ll प्रकरण 2 रे ll
ll हिन यातीतला जन्म ll
हिन याती माझी देवा l कैसी घडे तुझी सेवा ll
मज दुर दुर हो म्हनती l तुज भेटु कवण्या रिती ll
माझा लागताची कर l सिंतोडा घेताती करार l
माझ्या गोविंदा गोपाळा l करुणा भाकी चोखामेळा
- संत चोखोबाराय
भारतीय जातीव्यवस्थेतल्या महार या अस्पृश्य ठरवलेल्या जातीतला संत चोखोबारायांचा जन्म.आजपासून साधारणत: साडेसातशे वर्षापूर्वीच्या सामंतशाहीत गावकुसाबाहेर हिन , कलंकित , दास्यत्वाचे जीने संत चोखोबारायांच्या वाट्याला जन्मताच आले होते.तो काळ अत्यंत कठोर नियमावलींच्या आमलाचा होता.त्यावेळी कुठलाही स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार अस्पृश्य जातींना नसत.म्हणजे स्वत:चे मत सुद्धा व्यक्त करण्याची कुठलीच मुभा , परवानगी अस्पृश्य जातींना नसे.प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात कुठलाही विचार आणि मत मांडण्याचे आधिकार तर नव्हतेच परंतू असे केल्यास प्राणदंडाच्या कठोरातील कठोर शिक्षा दिल्या जात असत.आशावेळी अंतरीच्या भावना आणि विद्रोह आध्यात्मिक भक्तिमार्गाच्याद्वारे मांडण्याचे कौशल्य नामदेवादी संतांनी विकसीत केले होते.याच आध्यात्मिक भक्ती मार्गाने अभिव्यक्त होऊन अस्पृश्यांचे पुढारपण संत चोखोबारायांनी केले होते.
देवाच्या दारात सर्व समान असतात ना ! भक्त आणि भक्तित कुठे भेदभाव असतो का ? आत्मा जर या देहातून त्या देहात जात असेल तर वरवरचा विटाळ पाळणे ईश्वर भक्तीत आध्यात्मात बसत नाही.म्हणून भौतिक जगतातले अमानवीय वास्तव आध्यात्माचा आधार घेऊन, उघड करण्याचे धाडस नामदेवांच्या संत मंडळातून चोखोबादी संतांनी केले होते.
एखाद्या राजाला , सरंजामदाराला हे सर्व बोलुन दाखवावावे, आपले अंतरिचे विचार मांडावे तर रित मोडायला निघालास , धर्माला आव्हान देतो आहेस,या आरोपावरून देहदंडाची शिक्षा होऊ शकते. जीवे मारले जावु शकते. म्हणून आपल्या अंतरीचे दुःख विठ्ठलाला सांगायचे, हा संत चोखोबारायांच्या अभिव्यक्तीचा मार्ग आहे. आम्ही देवाला भांडतोत , आमचे दुख सांगतो आहोत अशी युक्ती संतांची आहे. अध्यात्मिक तत्वज्ञानात सर्व जीव समान असतात, तर मग भौतिक जगतात आमच्याशी भेदभाव का करता ? हा धागा पकडून संत भांडत असतात. म्हणूनच त्यांच्या देवाला सर्व संत भौतिक जगतातील सर्व कामे करायला लावून भौतिक समतेचा आग्रह धरतात. संत चोखोबारायांनी आपल्या एकूण 358 अभंगात बऱ्याच वेळा आपल्याला हिन यातीत जन्माला येण्याचे, अस्पृश्य असण्याचे दुख,हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या आंतरिक मनावर सर्वात मोठा आघात आहे, तो म्हणजे ते अस्पृश्य असणे. लोकांनी त्यांच्याशी भेदभाव करणे. त्यांना हीन लेखणे.त्यांना दूर हो म्हणने. आपल्या अंतरीची सल बोलून दाखवताना चोखोबाराय म्हणतात.
आधिकार माझा निवेदन पायी l
तुम्ही तो गोसावी जानतासां ll
अवघ्या वर्णामाजी हिन केली जाती l
विटाळ विटाळ म्हनती क्षणोक्षणी l
कोणीही अंगिकार न करती माझा ll
दुर हो जा आवघे म्हनती l
चोखा म्हने तुम्ही घ्याल पदरी l
तरिच मज हरिसुख होय ll
मी माणसासारखा माणूस असून सुद्धा हे मला स्वीकारत नाहीत. दूर हो म्हणतात.माझा स्पर्श झाला तर अंगावर पाणी शिंपडून शुद्ध होतात. मला कोणीच स्वीकारत नाही.यांच्या वर्णव्यवस्थेप्रमाणे सर्वात हिन माझी जात आहे , असे त्यांचे म्हनने आहे. विटाळ, विटाळ म्हणू म्हणू दूर करतात. या पद्धतीचे अनेक आत्मनिवेदने चोखोबांनी केलेले आहेत.
आजच्या टोकाच्या विद्रोहाच्या संकल्पनांतून वावरणाऱ्यांना अस्पृश्यतेचा,भेदभावाचा विचार बोलून दाखवणारे चोखोबा कदाचित विद्रोही वाटणार नाहीत,पण त्या काळातील आजूबाजूची जाचक परिस्थिती लक्षात घेता अस्पृश्यता, भेदभावाचे आत्मनिवेदन जाहीर प्रगट करणे ,लोकांत मांडणे धाडसाचे काम आहे.इथे आवर्जून विचारात घेण्याजोगी गोष्ट अशी की भेदाभेद अस्पृश्यता ही मानवनिर्मित आहे हे ,चोखोबाराय जाणतात. अस्पृश्यता ईश्वर निर्मित नाही हे नामदेव , संत जनाबाईने सुद्धा ठणकावून सांगितले आहे. चोखोबारायांचा स्पर्श देवाला झाल्यानंतर देव बाटतो, या ब्राम्हणी संकल्पनेचे जनाबाईला हसू येते. अख्खे जग,सर्व मानव आणि देव विटाळात जन्माला येतात तर मग आमचा बाट, विटाळ का मानला जातो ? हे सुद्धा संत चोखोबाराय आणि त्यांच्या पत्नी संत सोयराबाई यांच्या आत्मनिवेदनात आहे.
१४ व्या शकतकात सबंध भारतातील अस्पृश्यांचे पुढारी म्हणून संत चोखोबाराय साहित्यिक ,सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात नेतृत्व करत होते.जातीव्यवस्था,अस्पृश्यता व गैरबराबरीच्या विषमतेची दरी त्यांनी जाहीर बोलून दाखवली होती. विटाळाचे ,अस्पृश्यतेचे अभंग त्यांनी अभिजनांच्या ,उच्चजातीयांच्या साहित्यविश्वात आणून मांडले होते. भारतीय ब्राह्मणी व्यवस्था एवढी खोटारडी आहे की इतिहासात घडलेल्या चुका तर मान्य केल्या जात नाहीतच ,उलट असे घडलेच नाही म्हणून हात वर केले जातात. बरे झाले संत चोखोबा यांनी अशा समस्या साहित्यिक पटलावर आणून ठेवल्या, नाहीतर या देशात भेदाभेद नव्हताच असे म्हणायला उच्च जातीयांनी कमी केले नसते. भारतातील अमानवीय प्रथा,परंपरांचा संत चोखोबाराय पुरावा आहेत. संत चोखोबारायांनी अभिव्यक्त होणे, हे फार मोठे डॉक्युमेंटेशन आहे. भारतीय संस्कृती ग्रेट म्हणविनार्यांच्या संस्कृतीवर चोखोबाराय यांनी मांडलेले अस्पृश्यतेचे अभंग काळ्या डागा सारखे आहेत. माणसांना माणसासारखं न वागवणाऱ्या अमानवी संस्कृतीच्या लोकांत संत चोखोबा निर्भीडपणे अभिव्यक्त झाले हे क्रांतिकारी आहे.
आजही जातिभेद, अस्पृश्यता पाळणाऱ्या रानटी मानसिकतेच्या झुंडींच्या झुंडी गावोगाव शहराशहरात अस्तित्वात असतील तर संत चोखोबारायांचा काळ किती भयावह असेल याची कल्पना करून पहावे. विदर्भातील आर्वी या गावी मातंगाचा आठ वर्षाचा पोरगा मंदिरात गेला म्हणून त्याला भर दुपारच्या उन्हात ॲसिड टाकलेल्या फरशीवर बसवण्यात आले होते. त्याचा ढुंगनाचा भाग प्रचंड भाजला गेला होता.ही घटना मे 2019 ची आहे .जातीव्यवस्था,अस्पृश्यता संपली म्हणणाऱ्यांनी हे उदाहरण लक्षात घेतले पाहिजे.युटुबला अमिर खान यांचा सत्यमेव जयतेचा अस्पृश्यतेवरला ॲपीसोड ही पहावा म्हणजे आजाही अस्पृश्यता पाळली जातअसल्याचे लक्षात येइल.
म्हणून सामाजिक सर्वहरांच्या साहित्यनिर्मितीचा आद्य पूर्वज म्हणून संत चोखोबारायांचे नाव घ्यावे लागेल. सामाजिक सर्वहरांचा बुद्धिजीवी बनण्याचे ऐतिहासिक मोठेपण संत चोखाबा यांच्या वाट्याला आले. सामाजिक सर्वहरांचा पहिला बुद्धीजीवी म्हटलं तरीही चालेल. पुढल्या काळात कितीतरी अस्पृश्य जातीतले किर्तनाला उभे राहिले, निर्भीडपणे व्यक्त व्हायला लागले,साहित्य लिहायला लागले. अशा अनेक लोकांना संत चोखोबा शतकानुशतके प्रेरणा देत राहिले. त्यांची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या सामाजिक सर्वहरांच्या टॉपच्या बुद्धीजीवीला सुद्धा मिळाली होती.
विद्रोही परंपरेचा अभिव्यक्त होण्याचा आशादाई पायंडा संत चोखोबारायांनी पाडला.एक पायवाट या ग्रेट संताने सुरु करुन दिली.
नितीन सावंत परभणी
9970744142
दिनांक १६ डिसेंबर २०२१
No comments:
Post a Comment