♦शहागड आणि संत शहामुनी
शाहगढ,जालन्यापासुन ५७ किलोमीटरवर तर अंबडपासुन अवघ्या ३१ किलोमीटरवर असनारे एक ऐतिहासिक गाव.जालना,अंबड कडुन बीडकडे जाणाऱ्या रोडवर भरपूर वर्दळ असनारे हे मोठे गाव.शहागड तसी ग्रामपंचायतच परंतू अगदी शहरीकरण झालेले गाव.सुरुवातीलाच भव्य कॉप्लेक्स, दुकाने आपले लक्ष वेधून घेतात.गावात ८०% मुस्लिम तर २०% इतर.गोदावरी नदिच्या अगदी किनाऱ्यावरवर वसलेले हे गाव आहे.पैठणच्या बाजारातील नावलौकिक पावलेली पैठणी याच गावी तयार होत असल्याचे बोलले जाते.त्यासाठीचा नदीच्या पात्रातील मोठा ओटाही दाखवला जातो,ज्याद्वारे रंगरंगोटी केली जाई,रेशीम काढले जाई असा दगडी ओटा अजही नदीपात्रात दिसतो.या गावाला पुर्वीला भव्य अशी तटबंदी होती.गावाच्या एका बाजुने वळन घेवून गावाच्या पाठीमागून निघून जानारी गोदावरी नदी तर दुसऱ्या बाजुने ओढ्याच्या स्वरूपात खंदकासाखे पाणी वळवलेले दिसेल.यामधे उंच तटबंदीवर शाहगढ वसले आहे.गावाच्या सुरुवातीलाच जुण्या भव्य अशा वेशीचे अवशेष आजही पहायला मिळतात.गावात शिरताना मोठा दरवाजा लागतो.त्या दरवाज्याच्या बाजुच्या भिंतीवर उर्दुत एक शिलालेखही आहे.तटबंदीच्या आतले गाव आता विस्तारत जावून मोठा आकार घेतलेले आपल्याला दिसेल.गाव वेशीतुन आत जाताना ग्रामीण ढंगाची सांस्कृतिक रचना,बोली,पडकी घरे,खेळनारी मुले मुली आपले लक्ष वेधून घेतात.अगदी सर्वत्र चिवचिवाट.गावच्या आतुन गेल्यानंतर मागच्या शेवटच्या टोकाला उंच गढीवर फक्त ज्या गढीच्या दवाज्याची कमान उरलेला एक पडका वाडा आपल्याला दिसु लागतो.याच उंच किल्लावजा गढीवर आपल्याला संत शहामुनी यांची समाधी आर्थात दर्गा किंवा मजार आपल्याला पहायला मिळेल.या दर्गाच्या देखभालीसाठी संत शहामुनी यांचे ९ वे वंशज जावेद शेख या गढीवर रहातात.त्यांनी संपूर्ण गढ फिरुन दाखवला.संत शहामुनी यांच्या वंशजांपर्यंत घेवून जाण्याचे काम मुक्तदिर बागवान यानी केले त्यांनी संपूर्ण गाव फिरुन दाखवला.यावेळी हा वारसा बघण्यासाठी या गावापर्यंत घेवून गेले ते रामेश्वर चंद व सोबत जालण्याचे संदिप शिंदे ही होते.त्यांच्यामुळे संत शहामुनी यांचे जीवनकार्य विस्ताराणे समजून घेता आले.
गढीच्या मागच्या बाजुने नदी पात्रात उतरण्यासाठी पुर्वीच्या पायऱ्या रस्ता त्यांनी दाखवत गडाची भव्यता लक्षात आणुन दिली.
शाहमुनी मुस्लिम सुफी संत होते.ते महानुभावांत सर्वाधिक लोकप्रिय आहेत.त्यांचा सिद्धान्तबोध हा ग्रंथ महानुभावांत आजही वाचला जातो.या ग्रंथाची चातुर्मासात पारायणे केली जातात.या सिद्धांतबोध ग्रंथाचे एकूण ५० अध्याय आहेत.महानुभवांत मात्र त्यांचे सुरुवातीचे १ ते ३० अध्यायच अभ्यासतात,त्याचीच पारायणे करतात.त्याचे कारण असे की सुरुवातीच्या ३० अध्यायांत संत शहामुणी एकेश्वरवादी भूमिका घेतात.आणि इतर शेवटच्या विस अध्यायांत मात्र ते अनेकेश्वरवादी आहेत.संत चक्रधर स्वामी यांचा स्वताला भक्त माननारे शहामुनी अनेकेश्वरवादी असने शक्य नाही असे महानुभावांच्या अभ्यासकांचे मत आहे.रा.चिं.ढेरे यांनी मात्र संत शहामुनी यांच्यावर मराठी मुसलमान संत कवी या ग्रंथामधे जे एक प्रकरण लिहीले आहे,त्यात त्यांनी सिद्धांतबोधचे एकूण पन्नास अध्याय अभ्यासाला घेतलेले आहेत.महानुभावांच्या आक्षेपांची पर्वा न करता इतर २० अध्याय सुद्धा रा.चिं.ढेरे संत शहामुनी यांचेच असल्याचे मांडतात.रा.चिं.ढेरे यांनी संत शहामुनी यांची वंशावळ आपल्या मराठी मुसलमान संतकवी या ग्रंथात पुढीलप्रमाणे दिलेली आहे.संत शहामुनी यांचे पनजोबा शहाबाबा तर पनजी आमिना होत्या.त्यांना पुढे पुत्ररत्न झाले त्याचे नाव जनाजी ठेवण्यात आले.पुढे जनाजी यांची पत्नी म्हणून मंडुबाई
यांचा उल्लेख येतो.मंडुबाईला आणि जनाजीला मनसिंग मुलगा झाला.त्याचे लग्न आमाई यांच्यासोबत झाले.त्यांच्या पोटी संत शहामुनी यांचा जन्म झाला.शहामुनी यांचे पंजोबा यांचे वास्तव्य प्रयाग या ठिकाणी होते.त्यानंतर त्यांचे स्थलांतर उज्जयिनीला झाले.तिथे शहामुनी यांचे आजोबा जनाजी यांचा जन्म झाला.तिथून हे कुटुंब सिद्धटेक कर्जतला आले.सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येते.या निवासी शहामुनी यांचे पिता मनसिग यांचा जन्म झाला.पुन्हा या कुटुंबाने सिद्धटेक सोडुन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावला निवास केल्याचे शहामुनी आपल्या सिद्धांतसार मधे स्पष्ट करतात.पेडगाव म्हणजे भीमा सरस्वतीच्या संगमाचे ठिकाण.या ठिकाणी शके १६७० म्हणजे इ.स.१७४८ ला संत शहामुनी यांचा जन्म झाला.रा.चिं.ढेरे ही माहिती सिद्धांतबोधचे ५० अध्याय स्वीकृत मानून देतात.
या शहागडला संत चक्रधरस्वामी येवून गेल्याचे पुरावे आहेत.तशा लिळाचरीत्रातही काही लिळा आहेत.तेव्हा या शहागढचे नाव श्रीपुर असे होते.म्हणजे संत शहामुनी यांच्या आधी संत चक्रधरस्वामी या शहागडला म्हणजे तेव्हाच्या श्रीपुरला येवून गेले होते.नंतर संत चक्रधर स्वामींचा प्रभाव त्या पंचक्रोशीत पडला असनार ज्यातून पुढे हे मुस्लिम घराणे संत चक्रधरस्वामींच्या एकेश्वरवादी भक्तीत रममाण झाले.ते इतके रममाण झाले की त्यांनी लिहीलेला ग्रंथ महानुभांचा पूजनीय ग्रंथ बनला आणि गावचे श्रीपुर हे नाव जावून एका मुस्लिम सुफी संतांच्या नावे या गावाला शहागड हे नाव मिळाले आर्थात लोकांनी दिले.
शहामुनी यांच्या नावामागे लागलेले मुनी हे नाव त्यांच्या गुरुचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले आहे.ते म्हणतात
"कोणी घेइल मुनीची कल्पना l मुनि नाम गुरुचे जाना ll
तयाचे कृपेने रचना l या ग्रंथाची होतसे ll
रा.चिं.ढेरे यांनी आपल्या मराठी मुसलमान संतकवी या ग्रंथात संत शहामुनी यांनी सिद्धांतबोध हा ग्रंथ सातारा जिल्ह्यातील चांबळी गावाजवळील पठारीमंडप येथे रचल्याचे नमूद केले आहे.त्यांच्या मते हे सामाजिक समतेचे काम करणारे संत शहामुनी शहागडला आले आणि तिथेच त्यांची अखेर झाली.शहागडला त्यांची समाधी बांधण्यात आली.त्यांचा समाधी काळा इ.स.१८०८ मानला जातो.या गावी महानुभाव वारकरी व सर्व धर्मीयांची मोठी जत्रा भरते.हि यात्रा चैत्र वद्यात असते.
आजच्या सांप्रदायिकतेच्या काळात संत शहामुनी हे एकात्मतेचे प्रतिक आणि दुवा ठरतात.कुठलाही जातीभेद,धर्मभेद न करता मानवी मुल्यांची माणुसकीची शिकवन देनारे संत शहामुनी होते.आनेक मुस्लिम संतांना मुस्लिम नसनारा समाज मोठ्याप्रमाणावर पुजतो भजतो त्यांना आपले मानतो यावरून हे सुफी संत,मुस्लिम संत माणुसकी शिकवणारे ग्रेट लोक होते.त्याशिवाय का त्यांचे एवढे मोठे स्वागत ग्रामीण भाग झाले.जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील माळकिनी गावात कठाळ्या बाबाचा पिर आहे.त्या गावी एकही मुस्लिम घर नाही परंतू दरवर्षी दिवळी नंतर पौष महिण्यात संदल काढली जाते.गावातील सर्व जातीचे लोक या उत्सवात सहभागी असतात.असे अनेक गावांत ही पिरे नॉन मुस्लिम लोक सांभाळून आहेत.आपल्या घरातील कुठल्याही सणाला या पिराला नैवेद्य जातो दिवा बत्ती होते.हे किती ग्रेट सहिष्णुता जपनारे.ही महाराष्ट्राची गंगाजमुनी परंपरा आहे.ही सुफींची परंपरा महाराष्ट्रातील जातीवादात भरडले गेलेल्यांना आणि अस्पृश्यांना मुक्ती देनारी ठरली.कॉ शरद पाटील म्हणतात या इस्लामच्या अगमनाचे स्वागत भारतात बोधीसत्व म्हणून करण्यात आले.पण या सुफींच्या परंपरेबद्दल रा.चिं.ढेरे सुद्धा पूर्वग्रह दूषित आहेत.दत्त सांप्रदायाचा इतिहास मधे त्यांनी इस्लामच्या आगमनाची मांडणी संकट म्हणून केलेली आहे.
संत शहामुनी आणि वारकरी ऐक्यभाव :
संत शहामुनी यांनी वारकरी परंपरेवरती देखील भाष्य केलेले आहे.वारकरी संत चळवळीतील संताच्याबद्दल गौरद्वार काढून त्यांनी आपले मोठेपण आधिक उंचीवर नेले आहे.वारकरी आणि महानुभावांचा दुवा म्हणून संत शहामुनी यांच्याकडे पाहिले पाहिजे.संत शहामुनी यांनी आपल्या सिद्धांतबोध ग्रंथाच्या आडतिसाच्या अध्यायाच्या सुरुवातीला पंढरपूरचे महिमान सांगून विठ्ठल,नामस्मरण आणि कलयुगातील ही सोपी भक्ती अत्यंत सुंदरपणे वर्णिलेली आहे.कुठलीही दाढिमिशी न भादरता हा पांडुरंग भेटतो असे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.एका महानुभाव संताने विठ्ठललाबद्दल एवढे रसाळ वर्णन करावे खरच अचंबित करणारे आहे.त्यामुळेच संत शहामुनी लोकप्रिय झाले असावेत.संत कबीर वारकरी परंपरेत सर्वमान्य आहेत अगदी त्याच प्रमाणे स्वतंत्र कबीर सांप्रदाय सुद्धा भारतभरात आहे.या कबिरांशी संत शहामुनी यांनी आपली नाळ जोडून दिलेली आहे.
"एसा कबीर जगी धन्य l माते स्वप्नी दिले दर्शन ll
तोही गुरु माझा पुर्ण l जपे त्याशी अहर्निशी ll
शहामुनी यांचे सर्वात मोठेपण काय असेल तर त्यांचा जात्यांतक समतावादी भाव.संत चोखोबारांबद्दल बोलताना ते म्हणतात
"देवाची भक्ती चोखामेळा करी l त्यासी लोक धरिती दुरी ll
वैकुंठी महारवाडा वेगळा करी l नांदायवा तयासी ? ll
उंच निच नदीत शिरोन l बाहेर निघती कुंभ करोन ll
मग म्हनती स्पर्शो नको चला दुरोन ll
उदकांत उभयता उभी होती ll
संत चोखोबारायांना तुम्ही अस्पृश्य मानता.मग ते एवढे भक्ती करतात तर ते वैकुंठास गेल्यानंतर काय त्यांच्यासाठी वेगळा महारवाडा मागनार ?अशी प्रश्नार्थक टिका जातीवादी व्यवस्थेला शहामुनी यांनी केलेली आहे.
त्यामुळे शहामुनी यांचे मोठेपण अधिक खुलून दिसते.
जातीव्यवस्था अस्पृश्य गैरबराबरी नाकारून एका अस्पृश्य संताची ठामपणे बाजु घेने त्याकाळी जीकरीचे होते.एका मुस्लिम संताने अस्पृश्य संताची बाजु घेने त्याहूनही अवघड पन लोकमान्य झाल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनता मुस्लिम असो अस्पृश्य असो त्या संतांचे प्रत्येक वाक्य शब्द प्रमाण मानु लागते.म्हणून शहामुनी ही विधाने करु शकतात.
अशा व्यापक बहुआयामी सर्वगुणसंपन्न जात्यान्तक समतावादी संताला उपेक्षीत ठेवण्याचे काम प्रस्थापित व्यवस्थेने जानीवपुर्वक केले आहे.संतांवर भरामसाट लिखान करणाऱ्या अनेक लेखकांनी एक्यभाव जपनारे सुफी,मुस्लिम संत मात्र उपेक्षीत ठेवले आहेत.सदानंद मोरेंचा गरजा महाराष्ट्र सुफी,मुस्लिम संताना वगळून असल्याची खंत यशवंत सुमंत नावाच्या लेखकाने व्यक्त केली आहे.अगदी खरे आहे,सुफी संतांशिवाय महाराष्ट्र सांस्कृतिक अंगाने पुर्णत्वास जाईल काय ? आपल्याला हवे असलेले परवडणारे संत पुन्हा पुन्हा लिखान करुन पुढे आनायचे आणि आपल्या जातीचे धर्माचे नसलेले संत मात्र जाणीवपूर्वक अडगळीत टाकायचे त्याबद्दल मौन बाळगायचे ही ब्राम्हणी वृत्ती आजही महाराष्ट्र सांभाळून आहे.
तरिही हे संत अजही जत्रा,उत्सव,उरुसांच्या रुपाने लोकमनावर अजही राज्य करत आहेत.हे नसे थोडके.
नितीन सावंत परभणी
9970744142
२६/७/२०१९
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment