Friday, 6 May 2022

संत चोखोबारायांचे जीवनचरित्र l प्रकरण १४ वे ll चोखोबारायांचे निर्वाण..

 संत चोखोबारायांचे जीवनचरित्र 
प्रकरण १४ वे 
चोखोबारायांचे निर्वाण.. 

माझा तो समय निकट दिसे आला l लेख तो लेखिला जैसे झाले ll  जन्मोनी पोसणा तुमचाच दास। आतां निकट सहवासी अंतरलो ll
उच्छिष्टाची आस सरलीसे दिसे। प्रारब्धासरसे ओढावलें ॥
चोखा म्हणे माझा दंडवत पायीं। करीं आतां साई कृपेची तूं ll 
                  - संत चोखोबाराय 

                            भारताच्या इतिहासाकडे बारकाव्याने पहायला गेलो तर, एक गोष्ट अशी लक्षात येते की, जे जे लोक चांगले काम करत होते त्यांना खुप अतोनात त्रास सहन करावा लागला. अत्यंत खडतर, यातनामय जीवन, माणुसकीचे काम करणार्यांच्या वाट्याला आले. महत्मा बसवेश्वरांच्या समतेच्या लढाईत सर्व शरणांच्या हत्त्या घडवून आनल्या गेल्या होत्या. चक्रधर स्वामींना पैठणच्या ब्राम्हणांनी खुप त्रास दिला होता. हेच माणुसकीचे काम करणाया संत चोखोबारायांनाही वेळोवेळी त्रास दिला गेला. त्यांच्यावर विठ्ठलाची मुर्ती बाटवल्याचा आणि चोरीचा आळ घालून त्यांना बेदम मारण्यात आले होते. एवढे करूनही सनातण्यांच्या डोळ्यात चोखोबाराय खुपत होते. म्हणून त्यांनी बिदरच्या राजाकडे तक्रार करून चोखोबारायांना कायमचे पंढरपुरातून हकलून लावले.या बद्दल भि. शि. शिंदे आपल्या ' संत चोखामेळा आणि मी " या ग्रंथात, प्रथम आवृत्ती, पान क्रमांक १५६ वर म्हणतात,

"  चोखोबा काही गावाचा वतनदार महार नव्हता, तरी त्याच्या हितशत्रूंनी त्याचेही इतर महारांमध्ये नाव घातले आणि त्याची गावातील इतर महारांबरोबर मंगळवेढ्यास रवानगी करण्यात आली."
                म्हणजे काय तर चोखोबारायांना सनातनी कर्मठीनीच मंगळवेण्यास नेण्यास सांगितले.काड्या , कुचाळक्या करुन चोखोबांना पंढरपूरातून बाहेर काढले गेले. 

           पंढरपुरातील एवढा सुखाचा सोहळा सोडून जाण्याची चोखोबांची ईच्छा नव्हती. त्याबद्दल त्यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले आहे.त्यांना पंढरपुर सोडून जावे लागत असल्याचे दुखद वर्णन त्यांनी अनेक अभंगात केले आहे. 
                        संत चोखोबाराय मंगळवेढ्याला गेल्यानंतर सर्व अस्पृश्यांच्या बरोबरीने सैनिकांकडून वेशीच्या बांधकामाला ,बिगारीच्या कामाला लावले गेले. या बांधकामात दगड फोडून चिरे घडवणे, माती भिजवून चिखल तयार करणे, चिखल तुडवणे, चिखलाचे गोळे करून ते रचत जाणे, पाणी आनने अशी कामे दिवसरात्र चोखोबारायांच्या वाट्याला आली होती. श्रमचा मोबदला काय तर तोकडे,अपुरे अन्न.केवळ जेवण देण्याच्या मोबदल्यात मराणाची कामे करून घेण्याची पद्धती आपल्या देशात स्वातंत्र्य मिळेपर्यंत होती. आजही स्वातंत्र्या नंतरही जाते, उखळ , पाटा, वरवंटा  घडवणाच्या भटक्या विमुक्त महिलांकडून केवळ एक भाकर देऊन, त्या दगड़ी वस्तु विकत घेतल्या जातात. चोखोबारायांचेही असेच शोषण चालू होते. दोन वेळच्या जेवणासाठी हा माणूस मरेतक राबत होता.एवढ्या जाचातून जाताना चोखोबांनी वारंवार पंढरपुरची आठवण काढली आहे.ते म्हणतात
" पंढरपुरातील रुखमाबाई, सत्यभामा आठवत आहे. सर्व संतांचा समारंभ आठवत आहे. वाळवंटात होणाऱ्या किर्तनाची आठवण होत आहे. पंढरीनाथाचे श्रीमुख आठवत आहे. " 
"हे पांडुरंगा काय हे ग्रहण माझ्या पाठीमागे लावलेस ? यात मला विनाकारण गोवलेस देवा, आतातरी लवकर धावून ये, यातून मला सोडव, माझे प्राण कंठात आले आहेत. माझे मरणच पहाणार आहेस काय ? माझा वेळ घालवत आहेस मला माझे मरण जवळ आलेले दिसत आहे." 

" केव्हा सुटेन ऐसें जाले जीवा । गोवियेलें देवा कांहीं येथें ॥१॥ आतां झडकरी धांवे लवकरी । सोडवी बाहेरी मजलागी ॥२॥ 
प्राण हा कंठी धरीला तुजसाठीं । निर्वाण दृष्टी पाहसी काय ||३|| चोखा म्हणे बांया चालिलासे वेळ । आला असे काळ निकट दिसे ॥४॥ " 

                        चोखोबाराय अत्यंत व्याकुल होऊन आपले म्हणने मांडत होते. त्यांना त्या कामावर जाने नापसंत होते. त्यांच्या इच्छे विरुद्ध त्यांना त्या कामाला लावले गेले होते. म्हणून आयुष्यभर त्रास भोगणाऱ्या संत चोखोबारायांना आता डोळ्यासमोर आपले मरण दिसू लागले होते.

                          त्यांनी स्पष्ट म्हटले आहे,माझा अंतिम समय जवळ आला आहे.सटवीने लेख लिहावा त्याप्रमाणे माझी शेवटची वेळ आली आहे. विठ्ठलाच्या सहवासाला आता अंतर पडणार आहे.माझे आयुष्य लोकांचे उष्टे खाण्यातच गेले. माझे प्रारब्धच एवढे होते. हा माझा शेवटचा दंडवत आहे ,पांडुरंगा ! 

एकेठीकाणी तर त्यांनी विठ्ठला मला तु परदीसे केलेस असेही त्यांनी म्हटले आहे.ते मनाने खचले होते.सोबत ना कुटुंब होते न संत मंडळ.त्यांचे आवसान गळाले होते.
या दुःखमय खडतर कामातून आणि भावनिक आत्मनिवेदनाने त्यांचा खरच अत्यंत करूण शेवट झाला. बांधकाम करताना मंगळवेढ्याची वेस कोसळी आणि त्यात संत चोखोबारायांचा मृत्यू झाला. हा दिवस शके १२६० गुरवार वैशाख वदय पंचमी होय,

                                       ही गोस्ट संत नामदेव व त्यांच्या संत मंडळातील सर्व संतांना समजली. नामदेवांसह सर्वचजनांनी मंगळवेड्याकडे धाव घेतली. मंगळवेढ्याच्या वेशीतल्या ढिगाऱ्यातून चोखोबारायांच्या अस्थी गोळा केल्या गेल्या. संत चोखोबारायांचा जीव पंढरपूरवर खुप होता.म्हणून आस्थी पंढरपूरला आणण्यासाठी नामदेवांनी पुढाकार घेतला." बघा माझा प्राणप्रिय चोखा आपल्याला सोडुन गेला आहे.त्याला न्याय द्यायला हवा.त्यांची दखल आपण नाहीतर कोण घेनार ? " या प्रकारे गावोगाव किर्तन करत, आस्थींचा कलश दर्शनासाठी पुढे करुन सर्व संत मंडळ भजन करत पंढरपूरकडे निघाले. गावोगावी सभा व्हायला लागल्या.संत चोखोबारायांची करूण कहाणी ऐकून लोक भावनिक व्हायला लागले.पंढरपुरला येईपर्यंत खुप मोठा गावोगावचा जनसमुदाय नामदेवांच्या सोबत सहभागी होत पंढरपूरला आला . संत चोखोबाराय विठोबाच्या अंगणात ज्या ठिकाणी उभे राहुन रोज भजन म्हनत असत ती मंदिरासमोरील जागा समाधीसाठी निवडली गेली.
                                      टाळ, विना गजराच्या स्वरात, ध्वज पतकांच्या वैष्णवांच्या मांदियाळीत चोखोबारायांच्या अस्थी पंढरपुरच्या विठ्ठल मंदीरासमोर पुरण्यात आल्या.फार मोठ्या जनसमुदायाच्या समोर बडव्यांना आणि सनातनी कर्मठ ब्राम्हणांना चोखोबांच्या होत असलेल्या समाधीला , हाडे पुरण्याला विरोध करता आला नाही. आता जनमत संत नामदेवांच्या, म्हणजेच संत चोखोबारायांच्या बाजूने झाले होते. या बद्दल संत नामदेवांनी चोखोबारायांच्या समाधीचे पुष्कळ अभंग लिहीले आहेत.संत नामदेवांच्या अभंग गाथ्यात संत चोखोबारायांच्या समाधी सोहळ्याचेही वर्णन आलेले आहे. या अभंगात विस्ताराने झालेल्या घटनेचे वर्णन संत नामदेवांनी केले आहे. संत नामदेवानी मंगळवेढ्याच्या वेशीतून चोखोबारायांची हडे गोळा करून त्यांची समाधी विठ्ठल मंदीराच्या समोरच का बांधली होती ? तर तुम्ही बडवे, ब्राम्हण पुरोहित वर्ग  चोखोबाला अस्पृश्य मानत होतात. त्यांना मंदिरासमोर येऊ देत नव्हतात. त्यांनी अभंग रचने , गाणे तुम्हाला धर्मद्रोह वाटत होता. तुम्ही वारंवार चोखोबाला छळत होतात. आज मात्र आम्ही तुमच्याच नाकावर टिच्चुन तुम्हाला नको असलेल्या एका अस्पृश्यांची समाधी विठ्ठल मंदीराच्या पायरीसमोर बांधत आहोत. या आडवे कसे येतात ते बघु , रोखुन दाखवा एवढा जनसमुदाय.नामदेव यांनी वैदिकांच्या, सनातन्यांच्या उराबर नाचून समाधी बांधुन दाखवली आणि आपल्या समस्त वारकर्यांना सांगितले ज्याला ज्याला विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे, त्याने आधी चोखोबारायांचे दर्शन घ्यावे. मग विठ्ठलाचे दर्शन होइल. आजपासून आपल्या वारकरी परंपरेचा गणपती कोण असेल तर संत चोखोबा होय.ज्याप्रमाणे आधी गणपतीचे दर्शन घेवुन मग मुख्य देवतेचे दर्शन घेतले जाते,अगदी त्याच प्रमाणे वारकरी परंपरेत चंद्रभागेत आंघोळ करुन आल्यानंतर आधी संत चोखोबारायांच्या समाधीचे दर्शन होइल आणि मग पांडुरंगाचे.हे संत नामदेवांनी सर्वांना सांगितले. म्हणून वारकरी सांप्रदायाचा मुख्य  गणपती चोखोबाराय आहेत. तुकोबाराय सुद्धा एका अभंगात म्हणतात "चोखा माझा गणपती | राधाई महारीन सरस्वती ॥"
                              आजही खेड्यात,  गावपातळीवर जातीवस्था, अस्पृश्यता  पाळणारे लोक जेव्हा पंढरपुरला जातात, तेव्हा त्यांना एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या संताच्या पाया पडुनच नंतर मंदिरात जावे लागते.हा विरोधाभास आहे. आणि  ही कमालही आहे संत नामदेवांची.


नितीन सावंत परभणी
9970744142

Monday, 2 May 2022

संत चोखोबारायांचे जीवनचरित्र l प्रकरण १३ वे ll पंढरपूरातून मंगळवेढ्याकडे

 संत चोखोबारायांचे जीवनचरित्र
प्रकरण १३ वे
पंढरपूरातून मंगळवेढ्याकडे

असेच करणें होते तुला l तरी का जन्म दिला मला ll
जन्म देवोनी सांडिले l काहो  निष्ठुर मन  केले ll
कोठे गेला माझे वेळी l केले कोणाचे सांभाळी ll
चोखा म्हणे देवा l नको मोकलू केशवा ll
            - संत चोखोबाराय

                        संत नामदेवांच्या अनुग्रहाने वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालेले चोखोबाराय जेव्हा अभंगातून आपली भुमीका मांडु  लागले होते. तेव्हा पंढरपुरातील सनातनी मंडळीचा पारा अधिकच चढल्याने त्यांनी विविध षडयंत्रे , कट कारस्थाने सुरु केली होती. गावकीची कामे करणाऱ्या अस्पृश्याने ज्ञानाच्या गोष्टी कराव्यात हे ब्राम्हणांना न पचणारे होते.चोखोबारायांनी विठोबाला आत्मनिवेदन करण्याच्या निमीत्ताने विटाळग्रस्त आम्हीच कसे  काय ? असा प्रश्न उपस्थित केला होता. अभंग रचून चोखोबारायांनी वेद, पुराण, ब्रम्हा, विष्णु विटाळापासून चुकले नाहीत मग माझाच विटाळ का धरता हा मुद्दा लावून धरला होता. यामुळे पंढरपुरातील ब्राम्हण खवळले होते. चोखोबारायांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे, हा विचार मनी बाळगून ते चोखोरायांवर लक्ष ठेवू लागले होते.आज उपलब्ध असलेल्या एकूण ३५८ अभंगात चोखोबारायांनी वेद पुराणावर प्रश्न उपस्थित केलेले अभंग उपलब्ध आहेत. त्यांच्या रचलेल्या परंतू हयात नसलेल्या कालौघात किंवा जानुनबुजून नष्ट केलेल्या अभंगात तर आजुन काय काय प्रश्न उपस्थित केले होते याचा आपण फक्त अंदाज  बांधू शकतो.त्याद्वारे चोखोबारायांची मांडणी वैदिक , सनातनी लोकांना पचनारी नव्हती. म्हणून विविध मार्गाने संत चोखोबारायांना त्रास देने सुरुच होते. विठ्ठल मंदिरात घुसला , देव बाटवला , मंदिरात चोरी केली,आशा अनेक कारणांवरून संत चोखोबारायांना आधी मारहान करण्यात आली आणि नंतर त्यांना पंढरपूरातून हाकलून लावण्यात आले.संत चोखोबारायांना चंद्रभागा नदी पलिकडेही हकलून दिल्यानंतर त्यांना त्रास देने काही थांबवले गेले नाहीच.नदीच्या पलिकडे नामदेवांच्या संत मंडळातील सर्व संत जेवायला जात असत.सर्वजन जातीभेदविरहीत एकत्र गोपाळकाला करत असत.
              चोखोबारायांच्या घरातील दही व लाह्या एकत्र करून चोखोबारायांची बायको सोयराबाई सर्वांना वाटत असे. संत नामदेव , संत जनाबाई ,ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, सावता महाराज, गोरोबाकाका, सेना महाराज , नरहरी महाराज सर्वजन एका पंगतीत बसुन भेदभाव न करता चोखोबारायांच्या घरचे दही लाह्या खात असत.हा समतेचा गोपालकाळा , ही जातीअंताच्या मार्गातील सहभोजनाची सुरुवात वैदिक सनातन्यांना खुप झोबली होती. ही गोष्ट विठ्ठल मंदिरातील ब्राम्हणांना न कळता थोडीच राहीली असेल. चोखोबारायांचे वाढलेले महत्त्व बघून मंदिरातील ब्राम्हणांनी पुन्हा दुसरा आरोप लावला की चोखामेळ्याच्या दह्याचे डाग विठ्ठल मुर्तीवर कसेकाय ?  याने पुन्हा मंदिरात येवून देव बाटवला.
               देव बाटवल्याचा हा आरोप दुसर्यांदा केला केला गेला होता.मात्र यावेळी यात मोठे कटकारस्थान होते. पूर्वी तरी चोखोबारायांना गावाच्या बाहेर हकलून दिले होते. आता मात्र पुर्वीपेक्षा कठोर शिक्षा देण्याचे प्रयोजन मंदिरातील बडव्यांनी केले होते. त्यांनी ब्राम्हण समुदायास एकत्र बोलावून , धर्मसभेने  बैलाच्या पायाला बांधुन फरफटत नेण्याची शिक्षा चोखोबांना सुनावली त्या घटनेची अमलपजावणी देखील झाली.संत चोखोबारायांना जीवंत मारण्याचा कट रचण्यात आला.याबाबदचा तपशील संत  सोयराबाईच्या अभंगात आलेला आहे.संत सोयराबाई लिहुन ठेवतात.
               " म्हणती या महाराने देव बाटवीला l
               जीवे मारा त्याला बैला जुंपा ll
               बांधुनिया पाय हाकियेले बैल l
               धरुनी शिवळ विठो उभा ll "
धर्मपुरोहीतांनी गलका केला.याला जीवे मारा , बैलाला जुंपा असल्या अरोळ्या ठोकणे सुरु झाले.आणि आशा गलक्यात संत चोखोबाराय सापडले.त्यांच्याशी मॉब लिंचींग सुरु झाली.
                  आशा पद्धतीने चोखोबारायांचा छळ चालूच होता. सोयराबाईनी विठोबाला प्रश्न केला आहे.
                  खाईले , जेविले त्याचा हा उपकार । दुबळीचा भ्रतार मारु पहासी ll
                  या सततच्या त्रासामुळे , आपमानास्पद वागणूकीमुळे चोखोबारायही आतून खचले होते.त्यांची सहन करण्याची मर्यादा संपली होती.ते अत्यंत व्यथीत  झाले." पांडुरंगा तुला हेच करायचे होते, तर का जन्माला घातलेस ? नुसते जन्माला घालून मोकळा झालास. आमच्या बाबतीत वेगळे असे काय कार्य कलेस ?  किती निठुर झालास तू ?  माझ्यावर संकट आले तेव्हा तु कुठे गेला होतास? हा प्रश्न चोचोबारायांनी विचारला होता.कुठल्या तरी कारणाने त्याही वेळी संत चोखोबाराय मृत्यूच्या जबड्यातून वापस आले.ते बचावले.
                 चोखोबांना बैलाच्या पायाला जुंपुन ओढत नेल्याची  घटना सर्व संतांनी गायली आहे.वर्णन केले आहे. ही बातमी गावभर, पंचक्रोशीत पसरली होती. जो तो भेटायला चंद्रभागेच्या पलिकडे चोखोबारायांच्या झोपडीकडे निघाला. याबद्दल संत चोखोबारायांची पत्नी सोयराबाई आपल्या अभंगात म्हणतात.

पंढरीचे ब्राम्हणे चोखीयासी छळीले । तया लागी नवल देवे केले ll  सकळ समुदाव चोखीयाचे घरी l रिद्धी सिद्धी द्वारी तिष्ठताती ll
रंगमाळा सडे गुढीया तोरणे । आनंद किर्तन वैष्णवांचे ll
असंख्य ब्राह्मण बैसल्या पंगती । विमानी पहाती सुखर ll
तो सुख सोहळा दिवाळी दसरा । वोवाळी सोयरा चोखियांसी ll

                    त्यावेळी सर्व संतमंडळ तातडीने चोखोबारायांच्या घरी गेले. अस्पृश्यता पाळणारे बडव्यासांरखे ब्राम्हण वगळता इतर ब्राम्हणही चोखोबारायांच्या घरी गेले.सडा टाकूण,तोरणे बांधून, किर्तन सोहळा घेतला गेला. ब्राह्मण अस्पृश्य असे सर्वजन एका पंगतीत जेवायला बसल्याचे सोयराबाई म्हणतात. त्यांना हा सोहळा दिवळी दसऱ्या सारखा वाटला. सोयराबाईनी संत चोखोबारायांना ओवाळून अनंद व्यक्त केला आहे. हा आनंद यासाठी की चोखोबारायांच्या बाजुने जनमत उभे राहिले होते. त्यांच्या दुःखात लोक धावून आले होते.
                    पुढील काळात ज्यांनी संत चोखोबारायांना त्रास दिला, चोखोबारायांना जीवे मारण्याचा  प्रयत्न केला.त्यांना चोखोबारायांचे वरचेवर वाढणारे महत्त्व  डोळ्यात खुपू लागले होते.नदीच्या पलीकडेही दिपमाळेच्या उजेडात होनारे किर्तन - भजन बडवे-पुरोहितांच्या कानात घुमू लागले होते.या चोखोबाचा  कायमचा बंदोबस्त केला पाहिजे.हा आपल्या डोळ्यासमोर नकोच.म्हणून बडव्यांनी बिदरच्या राजाकडे चोखोबांची तक्रार केली.पुढे राजाच्या सैनीकांनी चोखोबांना वेठबिगारीच्या कामावर वेस बांधण्यासाठी बळजबरीने नेले.इतक्या लोकप्रिय संताला वेस बांधायला साधा मजुर समजून कोणी नेनार नाही.शिवाय चोखोबाराय काही पंढरपूरचे परंपरागत - पिढीदरपिढीगत वेसकरही नव्हते.ते मेहुणाराजाचे परंपरागत वेसकर होते.पंढरपूरात चोखोबारायांवर वेसकरकीचा हक्क सांगण्याचे आधिकार कुनाला नव्हते. मग संत चोखोबारायांना बळजबरीने वेसकरकीच्या कामाला नेण्याचा आधिकार सैनिकांना होता का ? ही बळजबरी का केली गेली आणि कुनाच्या सांगण्यावरून केली गेली ? चोखोबाराय पंढरपूर आणि संतमंडळ सोडून जाण्यास तयार नाव्हते. तरीही सैनिकांनी त्यांना बळजबरीने नेले.अस्पृश्य  मजुराला कामावर यायचे नसेल तर त्याला नकार देण्याचे काही अंशी तरी अधिकार होते. येथे मात्र राजाचे सैनिक चोखोबांना बळजबरीने नेतात, त्यांना न्यावे असे जानीवपूर्वक सांगण्यात आल्याचा अंदाज बांधता येतो. आपले आप्तस्वकीय, कुटुंब, गुरू नामदेव, सर्व सहकारी संत, विठोबा, बांधलेली दिपमाळ आणि पंढरपुर सोडून जाताना चोखोबारायांना अत्यंत गहिवरून आले होते.त्यांना मंगळवेढ्याची वेस बांधण्यासाठी नेले जात होते. कवित्व करणे , भजन कीर्तन करणे , संतांच्या सहवासात राहणे हे संत चोखोबारायांना हवे होते.यापासून ते जेव्हा दुर जात होते तेव्हा त्यांनी आपल्या अंतरीक भावना व्यक्त करताना काही अभंग लिहीलेत.त्यात ते म्हणतात.
                   
येथें तो दु:खाचे डोंगर आठवती । वाटतसे खंती मना माझ्या ।।
कां हो पंढरीराया परदेशीं केलें । कोणी न देखे आपुलें काय करूं ll
आठवे पंढरी आठवे महाद्वार । संतांचा भार आठवतो ll
आठवतो नामा पुंडलिक सखा । चोखा म्हणे देखा तळमळ वाटे ll

स्वतंत्र अभिव्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व असणाऱ्या एका संताला बळजबरीने त्याच्या सत्वापासून सनातन्यानी दुर केले.एखाद्याची अभिव्यक्ती मारणे , व्यक्त न होऊ देने,ही एक प्रकारे हत्याच आहे.

नितीन सावंत परभणी
9970744142