Wednesday, 16 June 2021

'भंगार' आत्मकथनाचे अंतरंग

 'भंगार' आत्मकथनाचे अंतरंग 

              नितीन सावंत परभणी 
              9970744142

            तथागत बुद्धाला एकदा एका शिष्याने प्रश्न विचारला की "भगवान जगातील सर्वात मोठे दु:ख कोणते ? " तर बुद्ध म्हनाले "दुसऱ्या चे दु:ख हे जगातील सर्वात मोठे दु:ख असते." अगदीच खरे आहे हे ,परदुख हे सर्वात मोठे दुख मानले पाहिजे.परंतू आज घडीला या भांडवली लोकशाहीत सर्वत्र मी मी आणि माझे माझे चालु आहे.या भांडवली लोकशाहीला माणुसकीची माया नाही.स्वजातीचे दबावगट आणि काहीतरी पदरात पाडुन घेण्यासाठी लागलेल्या जीवघेण्या स्पर्धा यात खरा दु:खी , शोषीत पिडीत जातसमुह मात्र तसाच होरपळत रहातो, येथील भयाण दमनकारी व्यवस्थेत.भारतात भांडवली लोकशाहीचा, व्यक्तीकेंद्रीत,अमर्याद स्वातंत्र्याचा विकास, माजीअस्पृश्य जातीपर्यंत पोहंचला.परंतू आदिवासी आणि भटक्या विमुक्तांची दयनीय अवस्था आणि भयावह शोषण पिडन आणि दमन आजही चालुच आहे.या भटके विमुक्त आणि आदिवासींचे दु:ख समजून घेण्याची तयारी आजूनही कुठल्याही शासन प्रशासनाने दाखवलेली नाही. 
' भंगार ' ही एक अशीच शोषण पिडन आणि दमनाची भटक्या विमुक्त समाजातील गोसावी जातीची आत्मकथा .
        अशोक_जाधव यांचे हे आत्मनिवेदनात्मक कथानक कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी गावचे.ते भटक्या विमुक्त जोगी गोसाव्यांतील पडियार या पोटजातीतले . त्यांनी आपल्या आत्मचरित्रातून भटक्या विमुक्तांची जगण्यासाठीची शिकस्त , भटक्या विमुक्तांची जाचक जातपंचायत आणि पितृसत्ताक मुल्ये यावर मुख्यत्वे प्रकाश टाकलेला आहे.
यात भंगार विकत घेणारे दुकानदार शोषण करतात.तर जातपंचायती व पितृसत्ताकता पिडन, दमन करते. असा सर्वच बाजुने विळखा घातलेला संघर्ष स्त्रीयांना करावा लागतो. 
       भटक्या विमुक्तांच्या साहित्याचा केंद्रबिंदू अंतर्गत द्वंद्वात्मक संघर्षाचा आहे.तिथे असनारे संघर्ष कुटूंबातील आहेत.जात पंचायतीतले आहेत.स्त्री पुरुषांतील आहेत.शत्रूभावी संघर्ष होतो तो पोलीस आणि भटक्या विमुक्तांच्यात.हा संघर्ष आजुन वर्गीय बनलेला नाही, तो जातीय, जातीअंतर्गतच आहे.म्हणून भटक्या विमुक्तांच्या साहित्यकृतीला स्वतंत्र साहित्य म्हणून पाहिले पाहिजे.तिथे गावगाडा नाही , कायमस्वरुपी मांडलेला संसार नाही, सर्व काही आहे ते आधर तरंगणारे.पाय ठेवायला इंचभर हक्काची जमीन नसने , शाळेत जायला गरजेची वह्या, पुस्तके,कपडे नसने,पोटासाठी कायमस्वरूपी कुठलेही साधन नसने, ही भटक्यांची पहिली प्राथमिक अडचण आहे.यावर आजूनही कुठल्याही सरकारने ठोस वर्क केलेले नाही.मतांच्या गणितासाठी काही भटक्यांचे बुद्धीजीवी जवळ धरण्याचे काम राजकारणी करतात पण ठोस वर्क आजूनही झालेले नाही.
            म्हणून आशोक जाधवांच्या या आत्मचित्राने जाती समाजाच्या आंतर्गत संघर्षतून बाहेर पडण्याचे बळ इतरांना नक्की मिळेल यात शंका नाही.सरंजामशाहीची पितृसत्ताक नियमावली पावलोपावली अशोक जाधव मोडुन काढुन, स्वताचे निर्णय स्वताला घेता यावेत अशी नवी मुक्त स्वातंत्र्याची पायवाट अशोक जाधव निर्माण करतात.

       भटक्या विमुक्त जातीत कडवी आणि संपूर्ण पितृसत्ता येवूनही कुठेकुठे मातृसत्तेचे अवशेष आपल्या पहायला मिळतात.अशोक जाधव यांच्या भंगार मधे सुद्धा शिमग्याच्या सणाला स्त्रीयांचे सांस्कृतिक आधिपत्य असने,हे लेखकाने उत्तमरीत्या निदर्शनास आनुन दिलेले आहे.लेखकाची नेनीव ह्या आदिबंदापर्यंत घेवून गेली हे महत्वाचे आहे.त्याद्वारे भटक्यांचा मातृसत्तेकडुन पितृसत्तेकडे झालेला प्रवास उलगडने सोपे जाइल.
          या आत्मचरित्राचे कथासूत्र भयानकतेकडुन तथा आसाहायतेकडुन सुरक्षीततेकडे, प्रगतीकडे मार्गक्रमण करते.प्रचंड कष्टदायक संघर्ष करत भटका विमुक्त गोसावी समाज हळूहळू कसा मुख्य धारेत येतो याचे चित्रण लेखक जागोजागी करतात.
         या आत्मचित्रात जागोजागी जीवघेणे कष्ट करणाऱ्या स्त्रीया दिसतात , यातूनही त्या सांस्कृतिक सणवार साजरे करण्यासाठी उत्साही दिसतात.संसार मोडणे , मारहान , व्यसने , स्त्रियांचे बळजबरीने पुनर्विवाह , हे गोसाव्यांतील सुरुवातीचे चित्रण लेखकाच्या शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या संघर्षातून बदलताना दिसते.समाजात फार मोठा बदलाचा हिस्सा लेखक बनतात.
          हे आत्मचरित्र व्यवस्थेला कोसत नाहीत तर मार्गकाढत जाते.लेखकाने उघड्या केलेल्या भळभळणाऱ्या जखमा दोषारोप करण्यासाठी नाहीत तर आज्ञानातून, अंधश्रद्धेतून , रुढी परंपरेतून मार्ग काढत पुढेजाण्यासाठीच्या आहेत. 
          भारतीय संस्कृती पुनरवापराची, रिसायकलिंगची आहे .त्यामुळे भंगार हा शब्द इंग्रजांच्या आगमनाने आला.त्यापुर्वीला भंगार वेचणी होत असल्याचे प्राचीन साहित्यात दिसत नाही.म्हणून लेखकाची गोसावी जात पुर्वीला फार मोठ्या वारस्याची हकदार असली पाहिजे. तो वारसा कुठला हे मात्र लेखक या आत्मचरित्रात मांडत नाहीत.उदरनिर्वाहासाठीची भंगार वेचनारे ही भांडवली व्यवस्थेने दिलेली ओळख आहे.भंगार वेचुन एक व्यक्ती संघर्ष करत उभा तर रहातो पण त्याच भंगार गोळा करणाऱ्या सर्वांना प्रेरणा देतो विकासाच्या प्रवाहात आनतो, हे मोठे काम आशोक जाधव यांनी केले आहे.

       अशोक जाधव यांचे हे आत्मचरित्र निश्चितच भटक्या विमुक्तांच्या साहित्यातील एक वेगळा दखलपात्र साहित्यआविष्कार आहे.त्याशिवाय कुणालाही पुढे जाता येनार नाही.
प्रत्येकाने वाचावे असे हे आत्मकथन आहे. 
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

No comments:

Post a Comment