Saturday, 9 March 2019

कॉ.शरद पाटील:वंचितांचा विद्वान (proletariat intellectual)

कॉ.शरद पाटील:वंचितांचा विद्वान (proletariat's intellectual)

*************************
नितीन सावंत ,परभणी
9970744142
दि. 11 एप्रिल 2016
************************
                              शुद्रातिशुद्रांच्या मुक्तिचा मार्ग ज्ञानाद्वारेच जातो.त्याशिवाय त्यांना मुक्ती नाही.असेच ज्ञानाद्वारे संबंध भारतावर आपला ठसा उमटवुन गेलेले महापंडित म्हणजे कॉ.शरद पाटील होत.
                            त्यांचा जन्म धुळे जिल्हातील कापडणे या गावी एका सत्यशोधक कुटुंबात झाला.शरद पाटील यांच्या वडिलांचे नाव तानाजी तर आईचे नाव मंदोदरी होते.या जोडप्याच्या पोटी शरद पाटील यांचा जन्म १७ सप्टेंबर १९२५ रोजी झाला.घरातच सत्यशोधकी परंपरा असल्यामुळे धर्मग्रंथ वाचुन त्याची चिकीत्सा करण्याची सुरुवात बालवयातच शरद पाटलांनी सुरु केली होती.नंतर शिक्षण घेताना १९४५ साली त्यांनी देशव्यापी विद्यार्थी संपात सहभाग नोंदवून ज्ञान,शिक्षण याबरोबरच सामाजिक कामाला सुरुवात केली ती शेवटच्या श्वासापर्यंत.

                                 प्राच्यविद्यापंडित कॉ.शरद पाटील यांच्या जीवनचरित्राकडे पहाता त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ,कार्य आदिवासी वाड्या वस्त्यांवर, दुर्गम भागात पार पडलेले आहे.कुटुंबातच त्यांना सत्यशोधकी वारसा लाभल्यामुळे त्यांना वंचितांच्याप्रती आत्मीयता असने सहाजिकच होते.आधुनिक भारतात सामाजिक कार्यात फुले शुद्रांचे प्रतिनिधी,तर बाबासाहेब अतिशुद्रांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.दोघांनी तो वर्ग डोळ्यासमोर ठेवून कार्य केले.फुलेंनी शुद्रांची प्रेरणा बळीराजा, शिवराय उभे केले.बाबासाहेबांनी अतिशुद्र संत रवीदास, संत चोखोबाराय, संत नंदनार यांना आपला ग्रंथ अर्पण केला होता.

                                    अगदी असेच अदिवासींचे प्रतिनिधी म्हणजे कॉम्रेड शरद पाटिल होत.त्यांनी आदिवासींना जीवन जगण्याची  प्रेरणा गणमाता-निर्ऋती,शूर्पणखा दिली.दिवसा आदिवासी समुहांना घेवून व्यवस्थेशी झगडायचे आणि रात्रीला पुस्तकांशी भांडत वंचितांच्या मुक्तिसाठी खंडात्मक ग्रंथनिर्मिती करायची असा शपांचा जीवनक्रम होता.भारतीय वंचितांची इथल्या व्यवस्थेने थोडिही दखल घेतली नाही उलट त्यांनाच बेदखल आणि बेघर करण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेने केला होता.या शासनशोषणसंस्थेने तर आदिवासींना जंगल अतिक्रमकच ठरवले होते.त्यांना त्यांच्या जंगलापासून बेदखल केले होते.त्यांना देशाचे नागरिकत्वच नाकारले होते.त्यांच्यासाठी संघर्षाला कुणीही पुढे आले नव्हते.अशावेळी तिथे शपांनी आदिवासीं साठी ३० वर्षे संघर्ष केला,आणि त्यांना ओळख देणारा, हक्क अधिकार देणारा फाॅरेस्ट राइट अँक्ट २००६ हा कायदा पास करवून घेतला.त्यासाठी त्यांनी आदिवासींचा, इथल्या प्राचीन दास-शूद्रांचा इतिहास नव्याने लिहला .याच वंचितांसाठी आपले तत्वज्ञान उभे करुन देवून त्यांना क्रांतीचा धागा बनवनारे वंचितांचे-विद्वान कॉ शरद पाटिल होते.

आजच्या OBC, SC, ST चा प्राचीन इतिहास नकारात्मक पध्दतीने लिहला गेला होता.शपांनी तो विधायक नकारकरणातून मांडला.त्याद्वारे, वंचितांच्या मुक्तिची प्रेरणास्थाने इतिहासगर्भातून शोधली,उदा. निर्ऋती, तुळजा, रेणुका, ताटका,शुर्पणखा,सिता,हारिती, मंदोदरी,इ. बरोबरच नहुष,बळी ,विदुर, मय,मेंढक,बुध्द,आनंद,दिग्नाग, धर्मकिर्ति,मच्छिंद्रननाथ, सिध्द, योगिनी,चक्रधर,बसवेश्वर, तुकोबा, शिवाजी राजे,संभाजी राजे,काॅडवेल, मार्क्स, फुले,आंबेडकर,इ.हा प्रचंड ध्यास,हा अभ्यास वंचितांच्या मुक्ती साठी केला होता.
                                      मार्क्सवाद-फुले आंबेडकरवाद, सौत्रांतिक मार्क्सवाद, सर्वहरांचे अब्राम्हणी सौंदर्यशास्त्र, अतीत्यसदयभविष्यवेधी प्रमाणशाशास्त्र ही लढाईची मजबूत शस्त्रेही वंचितांच्या मुक्तितून नवसमाजरचनेच्या निर्मिती साठी त्यांनी उभी केली आहेत.

                              प्रसिद्धी पासून कोसो दुर आसलेले आणि सत्कार पुरस्कार नाकारत आपला लोकलढा सदैव चालू ठेवनारे शपा होते.हल्ली जिवंतपणीच स्वताचे पुतळे बनवून घेण्याचा सपाटा चालू असताना हा वंचितांचा-विद्वान मात्र भक्ती आणि श्रद्धेय तत्वे विचार नाकारत होता.पायात स्लिपर आणि सदैव खानादेशी पांढरा पोशाख परिधान केलेले शपांचे व्यक्तिमत्त्व अगदी साधे होते.दगडावर बसुन किंवा साध्या खुर्चीवर बसुन हातात बिना स्ट्यांडचा माइक घेवून,आहे त्या साधनांचा वापर करत,त्यांनी समोर बसलेल्या आदिवासी समुदायाला जगण्याचे तत्वज्ञान शिकवले.त्यांच्यासोबत राहिले. त्यांना जवळून पाहिलेले त्यांचे सर्वच अभ्यासक शपांचे वंचितांच्याप्रती असलेले धागे सांगतात. अनेक किस्से सांगतात.हा महायोद्ध कधी जम्मु-काश्मिरच्या टुरवर गेला नाही किंवा कन्याकुमारीच्या सूर्योदयाचे समुद्रप्रतिबिंबही वाखाणताना दिसला नाही.त्यांनी कधी लालित्यपूर्ण शृंगारिक ब्राम्हणी लिखानही केले नाही की अतिशयोक्तीपुर्ण शब्दांचे इमलेही उभे केले नाहीत. त्यांनी पुरावे देत वस्तुनिष्ठ लेखन केले. ते राबले ते फक्त वंचितांच्या हितासाठी. जात वर्ग स्त्रीदास्य अंतासाठी. देशाला आपल्या दैदिप्यमान पुर्वजांच्या इतिहास मिळवून देण्यासाठी.

                      आत्मभान हरपून राबावे,बेभान होऊन मार्गक्रमण करत रहावे,हे आम्हाला शिकविले,ते शपांनी. आदिवासींना आत्मभान देताना,जंगले तुडवताना त्यांच्या पायात १७ काटे रुतेपर्यंत ते आत्मभान हरवून कार्य करत राहिले.

                        तत्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान भारतीय जातवर्गस्त्रीदास्यांताच्या क्रांतीसाठी अद्वितीय, एकमेव आहे.त्यांनी सर्वहरा या संज्ञेचे सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरा असे दोन भाग केले.त्यात त्यांनी शेतकरी जातींना आर्थिक सर्वहरा संबोधले तर आदिवासी जमाती व माजीअस्पृश्य जातींना सामाजिक सर्वहरा ही उपाधी दिली.याच गटातून जे शोषक बनतात त्यांना कॉ शरद पाटील ब्राम्हणी बुद्धीजीवी,उच्चभ्रू मिरासदार शेतकरी आणि बनिया भांडवलदार संबोधतात.हे विधायक डिव्हायडेशन फार मोठी कोंडी फोडुन जानारे ठरले आहे.पुरोगामी चळवळीत पाश्चिमात्य विज्ञानवादाच्या आधारे आणि नकारात्मक प्रबोधनाने भारतीय संस्कृतीबद्दल द्वेषभावना निर्माण करणे चालु होते.आशावेळी कॉ.शरद पाटील यांनी भालचंद्र नेमाडे यांच्याकडे लक्ष वळवत अनेक कार्यकर्त्यांना देशीवाद अभ्यासायला शिकवले.त्यांनी पुरोगामी चळवळीत प्रथमच मानसशास्त्र समाविष्ट करून बोद्ध परंपरेतील दिग्नाग आचार्यांचा जानीव नेनीव तर्कशास्त्राचा विस्तार करुन नकारात्मक नास्तिकवादाची कोंडी फोडली.सर्वच सणवार उत्सवांचे मिथकीय उलगडा करुन अदिबंध जोडुन देताना त्यांनी नवी थिअरी दिली.ज्याला जाणीवनेनीवेचे तर्कशास्त्र म्हटले जाते.ज्यामुळे पुरातन सर्वच त्याज्य हा सिद्धांत बाद झाला. 

                 कॉम्रेड शरद पाटील यांनी प्रचंड मोठा त्याग केला, त्यांच्या ह्या त्याग आणि समर्पनाला मात्र मौन बाळगून डावलले गेले.त्यांच्या बाबतीत रचलेला मौनाचा कट मोठे नुकसान करुन गेला आहे.बुद्धाचा भिख्खू संघ त्यांच्या डोळ्यासमोर उभारला गेला होता,येथे मात्र शपांचे सौत्रांतिक-मार्क्सवादी-तत्वज्ञानी-संघ उभे राहिलेले पहायला शपा मात्र नाही राहू शकले.

                                       भारतीय व्यवस्थेचे यथोचित आकलन पहिल्यांदा कॉ.शरद पाटील यांनीच केले.हा देश निमभांडवली निमसरंजामी जातवर्गीय ब्राम्हणी व्यवस्थेत आडकला आहे.त्यातून त्याला बाहेर काढायचे असेल तर कॉ शरद पाटील पुढील तत्वज्ञान देतात.
१) मार्क्सवाद:फुले आंबेडकरवाद
२)अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण  पध्दती.
३)अतित-सद्य-भविष्य वेधी प्रमाणशास्त्र
४)जानीवनेनीन्वेषी तर्कशास्त्र
५)सौत्रांतिक मार्क्सवाद (तत्वज्ञान)
६)अब्राम्हणी सौंदर्यशास्त्र
७)अब्राम्हणी, विधायक इतिहासलेखन शास्त्र
हे त्यांनी दिलेले समग्र तत्वज्ञान, क्रांतिशास्त्र अभ्यासावे लागेल.आणि ते तत्वज्ञान समाजाला लावत उभा करावा लागेल एक नवा क्रांतीलढा ,वर्गजातस्त्रीदास्यांताचा.

                            म्हणून काळाच्या पटलावर योग्य वेळी, योग्य भूमिका घेवून ठामपणे उभा राहिलेला माणूस म्हणजे कॉ शरद पाटील होत.कोण काय म्हनत आहे, यापेक्षा सत्य किती महत्वाचे आहे , हा दृष्टीकोण सदैव उरी बाळगणारा हा सत्यान्वेषी माणूस होता.फुले शाहु आंबेडकरांच्या पश्चात जातीअंताचा मुद्दा सतत चर्चेच्या केंद्रबिंदूस्थानी ठेवण्याचे श्रेय एकमेव कॉ शरद पाटील यांना जाते. 

                        कुंठित अवस्थेत सापडलेल्या चळवळींना आणि  झापडबंद आयुष्य जगणाऱ्या बुद्धीजीवींना शरद पाटील यांनी खडबडून जागे करुन आजची समस्या जोखून त्यावर काम करायला शिकविले.नकारात्मक नास्तिकवाद हा ब्राम्हणी छावणीला मदत करतो.त्यासाठी त्यांनी चिकीत्सेची अब्राम्हणी विधायक अन्वेषन पध्दती बहाल केली.विधायक नकारातून इतिहासाचे पट उलगडायचे शास्त्रच त्यांनी बहाल केले.

                            त्यांचे अतितसद्यभविष्यवेधी प्रमाणशास्त्र प्रतिबिंबवादी प्रमाणशास्त्राला छेद देत दोलायमान हेलकावे खानाऱ्या समस्याग्रस्ताला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बहाल करते.कॉ शरद पाटील यांचे आनखी महत्वाचे योगदान म्हणजे अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र. लढाई शत्रूच्या सौंदर्याच्या संकल्पनांवर लढून कशी जिंकता येइल ? त्यासाठी सर्वहरांचे सौंदर्यशास्त्र असले पाहिजे.या भुमीकेतून शरद पाटील यांनी सर्वहरांच्या सौंदर्यशास्त्राचे शस्त्रागार खुले केले.

                    हा काळ कॉ शरद पाटील यांचा आहे.ज्या नेतृत्वाला, व्यक्तिला सर्वहरांचा मुक्तीदाता बनायचे आहे,ज्या संघटना, पक्ष, चळवळींना साचलेपणातून आणि  परात्मततेच्या चक्रव्यूहातून बाहेर यायचे आहे. त्यांनी ताबडतोब हेका, भक्ती आणि  संकुचितपणा बाजुला सारुन उदार अंतकरणाने कॉ शरद पाटलांचा मार्ग धरावा.

जसे संत नामदेव व जोतीराव फुले यांना सर्व स्तरातील अनुयाई लाभले अगदी तसेच कॉ शरद पाटिल यांनाही सर्व जात समुहाचे अनुयायी लाभले आहेत.

ते नेहमी म्हनत असत की
"मला खाटेवर मरायचे नाही.मला सर्वहरांसाठी लढत लढत मरायचे आहे."
आणि अगदी वक्तव्याप्रमाणे ते आपला पाचवा-खंड लिहिता लिहिता सर्वांस सोडुन गेले.

 प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा....

No comments:

Post a Comment