Monday, 11 April 2022

महात्मा फुले व संत परंपरा

 महात्मा फुले व संत परंपरा

ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर 
मो. ९९७०७४४९४९

            शिवस्मारकाचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे प्रणेते, आधुनिक मराठी साहित्याचे जनक, कवी, शिवशाहीर, राष्ट्रपिता, क्रांन्तीसूर्य अशा अनेक उपाध्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्यांच्या नावाचा गाजावाजा चालू आहे, असे जोतीराव फुले होत. आधुनिक भारताचा आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचा जेव्हा अभ्यासकांना अभ्यास करावा लागतो, तेव्हा सुरवात मात्र जोतीरावांपासूनच करावी लागते. किंवा जोतीराव फुले नाहीच वाचले तर स्वातंत्र्याचा लढाच कळत नाही. अशाप्रकारे भूतकाळाच्या पटलावरून इतिहासाची माहिती घेणाऱ्यांना जोतीराव फुले फार मोठी दिशादर्शक खूण ठरतात.
                   छत्रपती शिवराय ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा महान दुवा म्हणजे फुले होत. सयाजीराव गायकवाड , शाहूराजे यांना प्रेरणा देनारे सत्यशोधक फुलें होत. प्राचीन, मध्ययुगीन चळवळीचे आधुनिक भारतातील नेतृत्व म्हणेज फुले होते. या देशाला क्रांती-प्रतिक्रांतीचा इतिहास लाभलेला आहे. यात पहिल्यांदा भारतात क्रांती करणारे तथागत बुद्ध ते सम्राट अशोक मानले जातात. दुसऱ्या टप्प्यात संत आंदोलन ते शिवराय व तिसऱ्यांदा राष्ट्रपिता जोतीराव फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. थोडक्यात काय तर अडीच ते तीन हजार वर्षापासून चालत आलेल्या समतावादी विचार चळवळीचे नेतृत्व करण्याचे काम आधुनिक भारतात फुले करत होते.
                    महाराष्ट्रात फुलेंवर अनेक अंगानी लिखाण झाले आहे. राष्ट्रपिता जोतीराव फुलेंवर सर्वच बाजूंनी चर्चा करणारे अनेक ग्रंथ महाराष्ट्रात आहेत. त्यात 'महात्मा फुले साहित्य आणि चळवळ' हा देखील महाराष्ट्र शासनाचा,हरि नरके यांनी संपादित केलेला एक ग्रंथ आहेत. या ग्रंथांची उणीव अशी की हा ग्रंथ फुलेंवर असणारा संत अंदोलनाचा प्रभाव दाखवत नाही किंवा अनेक लेखकांकडून जे लेख जमा केलेत त्यात फुले व संत आंदोलन या विषयाचे लिखाण सापडत नाही. या पद्धतीने लिखाण फारसे न झाल्यामुळे अनेक सनातन्यांनी वारकऱ्यांना फुलेंपर्यंत पोहचवू दिले नाही.किंवा जोतीराव फुले वारकर्यांत पोहंचू दिले गेले नाहीत. 
                   या देशात संतांनी प्रस्थापितांच्या विरोधात फार मोठे आंदोलन उभे केले होते. लोक वारकरी संप्रदाय, वारकरी पंथ किंवा वारकरी चळवळ हा शब्दप्रयोग करतात. मी मात्र वारकरी आंदोलन किंवा संत आंदोलन हा शब्दप्रयोग उचित समजतो. ज्यामुळे शत्रु मित्राची ओळख होण्यास मदत होते. या देशात वारकऱ्यांनी बुद्धानंतर जातीव्यवस्थेच्या वर्णव्यवस्थेच्या कर्मकांड, व कट्टरतेच्या विरोधात जो सर्वात मोठा लोकलढा उभारला होता. त्या लढ्याचा प्रभाव अनेक लेखक साहित्यिक, कवी व सर्वसामान्यांवर आजही दिसून येतो. मग याला जोतीराव फुले कसे बरे अपवाद राहतील. म्हणूनच तर आपले साहित्य जनमानसात पोहचवण्यासाठी जेव्हा फुले कंबर कसतात, तेव्हा संतांच्या अभंगाप्रमाणे अखंड म्हणून ते पद्य रचना करतात. अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारे तर अखंड म्हणजे कुठलाही खंड न पडणारा काव्य प्रकार. हा फुलेंचा लिखाणातला व्यापक दृष्टीकोन जो दिसून येतो तो संतांच्या प्रभावामुळेच. 
                म्हणूनच संतांनी आंदोलनाच्या ज्या भूमिका मांडल्या त्या सर्व भूमिका फुले मान्य करून पुढे चालवतात. संतांनी प्रस्थापितांचे साहित्य नाकारून स्वतंत्र साहित्य निर्माण केले होते.संस्कृत साहित्यरचना नाकारून , श्लोक नाकारून, वेद, पुराणे, स्मृती नकारून संतांनी मराठी भाषेत अभंग रचना स्विकारल्या. तसे संतांनी मराठीत साहित्य लिहीले , मराठीतच आपल्या भुमीका मांडल्या. फुले सुद्धा "माझ्या घालमोड्या दादा' म्हणून न्या. रानडेला पत्रात लिहून सांगतात की, 'तुम्ही आपमतलबीपणाने लिहिलेले साहित्य आम्ही नाकरतो. 'आम्ही आमचे स्वतंत्र साहित्य निर्माण करू'.हे स्पष्ट नोंदवून फुले स्वतंत्र सहित्यप्रवाह उभा करूनही दाखवतात.संतांच्याप्रमाणे ते अखंड ही काव्यरचना स्विकारुन मांडणी करतात. 
                     'ज्ञानदीप लावू जगी' म्हणणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या किंवा जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले। देव तेथेची जाणावा। तोच साधू ओळखावा।।' म्हणणाऱ्या संत तुकोबारायांच्या उक्तीला सार्थ ठरणारे व्यक्तीमत्व म्हणजे फुले होत. अस्पृश्यांसाठी शाळा काढुन ,सार्वजनिक सत्यधर्म स्थापून रंजल्या गांजल्यांसाठी ज्ञानदीप लावण्याचे संतांचे काम फुले करताना दिसतात. 
                     
                  संत जनाबाई , संत नामदेव म्हणतात, “अपराधाविण बळी घातला पातळी" आणि संत तुकोबाराय सुद्धा विष्णुला खडसावताना म्हणतात, 
                  
"हरि तु निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठिण 
नव्हे ते करिसी मान कवणे नाही केले ते ।। १ ।।
बळी सर्वस्वे उदार , जेने उभारीला कर 
करोणी कहर तू पाताळी घातीला l 

               म्हणजे सर्व संत बळीराजाची बाजु घेतात.संत साहित्यातून हे बळीराजाचे प्रतिक फुले घेतात आणि आपल्या अखंडात तुकोबारायांप्रमाणेच तोच प्रश्न उभा करतात. 

वामन का घाली l बळी रसातळी l 
प्रश्न जोती माळी l करी भटा ll 

 'बालपणी फुले जेव्हा लिहायला, वाचायला लागले तेव्हा त्यांच्या आजुबाजुची मंडळी त्यांच्याकडून कबिरांचा बीजमती हा ग्रंथ वाचून घेत असत. यातूनच फुले संतांकडे वळले. ते अनेक संतांचा अभ्यास करतात.
"नाना वर्ण गाय के एक वर्ण दुध 
तुम कहा के ब्राह्मण। हम कहा के सुद।। 
               हे नामदेव वचन वाचून त्यांची तर्कबुद्धी जागी होते आणि मग फुले रस्त्यावर उतरून पुन्हा संत आंदोलनाचे पुनरूज्जीवन करतात. फुले यांचे अखंड आणि तुकोबारायांच्या अभंगात प्रचंड साम्य असल्याचे आपल्याला दिसेल. 
संत तुकोबाराय म्हणतात -
"ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म" अगदी फुले सुद्धा अखंड रूपाने तेच मांडतात.
"ठावे नाही वर्म ब्राह्मणास ।'
तुकोबा गणपती बद्दल म्हणतात
"गणोबा विक्राळ। लाडु मोदकांचा काळ ।।" आणि फुले सुद्धा तेच सांगतात
“चिखला तुडवूनी बनविला मोऱ्या ।।
केला ढंबुढेऱ्या। भाद्रपदी ।।"

संत तुकोबाराय म्हणतात 
" आली सिंहस्थ पर्वणी नाव्ह्या भटाची धणी  " 

फुले म्हणतात 
दाढी डोई वेण्या मुढ भादरती l भट करिताती l दृव्यलुट ll 

संत तुकोबाराय म्हणतात 
सत्य असत्याशी मन केले ग्वाही l मानियेले नाही बहुमता ll 
किंवा 
तुका म्हणे सत्य सांगोत l येतील रागे तरी योवोत ll 

सत्याची बाजु घेताना फुले म्हणतात 

"सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर
जगामाजी सुख सारे, खास सत्याची ती पोरे " 

संत तुकोबाराय म्हणतात 
" नवसे कन्या पुत्र होती l तर का करणे लागे पती ll 
अगदी तंतोतंत फुले म्हणतात 
"जप अनुष्ठाने स्त्रीया मुले होती ll दुजा का करती मुलासाठी ? "
  
                    अशा अनेक अभंगाद्वारे फुले संताचेच कार्य पुढे नेत होते हे आपल्या सप्रमाण सिद्ध करता येते. 

                      पण खेदाची गोष्ट आमच्या वारकऱ्यांनी फुले स्विकारले नाहीत  किंवा राष्ट्रपिता जोतीराव फुले आज वारकऱ्यांपासून दूरच आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. फुलेंबद्दल वारकऱ्यांमध्ये अनेक आफवा पसरवण्यात आलेल्या आहेत. ब्राह्मणी व्यवस्थेतील अनेक लोकांचे अनेक आक्षेप फुलेबद्दल दिसून येतात.त्यातील अत्यंत महत्वाच्या एका आक्षेपावर मी येते चर्चा करू इच्छितो तो आक्षेप आधी आपण पाहू -
                     १) फुले वारकरी चळवळींच्या विरोधात होते किंवा फुले देवधर्म नाकारतात, वगैरे वगैरे हा आक्षेप फक्त विश्वहिंदुपरिषद आणि आर.एस.एस. च्या लोकांचा आहे. कारण फुलेंनी वारकऱ्यांप्रमाणेच वैदिक कर्मकांड म्हणजे फुटके वेद नाकारले होते.या देशात संत तुकोबाराय म्हणाले होते, 'तिर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी'. 
मग आयुष्यभर आपल्या कार्यातून आणि साहित्यातून फुले हेच सांगत होते. मग फुले धर्मद्रोही कसे? बरे संत नामदेव
महाराज म्हणतात.
“आम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म ॥ म्हणूनच फुले सुद्धा 'सत्यधर्म' काढतात. मग बिघडले कुठे? यात मिरच्या कुणाला झोंबल्या असतील विचार करा ?
या देशात 'या रे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर म्हणत संतांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था नाकारली. हेच काम आधुनिक भारतात फुलेंनी केले. यात धर्मद्रोहाचे कारण काय? संत म्हणत होते -
"पंढरीच्या लोका नाही अभिमान
पाया पडतीजण एकमेका"
                आजतरी ब्राह्मण इतरांच्या पाया पडतात का? म्हणून चक्क भटजीच नाकारायला सांगणारे फुले आजही प्रासंगिक ठरतात. त्यामुळे फुले एकदा वाचुन आमच्या वारकऱ्यांनी समजून घ्यावेत आणि फुलेंची भुमिका मान्य करावी आणि कुणाच्याही अफवांना बळी पडू नये.
              तात्पर्य काय तर फुलेंवर संतचळवळीचा प्रचंड मोठा पगडा होता. हे त्यांच्या अखंडावरूनच सिद्ध होते. आणि फुले सुद्धा पुढच्या काळात संताचेच कार्य करत होते. संत आंदोलनालाच फुलेंनी पुनरूज्जीवित केले. यात कुठलीही तीळमात्र शंका नाही.

ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर 
9970744142

No comments:

Post a Comment