Thursday, 25 July 2019

♦शहागड आणि संत शहामुनी

♦शहागड आणि संत शहामुनी

शाहगढ,जालन्यापासुन ५७ किलोमीटरवर तर अंबडपासुन अवघ्या ३१ किलोमीटरवर असनारे एक ऐतिहासिक गाव.जालना,अंबड कडुन बीडकडे जाणाऱ्या रोडवर भरपूर वर्दळ असनारे हे मोठे गाव.शहागड तसी ग्रामपंचायतच परंतू अगदी शहरीकरण झालेले गाव.सुरुवातीलाच भव्य कॉप्लेक्स, दुकाने आपले लक्ष वेधून घेतात.गावात ८०% मुस्लिम तर २०% इतर.गोदावरी नदिच्या अगदी किनाऱ्यावरवर वसलेले हे गाव आहे.पैठणच्या बाजारातील नावलौकिक पावलेली पैठणी याच गावी तयार होत असल्याचे बोलले जाते.त्यासाठीचा नदीच्या पात्रातील मोठा ओटाही दाखवला जातो,ज्याद्वारे रंगरंगोटी केली जाई,रेशीम काढले जाई असा दगडी ओटा अजही नदीपात्रात दिसतो.या गावाला पुर्वीला भव्य अशी तटबंदी होती.गावाच्या एका बाजुने वळन घेवून गावाच्या पाठीमागून निघून जानारी गोदावरी नदी तर दुसऱ्या बाजुने ओढ्याच्या स्वरूपात खंदकासाखे पाणी वळवलेले दिसेल.यामधे उंच तटबंदीवर शाहगढ वसले आहे.गावाच्या सुरुवातीलाच जुण्या भव्य अशा वेशीचे अवशेष आजही पहायला मिळतात.गावात शिरताना मोठा दरवाजा लागतो.त्या दरवाज्याच्या बाजुच्या भिंतीवर उर्दुत एक शिलालेखही आहे.तटबंदीच्या आतले गाव आता विस्तारत जावून मोठा आकार घेतलेले आपल्याला दिसेल.गाव वेशीतुन आत जाताना ग्रामीण ढंगाची सांस्कृतिक रचना,बोली,पडकी घरे,खेळनारी मुले मुली आपले लक्ष वेधून घेतात.अगदी सर्वत्र चिवचिवाट.गावच्या आतुन गेल्यानंतर मागच्या शेवटच्या टोकाला उंच गढीवर फक्त ज्या गढीच्या दवाज्याची कमान उरलेला एक पडका वाडा आपल्याला दिसु लागतो.याच उंच किल्लावजा गढीवर आपल्याला संत शहामुनी यांची समाधी आर्थात दर्गा किंवा मजार आपल्याला पहायला मिळेल.या दर्गाच्या देखभालीसाठी संत शहामुनी यांचे ९ वे वंशज जावेद शेख या गढीवर रहातात.त्यांनी संपूर्ण गढ फिरुन दाखवला.संत शहामुनी यांच्या वंशजांपर्यंत घेवून जाण्याचे काम मुक्तदिर बागवान यानी केले त्यांनी संपूर्ण गाव फिरुन दाखवला.यावेळी हा वारसा बघण्यासाठी या गावापर्यंत घेवून गेले ते रामेश्वर चंद व सोबत जालण्याचे संदिप शिंदे ही होते.त्यांच्यामुळे संत शहामुनी यांचे जीवनकार्य विस्ताराणे समजून घेता आले.

गढीच्या मागच्या बाजुने नदी पात्रात उतरण्यासाठी पुर्वीच्या पायऱ्या रस्ता त्यांनी दाखवत गडाची भव्यता लक्षात आणुन दिली.
शाहमुनी मुस्लिम सुफी संत होते.ते महानुभावांत सर्वाधिक लोकप्रिय आहेत.त्यांचा सिद्धान्तबोध हा ग्रंथ महानुभावांत आजही वाचला जातो.या ग्रंथाची चातुर्मासात पारायणे केली जातात.या सिद्धांतबोध ग्रंथाचे एकूण ५० अध्याय आहेत.महानुभवांत मात्र  त्यांचे सुरुवातीचे १ ते ३० अध्यायच अभ्यासतात,त्याचीच पारायणे करतात.त्याचे कारण असे की सुरुवातीच्या ३० अध्यायांत संत शहामुणी एकेश्वरवादी भूमिका घेतात.आणि इतर शेवटच्या विस अध्यायांत मात्र ते अनेकेश्वरवादी आहेत.संत चक्रधर स्वामी यांचा स्वताला भक्त माननारे शहामुनी अनेकेश्वरवादी असने शक्य नाही असे महानुभावांच्या अभ्यासकांचे मत आहे.रा.चिं.ढेरे यांनी मात्र संत शहामुनी यांच्यावर मराठी मुसलमान संत कवी या ग्रंथामधे जे एक प्रकरण लिहीले आहे,त्यात त्यांनी सिद्धांतबोधचे एकूण पन्नास अध्याय अभ्यासाला घेतलेले आहेत.महानुभावांच्या आक्षेपांची पर्वा न करता इतर २० अध्याय सुद्धा रा.चिं.ढेरे संत शहामुनी यांचेच असल्याचे मांडतात.रा.चिं.ढेरे यांनी संत शहामुनी यांची वंशावळ आपल्या मराठी मुसलमान संतकवी या ग्रंथात पुढीलप्रमाणे दिलेली आहे.संत शहामुनी यांचे पनजोबा शहाबाबा तर पनजी आमिना होत्या.त्यांना पुढे पुत्ररत्न झाले त्याचे नाव जनाजी ठेवण्यात आले.पुढे जनाजी यांची पत्नी म्हणून मंडुबाई
यांचा उल्लेख येतो.मंडुबाईला आणि जनाजीला मनसिंग मुलगा झाला.त्याचे लग्न आमाई यांच्यासोबत झाले.त्यांच्या पोटी संत शहामुनी यांचा जन्म झाला.शहामुनी यांचे पंजोबा यांचे वास्तव्य प्रयाग या ठिकाणी होते.त्यानंतर त्यांचे स्थलांतर उज्जयिनीला झाले.तिथे शहामुनी यांचे आजोबा जनाजी यांचा जन्म झाला.तिथून हे कुटुंब सिद्धटेक कर्जतला आले.सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येते.या निवासी शहामुनी यांचे पिता मनसिग यांचा जन्म झाला.पुन्हा या कुटुंबाने सिद्धटेक सोडुन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावला निवास केल्याचे शहामुनी आपल्या सिद्धांतसार मधे स्पष्ट करतात.पेडगाव म्हणजे भीमा सरस्वतीच्या संगमाचे ठिकाण.या ठिकाणी शके १६७० म्हणजे इ.स.१७४८ ला संत शहामुनी यांचा जन्म झाला.रा.चिं.ढेरे ही माहिती सिद्धांतबोधचे ५० अध्याय स्वीकृत मानून देतात.
या शहागडला संत चक्रधरस्वामी येवून गेल्याचे पुरावे आहेत.तशा लिळाचरीत्रातही काही लिळा आहेत.तेव्हा या शहागढचे नाव श्रीपुर असे होते.म्हणजे संत शहामुनी यांच्या आधी संत चक्रधरस्वामी या शहागडला म्हणजे तेव्हाच्या श्रीपुरला येवून गेले होते.नंतर संत चक्रधर स्वामींचा प्रभाव त्या पंचक्रोशीत पडला असनार ज्यातून पुढे हे मुस्लिम घराणे संत चक्रधरस्वामींच्या एकेश्वरवादी भक्तीत रममाण झाले.ते इतके रममाण झाले की त्यांनी लिहीलेला ग्रंथ महानुभांचा पूजनीय ग्रंथ बनला आणि गावचे श्रीपुर हे नाव जावून एका मुस्लिम सुफी संतांच्या नावे या गावाला शहागड हे नाव मिळाले आर्थात लोकांनी दिले.
शहामुनी यांच्या नावामागे लागलेले मुनी हे नाव त्यांच्या गुरुचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले आहे.ते म्हणतात
"कोणी घेइल मुनीची कल्पना l मुनि नाम गुरुचे जाना ll
तयाचे कृपेने रचना l या ग्रंथाची होतसे ll
रा.चिं.ढेरे यांनी आपल्या मराठी मुसलमान संतकवी या ग्रंथात संत शहामुनी यांनी सिद्धांतबोध हा ग्रंथ सातारा जिल्ह्यातील चांबळी गावाजवळील पठारीमंडप येथे रचल्याचे नमूद केले आहे.त्यांच्या मते हे सामाजिक समतेचे काम करणारे संत शहामुनी शहागडला आले आणि तिथेच त्यांची अखेर झाली.शहागडला त्यांची समाधी बांधण्यात आली.त्यांचा समाधी काळा इ.स.१८०८ मानला जातो.या गावी महानुभाव वारकरी व सर्व धर्मीयांची मोठी जत्रा भरते.हि यात्रा चैत्र वद्यात असते.
आजच्या सांप्रदायिकतेच्या काळात संत शहामुनी हे एकात्मतेचे प्रतिक आणि दुवा ठरतात.कुठलाही जातीभेद,धर्मभेद न करता मानवी मुल्यांची माणुसकीची शिकवन देनारे संत शहामुनी होते.आनेक मुस्लिम संतांना मुस्लिम नसनारा समाज मोठ्याप्रमाणावर पुजतो भजतो त्यांना आपले मानतो यावरून हे सुफी संत,मुस्लिम संत माणुसकी शिकवणारे ग्रेट लोक होते.त्याशिवाय का त्यांचे एवढे मोठे स्वागत ग्रामीण भाग झाले.जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील माळकिनी गावात कठाळ्या बाबाचा पिर आहे.त्या गावी एकही मुस्लिम घर नाही परंतू दरवर्षी दिवळी नंतर पौष महिण्यात संदल काढली जाते.गावातील सर्व जातीचे लोक या उत्सवात सहभागी असतात.असे अनेक गावांत ही पिरे नॉन मुस्लिम लोक सांभाळून आहेत.आपल्या घरातील कुठल्याही सणाला या पिराला नैवेद्य जातो दिवा बत्ती होते.हे किती ग्रेट सहिष्णुता जपनारे.ही महाराष्ट्राची गंगाजमुनी परंपरा आहे.ही सुफींची परंपरा महाराष्ट्रातील जातीवादात भरडले गेलेल्यांना आणि अस्पृश्यांना मुक्ती देनारी ठरली.कॉ शरद पाटील म्हणतात या इस्लामच्या अगमनाचे स्वागत भारतात बोधीसत्व म्हणून करण्यात आले.पण या सुफींच्या परंपरेबद्दल रा.चिं.ढेरे सुद्धा पूर्वग्रह दूषित आहेत.दत्त सांप्रदायाचा इतिहास मधे त्यांनी इस्लामच्या आगमनाची मांडणी संकट म्हणून केलेली आहे.
संत शहामुनी आणि वारकरी ऐक्यभाव :
संत शहामुनी यांनी वारकरी परंपरेवरती देखील भाष्य केलेले आहे.वारकरी संत चळवळीतील संताच्याबद्दल गौरद्वार काढून त्यांनी आपले मोठेपण आधिक उंचीवर नेले आहे.वारकरी आणि महानुभावांचा दुवा म्हणून संत शहामुनी यांच्याकडे पाहिले पाहिजे.संत शहामुनी यांनी आपल्या सिद्धांतबोध ग्रंथाच्या आडतिसाच्या अध्यायाच्या सुरुवातीला पंढरपूरचे महिमान सांगून विठ्ठल,नामस्मरण आणि कलयुगातील ही सोपी भक्ती अत्यंत सुंदरपणे वर्णिलेली आहे.कुठलीही दाढिमिशी न भादरता हा पांडुरंग भेटतो असे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.एका महानुभाव संताने विठ्ठललाबद्दल एवढे रसाळ वर्णन करावे खरच अचंबित करणारे आहे.त्यामुळेच संत शहामुनी लोकप्रिय झाले असावेत.संत कबीर वारकरी परंपरेत सर्वमान्य आहेत अगदी त्याच प्रमाणे स्वतंत्र कबीर सांप्रदाय सुद्धा भारतभरात आहे.या कबिरांशी संत शहामुनी यांनी आपली नाळ जोडून दिलेली आहे.
"एसा कबीर जगी धन्य l माते स्वप्नी दिले दर्शन ll
तोही गुरु माझा पुर्ण l जपे त्याशी अहर्निशी ll
शहामुनी यांचे सर्वात मोठेपण काय असेल तर त्यांचा जात्यांतक समतावादी भाव.संत चोखोबारांबद्दल बोलताना ते म्हणतात
"देवाची भक्ती चोखामेळा करी l त्यासी लोक धरिती दुरी ll
वैकुंठी महारवाडा वेगळा करी l नांदायवा तयासी ? ll
उंच निच नदीत शिरोन l बाहेर निघती कुंभ करोन ll
मग म्हनती स्पर्शो नको चला दुरोन ll
उदकांत उभयता उभी होती ll

संत चोखोबारायांना तुम्ही अस्पृश्य मानता.मग ते एवढे भक्ती करतात तर ते वैकुंठास गेल्यानंतर काय त्यांच्यासाठी वेगळा महारवाडा मागनार ?अशी प्रश्नार्थक टिका जातीवादी व्यवस्थेला शहामुनी यांनी केलेली आहे.
त्यामुळे शहामुनी यांचे मोठेपण अधिक खुलून दिसते.
जातीव्यवस्था अस्पृश्य गैरबराबरी नाकारून एका अस्पृश्य संताची ठामपणे बाजु घेने त्याकाळी जीकरीचे होते.एका मुस्लिम संताने अस्पृश्य संताची बाजु घेने त्याहूनही अवघड पन लोकमान्य झाल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनता मुस्लिम असो अस्पृश्य असो त्या संतांचे प्रत्येक वाक्य शब्द प्रमाण मानु लागते.म्हणून शहामुनी ही विधाने करु शकतात.
अशा व्यापक बहुआयामी सर्वगुणसंपन्न जात्यान्तक समतावादी संताला उपेक्षीत ठेवण्याचे काम प्रस्थापित व्यवस्थेने जानीवपुर्वक केले आहे.संतांवर भरामसाट लिखान करणाऱ्या अनेक लेखकांनी एक्यभाव जपनारे सुफी,मुस्लिम संत मात्र उपेक्षीत ठेवले आहेत.सदानंद मोरेंचा गरजा महाराष्ट्र सुफी,मुस्लिम संताना वगळून असल्याची खंत यशवंत सुमंत नावाच्या लेखकाने व्यक्त केली आहे.अगदी खरे आहे,सुफी संतांशिवाय महाराष्ट्र सांस्कृतिक अंगाने पुर्णत्वास जाईल काय ? आपल्याला हवे असलेले परवडणारे संत पुन्हा पुन्हा लिखान करुन पुढे आनायचे आणि आपल्या जातीचे धर्माचे नसलेले संत मात्र जाणीवपूर्वक अडगळीत टाकायचे त्याबद्दल मौन बाळगायचे ही ब्राम्हणी वृत्ती आजही महाराष्ट्र सांभाळून आहे.
तरिही हे संत अजही जत्रा,उत्सव,उरुसांच्या रुपाने लोकमनावर अजही राज्य करत आहेत.हे नसे थोडके.

नितीन सावंत परभणी
9970744142
२६/७/२०१९
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Tuesday, 23 July 2019

देवीच्या अनेक हतांचा अर्थ

स्त्रीदेवतेची मुर्ती बनवताना तिला #अनेक_हात का दाखवले गेले असतील ? एक मुख आणि दोन पायाला दोन हात न ठेवता जास्त हात का दाखले गेले असतील ? कुठल्या तरी शिल्पात स्त्रीला दोन पेक्षा जास्त पाय दाखवले गेले आहेत काय ? मग हात जास्त का ?

शिल्पशास्त्रात उतरलेली मुर्तीकारांची नेनीव स्त्रीयांची  निपुणता,कार्यकुशलता,सर्वगुणसंपन्नता या आर्थाने बहुतांश स्त्री शिल्पांना जास्त हात दाखवले जातात.

६४ योगीनींमधे प्रत्येक योगीनी कुठल्यातरी एका कला गुणांत अधिक निपुण,तरबेज होती.
कुणी शेतीत,कुणी वैद्यकशास्त्रात,कुणी युद्धकलेत याप्रमाणे प्रत्येक योगीनी स्पेशालिटी बाळगणारी होती.
म्हणून तिच्या दोन हातात तिच्या सर्व कला गुणांचे प्रतिके देता येनार नाहीत.म्हणून तिचे सर्व शस्त्रे,अयुधे,कला गुणांचे सिंबॉल हतात देण्यासाठी हताची संख्या वाढवावी लागली.

आजही ग्रामीण भागात घरात महिला शिवणकाम करत असते, तिच्या बाजुला मुल खेळत असते,चुलीवर दाळ शिजत असते, त्याचबरोबर अंगणात काहीतरी वाळवत घातलेले असते.यातील प्रत्येक गोस्टीवर समान कॉसंट्रेशन ठेवावे लागते.जराही लक्ष विचलीत होऊ द्यायला जमत नाही.एवढे आवघड काम ती गृहणी स्त्री सहज पार पाडत असते.म्हणून हे मल्टिपल काम करणारी भेदक #स्त्रीनेनीव_शिल्पशास्त्रात जास्त हात घेवून उतरली आहे.

नितीन सावंत परभणी
99707474142

Thursday, 11 July 2019

ll माझे माहेर पंढरी ll

♦️माझे माहेर पांढरी....


               पंढरपूर,विठ्ठल आणि चंद्रभागा हे महाराष्ट्रातील लोकमानाचा अविभाज्य भाग बनलेली नावे आहेत.शतकानुशतके लोटत आली आहेत,तरी या नावांची क्रेझ काही कमी होत नाहीए,उलट दिवसेंदिवस वाढत आहे.चंद्रभागेच्या तिरी, पंढरपूरनगरी उभ्या असलेल्या पांडुरंगाचे वेड इतके का लागले असावे ? अजूनही ही पंढरी एवढी का जवळची वाटत असेल ? संतांनी नेमकी कोनती जादू केलेली असेल एवढ्या मोठ्या लोकमनावर ? 

        होय पंढरपूरचे महत्व वाढवले ते संतांनीच. हे महत्व वाढवताना प्रचाराची मोठी साधने नाहीत की राजाश्रय नाही तरी या संतांनी लोकमनाचा ठाव कसा घेतला असेल ?

       सर्व संत मंडळी जेव्हा पंढरपूर,विठ्ठल,चंद्रभागा हे नाममहात्म्य वाढवत होती तेव्हा त्यांनी लोकमनावर प्रभाव गाजवनारी भौतिकवादी सर्व विशेषणे वापरलेली तुम्हाला दिसतील.सर्व उपमा,मिथकांचा त्यांनी वापर केलेला दिसून येइल.एकमेव हा भागवत धर्म असा आहे की त्यातील प्रचारकांनी सर्वप्रकारच्या तत्वज्ञानाचा , मिथकांचा , रुपकांचा , अलंकार आणि शृंगारांचा एकत्र मिलाफ घातलेला आहे. वैदिकांच्या परक्या यज्ञ,कर्मकांडी संस्कृतीला नाकारून सर्वांना जवळचा वाटावा असा भागवत धर्माचा पर्याय देताना हे वारकरी संत सर्वसामान्यांच्या जीवनातील अवतीभवतीचे विषेशने वापरतात.सर्वांच्या जीवनातील लोकप्रिय उपमांचा ते वापर विठ्ठल इस्ट्याब्लिश करण्यासाठी करतात.त्यातील लोकप्रिय संकल्पना म्हणजे माहेर होय.विवाहित स्त्रीला आयुष्यातले सर्वात हवेहवेसे वाटनारे,ओढ लावणारे ठिक कोणते असेल तर ते माहेर.सासुरवाशीणीला सदैव आवडनारे तीर्थक्षेत्र म्हणजे तिचे माहेर.

           म्हणून या माहेरसारख्या स्त्रीवादी उपमा पंढरपूरचे महत्त्व वाढवण्यासाठी संतांनी वापरलेल्या दिसतील.

संत कान्होपात्रा महाराज आपल्या अभंगात स्त्री अभिव्यक्तितून अभिव्यक्त होताना म्हणतात.

माझे माहेर पांढरी l सुखे नांदो भिमातिरी ll                तेथे आहे मायबाप l हरेताप कौतुके ll                  निवारली तळमळ l चिंता गेली याता अंतरिची l          कैसी विटेवरी शोभली l पाहोनी कान्होपात्रा घाली ll

              स्त्रीने स्त्रीअंगाची उपमा वापरणे साहजिकच आहे.पण पुरुष म्हणून जन्माला आलेले संतही स्त्रीपुरुष या भेदाभेदाच्या पलीकडे गेलेले दिसतील.ते सुद्धा स्त्रीवादी भूमिका घेत संत साहित्यात माहेर म्हणून पंढरपूर केंद्रबिंदू बनवतात.

संत एकनाथ महाराज म्हणतात. 

माझे माहेर पांढरी l आहे भिवरेच्या तिरी ll                बाप आणि आई l माझी विठ्ठल रुखमाई ll             पुंडरीक राहे बंधू l त्याची ख्याती काय सांगू ll         बहीण माझी चंद्रभागा l करितसे पाप भंगा ll            एका जनार्दनी शरण l करी माहेरची आठवण ll

             एका सासुरवाशीण स्त्रीला माहेरची आठवण झाल्यानंतर तिला काय आठवते तर आई,वडिल,बंधू,बहीण.अगदी हेच माहेरचे नाते एकनाथ महाराज विठ्लाशी जोडु पहातात.हा संत एकनाथ महाराजांचा स्त्रीवादी दृष्टीकोण लोकमनाची पकड घेतो.आणि विठ्ठल भक्ती पंढरपूर महत्व वेगाने वाढु लागते.

संत तुकोबाराय एकेठिकाणी म्हणतात

आपल्या माहेरा जाईन मी आता l

निरोप या संताहाती आला ll

सुख दुख माझे एकीले कानी l

कळवळा मनी करुनेचा ll

करुनी सिद्ध मुळ साऊले भातुके l

येथी दिसे एके न्यावयासी  ll

त्याची पंथे माझे लागलेसे चित्त l

वाट पाहे नित्य माहेराची l

तुका म्हने आता येतील न्यावया l

अंगी आपलिया मायबाप ll

                  एका सासुरवाशीण स्त्रीच्या भुमीकेत संत तुकोबाराय म्हणतात, " मला संतांच्याकडुन निरोप आला आहे.मी माझ्या माहेरा जाइल.माझे सुख दुख त्यांनी जानुन घेतले आहे.त्यांच्या मनात करुणेचा कळवळा आहे.माला माझ्या माहेराची आस लागलेली आहे.मला न्यायला येतील याची मी नित्य वाट पहात आहे." एवढी अर्त भावना स्त्रीवादी अंगाने टिपने खरच जीकरिचे काम आहे.आपल्या अभिव्यक्तीत एवढा सखोल स्त्रीभाव ओतने साधे काम नव्हे.एवढे काय स्त्री माहेरासाठी किती व्याकुळ असते याबद्दल अनखी एका ठिकाणी संत तुकोबाराय म्हणतात.

माहेरीचा काय येइल निरोप l

म्हनवुनी झोप नाही डोळा ll

वाटपाहे आस धरुनिया जीवी l

निडळा हे ठेवी वरी बाहे l

बोटावरी माप लेखीतो दिवस ll

होतो कासावीस धीरनाही l

कायनेनो संता पडेल विसर l

की नव्हे सादर मायबाप ll

तुका म्हने तेथे होइल दाटणी l

कोण माझे आनी मना तेथे ll

           माहेरी जाण्यासाठी बोटावर दिवस मोजणार्या व्याकुळ स्त्रीचे चित्रण संतांच्या वतीने तुकोबाराय करतात.तिची कासावीसता तुकोबाराय अभंगात घेतात अगदी भन्नाट आहे हे.

           हे पंढरपूर सर्व संतांचे माहेर असल्याची घोषणा संत नामदेव यांनीच केली होती.पुढे ही कबुली सर्वांनीच दिली.नंतर  हे पंढरपूर आमचे माहेर आहे हे सर्वांनी एकमताने स्विकारले.संत नामदेव महाराज म्हणतात.

झळझळीत सोनसळा l                                    कळस दिसतो सोजळा ll                                        बरवे बरवे पंढरपूर l                                          विठोबा रायाचे नगर ll                                       माहेर संताचे l                                        नामयास्वामी केशवाचे ll

       संत नामदेवांचे हेच बोल संत ज्ञानेश्वर महाराजही आपुल्या मुखी व्यक्त होतात.ते म्हणतात

आवघाची संसार सुखाचा करिण l                          आनंदे भरीन तिन्ही लोकी l                                  जाईन गे माये तया पंढरपूरा l                                भेटेन माहेर आपुलीया l                                       सर्व सुकृतीचे फळ मी लावीन l                              क्षम मी देइल पांडुरंगा l

बापरखुमा देवीवर विठ्ठलाचे भेटी l                    आपुल्या संसाठी करुनी ठेला ll

              संत मालिकेतील सर्वच संतांनी पंढरपूरसाठी माहेर ही उपमा वापरलेली आहे.त्यामुळे त्याकाळातील स्त्रीमनावर याचा प्रचंड प्रभाव पडला असेल, यात शंका नाही.अनेक स्त्रीयांना स्वताचे दुख या संतांच्या अभंगांच्या रुपाने गावोगाव व्यक्त होता आले असेल.कारण आजही संतांच्या वारसा आपल्या सुमधुर आवाजातून सांगणाऱ्या गोदावरीताई मुंढे जेव्हा बाई बाई जाते ग माहेराला l माझ्या मुळच्या घराला l हा संत मुक्ताबाईंचा अभंग गातात तेव्हाच खरी माहेरची अनुभूती येते.

म्हणून सर्व संतांना त्यांचे हक्काचे माहेर मिळाले आनखी काय हवेय.

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात

शेवट तो भला l माझा बहुगोड झाला ll

आलो निजाचा माहेरा l भेटो रखुमाईच्या वरा l

किंवा आपले माहेर भेटल्यानंतर,माहेरी आल्यानंतर संतांना काय वाटते याबद्दल तुकोबाराय म्हणतात.

आजी बरवे झाले l माझे माहेर भेटले ll

डोळा देखीले सज्जन l निवारला भागसीण ll

धन्य झालो आता l क्षेम देवुनिया संता ll

इच्छेंचे पावलो l तुका म्हने धन्य झालो ll

   आशा पध्दतीने सर्वाधिक लोकप्रिय उपमा वापरून संत विठ्ठल माहात्म्य वाढवतात.विठ्ठलाचा ते प्रचार करतात.त्यात ते प्रचंड यशस्वी होतात.लोकप्रिय होतात.

पुरोगामी , आंबेडकरवादी , डाव्या , समाजवादी पक्ष संघटनांना आशा लोकप्रिय मिथके , उपमा , दृष्टांत , अलंकार वापरून लोकमनाचा ठाव घेता आला असता.पण त्यांचे कर्मठतेचे सुतक फिटलेले नसल्यामुळे, सध्या प्रतिगामी , ब्राम्हणी धर्मांध छावणीच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमात ते आनंद मानत आहेत. 

ह.भ. प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर    9970744142

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

Tuesday, 9 July 2019

लऊळचा इतिहास

#लऊळ

#लऊळ गाव हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील अत्यंत ऐतिहासिक गाव.ऐतिहासिक यासाठी की येथे सर्वच पंथ सांप्रदायाचा वावर राहिलेला आहे.या गावात आंबाबाईचे ठाणे आहे.या आंबाबाईची छोटेखानी उभी मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते.ही आंबाबाई आपल्याला मातृसत्तेचे ठाणे,गावाचा रचना काळ सांगुन जाते.त्याचबरोबर गावात दोन खंडोबा मंदिरे आहेत.एक खंडोबा बाळे यांचा तर दुसरा जेजुरीचा खंडोबा.गावाच्या बाहेर भैरवनाथ मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिर हे या गावात सिद्ध तथा नाथांचा वावर असल्याचे पुरावे देतात.सिद्धेश्वर मंदिरात आणि मरीआई मंदिरात चिंचेची झाडे आहेत.चिंचेचे झाड आणि मातृसत्तेचा, स्त्रीसत्तेचा तथा सिद्ध परंपरेचा खुप सुंदर संबंध राचिंढेरे यांनी शोधलेला आहे.
यानंतर या गावात शैव वैष्णव संघर्षाचे स्पष्ट धागेदोरे महादेव मंदिराबाहेर आपल्याला दिसतील.विष्णुच्या भग्न पावलेल्या मुर्ती येथे वैष्णवांचे उपासक राजे होऊ गेल्याचे स्पष्ट करतात.महादेव मंदिरात शिवलिंग आहेत.बाहेर अनेक वीरगळ एका रांगेत लावलेले आहेत.या गावात विरगळांची संख्या भरपूर आहे.बरेच शुरवीर युध्दात शहिद झाल्याची ही प्रतिके गावाचे वैभव किती मोठे असावे हे लक्षात अनुन देतात.

या गावात पार्श्वनाथांचे जैन मंदिर आहे.गावच्या गावगाड्यातील सर्वच जाती या गावात दिसून येतात.त्यामुळे सर्वदूरपर्यंत व्यापर करणाऱ्या जैन बांधवांनी हे पार्श्वनाथांचे मंदिर उभारले असावे किंवा पार्श्वनाथ या परिसरात येवून गेले असावेत असा अंदाज आपल्याला बांधता येइल.गावाला किल्लेवजा तटबंदी स्वरुपाची वेस आहे.वेशीच्यात आत शिरलात की शिवरायांचा पुतळा आपल्याला ग्रामपंचायती समोर दिसतो.लगेच पुढे गेलात की सुंदर नक्षीकाम केलेली मशीदही आपल्याला दिसेल.या गावात मोहरम सनाला पिराचा डोला निघतो.या डोल्यामागे दोन मराठा कुटुंबियांच्या सवार्या असतात.यात कुठालाही भेदभाव न करता सर्वजन सहभागी असतात.

अलीकडे या गावात फुलेंचाही विचार रुजतना दिसत आहे.या गावात ऱाम मंदिराच्या समोरच जोतिराव फुले यांचा पुतळा आहे.गावाचे नाव उंचीवर नेनारे सर्वात महत्वाचे प्रतिक म्हणजे #संत_कुर्मादास होत.संत कुर्मादास मुस्लिम संत असावेत कारण त्यांची समाधी कबरीच्या स्वरूपात आहेत.त्या समाधीवर हिरव्या रंगाची किनार असलेली पांढरी चादरी टाकली जाते.या संत कुर्मादास यांना भेटण्यासाठी स्वता पांडुरंग आल्याची आख्यायिका आहे.संत नामदेव,संत ज्ञानेश्वर महाराजही येथे येवून गेल्याचे गावकरी सांगतात.या गावी ४ फुटापेक्षा जास्त उंचीची विठुरायाची मुर्ती आहे.या विठुरायाच्या बाजुला रुख्मिणी नाही.माढा पंढरपूर येथील एकुलत्या एक विठ्ठलाप्रमाणे हा विठोबा स्वतंत्र उभा आहे.हाच विठुराया कुर्मादास यांना भेटायला आल्याचे सांगतात.संत कुर्मादास यांचे मंदिर गावाच्या बाहेर दोन किलोमीटरवर आरण रोडवर आहे.
या गावची लोकसंख्या ८ हजार आहे.१७ सदस्यांची बॉडी सरपंच निवडते.गावाच्या मध्यभागी मारोती मंदिर आहे.या मारोतीच्या पायाखाली कुठलातरी असुर आहे.शेंदूर लावलेली ही मारोती मुर्ती त्या पायाखालील असणाऱ्या प्रतिकामुळे मारोतीचीच आहे का हा प्रश्न निर्माण करते.गावातील लोकरे यांच्याकडे पोळ्याचा मानाचा बैल असतो.गवळी यांच्याकडे सुद्धा अदलुन बदलून हा मान जातो.
इतक्या वर्षांची जुनी परंपरा घेवून उभे असलेले हे लऊळ गाव अनेक संकटांचा सामना करत पुरातन संस्कृतीचे भग्न अवशेष दाखवत उभे आहे.
दरवर्षी या गावी पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या येतात.गावकरी येणाऱ्या सर्व दिड्यांची सेवा करतात.रहाण्याची जेवणाची व्यवस्था करतात.गावाच्या ह्या मंदिराच्या आवारात व मंदिरांत ह्या दिंड्या थांबतात.संत जनाबाई दिंडीचाही एक मुक्काम या गावी असतो.विठ्ठल मंदिरात रात्री किर्तन होते आणि सकाळी दिंडी पुढे निघते.ही सर्व माहिती गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ दिनेश बागल यांनी दिली.दिनेशजींनी संपूर्ण गाव फिरुन दाखवले.त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन...

#माढा
#लऊळ
#सोलापूर