Monday, 3 September 2018

रा.चिं.ढेरे यांचे मराठी मुसलमान संतकवी- एक समिक्षा

चिं.ढेरे यांचे मराठी मुसलमान संतकवी- एक समिक्षा           

   

             नितीन सावंत परभणी

           9970744142


                     भारतीय जात्यांतक क्रांतीसाठी आधुनिक भारतातील ज्या ज्या साहित्तीकांच्या साहित्यसंपदेला अभ्यासल्याशिवाय पुढे जाता येत नाही त्यामधे फुले ,आंबेडकर, अण्णाभाऊ साठे , वि.रा.शिंदे आणि कॉ शरद पाटील होत.कॉ शरद पाटील यांच्या अन्वेषणाच्या द्वारे जी मेथड बनते त्या अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही एतिहासिक भौतिकवादी मेथडद्वारे आनखी काही साहित्यिक आपल्याला गवसतात,ज्यांच्याशिवाय जात्यांतक क्रांतीसाठी पुढे सरकता येत नाही.त्यामध्ये परात्मतेच्या परमोत्कर्षाचे साहित्य मांडनारे भालचंद्र नेमाडे,लोकदैवतांचे विश्व दाखवनारे रा.चिं.ढेरे आणि मिथकांच्या शास्त्राचा विधायक विकास करुन भारतीय मिथकांचा उलगडा करणारे डॉ अशोक राणा आदी होत.

                             रा.चिं.ढेरे यांचे लिखान हे प्रत्यक्षात स्थळांना भेटी देवून तथा जुने हस्तलिखिते धुंडाळून त्यांचा तौलनिक अभ्यास करणारे राहिलेले आहे.सर्व पंथप्रवाह हताळनारी त्यांची ग्रंथसंपदा आहे.ज्यामध्ये श्रीपर्वताच्या छायेत,लज्जागौरी,श्रीतुळजाभवानी,करवीरवासिनी श्रीमहालक्ष्मी,लोकदैवतांचे विश्व,दत्त सांप्रदायाचा इतिहास, नाथ सांप्रदायाचा इतिहास,भारतीय रंगभूमीच्या शोधात,त्रिविधा,संत लोक आणि अभिजन,लोकसंस्कृतीचे उपासक, इत्यादींचा समावेश त्यांच्या ग्रंथसंपदेत करता येइल.यामध्ये त्यांनी वारकरी,नाथ,महानुभाव,लिंगायत,शाक्त,शैव, या सर्व पंथांवर लिखान केलेले आहे.शिवाय त्यांनी ' मराठी मुसलमान संतकवी' या नावाने सुद्धा उपेक्षित मुस्लिम संतांवर लिखान केल्याचे दिसून येते. 

                            ' मराठी मुसलमान संतकवी '  हा त्यांचा एकूण १६७ पानांचा ग्रंथ.पद्मगंधा प्रकाशनाकडून प्रकाशित झालेले १७० रुपये किमतीचे हे पुस्तक सहजरीत्या कुठेही उपलब्ध होऊ शकेल. हा ग्रंथ ब्राम्हणी व्यवस्थेने उपेक्षित ठेवलेल्या अदखलपात्र व दुर्मीळ मुस्लिम संतांवर प्रकाशझोत टकणारा अमुल्य ठेवा आहे.

मध्ययुगीन काळात भारतीय जातीव्यवस्था संपूर्णपणे विकास पाऊन, तीने ताठर स्वरुप धारण केले होते.संत नामदेवांसारख्या शिंपी जातीत जन्मलेल्या व्यक्तीलाही मंदिरात न येवु देण्याचे आदेश काढले जात होते.यापुढे संत चोखोबा तर जाणूनबुजून अस्पृश्य.आशा काही लिखीत पुराव्यांनुसार याप्रकारच्या हिन, दिन वागणुकीला कंटाळून भारतीय जातीजमाती इस्लामच्या सुफी संतांच्या प्रभावक्षेत्रात येवुन इस्लाम स्विकारत होत्या.यात मुस्लिम झालेले अनेक कुटुंबे मात्र भारतीय सांस्कृतिक नाळ मात्र तोडु शकलेले नव्हते.सुफींच्या प्रभावक्षेत्रातुन एकेश्वरवादी पंथ सांप्रदायाची पायाभरणी या मातीत केव्हाच सुरु झाली होती.संत नामदेवांच्या भक्ती संप्रदायाचे लोण उत्तरेतही पसरले होते.हे भक्ती सांप्रदाय एकेश्वरवादी असल्याने मुस्लीमांच्या उपसना पध्दतींचा अवलंब जसे गैरमुस्लिमही करत असत तसेच अनेक मुस्लिमही गैर मुस्लिमांच्या एकेश्वरवादी भक्ती सांप्रदायाला आपले मानयला लागले होते.याचे पुरावे आजही पहायला मिळतात.आजही अनेक मुस्लिम हे वारकरी, महानुभाव या एकेश्वरवादी सांप्रदायाला जीवेभावे अनुसरतात.

                          याच धर्तीवर मराठी भक्ती सांप्रदातील संतांचा प्रभाव इतका विस्तारत गेला की त्यात अनेक मुस्लिमही संत म्हणून नावलौकीकास पावले.यामधे रा.चिं.ढेरे मुख्य असणाऱ्या शहा मुंतोजी ब्रम्हणी,हुसेन अंबरखान,शेख सुलतान,शेख मुहम्मद,शहा मुनी,लतिफ शाहा,शेख अली मुहम्मद,अविंध आणि गोविंद आदी मुस्लिम संतांची चरित्रे या पुस्तकात देतात.

हे सर्व लिखान करताना रा.चिं.ढेरे यांनी भरपूर कष्ट घेतल्याचे दिसते. त्यांनी जुने बाढे ,कागदपत्रे आणि बऱ्याच धर्मग्रंथ व पोथ्यांचा धुंडाळा घेतल्याचा दिसतो. काही चरित्रांत त्यांनी एकाच पोथीच्या आधारे मुस्लिम संतकवी साकारलेला दिसतो.यामधे रा.चिं.ढेरे मात्र एकदाही मिथकांचा उलगडा वगैरे करत नाहीत. काल्पनिकता व अवास्तविक भागही ते चर्चेला घेतात आणि संतकवींचे चरित्र साकारत जातात.रा.चिं ढेरे यांना मिथकशास्त्र माहिती नव्हते असे म्हनता येनार नाही.परंतू त्यांनी मिथकांचा उलगडा का केलेला नसावा हे सांगणे कठीण.त्यांची मांडणी कधी कधी विज्ञाननिष्ठा सोडुन भौतिकवादापासून दुर जाते.म्हणजे आचानक हृदयपरिवर्तन झाल्याच्या किंवा साक्षात्कार झाल्याच्या घटना त्यांच्या साहित्यात अनेकदा जशास तशा येतात.याद्वारे ते पुर्वीचे भौतिक प्रभावक्षेत्र विचारात घेत नाहीत.या ग्रंथात रा.चिं.ढेरे यांची ब्राम्हणी नेनीव सुद्धा कुठे कुठे उफाळून आलेली आपल्याला दिसेल.त्यांनी मुसलमान मराठी संतकवी हा ग्रंथ जरी महाराष्ट्राला दिला असला तरी महाराष्ट्रात सुफींनी येने आणि धर्मप्रसार करणे त्यांच्या ब्राम्हणी बुद्धीला मान्य नाही. मग अस्पृश्यांनी उद्धारासाठी ब्राम्हणांच्या दारात किती पिढ्या घालवायच्या होत्याका ? हा प्रश्न राचिंढेरेना ते जिवंत असताना कुणीतरी विचारायला हवा होता. या ग्रंथात ते एकांगी मांडणी करतात ती अशी की,

१)सर्व मुस्लिम संत हे मुस्लिम नसलेल्या अवैदिक संतांच्या प्रभावक्षेत्रातुन तयार झालेले होते.

२)सर्वच मुस्लिम कवी,संतांना ते स्वता मुस्लिम असल्याचा पश्चात्ताप होता आणि मग त्यांनी या अब्राम्हणी,अवैदिक प्रवाहाला आपलेसे केले.यासाठी रा.चिं.ढेरे मुस्लिम संतांनी ते मुस्लिम असल्याचा खेद व्यक्त केलेले पुरावेही देतात.

                     परंतू ही मांडणी नकारात्मक एकप्रवाही आहे. खरेतर भारतीय संतचळवळ सुफींच्या प्रभावक्षेत्रातुनही बहरली आहे.जे सुफी संत होते त्यांना कधीही ते मुस्लिम असल्याचा प्रश्चाताप झाला नाही की खेद वाटला नाही.किंवा हिंदू संतांना देखिल मुस्लिम संत , सुफी कधीही बला किंवा महाराष्ट्राला लागलेली पिडा वाटले नाहीत. अनेक  मुस्लिम संतांनी आणि सुफींनी इस्लामात घुसलेल्या अनाचारावर टिका केली असेल पण इस्लाम आमच्यासाठी नर्क आहे अशी खेदजनक विधाने त्यांनी केलेली नाहीत.रा.चिं. अशी मांडणी करतात की जनु काय ते नरकात अडकले होते, आणि मग महाराष्ट्रातील हिंदूंच्या संपर्कामुळे त्यांचा आत्मोद्धार झाला.उलट सुफी आणि इस्लाम आल्यामुळे भटके विमुक्त , काही प्रमाणात आदिवासी व संपूर्ण अस्पृश्यांसाठी मुक्तीमार्ग निर्माण झाला होता. 

                     जनार्धन स्वामींचे गुरु चांदबोधले हे कादरी परंपरेतील सुफी प्रचारक आहेत.त्यांचे नाव सय्यद चांदसाहेब कादरी उर्फ चांद बोधला आहे.बोधले आडनावाच्या हिंदू संताने सुफी परंपरेची दिक्षा घेतली , इस्लाम स्विकारला आणि पुढे ते कादरी परंपरेचे प्रचारक बनले इतके हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे.तरी राचिंढेरे या आपल्या ग्रंथात चांद बोधले यांना हिंदू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.ते शेख मुहम्मद या प्रकरणात पान क्र ८२ वर म्हणतात " गुरु परंपरेने सुफी साधू असल्यामुळे सुफी वेशात म्हणजे मंगलवेशात रहात असत . " पान क्र ८३ वरही ते असेच एक विधान करतात. " जनार्धन स्वामींनी बांधलेली चांद बोधल्यांची समाधी देवगिरीच्या पायथ्याशी आजही आहे. चांद बोधले यांनी सुफी साधना आणि सुफी वेश स्विकारलेला असल्यामुळे ते हिंदू असूनही त्यांचे समाधी मंदिर दर्ग्याच्या स्वरूपात आहे. " 

                     ढेरे यांची ब्राम्हणी नेनीव अशी की ते चांद बोधले हे मुस्लिम झाले होते, हे ढेरे मान्य करत नाहीत तर त्यांचे हिंदूकरण करतात.चांद हे नंतर दिलेले नाव आहे.हिंदू घरात ठेवलेले नाव नाही. दिक्षा झाल्याशिवाय हिंदू नाव जावुन मुस्लिम नाव लागने शक्य नाही.त्यातल्या त्यात सय्यद चांदसाहेब कादरी हे नाव इस्लाम स्विकारल्याशिवाय कसेकाय लावले जाईल.ते सर्व इस्लामिक रिवाज आदा करायचे.नमाज पढायचे म्हणून त्यांचा अंत्यसंस्कारविधीही इस्लामीक पध्दतीने झाला म्हणूनच तर संत जनार्धन स्वामी यांनी चांद बोधले यांची समाधी स्वताच्या पगारीतून खर्च करुन दर्ग्याच्या स्वरूपात बांधलेली आहे.शेख मुहम्मद महाराज श्रीगोंदेकर हे या चांदसाहेब यांचे शिष्य होते.चांद बोधले हिंदू होते तर शेख मुहम्मद यांनी चांद बोधले यांच्याकडून कशाची दिक्षा घेतली होती ? 

                      दावल मलिक या  मुस्लिम संतांचे महाराष्ट्रात फार मोठे प्रभावक्षेत्र त्याकाळी निर्माण झाले होते. त्यांच्याबद्दल रा.चिं. गौरवास्पद विधान करण्याऐवजी " अनेक हिंदू त्यांच्या नादी लागले होते " ( पान क्र १४६ , आवृत्ती २१ जुलै २०१४ ) असे हेटाळणी करणारे विधान ते करतात. ते याचा ग्रंथात पान क्र १४२ व १४३ वर म्हणतात " या राजकीय आक्रमणाच्या हतात हात घालूनच सुफींचे धार्मिक आक्रमण मोठ्या प्रमाणात घडुन आले. " ... "चौदाव्या शतकाच्या पुर्वार्धात या चौदाशे सुफी प्रचारकांनी देवगिरीच्या परिसरात आपले प्रधान केंद्र ठेवून सारा महाराष्ट्र व्यापला आणि इस्लामच्या बलात्कारी विस्ताराची मोहीम उघडली. "                   

                         यातून राचिंढेरे यांची ब्राम्हण्यग्रस्त नेनीव स्पष्टपणे उघड होते. त्यांना इस्लाम आणि सुफी संतांचे आगमन बलात्कारी मोहिम वाटते.येथे रा.चिं ढेरेना सुफींनी केलेल्या जातीव्यवस्था,अस्पृश्यता,गैरबराबरीच्या विरोधातील इस्लामचा प्रचार बलात्कारी मोहीम वाटणे अत्यंत दुर्दैवी आहे.  याऊलट कॉ शरद पाटील तर सुफींचे आगमन बोधीसत्वासारखे मुक्तीदाई ठरले असे म्हणतात.

                         सुफी आले नसते तर अस्पृश्यता इश्वर निर्मीत नाही हे अस्पृश्यांना समजायला इंग्रजांचा काळ उजाडावा लागला असता. या ग्रंथ तरी राचिंढेरे यांचे लिखान निरपेक्ष ठरवत नाही. ते तटस्थ लिहीण्याएवजी ब्राम्हणवाद्यांच्या बाजुने लिहीतात असे दिसते आहे.  रा.चिं.ढेरे यांनी हे मुसलमान मराठी संतकवी पुस्तक लिहीताना पुर्वपार्श्वभुमी दिलेली नाही. आणि त्यांना सुफी व इस्लामचा मूलभूत फरक माहिती असेल की नाही याची शंका येते.

                         भारतात सुफी इस्लामचा संदेश घेवुन आले , त्यांनी प्रचार केलाही पण याचा फायदा अस्पृश्य जाती , भटक्या विमुक्तांना झालाच ना . ते सनातनी कर्मठांच्या कैदेतून मुक्त झाले.उच्चभ्रूच्या संस्कारातून घडलेली ढेरेंची नेनीव तळागाळातील सर्वहरा जातींचा विचार करणार नाही हे स्पष्टच आहे. त्यांनी शोधलेले हे मुस्लिम संतकवी फारच थोडे आणि वैदिकांच्या गौरवीकरनातले आहेत. इतरही संतकवी प्रकाशात येने गरजेचे आहे.परंतु तरिही त्यांनी ही केलेली मांडणी मात्र नव्या इतिहासकारांच्यासाठी अप्रतिम असा पुराव्यांचा संग्रह म्हनायला काही हरकत नाही.

                         आपल्याकडे ब्राम्हणेतरांत झालेल्या संतांकडे कुनी बघायला तयार नाही तर मुस्लिम संतांकडे कोन वळनार ? काही फड आजूनही भजनातुन संत नामदेव, संत जनाबाई , संत चोखोबाराय सांगत नाहीत. त्यांचा अभ्यासक्रमच ब्राम्हणी आहे. असे भटाळलेले लोक मुस्लिम संतांकडे कधी वळणार.या धर्तीवर रा.चिं.ढेरे यांनी मुस्लिम संतदर्शन घडवून आनल्या बद्दल खरच ते कौतुकास्पद आहेत.या पुस्तकात त्यांनी दिलेल्या मोजक्याच संतांची चरित्रे आहेत.याशिवाय अनखी बऱ्याच मुस्लिम संतांची चरित्रे उजेडात यायची आहेत.त्यावर काम करणे गरजेचे आहे.

                         संत कुठलाही असो मुस्लिम किंवा गैरमुस्लिम तो सर्वहरा जातवर्गीयांचा श्वास असतो या धर्तीवर रा.चिं.ढेरे यांची ही देन जात्यांतक क्रांतीस एक दुवा ठरणारी आहे.तत्कालीन परिस्थींचे सांस्कृतिक भान आपल्याला रा.चिं.ढेरे यांच्या साहित्याच्या आधारे लक्षात घेता येते.महाराष्ट्रातील गंगाजमुनी परंपराही या ग्रंथात जागोजागी दिसते.जसे संत शहामुनी मुस्लिम आहेत.ते वारकरी संतांना आदबीने उल्लेख करतात.अस्पृश्यतेला विरोध करुन ते संत चोखोबारायांची बाजु घेतात.त्यांनी लिहीलेला सिद्धांतबोध हा ग्रंथ महानुभाव पंथाचे लोक नित्यनियमाने वाचतात.यावरून मुस्लिम , वारकरी , महानुवांचा गंगाजमुना परंपरेचा सांस्कृतिक दुवा शहामुनी ठरतात.

                          महाराष्ट्रात सुफींचे येने अत्यंत नवचैतन्य प्रदान करणारे ठरले आहे.त्यांनी कुनालाही त्रास तर दिला नाहीच उलट या सुफींच्या प्रभावातून संत जनार्दन स्वामी , संत एकनाथ महाराजांसारखे महान संत महाराष्ट्राला मिळाले.कला साहित्याचा विकास सुफींच्या अगमनाने झाला.कारागिरी आणि इतर व्यावसायांची भरभराट सुफींच्या प्रोत्साहानातून झालेली आहे.अस्पृश्य आणि भटक्या विमुक्तांना माय बनुन पोटाशी धरणारे हे सुफी मुक्तीदाते होते.त्यांचा द्वेष करुन आपल्याही पदरात द्वेषच पडेल. 

                         असो कुनालाही कुठल्याही पंथात किती सहजरीत्या जाता येत असे. मुस्लिम असलेले संतही किती सहजतेने किर्तन करत असत.वारकरी , महानुभाव , नाथ आणि सुफी परंपरा ही किती एकमेकांना मिसळलेली आहे. यांची प्रचिती रा.चिं. वाचताना आपल्याला येते.रा.चिं.ढेरे यांच्या काही मर्यादा लक्षात घेता हा ग्रंथ एक वेगळा आणि उपेक्षित विषय असनाऱ्या मुस्लिम संतकवींवर उत्तमरित्या प्रकाश टाकतो.त्यांच्या मर्यादा लक्षात घेता वाचकांना हा ग्रंथ मार्गदर्शकच आहे.



1 comment: