♦अब्राम्हणी कला आणि साहित्याचे सौंदर्यशास्त्र ♦
कुठल्याही सामाजक्रांतीची पुर्वअट ही कला आणि साहित्य असते.क्रांतीस उद्युक्त करनारे कला साहित्य निर्माण झाल्याशिवाय क्रांती कशी होइल.
"साहित्य क्रांतिकारक असते; पण ते क्रांतीशास्त्र नसते. साहित्य क्रांती करत नाही तर क्रांतिला उद्युक्त करते,तर क्रांतिशास्त्र क्रांती कशी करायची ते शिकविते"१
म्हणजे आधी आपल्याला या देशात कला आणि साहित्याचा क्रांतिकारक विकास घडवून आनायचा आहे ज्याद्वारे या देशात क्रांतिची सुरुवात होइल.
याला ग्रामसीच्या भाषेत कल्चरल हेजोमनीवर काम करणे म्हणतात.
या देशाच्या क्रांतीची पुर्वअट जातीअंत आहे.म्हणून जातीअंत झाल्याशिवाय कुठलीही समाजवादी साम्यवादी वर्गीय क्रांती होने नाही.जात या केंद्रबिंदूचा विचार करुन भारतीय कलाकारांना व साहित्तीकांना आपल्या कलाकृतीला / साहित्यकृतीला आकार द्यावा लागेल. लोकमनाचा ठाव घेणाऱ्या सुंदर कलाकृती/ साहित्यकृती त्यांना प्रसवायच्या आहेत.म्हणून या देशातील साहित्तीक व कलावंतांनी सौंदर्यशास्त्र समजून घेतले पाहिजे.
"सर्व कलाशाखांच्या शास्त्रांना सामावनारे आणि त्यांना तत्वज्ञानात्मक उंचीवर नेनारे शास्त्र म्हणजे सौंदर्यशास्त्र होय. सौंदर्यशास्त्र हे विषयवस्तू, कलावस्तू ,व सौंदर्यवस्तू यांच्या परस्परसंबंधांची दार्शनिक मीमांसा करते.विषयवस्तू ही सामाजिक वास्तवाचा भाग असते,साहित्यिक वा कलावंत तिचा कलावस्तूत आविष्कार करतो आणि रसिक तिचा सौंदर्यवस्तूत ."२
म्हणजे साहित्यकृतीला सौंदर्यमुल्य प्राप्त होण्यासाठी रसिकासी समागम व्हावा लागतो.परंतू या देशात दोन विचारधारा सतत कार्यरत आहेत.तांत्रिकी वैदिकी किंवा ब्राम्हणी अब्राम्हणी या विचारधारा सातत्याने येथे कार्यरत असतात, म्हणून रसिक सुद्धा कुठल्या विचारप्रवाहाचा परवर्तक आहे त्यावर सौंदर्यमुल्य ठरते.म्हणजे रसिक आणि कलावंत ज्या समाजाचे अपत्य असतो त्याच्या अभ्यासावर आपल्या सौंदर्यमीमांसेची मदार ठेवतो.
कलावस्तू ही अनंतप्रसवा प्रकृती असते.ती पिढ्यानपिढ्या आपल्या कलेचे सुफले - कुफले रसिकाद्वारे प्रसवत असते.
भारतीय साहित्यिक या सौंदर्यशास्त्राच्या बाबतीत अनभिज्ञ असल्याने ब्राम्हणी अब्राम्हणी असा भेद करु शकलेले नाहीत, जे अत्यंत गरजेचे होते.याची सुरुवात आधुनिक भारतात मात्र फुलेंनी केली.
शरद पाटील म्हणतात त्याप्रमाणे सौंदर्यशास्त्र हे साहित्तिक वा कलावंत निर्मु शकत नाही हे खरे ; पण परिणत: साहित्यिक वा कलावंत बनण्यासाठी साहित्याचे वा कलेचे शास्त्र शिकावे लागते.
कलाशास्त्राचे उद्गाते हे सर्वहरा आहेत. मग ते सामाजिक सर्वहरा असोत नाहीतर आर्थिक सर्वहरा असोत. सुखवस्तू, उच्चभ्रू लोकांनी कलाशास्त्राचा विकास केला असेल , असेलही परंतू त्या कलाशास्त्राचे ते जनक नव्हेत.काही डावे आणि डाव्यांचे बुद्धीजीवी म्हणतात की सवडीतून कला जन्माला येते. याबाबतीत कॉ शरद पाटील म्हणतात "श्रमातून राबण्यातून आर्थात क्रियाशिलतेतून कला जन्माला येते . " शरद पाटलांचे म्हणणे योग्य आहे. ज्यांच्या गरजा पुर्ण झालेल्या आहेत ते कशाला नवनिर्मीतीचा खटाटोप करतील.
पानवठ्यावर बैलांना पाणी पाजताना एक विशिष्ट प्रकारची शिळ घालनारा शेतकरी किंवा घोड्याच्या साफसफाईच्या वेळी काढलेला आवाज,पोकळ लाकडी ओंडक्यावर पोकळ बंबूने बडवुन फेरधरुन नाचणारे आदिवासी, विनकाम करताना , दळताना कांडताना , शेतात भात लावताना म्हटलेली , गाईलेली गाणी ही कलेच्या निर्मीतीची प्राथमिक अंगे आहेत.येथून सुरु होते मनाचा ठाव घेनारी वाद्य किंवा कलाकृती निर्मीती.श्रमीकच जन्माला घालतात ताल लय आणि सुर. मेलेल्या जनावराच्या आंगावरले चामडे काढुन आनुन , ते सडवुन , त्याचे वाद्य बनवनारे अभिजन , उच्चभ्रू असतील काय ? हे त्यांच्याकडे भरपूर वेळ होता म्हणून त्यांनी केले होते काय ?
गुराढोरांच्या मागे असनार्या गुराख्याने वेळूच्या नळीला छित्रे पाडुन बासरी जन्माला घातली आहे . आपल्या कऱमनुकीसाठी म्हणून गोपालक कृष्णा तुम्हाला बासरी वाजवताना दिसेल .
म्हणून संबळ , ढोलकी , मृदंग,हलगी, झांज ,टाळ,बासुरी,घुंगरू, ही अब्राम्हणी कलेची सौंदर्यसाधने आहेत .याद्वारेच कलेची निर्मीती आणि विकास सर्वहरांनी केला आहे.
भारतीय सौंदर्याचा रंग हा काळा आहे.शेती करण्यासाठी वापरली जानारी काळी जमीन इथपासून ते ईश्वरीय प्रतिके असनारे विठ्ठल, कृष्ण , शिव , खंडोबा हे काळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतात.अब्राम्हणी सौंदर्यशास्त्रात स्त्रीचा शारीरिक बांधा हा नाजुक नसुन स्त्री जाडजूड असल्याचे दाक्षिणात्य चित्रपटांत दिसेल.म्हणून रंग काळा , शरीर जाडजूड , खानपान गावरान , रहानीमान मळकट साधे हे सर्व अब्राम्हणी सौंदर्यशास्त्राची अंगे साहित्त्यात जिथे दिसतात तिथे सर्वहरांचे सौंदर्यमुल्ये प्रसवले जाते.
भारतात आब्राम्हणी कला आणि साहित्याचा प्रवास तांत्रिकी श्रृतीच्या छंदांपासुन सुरु होते .पुढे विश्वकर्मा , मयासुर अनेक कलावंत आपली कलाकारी भारताच्या मातीत ठेवून जातात . नंतर चार्वाक , बुद्ध , सांख्य तत्वज्ञाने सौंदर्यमुल्य प्रसवनारी क्रांतीच करतात . याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतात विकास पावलेली नालंदा तक्षशिला विक्रमशिला आणि वल्लभी सारखी जगविख्यात विद्यापीठे .
पुढे बुद्ध शिष्यांचा ताफाच अब्राम्हणी सौंदर्यशास्त्र विकसीत करतो . उंचीवर नेतो ज्यामधे दिग्नाग व त्यांचा शिष्यगण वा समुह सौत्रांतिक विज्ञानवाद चालवताना दिसतो .
पुढे ६४ योगीनी ह्या नाथ परंपरेला जन्माला घालतात त्यातून पुढे लिंगायत महानुभाव व वारकरी भक्ती चळवळी विकास पावतात.आणि मग संत लोक साहित्यनिर्मिती करुन लोकमनाचा ठाव घेताना दिसतील.
पुढे फुले आंबेडकर क्रांतिकारी साहित्यनिर्मितीचा नवा पायंडा पाडताना दिसतील.यात मोठी भर घालतात ते आण्णाभाऊ.
शरद पाटिल,डिडी कोसंबी,रोमीला थापर नंतर मराठी साहित्यविश्वात राचिंढेरे व नेमांडेंना ओलांडून पुढे जाताच येनार नाही.कलाकारांमधे विठ्ठल उमप.आणि आजचे सर्व अब्रम्हणी खेड्यापाड्यात फिरनारे कलावंत.
आजच्या कलावंत व साहित्तीकाने आपल्या साहित्यकृतीद्वारे लोकमनाचा ठाव घ्यावा . त्याने रसिकाला अस्वस्थतेथुन मार्ग करुन द्या.भावनांच्या हिंदोळ्यावर नुसते हेलकावे खात तिथेच विवहळत पडायला लावनारी कलाकृती किंवा साहित्यकृती ही प्रतिबिंबवादी असते ती क्रांतीकारी ठरु शकत नाही.
सर्जक कलावंतांची नेनीव सहृदयाला वा रसिकाला प्रसवक्षम बनवते.सहृदयाने प्रसवक्षम बनुन सहनवनिर्मीती करावी असा अभिजात कलावस्तूचा उत्सव संकेत असतो . अभिजात कलावस्तू तिच्या सर्जकाच्या जाणीव नेणिवेच्या द्वेताने बनलेली असते . कलावंताची जाणीव त्याला प्रसुत करते तर त्याची नेनीव रसिकाला ."३
अलिकडल्या काळात छोट्या छोट्या शॉर्टफिल्म बनवणाऱ्या निर्मात्यांना आपल्या कलाकृतीचा या पातळीवर विचार केला तर त्यांची कालाकृती निश्चित लोकांच्या मनाचा ठाव घेइल.
नवनिर्मीतीचे हे अनंत वैचारिक स्तर असे सहज अनुभववायला मिळनार नाहीत त्यासाठी आपल्याकडे हवी सौमाची भेदक नजर ....
नितीन सावंत , परभणी
संस्थापक अध्यक्ष,
मानव मुक्ती मिशन
9970744142
--्---्---्---्---्---्---्---्---्---्---्---्---्--
संदर्भ:
१. अब्राम्हणी कला आणि साहित्याचे सौंदर्यशास्त्र - कॉ शरद पाटील , पान क्र २ आवृत्ती द्वितीय २०१७ .
२. उक्त , पान क्र. ३
३. उक्त , पान क्र , १४५
----------------------------------------------