्याचा अर्थ मळणे ( तींबणे ) असा होतो. कुलाची तुलना मळलेल्या वा कसलेल्या जमिनीशी केली आहे. "
हा कुल चा प्रारंभीक अर्थ शरद पाटील यांनी दिलेला आहे. स्त्रीसत्तेत ज्ञातींची पुढे कुले बनतात. ही कुले नदीकीनाऱ्या लगतची गाळपेऱ्याची शेती करत विस्तारत जातात. हे विस्तारलेले कुल सातव्या पिढीला फुटून विभक्त होई आणि नवे गाव वसवत असे. शेतीच्या प्रमुख हया स्त्रीया असल्यामुळे शेती करणाऱ्या कुलप्रमुख स्त्रीला कुलपा म्हटले जाई. कुलपा म्हणजे कुलाचे पालण वा आधिपत्य करणारी स्त्री असाच होतो. असे शरद पाटील म्हणतात. पुढे ते म्हणतात
"याचा अर्थ असा होतो की, स्त्री ही कुलाची मुख्य होती. ती कुलाची पुरोहिता या नात्याने कुल जमिनीची सुपीकता वा उत्पादकता संवर्धित करण्यासाठी कृषि-मायेचे विधी करी. " हे विधी करताना विस्तारत गेलेल्या आपल्या अनेक कुलीमधे ती भिक्षाटणाला जात असे. यातून आजच्या पितृसत्ताक दृष्टिकोनातून या कुलाकडून त्या कुलाकडे जाताना ती शीलभ्रष्ट होत असे. म्हणून कुलाच्या प्रमुख असणाऱ्या कुलपेचा विरोधाभासी प्रवास पितृसत्तेत कुलटा म्हणून झाला.
म्हणजे जी ज्ञातीमाता होती. कुलमाता होती. जी एका कुलाकडून दुसया कुलाकडे सुबत्ता होवून जाई. कृषीमायेचे तंत्र घेवून जाई.पुढील काळात ती दुराचारी स्त्री ठरवली गेली. तिला पितृसत्तेने 'शिवीत' परावर्तीत केले. कुलटा म्हणजे चारित्र्यहीन स्त्री म्हणुन.
गणिका :-
प्राचीन मातृसत्ताक स्त्रीसत्ताक कालखंडातील समाज व्यवस्थेमध्ये. गण समाज विकसित झाले होते. गण म्हणजे ज्ञातींचा समुह होय.अनेक कुले आणि ज्ञाती मिळुन गण बने. गणाची मुख्या स्त्री असे म्हणून गणमुख्या ती गणीका होय.
ही गणीका धांन्याचे मोजमापण करून समसमान वाटुन देत असे. जी गणना करते ती गणीका असेही म्हणता येईल. कॉ शरद पाटील म्हणतात ज्ञातीच्या संस्थापिकेवरून गणाचे नाव पडत असे.
गणिका ही गणाची शासनकर्ती होती. प्रमुख होती. अनेक ज्ञातीगण तिच्या आधिकारक्षेत्रात असत. वज्जी हा गण नऊ ज्ञातीचा बनलेला होता. या नऊ ज्ञातीने बनलेल्या गणाची प्रमुख गणिका होती अंबपाली. ती गणवृध्दीसाठी पन्नास कार्षापण होऊन ज्ञातीप्रमुखीकडे रात्रीला जाई, ज्यामुळे वैशालीची अधिक भरभराट होई. ही गणिका अंबपाली देखील सुबत्ता बहाल करणारी, गणवृध्दी करणारी, अंबका म्हणजे आई होती. गणातील प्रजेची आई.
पुढे गणिका (गणवृद्धी करणारी) हा शब्द बदनाम होत गेला आणि गणिका या शब्दाचा अर्थ बनला वैश्या. सुफी सुफलीकरणाचे विधी करणारी, गणाची वृद्धी करणारी, अनेक ज्ञाती, कुळांना एकत्र करून समन्याई राज्य करणारी गणिका पुढील काळात अंधारकोठडीतली वैश्या ठरवली गेली. पितृसत्तेत ती परावलंबी, हीन, कलंकीत बनवली गेली.स्वातंत्र्यातून ती पारतंत्र्यात गेली. जिला आईचा, आंबेचा दर्जा होता, पुढे निला वैश्येचा दर्जा पितृसत्तेत बहाल झाला. म्हणून गणिका शब्दाचा अर्थ मातृसत्ताक स्त्रीसत्ताक कालखंडात चांगला होता. पितृसत्ताक कालखंडात हा शब्द बदनाम करण्यात आला.
गाढव हे निऋतीचे वाहन आहे. माणसाळवलेला सर्वात पहिला प्राणी कोणता असेल तर ते गाढव. मातृसत्तेत स्त्रीसत्तेत स्त्रियांनी गाढवाला माणसाळवण्यात यश मिळवलं होतं. म्हणून निऋतीचे वाहन गाढव आहे. पण गाढवावरून मराठी भाषेत शिवी आहे. दिलेलं काम प्रामाणिकपणे नियमितपणे करणारा प्राणी. अंगावरचे जुने केस गळून पडावेत आणि नवे उगवावेत म्हणून उकिरड्यावर लोळणारा प्राणी. त्याच्या दृष्टीने व्यवस्थित नैसर्गिक जीवन जगणारा तो. पण नेमकं त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध शिवी आहे.काहीच न करणारा, ढ मुलाला आपण गाढवा म्हणतो. गाढव ढ नव्हे. तो प्रामाणिक आणि हुशार आहे. तरीही त्याच्यावरून गाढवा शिवी आहे.
आशाप्रकारे असंख्य शिव्यांमधून आपल्याला गतकाळाचे संदर्भ हाती लागतात. आजच्या शिव्यांमधील आदिबंध आपल्याला विधायक इतिहास बहाल करतात. या शिव्यांच्या उकलीतून आपण इतिहाच्या एका मोठ्या वारस्यापर्यंत जातो.
मराठीत ' सुकाळीची लेक ' ही देखील एक विधायक शिवी आहे. विधायक यासाठी की ही शिवी नकारात्मक भावनेने जरी वापरली जात असेल तरी त्या शिवीचा अर्थ अत्यंत चांगला आहे. सुकाळ म्हणजे सुबत्ता, संपन्नतेचा , भरभराटीचा काळ होय. आशा संपन्न भागातून नांदायला आलेल्या सुनेला 'सुकाळीची लेक' ही शिवी दिली जाते. सुनेचे घरातलं वागणं आघळपघळ असेल, काटकसर न करता ती घरातल्या वस्तू सहज वापरणारी असेल किंवा उधळपट्टी करणारी असेल तर तिला सुकाळीची लेक शिवी दिली जाते. म्हणजे जिला मोजून मापून राहणे, गरिबी, काटकसर माहिती नाही अशी ती सुकळीची लेक.
महाराष्ट्रभरात सर्व दुकानदार, विक्रेते सकाळी सकाळी पाहिले गिर्हाईक करताना, पहीली वस्तु किंवा माल विकताना गिऱ्हाईक जो भाव मागेल त्या भावात वस्तू देऊन टाकतात. गिऱ्हाईक भाव ठरवत असेल, घासाघीस करत असेल तर दुकानदार त्या पहिल्या गिऱ्हाइकाला त्याच्या मर्जीतल्या भावामध्ये वस्तू देऊन टाकतात.हे असे का केलं जातं ? तर ही पहिली वस्तू आईला दान असते आणि आईला दिलेल्या वस्तूचा भाव करायच्या नसतो. तिच्यामुळेच तर हे सगळं वैभव,सुबत्ता आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे पहिली वस्तू आईच्या नावे दान दिली जाते. ही आई म्हणजे आपली कुलदैवत. यासाठी शब्दप्रयोग आहे भवाणी. काही ठिकाणी भवणी, बव्हणी असेही म्हणतात. गिर्हाईकाने भाव तोडून मागितला की विक्रेता म्हणतो "साहेब दया काय दयायचे ते, भवाणीचा टाईम आहे." म्हणजे काय तर हे पहिलं गिऱ्हाईक आईच्या नावाने आहे. भवानीच्या नावे आहे.
या प्रकारच्या छोट्या कृतीतूनही फार मोठा ऐतिहासीक वारसा आपल्या पुर्वजांनी जपुन ठेवला आहे. हे सर्व हाती लागण्यासाठी संशोधनाची एक विधायक दृष्टी आपल्याकडे हवी. आपल्या सांस्कृतीक वारस्यांचा धांडोळा घेण्यासाठी आपण सदैव सजग, जागरूक असले पाहीजे.
नितीन सावंत परभणीकर
9970744142
दिनांक : 5 एप्रिल 2025.
-----------------------------------------------------