Thursday, 20 July 2017

ll अब्राम्हणी परंपरेतील स्त्रीअभिव्यक्ती ll

ll अब्राम्हणी परंपरेतील स्त्रीअभिव्यक्ती ll

नितीन सावंत,परभणी
9970744142

भारतीय संस्कृतीत स्त्रीचे स्थान काय ? तिची अभिव्यक्ती, तिचे मन,तिचे मत काय ? हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी पुस्तकांच्या जगाच्या बाहेर धुंडाळा घ्यावा लागतो. कालपर्यंत,तुमच्या  आईपर्यंत या देशात स्त्रीशिक्षणाची तजवीजच नसेल तर पुस्तकी जगात तुम्हाला स्त्रीवाद काय ढेकळाचा सापडेल काय ? मनुस्मृती आणि चार पुरुषी पुस्तकांच्या आधारे स्त्रीवाद कसा मांडता येइल.त्यासाठी लोकसाहित्य,लोकगिते,शिल्पशास्त्र,मिथके,कथा,रुढी , परंपरा,म्हणी,वाक्यप्रचार,भाषा,शब्द,जत्रा,गावांची नावे,नद्यांची नावे,असा मोठा भौतीकवादी पसारा आपल्या अभ्यासक्षेत्राच्या कवेत घ्यावा लागतो.या अब्राम्हणी प्रवाहांच्या शिवाय स्त्रीवाद मांडनारा अंधाऱ्या खोलीत नसलेले काळे मांजर शोधनाराच म्हटले पाहिजे.

मनुस्मृतीकाराने जरी स्त्रीला 'न स्त्री स्वातंत्र्य मर्हती' म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्याचा आधिकार नाही असे म्हटले असेल तरी त्याच वर्णाश्रम धर्माच्याच काळात वैदिकांच्या नाकावर टिच्चून आमच्या शिल्पशास्त्राज्ञांनी विरहिणी सारखी लिखानकरणारी स्त्रीशिल्पे मंदिरांवर कोरुन आपली अब्राम्हणी नेनीव अभिव्यक्त केली आहे.अब्राम्हणी प्रवाह हा स्त्रीयांचा सन्मान करनारा आहे.तो स्त्रीला आई राजा उदो उदो म्हणून समन्यायाने वाटप करनाऱ्या आईला राजाची उपमा दोतो.

तरी स्त्रीअभिव्यक्ती येथील  व्यवस्थेप्रती कधीच चांगली रहिलेली नाही.ही व्यवस्था तिला मान्य नाही. तिला इडापिडा जाऊन बळीचे राज्य हवे आहे.स्त्रीमन हे सदैव जाचात आणि कोंडमार्यात सापडलेले आहे. त्या स्त्रीला माहेरची आस आहे तर सासरचा तिटकारा.संसार ओझे आहे तर मृत्यु सुटका.

एक कवयित्री म्हनते

आह्यवपणी मरण आले l
आजीच्या माझे सोने झाले l

नवऱ्याच्या आधी आपल्याला मरण यावी.पांढऱ्या कपाळाने जगुन काय उपयोग असली ती धारणा.

स्त्रीची सन्मानजनक  लोकपरंपरा आज समुहगत सुष्ट नेनीवेत बंद आहे. ती पुन्हा उजळवून काढली पाहिजे. तिला लकाकी दिली पाहिजे.

आजही मला आठवते की आम्ही मामाच्या गावाहून निघताना सर्व महिला आमच्या आईला वाटे  लावायला यायच्या.त्याआधी आमच्या मामी आईचे पाय धुत असत.पायाच्या नखाच्या बोटाना कुंकू लावले जाई.नंतर आईला कुंकु लावले जाई. ही माहेरातुन जानार्या लक्ष्मीची आणि तिच्या पायाची पुजा होती.

लक्ष्मीच्या पाऊलनी ये,भरल्याघरातुन लक्ष्मी गेली,असले वाक्यप्रयोग आपन ऐकतोच की.शुभप्रसंगी स्त्रीयांची ओटी भरणे हे सुबत्तेचे प्रतिक आहे.आणि धनधान्याची ती निर्माती असल्याचे प्रतिक आहे.शेतातील धान्याच्या रासीलाही लक्ष्मीची रास म्हंतात.

माहेरात एवढा सन्मान असल्याने.स्त्रीला ते हवेहवेसे वाटने सहाजीक आहे.विवाहसंस्था सुरु होताना नवरा नवरीच्या मागे उभे रहानारे दोन्ही मामे हे मातृसत्तेचे  पाठीराखे आहेत . कारण पाठीमागे उभा रहानारा मामा हा आईचा भाऊ आहे.स्त्रीला आधिकार  नाकारल्यावर तिचा प्रतिनिधी म्हणून भाऊ उभा केल्याचे आपन म्हणू शकतोत.

माहेरचे वर्णन लोकगितांत आणि जात्यावरल्या ओव्यांत खुप येते.
आपला भाऊ कसा वाटतो तिला तर ...

विसाची चंची तिसाचा कात,
शंभाराची पानं,लवंगा सात l
बंधू रस्त्याने चालला पान खात ll
नगरच्या नारी ग बघती भिरीभिरी

भाऊराया बद्दल किती कौतुक आणि गोडवा आता हेच पहा ना ..

आम्ही दोघी बहिनी दोन बाजूच्या बारवा l
मधे जोंधळा हिरवा,भाऊराया ll

आई वडिलांचे राज्य कसे होते आणि भाऊजय आल्यावर कसी आपली सत्ता चालत नाही त्यावर डोळस स्त्रीमन अभिव्यक्त होताना म्हनते.

"आई बापाच्या राज्यात तांब्या तुपाचा केला रिता l
भाऊजयीच्या राज्यात नाही पाण्यावर सत्ता ll

आपल्या माहेरच्या वाटेचे सुद्धा किती कौतिक आहे बरे स्त्रीच्या अभिव्यक्तीत.

"ही नव्हे माहेरची वाट,इथं बाभळी बन बहुदाट l
माझ्या ग माहेरच्या वाटे,केळीचं बन बहु दाट ll

आन सासरच्या वाटेबद्दल विचाराल तर ..

सासरच्या वाटे कुचु कुचू काटे.

पुरुष म्हंतात एवढी माहेरची गोडी आहे तर सासरी का नांदायला येता मग.
त्यावर उत्तर देताना जात्यावरली स्त्री म्हनते ..

दे रे योग्या ध्यान,ऐक काय मी सांगते l
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते ll

शेजारणीशी कधीमधी कुरबुर होत असेल पन स्त्रीला मन मोकळे करायला शेजारीन हवी आहे.म्हणून ती म्हनते.

शेजारणीबाई एका दाराने वागू l
ओसरीला खेळे तुझी मैना माझा राघू ll

हे झाले स्त्रीचे स्त्रीबद्दलचे मत किंवा माहेरबद्दल मत पन ग्रामीण स्त्रीला पुरुषाबद्दल काय वाटते.

कडु विंद्रावन डोंगरी त्यांचा रहावा l
पुरुषाचा कावा,मला यडिला काय ठावा ll

कडु विंद्रावन आपुल्या जागी नटे l
त्याच्या अंगिचे गुण खोटे ll

ही आहेत पुरुषीव्यवस्थेबद्दलची स्त्रीयांची मते.

जीवाला जिव देते जीव देवून पाहिला l
पाण्यातला गोटा अंगी कोरडाच राहिला ll

कावळ्यान कोट केल,बाभूळबनामंदी l
पुरुषाला माया थोडी,नारी उमज मनामंदी ll

लोकसाहित्यात रामापेक्षाही सिता मोठी आहे.तिचे मोठेपण आमच्या मायमाऊलींनी गाइले आहे.

राम म्हणून राम नाही ग सिता मातेच्या तोलाचा l
सिता मोठी हिरकणी राम हलक्या दिलाचा ll

अशा अनेक लोकसाहित्य आणि साधनांच्याद्वारे भारतीय स्त्रीमन आपन समजून घेवु शकूत.
मिरा,जना,कान्होपात्रा, चोखोबारायांची पत्नी सोयराबाई,संत नामदेवांच्या कुटूंबातील राजाई, गोनाई,लाडाई,लिंबाई,या सर्व स्त्रीअभिव्यक्ती समजुन घेवून आलीकडे खुप मोठे संशोधन पुढे आले आहे.या स्त्रीपात्रांच्याद्वारेही आपन मध्ययुगीन भारतातील भौतिकवादी मांडणी करु शकुत.नव्हे ती मांडणी मोठ्याप्रमाणावर व्हायला हवी.

********************************

Thursday, 13 July 2017

शपा, शाक्त आणि तुकोबा

शपा, शाक्त आणि तुकोबा 


 नितीन सावंत , परभणी                    

 9970744142


            गेल्या काही वर्षात मानव मुक्ती मिशन या सौत्रांतिक मार्क्सवादी गटाच्या सौजन्याने सोशल मिडियात कॉम्रेड शरद पाटील यांच्या विचारांची मोठी रेलचेल सुरु आहे.विविध लेख व नवी सैध्दांतिक मांडणी आम्ही कॉ.शरद पाटील यांच्या साहित्याच्या द्वारे करत आहोत.

        त्या आधी मात्र महाराष्ट्रातील दिग्गजांनी शपांच्या (काॅ. शरद पाटील) बाबतीत अगदी मौन बाळगलेले होते.इतके की त्यांच्या ग्रंथांचे रेफ्रंस घ्यायचे नाहीत की त्यांच्या संकल्पनांवर आपली मांडणी करायची नाही हे त्यांनी ठरवलेले होते.एवढेच काय जनमानसात त्यांचे नाव चुकूनही घ्यायचे नाही,इतका काटेकोरपणा काही 'मोठी' मंडळी पाळत होती.

        आम्ही जेव्हा या मैदानावर येवून हाच प्रश्न विचारला की शपांना तुम्ही का डावले आहे ? शरद पाटील तुम्हाला का चालत नाहीत ? तेव्हा त्यांची भंबेरी उडाली. आणि,मग 'चोराच्या दाढीला कापुस' लागल्याप्रमाने सगळे चोर,आमचे कसे शपांशी चांगले संबंध होते, हे दाखवायला लागले.

         त्यासाठी, शपांच्या पत्रांचे दाखले, कोटेशन,आणि त्यांची विधानेही वापरायला सुरुवात झाली.हे सगळे केव्हा सुरु झाले तर लोकांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली,तेव्हा. काही म्हनतील हे गिल्टी फिलिंग होते, नाही. ही तर त्यांची बदमाशी होती.

            खेदाने म्हनावे लागत आहे की काही लोक शपा मरण्याची वाट पहात होते. काहींना तर यामुळे रान मोकळे झाले. शपांची जी मांडणी आहे ती मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादाच्या डोळ्यांना,अब्राम्हणी-विधायक- बहुप्रवाही दृष्टीकोन देत इतिहासाचे अन्वेषण करनारी आहे.त्यामुळे,ते भारतीय अब्राम्हणी प्रवाह मांडताना कुठल्याही काळात आपली 'इमोशन्यालिटी' अडकवुन ठेवत नाहीत.निरपेक्षपणे, तटस्थतेने ते इतिहासाचे पट उलगडत जातात. इतिहासाच्या गर्भातील अनेकानेक शक्यतांना आपल्यापुढे उभे करतात.


      नेनीवेच्या खाईत लोटल्या गेलेल्या तांत्रिकीच्या प्रवाहाला उलगडताना त्यांनी अब्राम्हणी प्रवाहातील सर्व पंथांची दखल घेतलेली आहे. त्यात स्त्रीराज्याची सुरवात ते मावळतीचा टप्पा आणि शाक्त परंपरा ते वारकरी, नाथ, महानुभाव, लिंगायत हे सर्वच पंथ त्यांनी संशोधनासाठी पुढे ठेवले आहेत. शरद पाटील यांच्या या प्रकारच्या मांडणीवर आक्षेप होते तर ते असतानाच डिबेट व्हायला हवी होती, मात्र विरोधकांना तेवढी छाती नव्हती. 


        शक्तीचे उपासक ते शाक्त,म्हणजे स्त्रीसत्ताक,मातृसत्ताक परंपरा जोपासनारे शाक्त होत.दुर्गा उत्सव हा शाक्त परंपरेतील सर्वात मोठा सण आहे.शाक्त परंपरा ही खुप जुनी आणि व्यापक आहे. 


          मातृसत्तेतुन स्त्रीसत्ता व स्त्रीसत्तेतून पुरुषसत्ता येताना आधीच्या प्रथा परंपरा बंद झाल्या आणि नव्या प्रतिकात्मक प्रथा रुढ झाल्याचे आपल्याला दिसेल. स्त्रीसत्तेचा वेष धारण केलेले पोतराज व तृतीयपंथी याचे उदाहरण म्हणून आपन पाहू शकतोत. म्हणून मुक्त, स्वैर- संभोग करनारी रानटी टोळी कुटुंब व्यवस्थेत येताना सहचारी किंवा सहचारिणी निवडायला लागली.पुढील काळात विवाहसंस्था जन्माला आली.आम्रपाली ही मावळती स्त्रीसत्ता व उगवत्या पुरुषसत्तेच्या काळातील जनपदकल्याणी आहे, वैशालीची 'निमीत्तमात्र' नगरवधू .


             इतिहासाची मांडणी करताना कुणाला तो काळ आज जशाला तसा हवा असतो का ?? एखादा अज्ञानीच तशी अपेक्षा करील.


           शपा जेव्हा शाक्तांची मांडणी करतात, तेव्हा त्यांना तो काळ, आज जशाला तसा हवा असतो का ?? नसतो. त्यामुळे, त्यांनी केलेल्या शाक्तांच्या मांडणीवरुन स्त्रीनिंदेची जी  चिखलफेक केली जाते आहे ती अकारण आहे. तसाच प्रश्न या निंदकांना जर केला की,आपल्या घरातील कुनाला आम्रपालीसारखी नगरवधू बनवनारी भूमिका घ्याल का ?? प्रश्नाचे उत्तर मिळण्याची खात्री देता येणार नाही.


              शाक्तांची मांडणी, त्याकाळातील विषमतेविरोधातील घडलेल्या घडामोडींचा लेखाजोखा घेण्यासाठी शपांनी केलेली आहे.विद्वत्तेसाठी नाही. या शाक्त परंपरेत ब्राम्हणी उच्छाद झाल्याने त्यात पंच 'म' कार घुसले आहेत. जातिव्यवस्था टिकवूनही हे उच्छाद करण्याची सोय यामध्ये आहे.म्हणून पंच म कार आज कुनाला हवे असतात का ? 


        गरिब,सर्वसामान्य शाक्त जे गृहस्ती होते, गावगाड्यात रहानारे होते,ते करतील का मैथुनाचा उच्छाद,करतील का मांसाहाराचा उच्छाद,करतील का मद्याचा उच्छाद ? हा उच्छाद माजला गेला तो शाक्त परंपरेतील पुरोहित वर्गात.ग्रहस्थी शाक्त यात दोषी नव्हे.


          आलीकडल्या काळापर्यंत शाक्त परंपरा पाळणारी आनेक घराणी कोकणात व अन्यत्र होती. टिकाकारांच्या म्हणण्याप्रमाणे ते ही आनाचारीच का मग? म्हणून ब्राम्हणी शाक्तांवरुन केली जाणारी टिका निरर्थक आहे. या संदर्भात कॉ शरद पाटील यांनी पंच 'म' कार ब्राम्हणी असल्याचे आधीच विषद केलेले आहे.


       एवढेच काय हल्ली तुकोबारायांचे शाक्तांच्या टिकेवरले चार दोन अभंग देवून शाक्तांवर जी टिका केली जाते ते अभंगही घुसखोरीतले,प्रक्षिप्त असल्याचे शपांनी मांडले आहे.आणि ही शपांची मांडणी स्वबचावासाठी अनेकांनी वापरली सुद्धा आहे.


       संत तुकोबारायांच्या पहिल्या गाथ्याच्या नशिबी इंद्रायणीचा डोह आला आणि संत जगनाडे महाराजांनी लिहीलेला दुसरा गाथा अगदी दोन शतके उलटून गेल्या नंतर आलेकझ्यांडर ग्रांट या इंग्रज अभ्यासकाने १८६९ रोजी गाथा प्रकाशित केला.


            मधल्या काळात हा गाथा कुठे होता? कुनाकुनाच्या हातून हा गाथा इंग्रजांच्यापर्यंत आला.काही कल्पना नाही.प्रबोधनकार ठाकरे 'ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास' मधे म्हणतात "हवा असलेला मजकूर घुसडण्यासाठी आणि नको असलेला मजकूर काढण्यासाठी सांगलीत एक गिरणच होती " मग तुकोबारायांच्या गाथ्यात काय काय बदल झाले असतील,  म्हणून त्या गाथ्यातून आपल्या हव्या त्या दोन-दोन ओळी घेऊन काही तुकोबांचे समग्रदर्शन होत नाही.त्यासाठी भौतिक अंगाने वारकरी सांप्रदायाचा अभ्यास करावा लागतो.


             तुकोबारायांची शाक्तांच्यावर केलेलेल्या टिकेची एकप्रवाही बाजु मांडणारे सदानंद मोरे आपल्या तुकाराम दर्शन मधे 'अधर्माचे उघड पिक' नावाच्या प्रकरणात तुकोबारायांनी शाक्तांवर केलेल्या टिकेचे काही अभंग सदानंद मोरे यांनी पुरावे म्हणून दिलेत.तुकोबाराय कसे शाक्तांचा समाचार घेतात हे दाखवताना मोरेनी जे अभंग दिलेत त्यात त्यांनी


 " सांडोनिया राम राम l ब्राम्हण करती दोम दोम ll " 

हे एका अभंगाचे चरण पुरावा म्हणून वापरलेले आहे.


हा अभंग खालीलप्रमाणे आहे.

ऐसीया कलयुगाच्या मुळे l झाले धर्माचे वाटोळे ll 

सांडोनिया राम राम l ब्राम्हण करती दोम दोम ll

शिवो नये ती निळी l वस्त्रे पांघरती ती काळी ll 

तुका म्हने वितृ l सांडुनिया गदा मागत जाती ll 


           या अभंगात कुठेही शाक्त शब्दाचा उल्लेख नाही.एवढेच काय जे वर्णन आले आहे ते शाक्तांना लागुच होत नाही. कलयुगामुळे धर्माचे वाटोळे झाले आहे.हा पहिल्या चरनाचा अर्थ.दुसऱ्या चरणाचा अर्थ होतो.ब्राम्हण लोक आपला ईश्वर राम सोडुन आता दोम दोम करत म्हणजे फिकीरी करत फिरत आहेत.म्हणजे ब्राम्हण वर्ग मोठ्याप्रमाणावर जाहिररित्या इस्लाम स्विकारत आहेत.दोम दोम हा शब्दप्रयोग सुफी आणि दर्गांचे प्रचारक फकिर लोक करतात.फकिर लोकं अंगणात आले की आपल्या पात्रात राळीचा धुर करत दोम दोम म्हनतात.मोरे मात्र हा अभंग शक्तांच्या टिकेत कोंबून बसवतात. तिसरे चरण स्पष्ट निर्देश करते की काळी वस्त्रे पांघरून हे ब्राह्मण लोकं दोम दोम करत फिरत आहेत.आजही हे प्रकार फकिर लोक करतात.हा अभंग शाक्त विरोधी कसाकाय होतो हे मोरेंनी स्पष्ट केले पाहिजे.बरे हा अभंग शाक्त विरोधी टिकेतला आहे असे आपण थोड्यावेळासाठी मान्यही केले तरी आनखी एक आफरातफर आपल्या निदर्शनास येइल .

देहु संस्थानच्या अभंगगाथेत जेव्हा आपण हा अभंग शोधायला जातो तेव्हा. एसें कलियुगाच्या मुळे या शिर्षकाखाली  'ए' च्या अनुक्रमणिकेत ९८७ क्रमांकावर आपल्याला हवा असलेला वरिल अभंग मिळेल असे सुचित केलेले आहे.आता मजेशीर बाब असी की आपण जेव्हा या क्रमांकावर म्हणजे नऊशे सत्यांशी क्रमांकाच्या अभंगावर देहु संस्थानच्या संत तुकाराम महाराज यांच्या गाथेत डोकावतो तर तिथे आपल्याला दुसराच अभंग नोंदवलेला दिसतो.तिथे ऐसें कलियुगाच्या मुळे हा अभंग नसुन , दुसराच म्हणजे अनुरेनुनिया थोकडा l तुका आकाशा एवढा l हा अभंग आहे. 

आता आपण जेव्हा उलट तपासणी करत जातो म्हणजे काय तर हा "अनुरेणीया थोकडा " अभंगक्रमांक शोधायला जातो तर अ च्या अनुक्रमणिकेत याही अभंगाचा नंबर तोच म्हणजे ९८७ च दिलेला आहे.थोडक्यात काय हा सदानंद मोरे यांनी दिलेला अभंग त्यांनीच संपादित केलेल्या गाथेत अभंग नाही.

       अनुक्रमणिकेत नोंद करायची नाही परंतू अभंगच उपलब्ध करुन द्यायचा नाही.वर हा अभंग रेफ्रंस म्हणूनही वापरायचा हा कमालीचा दुटप्पी पणा मोरे करतात.


         संबंध तुकाराम दर्शन मधे जागोजागी अशाच अफरातफरी,बनवाबनवी मोरेनी केलेली आहे.त्यावर मी अन्यत्र लिहील.तूर्तास तुकोबारायांच्या नावे ही मंडळी जी शाक्तांवर टिका करते ती एकप्रवाही आहे.तुकोबाराय न समजून घेता एककल्ली बाजु मांडण्याचा प्रकार आजतागायत चालु आहे.


        तुकोबाराय हे वारकरी सांप्रदायाचे एक पैलू आहेत.तो सबंध सांप्रदाय डावलून आपल्याला एकट्या तुकोबारायांच्या चार दोन घुसखोरीतील अभंगांवरुन शाक्तांची मांडणी करनाऱ्या शपांना कसे खोडता येइल.इतर संत शाक्तांच्या संदर्भात काय भूमिका घेत होते हे सुद्धा पाहिले पाहिजे.किंवा संबंध सांप्रदायाची तेव्हाची भूमिका विचारात घेतली पाहिजे. 


           सर्वात महत्वाचे म्हणजे संत तुकोबाराय काय एकटेच मोजपट्टी आहेत का? म्हणजे तुकोबाराय म्हटले की झाले का?? संत नामदेव आणि त्यांचे संत मंडळ विचारात घेनार की नाही.सांप्रदायातील इतर संतांचे काय ?  हा तर जातीवाद आहे,फक्त उच्चजातीय संत,आपलेच संत पुराव्यासाठी वापरायचे इतर संतांची दखलही घ्यायची नाही.हा जातीवाद आहे.संत तुकोबाराय वारकरी चळवळीचे पुढील काळातील प्रचारक आहेत.त्या आधीचे संतही विचारात घ्यावे लागतीलच की. 


संत तुकोबाराय, संत नामदेवांना प्रेरणा मानतात.ते म्हणतात,


"नामदेवे केले स्वप्नामाजी जागे l 

सवे पांडुरंगे येवुनिया l

सांगितले काम l करावे कवित्व ll

वावगे निमीत्य l बोलू नये ll


             तुकोबाराय हे संत नामदेवांनी उभ्या केलेल्या वारकरी परंपरेच्या साच्यावर उभे आहेत.तुकोबांना अभिव्यक्त होण्याची संधी नामदेवांनी सुरु केलेली किर्तन व अभंग परंपराच देते.म्हणून तुकोबाराय ज्या नामदेवांना प्रेरणा मानतात, ते नामदेवराय शाक्त परंपरेचे मुख्य ठिकाण श्रीशैल्यमबद्दल गौरवपूर्ण भाष्य करतात.त्या ठिकाणाला भेट देण्याचा मनोदय व्यक्त करतात.ते म्हणतात,


"साठी सहस्त्र विघ्नांवरी l शिवनाम पंचाक्षरी ll

तो पर्वत राजा कै देखेन l जेथे असे मल्लिकार्जुन ll

भक्तीभावाचे अंजन l साधावया निधान ll

मन मारुनी देइल बळी l साधावया  चंद्रमौळी ll

भ्रांतीपाटा फिटला l शिवमार्ग देखिला ll

नामा पायाळ हो भला l तेने मलयानिध देखिला ll


( संत नामदेव सरकारी अभंगगाथा अभंग क्र. ६०१ )


             या अभंगात संत नामदेव शाक्तांचे मुख्य केंद्र श्रीशैल्यमला भेट देण्याचा मनोदय व्यक्त करतात. त्यासाठी तिथे बळी द्यावा लागतो म्हणून ते मनाचा बळी देण्याचा संकल्प सोडतात.आता टिकाकारांना नामदेव पुरावा म्हणून नको आहेत काय? नामदेव नाकारण्याचे कारण ते शिंपी होते हे आहे काय ?? शाक्तांचा गौरव करणारे नामदेव चालणार नाही का ?


          शिवरायांनी श्रीशैल्यमलाही भेट दिली होती. ते तर तुकोबारायांच्या प्रभावक्षेत्रातील होते. तुकोबाराय शाक्तांवर टिका करूनही शिवराय मात्र शाक्तांच्या नगरीत श्रीशैल्यमला का जातात ???


         शाक्तांचे प्रमुख उपास्यदैवत कुळीची कुळदेवी असते. समग्र शाक्त निंदा करणाऱ्या टिकाकारांसाठी तुकोबारायांचाच पुरावा पुरेसा आहे.त्यांच्यासाठी शाक्तांची प्रेरणा कुळदेवी बद्दल तुकोबाराय म्हणतात


कुळींची ही कुळदेवी |केली ठावी संतांनीं ||१||

बरवें झालें शरण गेलों |उगविलों संकटीं ||२||

आणिली ही रूपा बळें |करूनि खळें हरिदासीं ||३||

तुका म्हणे समागमें |नाचों प्रेमें लागलों ||४||


मग तुकोबाराय समग्र शाक्त द्वेषी होते असे म्हनता येतील का ?


त्यांचा अनखी एक अभंग पुढीलप्रमाणे आहे.


धाव घाली आई l आता पहातीस काई ll

धिर नाही माझे पोटी l झालो योगे संपुटी ll

करावे शितळ l बहु झाली हळहळ l

तुका म्हने डोई l कई ठेवील तुझे पाई ll


आता तुकोबाराय शाक्तांच्या मुख्य प्रेरणेलाच अळवतात तर बाकीचे काय घेवून बसावे ?


            बरे संपूर्ण नाथ संप्रदाय शाक्तांच्या राज्यातुनच बहरला वाढला.नाथांचे महागुरु मच्छिंद्रनाथ हे श्रीशैलमवर खुप काळ राहिले होते.त्यांचे शिष्य गोरक्षनाथ आपल्या गुरुला स्त्रीराज्यातुन हुडकून काढायला आले असता त्यांची शिष्या महायोगिनी मुक्ताबाई बनल्या होत्या.त्या महायोगिनी मुक्ताबाईंचा श्रीशैल्यमवर आश्रम होता.मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ व महायोगिनी मुक्ताबाई यांची या शाक्त नगरीत मोठी चर्चा झाली.पुढे महानुभावांचे सर्वेसर्वा चक्रधरस्वामी एक तप म्हणजे १२ वर्षे श्रीशैल्यमला होते.एवढेच काय लिंगायत धर्माचे अल्लमप्रभु यांचेही वास्तव्य श्रीशैल्यमला होते त्यामुळे आल्लमप्रभू यांची समाधी श्रीशैल्यमला आहे.या महायोगीनी मुक्ताबाई आल्लमप्रभु व संत चक्रधरस्वामींनाही भेटलेल्या होत्या . संत नामदेवांना ज्यांनी गुरूपदेश केला ते विसोबा खेचर हे चांगा वटवेश्वर आणि कृष्णनाथ या द्वारे शाक्त नगरी श्रीशैलच्या योगीनी मुक्ताबाईंचे शिष्य होते.ती मुक्ताबाई ज्ञानेश्वरांची बहीण नसून या महायोगिनी मुक्ताबाई होत. म्हणून नामदेव श्रीशैल्यमला भेट देण्याचा मनोदय व्यक्त करतात. म्हणजे नाथ,वारकरी,लिंगायत, महानुभाव,या सर्व पंथांचा दुवा महायोगिनी मुक्ताबाई होत.


           म्हणजे शाक्तांच्या राज्यात तत्वज्ञानावर महाडिबेट होऊन हे सांप्रदाय ब्राम्हणी छावणीला टक्कर देण्यासाठी देशभर पसरले. या संदर्भात 'श्रीपर्वताच्या छायेत' या ग्रंथात रा. ची. ढेरे यांनी सखोल मांडणी केली आहे.


नाथ, वारकरी, लिंगायत, महानुभाव हे संप्रदाय शाक्तांचीच देन आहेत. आदिनाथ उमा बिज प्रगटले हे वारकरी नित्यनेमाने म्हनतातच की. 


      म्हणून संत तुकोबाराय किंवा संपूर्ण संत शाक्त परंपरेतील आनाचारावर निश्चित टिका करतात.परंतू मुळ परंपरा नाकारत नाहीत.त्यांनी गुरु शिष्य परंपरेतील आवडंबरावरही टिका केलेली आहे.परंतू थेट गुरु शिष्य परंपरा नाकरलेली नाही.


     शाक्त परंपरा ही आपल्या इतिहासाच्या मुळापर्यंत नेनारी महान सांस्कृतिक परंपरा आहे.तिच्या शिवाय भारतीय मनुष्यमन विकसीतच होऊ शकलेले नाही.औषधी वनस्पती , भाज्यांचा शोध लावणाऱ्या शाक्त स्त्रीया होत्या. हे शाक्तांची खरुज आलेले मान्य करोत न करोत.


आमची हरिती-मरिमाय त्या श्रीशैल्यमची गणराणीच यांची मनातील खरुज घालवेल यात शंकाच नाही.


१५/१२/२०१९


नितीन सावंत , परभणी

अध्यक्ष मानव मुक्ती मिशन

9970744142


Friday, 7 July 2017

परकायाप्रवेश

ll परकायाप्रवेश ll

कॉ शरद पाटलांच्या साहित्यात परकायाप्रवेश हा शब्द नेमाडेंच्या कोसलाचे समीक्षण करताना शेवटी येतो.

तसा हा शब्द कॉ राजकुमार घोगरे यांच्या तोंडून आनेकवेळा कानी गेला आहे.

पण हा शब्द जगायला मिळाला तो दिंडीत.पंढरीच्या वारीत.

एवढ्या सत्यवादी परिवर्तनाच्या चळवळी आपन चालवतो मग त्या अल्पजीवी का ठरतात ? त्याचे मुख्य  कारण हेच आहे,की
आजूनही आपन परकायाप्रवेश करु शकलेलो नाहीत.

वारीला जाताना मी ठरवलेले होते.सामान्य वारकरी जसे जगतात अगदी तसेच जगायचे.अगदी खडतर वृत्त घेवून.

कधी कधी आंगाखाली काहीही न घेता तसेच झोपावे लागले.एकदा खुप गारठा पडला,थंडी वाजली.त्या दिवसी किर्तनात आलेल्या सत्काराच्या शालीवर रात्र काढली .
आसाच असतो परकायाप्रवेश.ते जगतात अगदी तसेच जगणे,ते खातात तेच खाने.हे मी गेले चार वर्षे झाले करत आहे.
कुठलेही पाणी प्या,जे मिळेल ते खा.दिवसभर आंगावर उन घेवून तासंतास चालत राहायचे.एकूण सर्व दिवसांचा प्रवास ५०० शे १००० किमीचा.
रात्रीला पाऊस आला तर राहुट्या किंवा उघड्यावर भिजायचे.

हे त्याग आणि समर्पित जीवन लोकांना तत्वज्ञानापेक्षा जास्त जवळ करते.लोकांना ज्ञानापेक्षा त्याग हवा हे जेव्हा मला कळले तेव्हा धक्काच बसला.आणि उदाहरण म्हणून दिसले ते संभाजी भिडे.

तुम्ही कितीही शिव्या द्या.पण तुम्ही भिडे गुरुजींचे चेले बदलवू शकत नाहीत.कारण भिडे गुरूजींच्याकडे ही परकायाप्रवेशाची कला आत्मसात आहे.त्यांनी पायात कधीही चप्पल बुट काहीही न घालता,साधा पोशाख करुन, मळकट कळकट कपडे घालून या परकायाप्रवेशाद्वारे हजारो संभाजी भिडे तयार केले आहेत.अगदी असेच खडतर वृत स्विकारून.

हि कला कॉ शरद पाटलांना सुद्धा अवगत होती.म्हणून तर आदिवासींना ते प्रिय होते.शपांनीही खडतर व्रत्ताद्वारे आदिवासींच्यात परकायाप्रवेश केला होता.त्यासाठी त्यांना उपाशीतापाशी रहावे लागले,एकदा तर ते रात्रभर पिकाच्या भुस्यात थंडीपासून बचावासाठी झोपले.पायात खुरुप आणि काटे घेवून ते जगले.
आणि तुम्ही मात्र घरातल्या ए सी खुर्चीवर बसुन वारकऱ्यांची टिंगल टवाळी करता.या तुमच्या नास्तिकवादाने लोक जोडले जातील काय ? कोनता आजेंडा आहे तुमच्याकडे हे गरिब कष्टकरी लोक जोडनारा.तुमच्या कोरड्या तत्वज्ञानाने हे जोडले जातील काय ??

भिडे गुरुजींच्या चेल्यांना तुमचे तत्वज्ञान सांगून एक तरी बदलून दाखवा बरे.

जोपर्यंत परिवर्तनवादी चळवळीत ही परकायाप्रवेशाची कला घेवून कुणी त्याग आणि समर्पण करायला तयार होत नाही तोपर्यंत सामाजिक चळवळी जैसे थेच रहातील.एकेरी नास्तिकवादातून फक्त टिका करत बसायचे बाकी काम शून्य...

नितीन सावंत , परभणी
9970744142