♦बिराड : भटक्या विमुक्तांच्या अथांग वेदनांचे ओझे.
नितीन सावंत परभणी
9970744142
" ज्ञानाशिवाय आणि पर्यायी ज्ञानाशिवाय शुद्रातिशुद्रांची मुक्ती नाही"
- कॉ शरद पाटील (मार्क्सवाद:फुले आंबेडकरवाद)
कॉ शरद पाटील म्हणतात त्याप्रमाणे भारतात शुद्र (आर्थिक सर्वहरा) आणि अतिशुद्र (सामाजिक सर्वहरा) यांची मुक्ती ज्ञान घेतल्याशिवाय होने नाही.सामाजिक सर्वहरांमधे आर्थात माजी अस्पृश्य जाती व आदिवासी जमातींमधे तर दु:ख तथा शोषण मुक्तीचा मार्ग ज्ञान आणि शिक्षण घेण्यातून पुढे जातो.याशिवाय कुठलाही पर्याय उपलब्ध नाही.स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्षे झाली तरी आजही सामाजिक सर्वहरा वर्गातील शेडुल्ड कास्टच्या जाती,भटक्या विमुक्त जाती आणि आदिवासी जमातींना माणूस म्हणून दर्जा मिळालेला नाही.शाळेत भारत माझा देश आहे,ही प्रतिज्ञा रोज म्हनायला लावली जाते.परंतु भारत माझा म्हणण्याइतपत इंचभरही जमीन स्वताच्या नावे नसणाऱ्या हजारो जातीजमाती भारतात आहेत.ज्यांना गावचे रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा मिळु शकत नाही,आशांना भारत माझा म्हणायला लावणे,हि त्या भटक्या विमुक्त जातींची क्रृर थट्टा आहे.भारताला माझे म्हणण्याइतपत त्यांच्याकडे काय आहे ?
आशाच शोषीत,पिडीत आणि सर्वच लाभांपासुन वंचित असणाऱ्या भटकंती करत जीवन जगणाऱ्या अनेक जातीपैंकी 'बेलदार' एक जात आहे.पारधी,वडार,घिसाडी,वासुदेव,ट कारी,कैकाडी,डोंबारी,भोई,आणि बेलदार यासारख्या काही भटक्या जाती ह्या गावसंस्कृतीच्या बाहेर बिराड मांडून राहतात.त्यांना गावात हक्काने वावरता येत नाही.गावात काम असे पर्यंत या जाती गावाबाहेर राहतात.कामं संपल्यावर आपले 'बिराड' घेऊन त्या जाती दुसऱ्या गावी जातात.अशीच भटक्या जातीतील बेलदाराची आत्मकथा कथाकार अशोक पवार यांनी समाजवेवस्थेसमोर खुली केली आहे. हे आत्मकथन एवढे व्यापक आहे कि ते व्यक्तिगत न राहता अनेक जाती जमातींचे वास्तव दर्शन बनले आहे.या आत्मकथनात फक्त बेलदाराचीच जगण्याची लढाई नसून अनेक भटक्या जातींच्या बिराडाचे जागोजागी दर्शन आपल्याला होते.
इंग्रजांच्या आगमनाने भारतात भांडवलशाही आली आणि स्वातंत्र्यानंतर तिने व्यापक स्वरूप धारण केले.या 'भांडवलशाही' मुळे बेलदार जातीसारख्या अनेक जातीजमाती नवा बदल जुळवून न घेता आल्यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.गावचे वाडे,मंदिरे बांधण्यासाठी 'चिरे' अर्थात दगड घडवण्याचे काम करणारे बेलदार आज काम मिळत नसल्याने अत्यंत हलाखीचे जीवन जगताना दिसताहेत. बेलदारांचे दयनीय जीवन भांडवलशाहीत तर आहेच पण सर्वात जास्त हालअपेष्टा भोगाव्या लागलेल्या त्या सरंजामशाहीत.
भारतीय सरंजामशाही जातीग्रस्त असल्यामुळे येथे समता,बंधुभाव जातीग्रस्तच आहे.अर्थात गावातील शेतकरी जातींचे लोक गावाबाहेरील अस्पृश्य व भटक्या जातींप्रती समता,बंधुभाव बाळगत नाहीत.उलट या जातीजमातींचा गावाच्या आत द्वेष केला जातो.गावाच्या आत आपापसात अंतर्गत द्वंद्व भाऊबांधकी जरी असली तरी आपसातील व्यवहार समतावादी बंधूभावात्मक असतात.हेच अगदी वेशीबाहेरच्या समाजातही सेम.
म्हणून बेलदाराची ओली बाळंतीण भर पावसात आश्रयाला पारावार आल्याबद्दल तिला आणि त्या कुटुंबाला पारावार जागा तर दिली जात नाहीच,उलट गावाचे माणसे बोलाऊन हे कुटुंब पावसात पारावरून हाकलले जाते.यात ती ओली बाळांतीण पावसात ठेचाळुन पडल्याने स्वतःचे बाळ गमवते.पाण्यात कुठेतरी ते बाळ वाहून जाते.बेलदराचा नवरदेवही पारावार न येऊ दिल्याची आणखी एक घटना गावची सरंजामी मानसिकता किती निष्टुर आणि क्रुर असल्याची सिद्ध करते.
ही जातीय समता वारकरी परंपरेतील मारोतराव महाराजांच्या किर्तनाच्या पंगतीतही दिसून येते.
"या रे या रे लहान थोर l
याती भलत्या नारी नर ll
किंवा
" भेदाभेद भ्रम अमंगळ l "
म्हणणाऱ्या वारकरी संप्रदायातही मारोतराव महाराजांचे कीर्तन झाल्यानंतर वेसीच्या आतले एका पंगतीत जेवतात वेशीबाहेरच्यांना मात्र ताटकळत ठेवले जाते.शेवटी जेवायला वाढले तरीही त्यांची वेगळी पंगत बसवली जाते आणि तिही बाजुच्या खारित.
म्हणून विठ्ठलाच्या दारातील वारकरी सांप्रदायाची समता गावपातळीवर उच्चजातीयांपुरतीच मर्यादित राहिली.अस्पृश्य आणि भटके यांपासून दुरच.
बिराडात वारंवार आपल्या नजरेस पडनारी स्त्री शोषणाची सर्वात जाचक व्यवस्था म्हणजे भटक्या विमुक्तांची जातपंचायत.या जातपंचायतीच्या सर्वाधिक बळी नेहमी स्त्रीयाच असतात.या बेलदारांच्या बिराडात जातपंचायतीचे नियम अत्यंत जाचक आहेत.बेलदाराची एक बाई मुसलमानासंग झोपली हा खोटा आरोप लावणाऱ्या नवऱ्याला परिक्षा वगैरे न द्यायला लावता,निर्दोष बाईला उकळत्या तेलात हात बुडवून बंदा रुपाया काढायला लावला जातो.आपले निर्दोषपन सिद्ध करताना ती स्त्री तो बंदा रुपाया निडरपणे काढते.यामुळे कोपरापर्यंत तिचे हात जळतात,भाजतात.दुसऱ्या एका घटनेत तर आठव्या महिण्याचे बाळ पोटावर पाय देवून पाडायला लावले जाते.आणि त्या स्त्रीने आर्थात लेखकाची मामी सरीमामीने पुन्हा गुन्हा करु नये म्हणून जातपंचायत तिच्या ढुंगणाला तापलेल्या उलथण्याचे डाग द्यायला लावते.ही क्रृर शिक्षा आमलात आनली जाते.सरीमामी ढोरासारखी ओरडते.पुढे तिला डाग दिलेल्या जखमा सडतात.आणि त्यात आळ्या पडतात.यात लेखकाचा मामीचा तडफडुन मृत्यू होतो.
पुरुषवर्चस्ववादी जातपंचायत जातीव्यवस्था मोडु पहाणाऱ्या आर्थात अंतरजातीय विवाह केलेल्या सजातीय पांडु नावाच्या तरुणाला प्रंचड मानसिक त्रास देते.जात पंचायतीचे लोक त्याला झाडाला बांधुन मारतात.यातून तो वेडा होतो आणि फाशी घेवून आत्महत्या करतो.असे कितीतरी उदाहरणे केवळ बेलदारांच्याच नव्हे तर सर्वच भटक्या विमुक्तांच्या जातपंचायतीत आपल्याला दिसतील.आजही लोकशाहीत देखील काही ठिकाणी ह्या जातपंचायती मोडलेल्या नाहीत.या जातपंचायती त्या त्या जातीला नियंत्रणात ठेवत असतात.जातीचे काटेकोर नियम सांभाळायला लावतात.
बिराडले स्त्री चित्रण हृदय पिळवटुन टाकणारे आहे.आजही भारतात गरिब तथा निम्नजातीय स्त्रीयांना भयानक जीवन जगावे लागते.एकीकडे उच्चजातीय पुरुषांच्या स्त्री अबृवर असनार्या नजरा आणि हिनत्वदर्शक वागून तर दुसरीकडे स्वकुटुंबातील पुरुषांकडुन होनारे दमन,पिडन हे स्त्रीयांना सतत मरणयातना देनारे आहे.बिराडातली स्त्री ही ब्राम्होभांडवली वर्गव्यवस्थेची,निमसरंजामी जातीव्यवस्थेची तथा पुरुषवर्चस्ववादी व्यवस्थेची तिहेरी जाचक गुलामी भोगणारी आहे.
ब्राम्हो भांडवली व्यवस्थेचे दलाल पुलीस बिराडातील स्त्रीयांना वेळोवेळी निचपद्धतीने मारहान करतात.स्त्रीयांना मारहान करताना नग्न करतात.प्रसंगी बलात्कार करेपर्यंतही त्यांची मजल जाते.काही ठिकाणी स्त्रीयांना मारताना अजुबाजुची पुरुषी मानसीकता बाळगणारी गर्दी त्यांना सोडवतही नाही.
शारीरिक भुक भागवण्यासाठी ठेवलेली स्त्री,गरज संपल्यानंतर निम सरंजामी व्यवस्थेतील उच्चजातीय देशमुखाने जाळून मारल्याचीही एक घटना निर्दयी पुरुषी व्यवस्थेचे दर्शन घडवते.किंवा कधीकधी उच्चजातीय लोक जेव्हा बेलदारांना मदत करतात तेव्हा माणुसकी म्हणून नव्हे तर बिराडातल्या एखाद्या स्त्रीवर त्यांचा डोळा असतो म्हणून.
म्हणून उच्चजातीय पुरुषांच्या डोळयात आपल्या स्त्रीया येवू नयेत म्हणून त्यांना आंघोळ करु दिली जात नाही.केस विंचरु दिले जात नाही.स्त्रीने आंघोळ केल्यास मारहान केली जाते.याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नसतो.
स्वजातीय पुरुष तर वेळोवेळी,दररोज स्त्रीयांना दारु पिवुन जीव जाईपर्यंत मारतात.ते मारणे अत्यंतनिर्दयी अमानुष असते.जातपंचायतही हेच पुरुषवर्चस्ववादी वर्तन करुन स्त्रीयांना ओलीस ठेवून घेवून बलात्कार करण्यापर्यंत जाते.किंवा एकाने दुसऱ्याच्या बायकोवर बलात्कार केल्यास बदला म्हणून दुसऱ्याने सुद्धा त्याच्या बायकोवर बलात्कार करण्याची शिक्षा जातपंचायत सुनावते आणि ती आमलातही आनली जाते.यात दोनही बाजुने स्त्री अवहेलना आणि दमनच आहे.आशाप्रसंगी इतर स्त्रीयांना बघ्याच्या भुमीकेशिवाय काहीच करतात येत इतक्या त्या गुलाम आहेत.
नव्या बदलाप्रती मात्र स्त्री पुढारलेली आहे.नवे बदल ती स्विकारत बदलायला तयार आहे.म्हणून तर शाळेतील शिक्षीकेने मुलाला शिकवा हे सांगितलेले शब्द लेखकाची आई आमलात आनायला तयार आहे.माझा अशोक शिकावा म्हणून ती त्याला स्वता शाळेत तर घालतेच पण वेळोवेळी वडिल शिक्षण बंद करत असताना तसे होऊ नये म्हणून लेखकाची आई पुढाकार घेते.प्रसंगी नवऱ्याचा मार खाते पण मुलगा शिकावा,त्याने आमच्यासारखे यातनामय जीवन जगु नये असे स्त्रीचे मन आहे.
मानवी मुल्यांच्या संकल्पना सुद्धा या देशात जातीग्रस्त आहेत.निम्न जातीय कितीही प्रामाणिक असले तरी त्यांचे कुनालाही कौतुक नाही की त्या प्रामाणिकपणाची कुणी दखलही घेत नाही.उलट कधीकधी प्रामाणिकपणामुळेच निर्दोष माजी अस्पृश्य जाती व भटक्या विमुक्त जाती जाचाला मारहाणीला बळी पडतात.झाडाला टांगून मारणे,डोळ्यांत,गांडीत चटणी टाकून मारणे,बाया नग्न करणे हे प्रामाणिक लोकांच्या वाट्याला आलेले जाच आहेत.
भटक्या विमुक्तांचे जीवन बहुतांश सरंजामशाहीतील नियमावलीवर चलाते.त्यांच्यासाठी आजही लोकशाहीची नियमावली गंभीरपणे लागु नाही.म्हणून बिराडातल्या कुठल्याही व्यक्तीला आपले काही काम करुन घ्यायचे असल्यास उच्चजातीय जातींचे पाय धरावे लागतात.त्यांना कोंबड्या बकऱ्याची तथा पैशांची लाच द्यावी लागते.गाव सोडताना आम्हाला न विचारता गाव कसे काय सोडलेस म्हणून गावचा पाटील लेखकाच्या बापाला मारहान करतो शिक्षा म्हणून दोन कोंबडे आणि लेखकाच्या आईच्या पायातील जोडवे घेवून जातो.हा कोणता न्याय आहे ? ही कोणती लोकशाही आहे ? असा प्रश्नही त्यांना विचारता येत नाही.
असेच लेखक अशोक पवारांना आडगावच्या शाळेत दाखल करुन घेतले जात नाही.तेथील शिक्षक वर्ग एक कोंबडा आणि शंभर रुपायाची लाच मागतो.शेवटी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील काही लाजा सोडलेल्या शिक्षकांना लेखकाचे वडिल रात्रीला पार्टी देतात.त्यासाठी लेखकाचे वडिल गावातील रामकिसन दाभाड्याकडुन व्याजाने पैसे अनुन त्या शिक्षकांना शंभर रु देतात आणि आपल्या मुलाला शाळेत घालतात.
या देशात गावचा पाटील,पोलीस प्रशासन एवढेच काय विद्यादाते शिक्षकही लाच घेत असतील तर भटक्या विमुक्तांनी जगायचे कसे ? दाद कुणाकडे मागायची ? त्यांनी आयुष्यात उभे कसे रहावे ? म्हणून लेखक अशोक पवार एकेठिकाणी म्हणतात
" मव्हं जीवन आधरवेलीसारखं.फेकलं तिथं उगवलं.मिळाला रस्ता तिकडं चालला." किती करूण अभिव्यक्ती आहे ही.हाती काहीच नसलेल्या जगात फक्त जगण्याची धडपड.हृदयात खोलवर रुतावी अशी भटक्यांची कैफियत.
बेलदारांचे जगणे अगदी चिवट आणि शेवटपर्यंत हार न मानणारे आहे.कर्जापायी आत्महत्या करणारे शेतकरी आणि त्या हार मानणाऱ्या शेतकरी जाती पहाता हे भटके विमुक्त कशाच्या आशेवर एवढे खडतर जीवन जगतात हा मोठा प्रश्न आहे.प्रोपर्टीसाठी मुडदे आणि खुन पाडण्याचे प्रमाणही उच्चजातीयांतच आहे.भटक्यामधेही भांडणे होतात पण पुन्हा एक होऊन मिळून मिसळून खाण्याची,रहाण्याची,एकीची परंपरा भटक्यांत दिसते.येथे धनसंजयाची जास्त हाव नाही.थोडीसे पैसे आले की पोटापुरते अन्न आणि उरलेल्या पैस्याची दारु बाकी उद्याचे उद्या बघु असा एक रिवाज भटक्यांत दिसुन येतो.म्हणून त्यांना मुक्त आकाश आणि विशाल धरणी आपलीशी वाटते.एका ठिकाणी लेखक आपल्या वडिलांना म्हनतो की
" आहो बाबा कसंतरी या गावात लटमपटम करुन आपन पोट भरतुया आन दुसऱ्या गावतबी असचं झालं तर ?" तेव्हा लेखाचे वडिल म्हणतात
" दुसऱ्या गावात असं झालं तर तिसरं गाव मेलं का ? आन् तुझ्या बापजाद्याला एक गाव होतं का ? आन् हेच गाव दुध देतय का ? चल बाबा बिराड घेवून मस्त बेलदारावानी राजासारखं हिंडुया".
लेखकाच्या वडिलांच्या दृष्टीने राजासारखे सुख म्हणजे मुक्त हिंडणे आहे.राजा सारखे बंधनहीन जगण्याची मुक्त नेनीव आपल्या भटक्या गणव्यवस्थेचा थेट राजेशाही वारसा घेवून आलेली आहे.यावर गांभीर्याने विचार केला असता शिल्पे,मंदिरे,भव्य महल,राजवाडे आणि शिलालेख घडवनारे हे बेलदार एकेकाळी राजेशाहीच जीवन जगत असावेत.पाषाण युगाचे ते नक्कीच राजे म्हटले पाहिजेत.पण आजची निमभांडवली निमसरंजामी जातवर्गीय व्यवस्था त्यांचे हे मुक्त जगणे संपवताना दिसते आहे.कुठेही गेले की बेलदारांच्या वाट्याला सुख नाही तर यातनाच आहेत या व्यवस्थेत !
या आत्मचरित्रात अश्रोबा अर्थात अशोक पवार फक्त मांडत जातात.ते उचजातीयवर्गीय व्यवस्थेशी भांडत नाहीत.किंवा व्यवस्थेला दोषही देतना दिसत नाहीत.त्यांच्या लिखानात इतर दलित आत्मकथनीसारखे व्यवस्थेला शिव्याशापही नाहीत.येथे आक्रोश नाही की संपूर्ण नाकरही नाही.म्हणून अशोक पवारांच्या बिराडात व्याजाने पैसे देऊन सतत शोषण करणारा जसा रामकीशन दाभाड्या आहे तसेच परीक्षेला जाण्यासाठी पन्नास ची नोट देणारे घुगे गुरुजीही आहेत.वेशीच्या आतले सर्वच वाईट,तुमचे काहीच नको या आशयाचे आत्मचरित्र म्हणजे बिराड नव्हे.म्हणून विधायक मांडणी करणाऱ्या,व्यवस्थेला विधायक नकार देणाऱ्या अशोक पवारांच्या साहित्याला दलित साहित्यात कोंबता येणार नाही.या भटक्यांच्या साहित्याचे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र असावे.
या आत्मकथानात काही भटक्या जाती जमातींना आत्मभान येत असल्याचे कुठे कुठे जाणवते.काही भटक्या जाती प्रस्थापित व्यवस्थेला कोसताना दिसतात.या लोकशाहीवर मिळालेल्या स्वातंत्र्यावर प्रश्न चिन्ह निर्माण करताना दिसतात.पुसद परिसरातील कारखेड गावाचा कैकाडी आपल्या मुलाला शाळेत घालू पाहतो परंतु शाळेतल्या मास्तराने राहिवाश्याचा दाखला मागवला.भटक्या जातीला कोण देणार रहिवासी दाखला ?? म्हणून तो कैकाडी लेखकाच्या बापाला म्हणतो "बापजादयांपासून आपले लोक बिराडच घेऊन फिरत्यात.आता यायच्या मायच्या गांडीतून आणायचा का दाखला ? "
रास्त प्रश्न आहे कैकड्याचा.भटक्या जाती-जमातींना असले दाखले मागने म्हणजे या देशातील भूमिपुत्रांवरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे.हे आजही थांबलेले नाही.किंवा हे नियम शिथिलही नाहीत.यामुळे अनेक ठिकाणी भटक्या जातीजमातींचे मुले-मुली शाळेत जाऊ शकले नाहीत.आजही जाऊ शकत नाहीत.
असेच एक रतन बेलदार जातपंचायतीच्या पुढाऱ्याला म्हणतो.
"असले धंदे करुस्तर पोटासाठी मुसलमान झालु तर काय बिघडले ? काय देलं तुम्हाला बेलदार जातीनं ? हिंदू धर्मात एका येळची भाकरी बी नाही.काय केलं तुमचं हिंदूंन फक्त तुमच्या बायकांवर अतिप्रसंग.गावची येस गाववाल्यानी वलांडू देली नाही. तुम्हाला राहायला फक्त हागणदारी देली.बेलदार जात म्हणलं तर पोलिसाईन गांडीत चटणी भरू भरू हानल.काय दिलं बेलदार जातीनं ?
काय सुधारणा केली तुमची सरकारनं ?
स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली तरी तुम्हाला गावाची वेस ओलांडायची मुभा नाही.आरे बघा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांन जात बदलली.महार लोक बुद्ध केले तवा ते सुधारले."
रास्त प्रश्न आहेत रतन बेलदाराचे.या प्रश्नाचे उत्तरे आजच्या समाजव्यवस्थेने,सरकारने दिली पाहिजेत.अन्यथा अशोक पावरांसारख्या अनेक भटक्यांनी धर्मांतराचा किंवा स्वतंत्र धर्माचा मार्ग अवलंबला पाहिजे.त्याशिवाय मुक्ती नाही.
या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या शोषणाला आज सर्वाधिक जबाबदार कोण असतील तर ती पोलीस प्रशासनाची दडपशाही.नुकतेच मुंबई येथे उडानपुलाखाली राहणाऱ्या काही भटक्या विमुक्त कुटुंबीयांना त्यांचे 'बिराड' जाळून पोलिसांनी मारहाण केली.त्यात एक दोन महिन्याचे मुल दगावल्याचे मॅक्स महाराष्ट्र चॅनल ने दाखवले आहे.(दि.9 मे 2019) अशोक पवारांच्या बिराडातही पोलीस यंत्रणा सतत अन्याय करताना आणि अन्याय करनाऱ्यांचीच बाजू घेताना दिसते.भटक्या विमुक्तांना नेहमीच सतत चोर दरोडेखोर समजने,त्यांना तशा शिक्षा देते हे आजही थांबलेले नाही.यावर तात्कालिक उपाय म्हणून अशोक पवारांचे 'बिराड' प्रत्येक पोलीस स्टेशनमद्धे वाचायला दिले पाहिजे.आणि यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे भटक्यांनी संघटित होऊन लढा उभारला पाहिजे.
आपला एक मामा पोलिसांनी ठेचुन मारला,वेळोवेळी बिराडावरच्या बाया निस नागव्या केल्या,कधीकधी बाई पोलीस ठाण्यात कैद करून आब्रु लुटल्या.गरोदर केल्या.याबद्दल भटक्याची पोरं भविष्यात गुन्हेगार बनणार नाहीतर काय होतील?म्हणून सरकारच्या बाजूने यावर उपाय योजना करायला हवी की नको?
गावात भीक मागायला आल्यावर कुत्रे सोडणाऱ्या,भटक्यांची कुणीच वाली नसणार्यांची म्हातारी पांदीत नागवी करणाऱ्या,उपाशीपोटी राहणाऱ्या बेबस स्त्रीला धान्य देण्याच्या निमित्ताने तिच्या अब्रूवर हात टाकणाऱ्या,तिच्या अंथुरुणात शिरणार्या,गावातले सरकारी जागेवरले बिराडे मोडून उचलून फेकून देणाऱ्या आशा सर्वच गावगुंडांवर इथून पुढे सरकारने कायदे करून कडक कारवाई करायला हवी आणि भटक्या विमुक्त जाती जमातींनी सुद्धा संघटीत होऊन या गावगुंडांच्या विरोधात कायदेशीर मार्गाने लढा उभारला पाहिजे.
हे किती भयाण आणि अमानवीय आहे की टोलेजंग वाडे,बंगले बांधणाऱ्या बेलदारांना आयुष्यात एकदाही मातीच्या सुद्धा घरात रहायला मिळत नाही.बेलदारांत नटणे सजणे साज श्रृंगार नाही.
एवढेच काय बाईच्या डोक्यात उवा होईपर्यंत अंघोळकरायचीनाही.कारण बाईने रोज अंघोळ केली तर.तिच्यावर गावच्या उच्चभ्रू सरंजामी लोकांची नजर पडेल.म्हणून जाणीवपूर्वक घान वागायचे.या भटक्यांच्या वस्त्या कुठे तर गावच्या हगणदरीत.एवढी दयनीय अवस्था पाचशे वर्षांपूर्वीची नाही तर सध्याची आताची आहे.आपण गरीब का आहोत तर याला देव ईश्वर कारणीभूत नसून आपले शोषण पिळवुणूक करणारी ब्राह्मो भांडवली सरंजामी व्यवस्था हे ज्याला ज्याला कळते अशा अशोक पवार सारख्या सर्वच भटक्यांनी हक्कांसाठी पुढे आले पाहिजे,किंवा गावकुसाबाहेरचे लोक एवढे दयनीय जीवन का कंठत आहेत ? तर याला जवाबदार त्यांचे कर्म किंवा देव नव्हे तर आपली सरंजामी उच्चभ्रूची व्यवस्था जवाबदार आहे.हे ज्यांच्या लक्षात येईल त्या सर्वच शेतकरी जातींनी मदतीचे हात पुढे केले पाहिजेत.
बिराड मानवी मनाला अस्वस्थ करणारे आत्मकथन आहे.(यामुळे मला दोन तीन दिवस झोप आली नाही) भारतीय संस्कृतीच्या छाताडावर,उरावर ठेवलेला मोठा धोंडा म्हणजे बिराड आहे.लाज वाटावी अश्या प्रथा,परंपरा आणि जातीवाद आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करत आहोत.आपल्या बेडवर महागडी कुत्रे घेऊन निजणार्या संस्कृतींचे लोक बेलदारांना पशुहुनही हिन जीवण जगायला लावत आहेत.हे अमानुष क्रौर्य थांबले पाहिजे.सडलेल्या आळ्या पडलेल्या मृत जनावराचे मांस खाण्याची वेळ इथून पुढे कुठल्याही भटक्यांवर येऊ नये,करोडोंचे घोटाळे करणारे मल्या,मोदी सोडून पोटासाठी चोरी करणाऱ्या बेलदाराला मारताना पोलिसांनाही लाज वाटावी.
चिरडलेल्या बेलदारांच्यातून,विद्रोह बंड करून एखादा आंबेडकर,फिडेल केस्ट्रे,चे गव्हेरा व्हावा तरच 'बिराड' या आत्मकथनाचे सार्थक होईल.
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment