Tuesday, 11 May 2021

♦️ जातीव्यवस्थेच्या आकलनाप्रत डाव्यांच्या भूमिका आणि वास्तव.

 ♦️ जातीव्यवस्थेच्या आकलनाप्रत डाव्यांच्या भूमिका आणि वास्तव.

                      नितीन सावंत परभणी -             9970744142 
                      (सौत्रांतिक मार्क्सवादी अभ्यासक )


      " वर्णअभिमानाने कोण झाले पावन l
       ऐसे द्या सांगोन मजपाशी ll
       अत्यंजादि योनी तरल्या हरिभजने l
       तयाची पुराणे भाट झाली ll "१ 
              - संत तुकोबाराय 

( वर्णजात या प्रधान समस्येचे आध्यात्मिक मुक्तीमार्गाने संत तुकोबारायांनी केलेले निराकरण ) 

       त्रिपुरा नंतर पश्चिम बंगालची सत्ता सुद्धा डाव्यांच्या हातून पूर्णपणे निसटली आहे.पुन्हा पुर्वीचे दिवस भारतीय डाव्यांना येइपर्यंत क्युबा प्रमाणे छोट्याशा केरळाच्या सत्तेवर भारतीय  कम्युनिस्टांना समाधानी रहावे लागनार आहे.

    कोणत्या कारणाने प्रधानमंत्री पदापर्यंत मार्गक्रमण करणारे डावे इतक्या वेगाने #पिछाडीवर आलेत ? 

      सांस्कृतिक राजकारणाच्या बाबतीत मौन बाळगणे , आस्मिता आणि प्रतिकांच्या लढाईला प्रतिगामी छावणीत लोटणे , सर्वहारांच्या बोलीभाषेत साहित्य निर्मिती न करणे, त्याभाषेमध्ये मार्क्सवाद न नेता आल्याने, डावे पिछाडीवर गेले आहेत. डाव्यांची वाताहत होण्याची यापेक्षा आनखी वेगवेगळी कारणेही आहेत.

     यातले सर्वात महत्वाचे कारण जो मुख्य चर्चेचा भाग आहे , ते म्हणजे जातीअंताच्या लढाईत प्रधान भूमिका न घेता जातीव्यवस्थेला दुय्यम मानने आहे. ऊर्ध्ववास्तू किंवा इमला मानने आहे. 

    "भारतीय कम्युनिस्ट नेत्यांनी व मार्क्सवादी पंडितांनी वासाहतिकपुर्व #वर्णजातीव्यवस्थेला ऊर्ध्ववास्तू मानायचा दुराग्रह आजूनही चालु ठेवला आहे."२ 
भारतात गणव्यवस्थेत आधी वर्णव्यवस्था आणि नंतर सामंतशाहीत जातीव्यवस्था निर्माण झाल्याने येथे वर्ग बनण्याची प्रक्रिया इंग्रजांच्या आगमणाने सुरु झाली.त्या आधी भारतात वर्ग नव्हते.ही मांडणी बहुतांश डाव्यांना मान्य नाही.भौतिक , वास्तविक असणाऱ्या जातीव्यवस्थेला डाव्यांनी ऊर्ध्ववास्तूत टाकून अभौतिक , अवास्तविक वर्ग मात्र वासाहतिक काळापूर्वी आणि आत्ताही पाया बनवला आहे. याबद्दल कॉ शरद पाटील म्हणतात,
 " जातीला आजूनही कोणत्याही प्रकारची भौतिकता द्यायला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तयार नाहीत.त्यांच्या दृष्टीने केवळ वर्गच सत्य व भौतिक आहे.तर जात भारतीय जनतेच्या केवळ मनात अस्तित्वात आहे. मार्क्सवादी तत्वज्ञानाच्या 'प्रतिबिंबवादी प्रमाणशास्त्रा'नुसार मानसिक प्रतिमा वा विचार बाहेर व स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेल्या भौतिक वास्तवाचे प्रतिबिंब असतात.मग मनाबाहेर कधीही भौतिक अस्तित्व नसलेली जात भारतीय मनांमधे हजारो वर्षापासून आस्तित्वात आहे हे कसे ? "३
या महत्वपूर्ण प्रश्नाला अनुल्लेखाने मारणे, डाव्यांनी सोयिस्कर समजले आहे.

" उत्पादन प्रक्रियेत एकाच प्रकारे  काम करणाऱ्या, आर्थिक आणि हितसंबध सारखे असणाऱ्या माणसांचा समूह म्हणजे वर्ग"४
 ही शिव वर्मा यांची वर्गाची व्याख्या आहे.परंतु केवळ अर्थव्यवस्थेत संबंधांचे एक स्थान असल्याने एक वर्ग ठरु शकत नाही.तर जेव्हा ते सामूहिकपणे समाजजीवनात उतरतात तेव्हा पुर्णार्थाने तो वर्ग ठरतो. 

     भारतीय समाजव्यस्थेकडे केवळ वर्गीय दृष्टीकोणातून पहाणाऱ्या कर्मठ डाव्यांनी ही व्याख्या वासाहतिक काळाच्या आगोदर  आणि वासाहतिक काळाच्या नंतरच्या भारतीय समाजव्यवस्थेला लावून जातीग्रस्त समाजात वर्ग कसे आहेत ते सिद्ध करावे.

रोग हाल्याला आणि इंजेक्शन पकालीला हे किती दिवस चालवनार ? इग्रजांच्या आगमनापूर्वी भारतीय संघर्ष वर्णजातींचा तर इंग्रजांच्या आगमनानंतर हा संघर्ष जातवर्गीय असा बनला आहे. 

   कुठल्याही समाजाचा आर्थोत्पादनाचा चौथरा जाणून घेतल्यानंतर त्यातील सामाजिक, राजकीय , धार्मिक , दार्शनिक , सांस्कृतिक इत्यादींनी बनलेल्या ऊर्ध्ववास्तूचे सम्यक आकलन होइल , हे मार्क्सच्या तत्वज्ञानाचे सारसर्वस्व आहे. या आर्थिक चौथऱ्याच्या आधारे जेव्हा भारतीय समाजव्यवस्थेच्या  वासाहतिकपुर्व कालखंडाकडे नजर टाकल्यास  सामाजिक संबंध जन्मावर ठरत असल्याचे निदर्शनास येते.

     मनुस्मृती ब्राम्हणेतरांना धनसंचय करु देत नाही.तसे केल्यास ते धन यज्ञासाठी थेट लूटुन,लुबाडुन आणावे अशी ताकीद देते.शुद्राने धनसंचय केल्यास ब्राम्हणांना बाधा निर्माण होते आशा प्रकारचा श्लोक मनुस्मृतीत आहे.अनेक राजे महाराजांच्या राज्यतही दोन बैलजोड्यापेंक्षा जास्त बैल बाळगण्याची बंदी होती. म्हणजे काय तर " वासाहतिकपूर्व जातीव्यवस्थाक समाजात शेतकरी ते शेतमजूर शुद्रजातीजमाती कायद्यानेच धनहिन होत्या.म्हणून त्यात आर्थिक भेद असु शकत नव्हते."५  
   म्हणजे काय तर भारतीय सामंतशाहीत शुद्रातिशुद्र जातीजमातींना आपला आर्थिक चौथरा कधीही बदलता येत नसे.माजी अस्पृश्य जाती तर शिजवलेल्या अन्नालाही मौताद होत्या.वर्ग हा जन्मसिद्ध नसतो.भारतात आलेली गरिबी , झालेले शोषण पिडन हे जन्मसिद्ध म्हणजे जातवार असल्यामुळे त्या जातींना कधीही आपला आर्थिक चौथरा बदलता आलेला नाही.म्हणजे वर्ग बदलता आलेला नाही.

      जातीलाच जर वर्ग मानायचे झाल्यास त्यासाठी समान हितसंबंध असावे लागतील पण तसे कुठल्याच जातीत हितसंबंध समान नाहीत.वर्ग बनण्यासाठी जातीअंतर्गत सुद्धा समानता नाही.तिथे क्रमिक असमानता आहे.जातीअंतर्गतही जन्मावर आधारलेले शोषण , शासनाचे स्तर आहेत. 

    ब्राम्हणांच्यापासून माजी अस्पृश्य जातीतील भंगी , मातंग, चर्मकार किंवा  महार यांच्यातही पोटजातींची इतकी क्रमिक असमानता आहे की तिथे समान हितसंबध कधीच निर्माण होऊ शकलेले नाहीत.आणि त्यांना एका पोट जातीतून दुसऱ्या वरच्या पोटजातीत आर्थिक निकषावर जाता आलेले नाही. 

  जातीअंतर्गत व्यवहार आणि संबंध हे काही आर्थिक चौथऱ्यावर नसतात. तिथे जन्मावर आधारित सामाजिक नियमावलीचे मापदंड हे हितसंबध निश्चित करतात.

    जसे गावगाड्यात एखाद्या जातीतील अलीकडे श्रीमंत बनलेल्या शेतकरी कुटुंबाकडे होळीचा , पोळ्याचा किंवा गावची यात्रा सुरु करण्याचा किंवा असे मुख्य मानपान त्याच्याकडे दिले जात नाहीत तर पूर्वापार चालेला मान भलेही ते कुटुंब गरिब असो त्याच्याकडे असतो.

     गावगाड्यात आर्थिक चौथऱ्यावर वरचढ बनलेला सजातीय देखील गरिब मुकादम , गरिब पाटील , गरिब देशमुख , गरिब कुलकर्णी यांच्यापुढे  आजूनही हिनदिन दुय्यमच असतो.बऱ्याच गावात बाहेरून येवून राहिलेल्या कुटुंबाला उपरे , उतरकरु , गुढेकरु , हलके मानले जाते.ते कुटुंब श्रीमंत बनले तरी त्यांना गावात मानसन्मान नसतो.

   सर्वात मोठे उदाहरण द्यायचे झाल्यास , ज्यांच्या घरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद दोनवेळा होते,असे अशोकराव चव्हाण लोकसभा निवडणूकीत पाडले जाण्याच्या अनेक कारणांत ते जातीव्यवस्थेत मुख्य जातीतही हलके माणणे हे होते. जातीतल्या क्रमिक असमानतेचा फटका आजघडीला एका नामांकित माजी मुख्यमंत्र्याला बसतो तर संपूर्ण जात वर्ग कशी मानता येइल ? 

     अमीर खान यांनी सत्यमेव जयतेच्या मालिकेत अस्पृश्यता या विषयावर एक भाग चर्चेला घेतला होता.त्यात एक चर्मकार व्यक्ती कलेक्टर बनली तरी त्या व्यक्तिला लोक " साला चमार बैठा है अंदर " म्हनत असत.ती कलेक्टर व्यक्ती म्हनते " ही नोकरी केवळ माझ्या रोजीरोटीचे साधन होती आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेचे साधन बनु शकली नाही. म्हणून मी राजीनामा दिला " याच सिरिअल मधे कौसर नावाची संस्कृतची प्राध्यापिका केवळ अस्पृश्य जातीतून आल्यामुळे तिला सतत घर बदलावे लागते , घर मालक  तिच्या आईला साफ सफाई करायला लावतात.

     प्रश्न आहे आर्थिक चौथरा बदलला की सामाजिक दर्जा सुधारतो का ? उत्तर आहे नाही. वर्ग बदलला की जातीव्यवस्था अस्पृश्यता आपोआप जाते का , संपते का ?  नष्ट होते का?  उत्तर आहे नाही

मग वर्ग भौतिक आणि जात म्हणजे माया हा हेका कशासाठी ?

    म्हणून "ब्रिटिशपुर्व , भारतीय समाजात अदृष्ठ वा अदृश्य वर्गाचे अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न हा भौतिकवादविरोधी असून अध्यात्मवादी इंद्रियातीत प्रमाणशास्त्राला शरण जाणारा आहे"६
 
   स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने जात भौतिक आणि वास्तव मानून आरक्षणाची तरतुद केलेली आहे." डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय जी.आय.पी.रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद , मनमाड येथे दिनांक १३/२ / १९३८ ला जे भाषण दिले त्यात त्यांनी ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही हे कष्टकर्यांचे दोन शत्रू असल्याचे म्हटले आहे.त्यासाठी त्यांनी रेल्वेतील अस्पृश्य कामगार आयुष्यभर ग्यांगमन म्हणूनच कसा काम करतो ,तो अस्पृश्य असल्यामुळे त्याचे कधीच वरच्या पोस्टवर प्रमोशन किंवा नियुक्ती होत नाही, हे उदाहरण त्यांनी आपल्या भाषणात दिले आहे."७
 
     वर्गव्यवस्थेत व्यवसाय जन्मावर आधारित नसतात.जातीव्यवस्थेत मात्र व्यवसाय जन्मावर आधारित आहेत .ही नियमावली मोडणाऱ्याला कठोर शिक्षा केली जात असे. शिवाय हे नियम नियंत्रीत करायला जातपंचायती सतत कार्यरत असत.वर्गव्यवस्थेत जातपंचायती नसतात.

     म्हणून जात हा वर्ग होऊ शकत नाही.भारतीय डावे ज्याप्रमाणे वर्गलढ्यांत सर्वस्व पणाला लावतात त्याप्रमाणे ते जाती लढ्यांत हात राखून सहभाग नोंदवतात,हे नेहमीचे चित्र आजही बदललेले नाही.आलिकडे शेतकरी जातींमधे जातींची अस्मिता इतकी प्रबळ बनत गेल्याने ते शेतकरी न रहाता जातीग्रस्त बनले आहेत.याकडे डोळेझाक केल्याने ब्राम्हणी छावणी वरचेवर मजबूत बनत गेलेली आहे. 
   आज घडीला " वरचढ शेतकरी जातींचे राज्याराज्यातले उच्चभ्रू हे भांडवलदार - जमीनदार जातवर्गाबरोबर शासक बनले.भारतीय लोकशाही क्रांतीची व्यूहरचना केवळ वर्गीय वा केवळ जातीय रहाण्याऐवजी जातवर्गीय बनने अपरिहार्य झाले"८

    म्हणून यापुढील लढे जातवर्गीय होतील यात वाद नाही.परंतू डाव्यांनी जातीअंताची भूमिका अजेंड्यावर घेतल्याशिवाय, हे लढे त्वरित उभे केल्याशिवाय चालू असलेली वाताहत थांबनार नाही.ब्राम्हणी छावणी हिंदू नावे जी एकजूट करतात ती एकजूट दलीत आदिवासी आणि भटक्याविमुक्तांच्या विरोधात असते.

   ग्रामीण भागातील एका समान प्लॅटफाॅर्मवर लढले गेलेले शेतकरी 'वर्गाचे' लढे, गावामध्ये गेल्यानंतर जातीमध्येच व्यवहार करतात.  

शहराच्या कामगार 'वर्गाचे' लढे कामगार काॅलनीतच गेल्यानंतर जातीमध्ये रोटीबेटीव्यवहार करतात.

जात-वर्ग चरित्र असणाऱ्या मध्यमवर्गीय समाजात हाऊसिंग सोसायटीज, बेटीव्यवहार, शिफारस, जातीनिहायच असते.

यामुळे जातीव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतो.याकडे डोळेझाक करुन कसे चालेल.
*******************************
संदर्भ :
१. देहुगाथा अभंग क्र.४२७६ 
२ . मार्क्सवाद: फुलेआंबेडकरवाद - कॉ शरद पाटील द्वितीय आवृत्ती पान क्र. १९
३. उक्त पा.क्र. १८४. 
४.मार्क्सवाद परिचयमाला - शिववर्मा ,जनशक्ती प्रकाशन, पान क्र.२८
५.शरद पाटील उक्त पान क्र १८. 
६.उक्त पा.क्र.२६८.
७.कष्टकर्यांचे सनातन शत्रू ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दोन भाषणे : लोकवाङ्मयग्रह डिसेंबर २०१५ 
८.कॉ.शरद पाटील उक्त २५९ 
****************************
नितीन सावंत परभणी - 9970744142
( सौत्रांतिक मार्क्सवादी )

No comments:

Post a Comment