जनी बैसली न्हायाला l
पाणी नाही विसणाला ll
घागर घेवून पाण्या गेली l
विठू मागे धाव घाली ll
गोपाळपुर्यावरी l जनाबाईची झोपडी ll
नामयाच्या घरी l जनी झाडलोट करी ll
देव केराच्या पाट्या भरी l
दळीता कांडीता l देवाहाती आले फोड ll
जनाबाई बोले l केली वैकुंठाची जोड ll
रुख्मिणी धुन धुई l विठ्ल दरडी उभा ll
त्याहीच्या पिरतीला ll दंग झाली चंद्रभागा ll
रुख्मिणी बोलती देवा जन्मगेला वाया l
एवढ्या राऊळात बाळ नाही खेळवाया ll
इठ्ठल म्हनती l नाही जना करमत ll
मी जातो अंघुळीला l कर धुण्याचं निमित्त ll
रावळापासुन l गोपाळपुराला सुरंग ll
येरझारा घाली l जनीसाठी पांडुरंग ll
इट्टल मनईती l चल जना माडिवरती ll
रुख्मिण नाही घरी l दोघं बोलु घडीभरी ll
रुख्मिण जेवु वाढी l निराशा दुधामधी केळं ll
देवाला आवडतं l जनाच ताक शिळं ll
देवाच्या फराळाला l रुख्मिण देती दुध फेन्या ll
देवाला आवडती l जनाच्या ताककन्या l
रुख्मिण जेवु वाढी l पोळी ठेवती काढून ll
दे ग जनाला वाढून l सावळे रुखमाई ll
देव बसले जेवाया l पोळी ठेवीती ताटाआड ll
रुख्मिण म्हनती देवा l जनाचं किती येड ll
रुख्मिण म्हनती l कांबळ कावं खांद्यावरी ll
अग इसरुन आलो l शाल जनीच्या मी घरी ll
रुख्मिण म्हनी l देवा तुम्हाला लाज थोडी ll
जनीच्या मंदिरात l वाकळाची काय गोडी ll
रुख्मिण मनिती l देवा तुमचा येतो राग ll
जनीच्या काळजाचा ll दुशालीला काळा डाग ll
काठी या घोंगडीच्या l म्होरं वाटेनं कोन जातो ll
पिरतीचा पांडुरंग l जनीचं धुनं धुतो ll
विठ्ठल म्हने l चल जने गवताला ll
चंद्रभागेच्या वताला l फार पोवना दाटला ll
इट्टलाच्या पाया l रुख्मिण लावती दही ll
खरं सांगा इठ्ठला l जना तुमची कोन व्हावी ?
इट्टलाचं पाय l रुख्मिण घेई तळहातं ll
खरं बोला स्वामी l जनीचं काय नातं ll
रुख्मिण म्हनती देवा l गळीयाची आन ll
जना तुमची व्हावी कोन l माझी धर्माची बहीण ll
इट्टल म्हनती l नको रुख्मिण राग धरु ll
जना धर्माचं लेकरु l आलं थार्याला पाखरु ll
इट्टल म्हनती l कागं रुख्मिण कपटी ll
जना बहीण धाकटी l आपल्या दोघामधी ll
इट्टल मनितो l का गं रुख्मिण बोलना ll
गोपाळपूरा जाया l रथ जागचा हलेना ll
देव इट्टल मनी l नाही रुख्मिणीला ग्यान ll
आपल्या दारावुन l जनी गेली अबोल्यानं ll
भरली चंद्रभागा l पाणी चाललं वाहुनं ll
जनाच्या भेटीसाठी देव l जाती रुख्मिणी घेवून ll
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जनी आणि विठ्ठलाचे नेमके नाते काय होते ? वारकरी परंपरेला मधुरा भक्ती मान्य होती का ? तर बिलकुल नाही.वारकरी परंपरेत मधुरा भक्ती नाही.. मग जनी आणि विठ्ठल यांचे नातेसंबंध काय होते.. ?
याचे उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील महिलांनी जात्यावरच्या ओव्यांमधुन दिलेले आहे..
Kailash B. Krishna यांनी जमा केलेले मौखिक संचीत .. लाखमोलाचा ठेवा .. याद्वारे हे नातेसंबंध काय होते हे आपल्याला हे समजते ..
जनी आणि विठ्ठलाचे नेमके नाते काय होते .. ग्रामीण जात्यावरच्या ओव्यांमधुन ..
कैलास यांच्या वालवरुन ..नवा ठेवा ..
जेव्हा रुख्माणीला हेवा वाटतो जनाबाईंचा.....
(आई गात असतांना लिहून काढलं)
कमानी दरवाजात, रुख्मणीचे दोन्ही हात!
खरं सांगा विठ्ठला, जनी शी काय नातं?
विठ्ठल म्हणे रुख्मानिला,अंघोळीला टाक पाणी!
मी नाही टाकणार पाणी, जनी तुमची आहे कोणी?
कमानी दरवाजात रुख्मणीचे दोन्ही हात!
खरं सांगा विठ्ठला, जनी शी काय नातं?
विठ्ठल म्हणे रुख्मानिला, जेवायला आन ताट!
मी नाही वाढत ताट, जनी तुमची लागस कोण?
कमानी दरवाजात रुख्मणीचे दोन्ही हात!
खरं सांगा विठ्ठला, जनी शी काय नातं?
विठ्ठल म्हणे रुख्मानिला, पानाचा आन विडा!
मी नाही आणत विडा, जनीचा नाद सोडा!
कमानी दरवाजात रुख्मणीचे दोन्ही हात!
खरं सांगा विठ्ठला, जनी शी काय नातं?
विठ्ठल म्हणे रुख्मानिला, नको लावू असं पाप!
जनी आहे आपली लेक, आपण तिचे माय-बाप!
****************************************************