प्रकरण १४ वे
चोखोबारायांचे निर्वाण..
माझा तो समय निकट दिसे आला l लेख तो लेखिला जैसे झाले ll जन्मोनी पोसणा तुमचाच दास। आतां निकट सहवासी अंतरलो ll
उच्छिष्टाची आस सरलीसे दिसे। प्रारब्धासरसे ओढावलें ॥
चोखा म्हणे माझा दंडवत पायीं। करीं आतां साई कृपेची तूं ll
- संत चोखोबाराय
भारताच्या इतिहासाकडे बारकाव्याने पहायला गेलो तर, एक गोष्ट अशी लक्षात येते की, जे जे लोक चांगले काम करत होते त्यांना खुप अतोनात त्रास सहन करावा लागला. अत्यंत खडतर, यातनामय जीवन, माणुसकीचे काम करणार्यांच्या वाट्याला आले. महत्मा बसवेश्वरांच्या समतेच्या लढाईत सर्व शरणांच्या हत्त्या घडवून आनल्या गेल्या होत्या. चक्रधर स्वामींना पैठणच्या ब्राम्हणांनी खुप त्रास दिला होता. हेच माणुसकीचे काम करणाया संत चोखोबारायांनाही वेळोवेळी त्रास दिला गेला. त्यांच्यावर विठ्ठलाची मुर्ती बाटवल्याचा आणि चोरीचा आळ घालून त्यांना बेदम मारण्यात आले होते. एवढे करूनही सनातण्यांच्या डोळ्यात चोखोबाराय खुपत होते. म्हणून त्यांनी बिदरच्या राजाकडे तक्रार करून चोखोबारायांना कायमचे पंढरपुरातून हकलून लावले.या बद्दल भि. शि. शिंदे आपल्या ' संत चोखामेळा आणि मी " या ग्रंथात, प्रथम आवृत्ती, पान क्रमांक १५६ वर म्हणतात,
" चोखोबा काही गावाचा वतनदार महार नव्हता, तरी त्याच्या हितशत्रूंनी त्याचेही इतर महारांमध्ये नाव घातले आणि त्याची गावातील इतर महारांबरोबर मंगळवेढ्यास रवानगी करण्यात आली."
म्हणजे काय तर चोखोबारायांना सनातनी कर्मठीनीच मंगळवेण्यास नेण्यास सांगितले.काड्या , कुचाळक्या करुन चोखोबांना पंढरपूरातून बाहेर काढले गेले.
पंढरपुरातील एवढा सुखाचा सोहळा सोडून जाण्याची चोखोबांची ईच्छा नव्हती. त्याबद्दल त्यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले आहे.त्यांना पंढरपुर सोडून जावे लागत असल्याचे दुखद वर्णन त्यांनी अनेक अभंगात केले आहे.
संत चोखोबाराय मंगळवेढ्याला गेल्यानंतर सर्व अस्पृश्यांच्या बरोबरीने सैनिकांकडून वेशीच्या बांधकामाला ,बिगारीच्या कामाला लावले गेले. या बांधकामात दगड फोडून चिरे घडवणे, माती भिजवून चिखल तयार करणे, चिखल तुडवणे, चिखलाचे गोळे करून ते रचत जाणे, पाणी आनने अशी कामे दिवसरात्र चोखोबारायांच्या वाट्याला आली होती. श्रमचा मोबदला काय तर तोकडे,अपुरे अन्न.केवळ जेवण देण्याच्या मोबदल्यात मराणाची कामे करून घेण्याची पद्धती आपल्या देशात स्वातंत्र्य मिळेपर्यंत होती. आजही स्वातंत्र्या नंतरही जाते, उखळ , पाटा, वरवंटा घडवणाच्या भटक्या विमुक्त महिलांकडून केवळ एक भाकर देऊन, त्या दगड़ी वस्तु विकत घेतल्या जातात. चोखोबारायांचेही असेच शोषण चालू होते. दोन वेळच्या जेवणासाठी हा माणूस मरेतक राबत होता.एवढ्या जाचातून जाताना चोखोबांनी वारंवार पंढरपुरची आठवण काढली आहे.ते म्हणतात
" पंढरपुरातील रुखमाबाई, सत्यभामा आठवत आहे. सर्व संतांचा समारंभ आठवत आहे. वाळवंटात होणाऱ्या किर्तनाची आठवण होत आहे. पंढरीनाथाचे श्रीमुख आठवत आहे. "
"हे पांडुरंगा काय हे ग्रहण माझ्या पाठीमागे लावलेस ? यात मला विनाकारण गोवलेस देवा, आतातरी लवकर धावून ये, यातून मला सोडव, माझे प्राण कंठात आले आहेत. माझे मरणच पहाणार आहेस काय ? माझा वेळ घालवत आहेस मला माझे मरण जवळ आलेले दिसत आहे."
" केव्हा सुटेन ऐसें जाले जीवा । गोवियेलें देवा कांहीं येथें ॥१॥ आतां झडकरी धांवे लवकरी । सोडवी बाहेरी मजलागी ॥२॥
प्राण हा कंठी धरीला तुजसाठीं । निर्वाण दृष्टी पाहसी काय ||३|| चोखा म्हणे बांया चालिलासे वेळ । आला असे काळ निकट दिसे ॥४॥ "
चोखोबाराय अत्यंत व्याकुल होऊन आपले म्हणने मांडत होते. त्यांना त्या कामावर जाने नापसंत होते. त्यांच्या इच्छे विरुद्ध त्यांना त्या कामाला लावले गेले होते. म्हणून आयुष्यभर त्रास भोगणाऱ्या संत चोखोबारायांना आता डोळ्यासमोर आपले मरण दिसू लागले होते.
त्यांनी स्पष्ट म्हटले आहे,माझा अंतिम समय जवळ आला आहे.सटवीने लेख लिहावा त्याप्रमाणे माझी शेवटची वेळ आली आहे. विठ्ठलाच्या सहवासाला आता अंतर पडणार आहे.माझे आयुष्य लोकांचे उष्टे खाण्यातच गेले. माझे प्रारब्धच एवढे होते. हा माझा शेवटचा दंडवत आहे ,पांडुरंगा !
एकेठीकाणी तर त्यांनी विठ्ठला मला तु परदीसे केलेस असेही त्यांनी म्हटले आहे.ते मनाने खचले होते.सोबत ना कुटुंब होते न संत मंडळ.त्यांचे आवसान गळाले होते.
या दुःखमय खडतर कामातून आणि भावनिक आत्मनिवेदनाने त्यांचा खरच अत्यंत करूण शेवट झाला. बांधकाम करताना मंगळवेढ्याची वेस कोसळी आणि त्यात संत चोखोबारायांचा मृत्यू झाला. हा दिवस शके १२६० गुरवार वैशाख वदय पंचमी होय,
ही गोस्ट संत नामदेव व त्यांच्या संत मंडळातील सर्व संतांना समजली. नामदेवांसह सर्वचजनांनी मंगळवेड्याकडे धाव घेतली. मंगळवेढ्याच्या वेशीतल्या ढिगाऱ्यातून चोखोबारायांच्या अस्थी गोळा केल्या गेल्या. संत चोखोबारायांचा जीव पंढरपूरवर खुप होता.म्हणून आस्थी पंढरपूरला आणण्यासाठी नामदेवांनी पुढाकार घेतला." बघा माझा प्राणप्रिय चोखा आपल्याला सोडुन गेला आहे.त्याला न्याय द्यायला हवा.त्यांची दखल आपण नाहीतर कोण घेनार ? " या प्रकारे गावोगाव किर्तन करत, आस्थींचा कलश दर्शनासाठी पुढे करुन सर्व संत मंडळ भजन करत पंढरपूरकडे निघाले. गावोगावी सभा व्हायला लागल्या.संत चोखोबारायांची करूण कहाणी ऐकून लोक भावनिक व्हायला लागले.पंढरपुरला येईपर्यंत खुप मोठा गावोगावचा जनसमुदाय नामदेवांच्या सोबत सहभागी होत पंढरपूरला आला . संत चोखोबाराय विठोबाच्या अंगणात ज्या ठिकाणी उभे राहुन रोज भजन म्हनत असत ती मंदिरासमोरील जागा समाधीसाठी निवडली गेली.
टाळ, विना गजराच्या स्वरात, ध्वज पतकांच्या वैष्णवांच्या मांदियाळीत चोखोबारायांच्या अस्थी पंढरपुरच्या विठ्ठल मंदीरासमोर पुरण्यात आल्या.फार मोठ्या जनसमुदायाच्या समोर बडव्यांना आणि सनातनी कर्मठ ब्राम्हणांना चोखोबांच्या होत असलेल्या समाधीला , हाडे पुरण्याला विरोध करता आला नाही. आता जनमत संत नामदेवांच्या, म्हणजेच संत चोखोबारायांच्या बाजूने झाले होते. या बद्दल संत नामदेवांनी चोखोबारायांच्या समाधीचे पुष्कळ अभंग लिहीले आहेत.संत नामदेवांच्या अभंग गाथ्यात संत चोखोबारायांच्या समाधी सोहळ्याचेही वर्णन आलेले आहे. या अभंगात विस्ताराने झालेल्या घटनेचे वर्णन संत नामदेवांनी केले आहे. संत नामदेवानी मंगळवेढ्याच्या वेशीतून चोखोबारायांची हडे गोळा करून त्यांची समाधी विठ्ठल मंदीराच्या समोरच का बांधली होती ? तर तुम्ही बडवे, ब्राम्हण पुरोहित वर्ग चोखोबाला अस्पृश्य मानत होतात. त्यांना मंदिरासमोर येऊ देत नव्हतात. त्यांनी अभंग रचने , गाणे तुम्हाला धर्मद्रोह वाटत होता. तुम्ही वारंवार चोखोबाला छळत होतात. आज मात्र आम्ही तुमच्याच नाकावर टिच्चुन तुम्हाला नको असलेल्या एका अस्पृश्यांची समाधी विठ्ठल मंदीराच्या पायरीसमोर बांधत आहोत. या आडवे कसे येतात ते बघु , रोखुन दाखवा एवढा जनसमुदाय.नामदेव यांनी वैदिकांच्या, सनातन्यांच्या उराबर नाचून समाधी बांधुन दाखवली आणि आपल्या समस्त वारकर्यांना सांगितले ज्याला ज्याला विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे, त्याने आधी चोखोबारायांचे दर्शन घ्यावे. मग विठ्ठलाचे दर्शन होइल. आजपासून आपल्या वारकरी परंपरेचा गणपती कोण असेल तर संत चोखोबा होय.ज्याप्रमाणे आधी गणपतीचे दर्शन घेवुन मग मुख्य देवतेचे दर्शन घेतले जाते,अगदी त्याच प्रमाणे वारकरी परंपरेत चंद्रभागेत आंघोळ करुन आल्यानंतर आधी संत चोखोबारायांच्या समाधीचे दर्शन होइल आणि मग पांडुरंगाचे.हे संत नामदेवांनी सर्वांना सांगितले. म्हणून वारकरी सांप्रदायाचा मुख्य गणपती चोखोबाराय आहेत. तुकोबाराय सुद्धा एका अभंगात म्हणतात "चोखा माझा गणपती | राधाई महारीन सरस्वती ॥"
आजही खेड्यात, गावपातळीवर जातीवस्था, अस्पृश्यता पाळणारे लोक जेव्हा पंढरपुरला जातात, तेव्हा त्यांना एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या संताच्या पाया पडुनच नंतर मंदिरात जावे लागते.हा विरोधाभास आहे. आणि ही कमालही आहे संत नामदेवांची.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment