संत चोखोबारायांचे जीवनचरित्र
प्रकरण १३ वे
पंढरपूरातून मंगळवेढ्याकडे
असेच करणें होते तुला l तरी का जन्म दिला मला ll
जन्म देवोनी सांडिले l काहो निष्ठुर मन केले ll
कोठे गेला माझे वेळी l केले कोणाचे सांभाळी ll
चोखा म्हणे देवा l नको मोकलू केशवा ll
- संत चोखोबाराय
संत नामदेवांच्या अनुग्रहाने वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालेले चोखोबाराय जेव्हा अभंगातून आपली भुमीका मांडु लागले होते. तेव्हा पंढरपुरातील सनातनी मंडळीचा पारा अधिकच चढल्याने त्यांनी विविध षडयंत्रे , कट कारस्थाने सुरु केली होती. गावकीची कामे करणाऱ्या अस्पृश्याने ज्ञानाच्या गोष्टी कराव्यात हे ब्राम्हणांना न पचणारे होते.चोखोबारायांनी विठोबाला आत्मनिवेदन करण्याच्या निमीत्ताने विटाळग्रस्त आम्हीच कसे काय ? असा प्रश्न उपस्थित केला होता. अभंग रचून चोखोबारायांनी वेद, पुराण, ब्रम्हा, विष्णु विटाळापासून चुकले नाहीत मग माझाच विटाळ का धरता हा मुद्दा लावून धरला होता. यामुळे पंढरपुरातील ब्राम्हण खवळले होते. चोखोबारायांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे, हा विचार मनी बाळगून ते चोखोरायांवर लक्ष ठेवू लागले होते.आज उपलब्ध असलेल्या एकूण ३५८ अभंगात चोखोबारायांनी वेद पुराणावर प्रश्न उपस्थित केलेले अभंग उपलब्ध आहेत. त्यांच्या रचलेल्या परंतू हयात नसलेल्या कालौघात किंवा जानुनबुजून नष्ट केलेल्या अभंगात तर आजुन काय काय प्रश्न उपस्थित केले होते याचा आपण फक्त अंदाज बांधू शकतो.त्याद्वारे चोखोबारायांची मांडणी वैदिक , सनातनी लोकांना पचनारी नव्हती. म्हणून विविध मार्गाने संत चोखोबारायांना त्रास देने सुरुच होते. विठ्ठल मंदिरात घुसला , देव बाटवला , मंदिरात चोरी केली,आशा अनेक कारणांवरून संत चोखोबारायांना आधी मारहान करण्यात आली आणि नंतर त्यांना पंढरपूरातून हाकलून लावण्यात आले.संत चोखोबारायांना चंद्रभागा नदी पलिकडेही हकलून दिल्यानंतर त्यांना त्रास देने काही थांबवले गेले नाहीच.नदीच्या पलिकडे नामदेवांच्या संत मंडळातील सर्व संत जेवायला जात असत.सर्वजन जातीभेदविरहीत एकत्र गोपाळकाला करत असत.
चोखोबारायांच्या घरातील दही व लाह्या एकत्र करून चोखोबारायांची बायको सोयराबाई सर्वांना वाटत असे. संत नामदेव , संत जनाबाई ,ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, सावता महाराज, गोरोबाकाका, सेना महाराज , नरहरी महाराज सर्वजन एका पंगतीत बसुन भेदभाव न करता चोखोबारायांच्या घरचे दही लाह्या खात असत.हा समतेचा गोपालकाळा , ही जातीअंताच्या मार्गातील सहभोजनाची सुरुवात वैदिक सनातन्यांना खुप झोबली होती. ही गोष्ट विठ्ठल मंदिरातील ब्राम्हणांना न कळता थोडीच राहीली असेल. चोखोबारायांचे वाढलेले महत्त्व बघून मंदिरातील ब्राम्हणांनी पुन्हा दुसरा आरोप लावला की चोखामेळ्याच्या दह्याचे डाग विठ्ठल मुर्तीवर कसेकाय ? याने पुन्हा मंदिरात येवून देव बाटवला.
देव बाटवल्याचा हा आरोप दुसर्यांदा केला केला गेला होता.मात्र यावेळी यात मोठे कटकारस्थान होते. पूर्वी तरी चोखोबारायांना गावाच्या बाहेर हकलून दिले होते. आता मात्र पुर्वीपेक्षा कठोर शिक्षा देण्याचे प्रयोजन मंदिरातील बडव्यांनी केले होते. त्यांनी ब्राम्हण समुदायास एकत्र बोलावून , धर्मसभेने बैलाच्या पायाला बांधुन फरफटत नेण्याची शिक्षा चोखोबांना सुनावली त्या घटनेची अमलपजावणी देखील झाली.संत चोखोबारायांना जीवंत मारण्याचा कट रचण्यात आला.याबाबदचा तपशील संत सोयराबाईच्या अभंगात आलेला आहे.संत सोयराबाई लिहुन ठेवतात.
" म्हणती या महाराने देव बाटवीला l
जीवे मारा त्याला बैला जुंपा ll
बांधुनिया पाय हाकियेले बैल l
धरुनी शिवळ विठो उभा ll "
धर्मपुरोहीतांनी गलका केला.याला जीवे मारा , बैलाला जुंपा असल्या अरोळ्या ठोकणे सुरु झाले.आणि आशा गलक्यात संत चोखोबाराय सापडले.त्यांच्याशी मॉब लिंचींग सुरु झाली.
आशा पद्धतीने चोखोबारायांचा छळ चालूच होता. सोयराबाईनी विठोबाला प्रश्न केला आहे.
खाईले , जेविले त्याचा हा उपकार । दुबळीचा भ्रतार मारु पहासी ll
या सततच्या त्रासामुळे , आपमानास्पद वागणूकीमुळे चोखोबारायही आतून खचले होते.त्यांची सहन करण्याची मर्यादा संपली होती.ते अत्यंत व्यथीत झाले." पांडुरंगा तुला हेच करायचे होते, तर का जन्माला घातलेस ? नुसते जन्माला घालून मोकळा झालास. आमच्या बाबतीत वेगळे असे काय कार्य कलेस ? किती निठुर झालास तू ? माझ्यावर संकट आले तेव्हा तु कुठे गेला होतास? हा प्रश्न चोचोबारायांनी विचारला होता.कुठल्या तरी कारणाने त्याही वेळी संत चोखोबाराय मृत्यूच्या जबड्यातून वापस आले.ते बचावले.
चोखोबांना बैलाच्या पायाला जुंपुन ओढत नेल्याची घटना सर्व संतांनी गायली आहे.वर्णन केले आहे. ही बातमी गावभर, पंचक्रोशीत पसरली होती. जो तो भेटायला चंद्रभागेच्या पलिकडे चोखोबारायांच्या झोपडीकडे निघाला. याबद्दल संत चोखोबारायांची पत्नी सोयराबाई आपल्या अभंगात म्हणतात.
पंढरीचे ब्राम्हणे चोखीयासी छळीले । तया लागी नवल देवे केले ll सकळ समुदाव चोखीयाचे घरी l रिद्धी सिद्धी द्वारी तिष्ठताती ll
रंगमाळा सडे गुढीया तोरणे । आनंद किर्तन वैष्णवांचे ll
असंख्य ब्राह्मण बैसल्या पंगती । विमानी पहाती सुखर ll
तो सुख सोहळा दिवाळी दसरा । वोवाळी सोयरा चोखियांसी ll
त्यावेळी सर्व संतमंडळ तातडीने चोखोबारायांच्या घरी गेले. अस्पृश्यता पाळणारे बडव्यासांरखे ब्राम्हण वगळता इतर ब्राम्हणही चोखोबारायांच्या घरी गेले.सडा टाकूण,तोरणे बांधून, किर्तन सोहळा घेतला गेला. ब्राह्मण अस्पृश्य असे सर्वजन एका पंगतीत जेवायला बसल्याचे सोयराबाई म्हणतात. त्यांना हा सोहळा दिवळी दसऱ्या सारखा वाटला. सोयराबाईनी संत चोखोबारायांना ओवाळून अनंद व्यक्त केला आहे. हा आनंद यासाठी की चोखोबारायांच्या बाजुने जनमत उभे राहिले होते. त्यांच्या दुःखात लोक धावून आले होते.
पुढील काळात ज्यांनी संत चोखोबारायांना त्रास दिला, चोखोबारायांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यांना चोखोबारायांचे वरचेवर वाढणारे महत्त्व डोळ्यात खुपू लागले होते.नदीच्या पलीकडेही दिपमाळेच्या उजेडात होनारे किर्तन - भजन बडवे-पुरोहितांच्या कानात घुमू लागले होते.या चोखोबाचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे.हा आपल्या डोळ्यासमोर नकोच.म्हणून बडव्यांनी बिदरच्या राजाकडे चोखोबांची तक्रार केली.पुढे राजाच्या सैनीकांनी चोखोबांना वेठबिगारीच्या कामावर वेस बांधण्यासाठी बळजबरीने नेले.इतक्या लोकप्रिय संताला वेस बांधायला साधा मजुर समजून कोणी नेनार नाही.शिवाय चोखोबाराय काही पंढरपूरचे परंपरागत - पिढीदरपिढीगत वेसकरही नव्हते.ते मेहुणाराजाचे परंपरागत वेसकर होते.पंढरपूरात चोखोबारायांवर वेसकरकीचा हक्क सांगण्याचे आधिकार कुनाला नव्हते. मग संत चोखोबारायांना बळजबरीने वेसकरकीच्या कामाला नेण्याचा आधिकार सैनिकांना होता का ? ही बळजबरी का केली गेली आणि कुनाच्या सांगण्यावरून केली गेली ? चोखोबाराय पंढरपूर आणि संतमंडळ सोडून जाण्यास तयार नाव्हते. तरीही सैनिकांनी त्यांना बळजबरीने नेले.अस्पृश्य मजुराला कामावर यायचे नसेल तर त्याला नकार देण्याचे काही अंशी तरी अधिकार होते. येथे मात्र राजाचे सैनिक चोखोबांना बळजबरीने नेतात, त्यांना न्यावे असे जानीवपूर्वक सांगण्यात आल्याचा अंदाज बांधता येतो. आपले आप्तस्वकीय, कुटुंब, गुरू नामदेव, सर्व सहकारी संत, विठोबा, बांधलेली दिपमाळ आणि पंढरपुर सोडून जाताना चोखोबारायांना अत्यंत गहिवरून आले होते.त्यांना मंगळवेढ्याची वेस बांधण्यासाठी नेले जात होते. कवित्व करणे , भजन कीर्तन करणे , संतांच्या सहवासात राहणे हे संत चोखोबारायांना हवे होते.यापासून ते जेव्हा दुर जात होते तेव्हा त्यांनी आपल्या अंतरीक भावना व्यक्त करताना काही अभंग लिहीलेत.त्यात ते म्हणतात.
येथें तो दु:खाचे डोंगर आठवती । वाटतसे खंती मना माझ्या ।।
कां हो पंढरीराया परदेशीं केलें । कोणी न देखे आपुलें काय करूं ll
आठवे पंढरी आठवे महाद्वार । संतांचा भार आठवतो ll
आठवतो नामा पुंडलिक सखा । चोखा म्हणे देखा तळमळ वाटे ll
स्वतंत्र अभिव्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व असणाऱ्या एका संताला बळजबरीने त्याच्या सत्वापासून सनातन्यानी दुर केले.एखाद्याची अभिव्यक्ती मारणे , व्यक्त न होऊ देने,ही एक प्रकारे हत्याच आहे.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment