Tuesday, 29 March 2022

संत चोखोबाराय चरित्र : प्रकरण ९ वे संत चोखोबारायांची गुरुपरंपरा

 संत चोखोबाराय चरित्र : प्रकरण ९ वे 
संत चोखोबारायांची गुरुपरंपरा

धन्य धन्य नामदेव l माझा निरसला भेव ll 
विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी l खुण सांगितली निर्धारी ll 
ठेवोनी माथां हात l दिले माझे मज हित ll 
दावियेले तारु l चोखा म्हणे माझा गुरु ll 
              -  संत चोखोबाराय 

                  भारतात संत , महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्यकतृत्वाचे श्रेय घेण्यासाठी गुरु आणि मार्गदर्शक ही पदे बदलण्याची , नसलेले लोक इतिहासात घुसण्याची मोठी चालाखीची परंपरा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातही दादोजी कोंडदेव आणि रामदास गुरु म्हणून घुसडण्याचे दीर्घकाळ प्रयत्न केले गेले.यादृष्टीने संत चोखोबारांच्या चरित्रात बघायचे झाल्यास, संत चोखोबारायांनी  आपल्या अभंगात आप्तस्नेह्यांचे उल्लेख केल्यामुळे त्यांच्या अभंगाच्या द्वारे आपल्याला त्यांची गुरुशिष्य परंपरा निश्चित करता येते. 
                        संत चोखोबारायांनी आपल्या अनेक अभंगात नामदेव गुरु असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. याबद्दल एक नव्हे दोन नव्हे नामदेवच गुरु असल्याचे अनेक अभंगांत चोखोबारायांनी दाखले दिलेले आहेत. जसे की चोखा म्हणे धन्य नामया तू गुरु l फेडिला अंधारु जीवीत्वाचा ll  म्हणजे संत नामदेवांकडून चोखोबारायांना अनुग्रह मिळाला. नामदेवांनी चोखोबारायांना शिष्य म्हणून स्विकारले होते. संत नामदेवांनी चोखोबांना अगदी सखा म्हटले आहे. संत नामदेवांच्याबद्दल बा. रं. सुंठणकर म्हणतात
     " या सर्व संतांनमध्ये अग्रभन्य नामदेव होते..
इतर प्रांतात, जे भक्तिपंथाचे उठाव झाले, त्याला प्रेरणा देण्याचे कार्य नामदेव आणि संतयात्रा यांनी केले. मराठी संतमंडळाचे तत्त्ववेत्ते ज्ञानदेव होते, तरी खरे प्रणेते नामदेवच होय. त्यांच्या 
वैष्णव सांप्रदायात ज्ञानदेव हे उशिरा म्हणजे १२९१ च्या सुमारास उघडपणे सामील झाले. त्यापूर्वी तो सांप्रदाय नावारूपाला आणण्याचे श्रेय नामदेवांना द्यावे लागेल. "
                         सुंठणकर म्हणतात त्याप्रमाणे भागवत धर्माचे संस्थापक संत नामदेव होते.२ नामदेवांनी भागवत धर्म सुरू केल्यानंतर आणि तो धर्म बराच प्रसिद्ध झाल्यानंतर संत भोजलिंग काका यांनी संत ज्ञानेश्वरादी भावंडाना नामदेवांकडे आनले. संत ज्ञानेश्वरादी भावंडांच्या भेटीच्या आधीच संत नामदेव औंढा नागनाथ येथील विसोबा खेचर यांच्याकडून दिक्षीत झाले होते. म्हणजे संत नामदेवांचे गुरु संत विसोबा खेचर होत. नामदेवांनी 'नामयाचा खेचरी दाता' म्हणून अनेक अभंगात विसोबा खेचर यांचे उल्लेख केले आहेत.विसोबा खेचर हे लिंगायत धर्मीय होते.ते शिवाचे उपासक होते.संत विसोबा खेचर यांची गुरुपरंपरा आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ - गोरक्षनाथ - मुक्ताबाई चांगा वटवेश्वर - कृष्णनाथ - विसोबा खेचर अशी दिली आहे.३ विसोबा बेचर यांचा स्वलिखीत 'षट्स्थळ' या ग्रंथात त्यांनी आपली हि गुरुपरंपरा दिली आहे.आता एकुण संत चोखोबारायांची गुरु परंपरा पुढील प्रमाणे होईल. आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ- गोरक्षनाथ मुक्ताबाई - चांगा वटवेश्वर - कृष्णानाथ - विसोबा खेचर - संत नामदेव - संत चोखोबाराय. 
                       हे एवढे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ असतानाही संत नामदेवांचे गुरुत्व बदलण्याचा प्रयत्न आजतागायत चालू आहे. वारकरी सांप्रदायातील बहुतांश किर्तनकार आणि लेखक साहित्तीक मंडळी संत नामदेवांना, ज्ञानदेवांच्या भगिणी मुक्ताबाई यांनी गोरोबाकांच्या परिक्षेद्वारे कच्चे मडके संबोधून विसोबा खेचर यांच्याकडे पाठवले असल्याचे सतत पसरवत असतात. म्हणजे विसोबा खेचर यांच्या गुरू ज्ञानदेव भगीनी आठ वर्षाच्या मुक्ताबाई आणि त्या मुक्ताबाईच्या सुचनेवरून "विसोबा खेचर यांच्यामुळे संत नामदेवांचा उध्दार झाला अशी मांडणी आजही चालू आहे.
                     ही  मांडणी संत नामदेव यांच्यावर अन्याय करणारी आहे.विसोबा खेचर यांनी दिलेल्या गुरु परंपरेत विसोबांचे गुरू कृष्णनाथ त्यांचे गुरु चांगा वटवेश्वर आणि चांगा वटवेश्वरांच्या गुरु मुक्ताबाई होत.या परंपरेत ज्या मुक्ताबाई येतात त्या संत विसोबा खेचर यांच्या गुरुच्या गुरु मुक्ताबाई होत.साधारण एका पिढी आधीच्या तरी मानाव्या लागतील. म्हणजे या परंपरेतील मुक्ताबाई वयस्क अभ्यासू योगीनी मुक्ताबाई आहेत. ह्या गुरु परंपरेत येणाऱ्या मुक्ताबाई नामदेव समकालीन संत ज्ञानदेवांच्या आठ वर्षाच्या भगणी मुक्ताबाई नव्हेत.यावर सविस्तर लिखान. रा.ची. ढेरे यांनी 'श्रीपर्वताच्या छायेत' या ग्रंथात केले आहे. म्हणुन संत चोखोबारायांच्या गुरू परंपरेची सुरवात श्रीशैलच्या स्त्रीराज्यातून होते. संत बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपातील अल्लमप्रभू अक्कमहादेवी हे श्रीशैलचेच होते. चक्रधर स्वामींचाही १२ वर्षे निवास श्रीशैलवर होता. म्हणून या मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक स्त्रीरातून जातीअंताची सुत्रे घेऊन सर्वच संत विविध पंथप्रवाहांच्याद्वारे कार्य करत होते. बसवाण्णांनी जातीअंताची सुरवात करून अंतरजातीय विवाह लावला. संत चक्रधर स्वामीनी मातंगांसाठी विहीर खुली केली तर संत नामदेवांनी संत चोखोबारायांना भागवत धर्माची दिक्षा दिली. अस्पृश्याला शिष्यत्व बहाल केले. बसवण्णा, चक्रधर आणि नामदेव या तिनही धर्मसंस्थापकांचा कॉमन दुवा योगीनी मुक्ताबाई होत. श्रीशैलचे स्त्रीराज्य होय.
                      संत चळवळीत सर्वात मोठा अन्याय झाला तो संत नामदेवांवर.संत नामदेवांनी सर्व जातीधर्माच्या संताना एकत्रित आनुन भागवत धर्म सुरू केला होता. परंतू नामदेवांच्या नंतर साधारण चारशे वर्षांनी जन्मलेल्या, उत्तरकालीन संत बहिणाबाईंचा अभंग घेउन 'ज्ञानदेवे रचिला पाया' हा प्रचार करण्यात आला.तो आजही चालु आहे. 
                  अगदी याचप्रमाणे संत -चोखोबारायांच्या तोंडी संत ज्ञानदेवांच्या स्तुतीचे जे अभंग आहेत ते प्रक्षिप्त आहेत. कारण संत ज्ञानेश्वरांच्या अभंगात, चोखोबांचा एकदाही उल्लेख नाही. नामदेव, जनाबाई, सोयरा, बंका, कर्ममेळा, निर्मला आदी समकालीन सर्व संत चोखोबाचा उल्लेख करतात पण ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई चोखोबांचा एकदाही उल्लेख करत नाहीत, हे मोठे अश्चर्यच आहे. याउलट चोखांच्यासंह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही ज्ञानदेवांचा उल्लेख करतात. हे उल्लेख केलेले अभंग संत ज्ञानेश्वरांचे महत्व वाढवण्यासाठी  नंतर घुसवण्यात आल्याचे स्पष्ट होते.
                  संत चोखोबारायांचा, संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा उल्लेख करणारा एक अभंग मजेशीर आहे.ज्यात संत चोखोबाराया सर्व संतांचे उल्लेख करतात पण नेमके आपल्या प्राणप्रिय गुरुचा म्हणजे  संत नामदेवांचाच उल्लेख ते करत नाहीत.मोठे आश्चर्यच आहे.अभंग खालीलप्रमाणे आहे.
                  
 सप्रेम निवृत्ती आणि ज्ञानदेव l मुक्ताईचा भाव विठ्ठलचरणी ll 
 सोपान सावता गोरा तो कुंभार l नरहरी सोनार प्रेम भरित ll 
 कबिर कमाल रोहीदास चांभार l आणि आपार वैष्णवजन ll
 चोखा तया पायी घाली लोटांगण l वंदितो चरण प्रेमभावे ll 
                            या अभंगात चरण वंदन करण्याच्या , म्हणजे नमस्कार करण्याच्या मुख्यवेळी संत चोखोबाराय आपले गुरु संत नामदेवांना कसे काय विसरु शकतात ? संत नामदेव यांचा  उल्लेख संत चोखोबारायांनी का टाळला असवा ?ज्यांचे जीवन संत नामदेवांनी प्रकाशमान करुन टाकले त्यांचा उल्लेख चोखोबा टाळतीलच कशाला ? आणि इतर अभंगांत तर संत चोखोबाराय म्हणतात " चोखा म्हणे या नामयाचे पाय l न विसंबे ओ माय जन्मोजन्मी ll नामयाचे पाय जन्मोजन्मी न विसंबनारे चोखोबा नेमके वरिल अभंगातच का विसरले असतील ? म्हणून  वरिल अभंग प्रक्षिप्त आहे. 
                 संत नामदेव आणि संत चोखामेळा हे जीवश्च कंठश्च मीत्र आणि गुरुशिष्य सुध्दा. हे चोखोबारायांच्या कुटुंबीयांनाही मान्य आहे. चोखोबाराय आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब चोखोबारायांची बायको सोयरा,मुलगा कर्ममेळा,बहिण निर्मळा, मेव्हणा बंका या सर्वांचा वैचारिक उद्धार संत नामदेवांच्यामुळेच झाला, हे सर्वजन मान्य करतात.तसे उल्लेख करतात.हे एवढे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ असूनही संदर्भहीन लिखान करून आनेकांनी बनवाबनवी केल्याचे दिसून येईल.
                           'संत चोखामेळा विविध दर्शन' या ऐलिनॉर झेलियट, यांच्या ग्रंथात संत नामदेव आणि संत चोखामेळा या प्रकरणात प्रा.हे.वि. इनामदार यांनी चोखोबांची गुरु परंपरा दिलीय. त्यात ते म्हणतात

                        "नामदेव व चोखोबा हे दोघे संत एकाच गुरुपरंपरेतील आहेत. 'आदिनाथ - मच्छिंद्रनाथ - गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - ज्ञानदेव - विसोबा खेचर - नामदेव अशी नामदेवांची गुरूपपरा आहे " इनामदार हे विसोबा खेचर यांच्या गुरु परंपरेत ज्ञानदेव घुसवतात. इनामदारांचे म्हणने धादांत खोटे आहे,कारण विसोबा खेचर यांनी आपले गुरू ज्ञानदेव असल्याचे कुठेच म्हटलेले नाही. 'षडस्थळ' मध्ये हे उल्लेख नाहीत.षडस्थळ हा विसोबा खेचर यांचा स्वलिखीत ग्रंथ आहे.ग्रंथ उपलब्ध आहे.तोच प्रमाण. 

               संत चोखोबांसारख्या अस्पृश्याचा आणि अनेकांचा उध्दार करण्यासाठी सदैव समतेचा अग्रह धरणारे संत नामदेव होत. म्हणुन संत चोखामेळा म्हणतात. 

"चोखा म्हणे तुम्ही माय हो माउली ।
कृपेची साउली नामदेवा ।।"

                      म्हणुन विसोबा खेचर यांनी लिहिलेल्या षडस्थळ ग्रथांत त्यांनी आपले गुरू ज्ञानेश्वर किंवा ज्ञानेश्वर भगीनी मुक्ताबाई असे कुठेही म्हटलेले नाही.संत चोखोबारायांचीही गुरू-शिष्य परंपरा सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. 

रा.चीं. ढेरे म्हणतात

                    "विसोबा खेचरांच्या 'षटस्थल' या ग्रंथाच्या उपलब्धीला जे अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे, ते त्यात ग्रथित झालेल्या परंपरा- वृत्तामुळे. आदिनाथ- मत्स्येंद्रनाथ - गोरखनाथ - मुक्ताबाई - चांगा वटेश्वर- कृष्णनाथ - विसा खेचर.4

                      राची.ढेरे यांनी दिलेल्या परंपरेला संत चोखोबारायांशी नामदेवांच्या द्वारे पुढीलप्रमाणे जोडले जाते.

आदिनाथ - मत्स्येंद्रनाथ - गोरक्षनाथ - मुक्ताबाई चांगा वटवेश्वर - कृष्णनाथ - विसा खेचर - संत नामदेव- संत चोखोबाराया. 

ही संत चोखोबारायांची आणि संत नामदेवांची गुरु परंपरा होय.

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment