संत चोखोबाराय चरित्र
ll प्रकरण १० वे ll
काय भुललासी वरलिया रंगा ....
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा l काय भुललासी वरलिया रंगा ll कमान डोंगी पर तीर नही डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा ll
नदी डोंगी परि जल नोहे डोंगे। काय भुललासी वरलिया रंगा ll
चोखा डोंगा परि भाव नोहे डोंगा ।काय भूललासी वरलिया रंगा ।।
- संत चोखोबाराय
'गुलामगिरी' हा जगभर थैमान घातलेला मानवी आजार . आपल्याच सारख्या माणसाला तो फक्त मरणार नाही एवढ्यात जाचक अटी लावून, त्याला प्रचंड श्रम करायला लावून, त्याचे शोषण करणे म्हणजे गुलामगिरी होय. युरोप,अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशात तर अत्यंत घृणास्पद गुलामगिरी 2000 साला पर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात होती. प्रचंड गर्दी होईल एवढाल्या गुलामांच्या बाजारपेठा होत्या. गुलामाला बोली लावून, चाचपुन पाहिले जाई. काही दिवस त्याला शारीरिक श्रम करायला लावून म्हणजे आजमावून विकत घेतले जाई. गुलाम स्त्रियांचे जीवनही महाभयंकर, नरक यातनामय होते. सतत होणारे बलात्कार आणि तिने जास्त आपत्य जन्माला घातली तर आपल्याला काम करायला फुकट माणसे उपलब्ध होतील या धारणेतून गुलाम स्त्रियांचे जीवन नरकमय बनवून टाकलेले होते.माय लेकरांची सतत ताटातूट केली जाई , बलावयात ते लकरं गुलाम म्हणून विकले जात.
गुलामांना दिल्या जाणाऱ्या शिक्षांमध्ये त्याला सतत चाबकाने फोडून काढले जाई, कामाच्या वेळे व्यतिरिक्त त्याला साखळदंडाने बांधून ठेवले जाई. गुलामांच्या आपापसात झुंजी लावल्या जाई, एका गुलामाने दुसऱ्या गुलामाला जीवे मारेपर्यंत ह्या झुंजी चालत असत. गुलामांना विष्ठा खायला लावली जाई, एखाद्या गुलामाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास तप्त सळयांनी किंवा चपट्या काँईनने शरीरावर डागले जाई,खुणा केल्या जात असत. गुलामांना सामुदायिक फासावर लटकवून ते प्रेत तसेच ठेवले जाई. जळालेल्या गुलामांचे हाडे गोळा करून मजाक आणि चेष्टा म्हणून दुकानात विकले जात असत. म्हातारी माणसे, स्त्रीया आणि लहान मुले जे गुलाम असत ते बर्फात नेवून फेकून दिले जात असत. तिथेच ते तडफडून मरत असत. कोळशांच्या हिऱ्यांच्या खाणीत त्यांना अत्यंत कमी अन्न देऊन राबवून घेतले जाई, त्यामुळे एक-दोन वर्षातच ते गुलाब खानितच मरायचे. काम करताना सर्वत्र वास सुटायचा, रोगराई पसरायची. ही जगभरातील गुलामगिरी होती. काळे-गोरे या भेदावर ही गुलामगिरी उभी राहिलेली होती. जगभरात कामाला आणि युद्धाला जुंपून करोडो काळे मारण्यात आले होते. दोन्हीकडून ही युद्धातील सैन्यात काळे गुलाम वापरले जात असत.काळयांचे सामूहिक शिरकानही कित्येक वेळा गोऱ्यांनी केले आहे. काळ्यांचे लढे उभे करणारे अनेक नेते पकडून गोळ्या घालून ठार करण्यात आले,तरीही लाखोंच्या बलीदानानंतर काळ्यांना गोर्यांच्या बरोबरीने हक्क अधिकार मिळाले आहेत.अलीकडे काळे-गोरे भेद आणि गुलामगिरी जवळपास संपत आली आहे.
भारतातही गुलामगिरीची अमानवीय प्रथा स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालू होती. परंतु भारतीय गुलामगिरी धर्माच्या आधारे, मानसिक खच्चीकरण करून लादली गेलेली गुलामगिरी होती. जागतिक गुलामगिरी पेक्षा भारतीय गुलामगिरी जातिव्यवस्थेवर आधारलेली असल्याने येथे एखादी व्यक्ती किंवा कुटुंब किंवा एखादा समूह नव्हे तर जातीच्या जाती गुलामगिरीत ढकलल्या गेल्या होत्या. अनेक, जातींना हीन, तुच्छ लेखून त्यांच्याबद्दल धर्मसंम्मत कायदे करण्यात आले होते. बुद्धाच्या काळात दास प्रथा होती.तथागत बुद्धांच्या सामाजिक जागृतीमुळे दास प्रथा नष्ट झाली. त्याकाळी दासांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा आणि वागणूक भीषण होती.दासाला फक्त एकच वस्त्र वापरायला दिले जाई आणि ते फक्त कमरेच्या खाली गुडघ्यापर्यंत असे.दासांना डागले जाई, चुकल्यास तप्त सळई कानातून घालून दुसऱ्या कानातून काढली जाई, दासांना जमिनीला कान टेकवायला लावून वरून दुसऱ्या कानातून बांबू किंवा टोकदार लाकडाने ठेचले जाई, गणातील लोक जमून याप्रकारे दासावर सामुहिक हल्ला केला जात असे. वर्णव्यवस्थेत भंगी ,चांडाळ यांना गुलामा सारखीच वागणूक असल्याचे दाखले त्रिपिटकात सापडतात.
पुढील काळात जातीव्यवस्था आली.जातीव्यवस्थेत अनेक जाती अस्पृश्यतेत लोटल्या गेल्या आणि या अस्पृश्यांचे संपूर्ण जीवन उच्चजातीयांच्या हातात असे. या अस्पृश्य जातींमध्ये महार,मांग,चर्मकार, ढोर,भंगी,खाटिक अशा अनेक जातींचा समावेश होतो.या जातींना काळ्या गुलामांपेक्षाही भयानक अत्याचाराला सामोरे जावे लागलेले आहे.
या गुलाम जातींना हिनत्वदर्शक कामे वाटून दिलेली असत.भंगी या जातीला तर परंपरागत पिढ्यानपिढ्या उच्चजातीयांची संडास हाताने उचलायला लावली जायची.गावातील उच्चजातीय स्वताच्या घरातील संडासात हगत असत आणि नंतर ती संडास बाहेरील खड्ड्यातून भंगी समाजाचे बांधव आपल्या डोक्यावर घेवुन तो मैला गावाबाहेर नेवुन टाकत असत. यावर अनटचड इंडिया ही डॉक्युमेंटरी सुद्धा आहे. या अस्पृश्य जातींना कुठलेच हक्क अधिकार नव्हते. अन्न म्हणून त्यांनी मेलेल्या जनावरांचे मांस खायचे. तळलेले अन्न अस्पृश्यांना खाण्यास बंदी होती. हे मनुस्मृतीत नमूद आहे. कच्चे,सडलेले ,विटलेले, बुरशी चढलेले अन्न अस्पृश्यांना खाण्यास दिले जाई. त्यांना गावगाड्यातील मुख्य पाणवठ्यावर पाणी भरु दिले जात नसे.अस्पृश्य स्त्रियांनी लाज झाकली जाईल एवढेच कपडे वापरावेत, त्यांचे कपडे धुतलेले स्वच्छ व पांढरे असू नयेत हा दंडक होता.अस्पृश्य पुरुषांनी कमरेखाली,गुडघ्यापर्यंत लंगोट किंवा धोतर वापरावे. एका प्रथेत तामिळनाडूत तर स्त्रियांना स्तन उघडे ठेवायला लावले जात असत. उच्चजातीय रस्त्याने जाताना अस्पृश्यांनी रस्ता रस्ता सोडून बाजूला उभे राहावे. अस्पृश्यांनी चूक केल्यास त्याला जिवंत जाळले जाई. अनेक अस्पृश्यांना बांधकामासाठी नेऊन भिंतीत किंवा बांधकामाच्या पायात जिवंत गाडले जाई. अस्पृश्यांच्या स्त्रीयाही उचलून नेऊन ओरबडल्या जात. अब्रू लुटली जाई.स्वातंत्र्यानंतरही खैरलांजी हे रेकॉर्ड वर आलेले उदाहरण आहे.अशा भीषण अस्पृश्यतेच्या गुलामगिरी विरोधात बंड करणे धार्मिक गुन्हा मानला जाई. तरीही मध्ययुगीन भारतात संत चोखामेळा संत सोयराबाई, संत बंका, संत कर्ममेळा, संत निर्मळा आणि संत रविदास हे संत अस्पृश्यतेच्या गुलामगिरी विरोधात बंडासाठी उभे राहिले होते.यांनी केवढा मोठा विद्रोह केला होता हे गुलामगिरी काय असते हे अभ्यासल्या शिवाय लक्षात येनार नाही.
अस्पृश्याने मुक्तपणे अभिव्यक्त होणे भजन,अभंग,दोहा लिहने, म्हणजे हा तर धर्मद्रोह होता. या अस्पृश्य जातीतल्या संतांनी प्रथम अभंग,दोहे लिहायला सुरुवात करून धार्मिक गुलामगिरी मोडीत काढायला सुरुवात केली होती.
संत रविदास म्हणायचे,
रैदास न ब्राम्हण पूजीए ।जो हो गुणहीन ।
पूजीए चरण चांडाल के। जो हो गुणप्रविण ।।
जातिव्यवस्थेच्या असमान वागणुकीवर संत रविदास यांनी अत्यंत परखड टीका केलेली आहे. संत रविदास यांच्या अगोदर संत चोखोबा यांचा जन्म झाला म्हणून अस्पृश्यतेच्या विरोधात धार्मिक क्षेत्रात पहिले बंड करणारा पहिला गुलामांचा नेता म्हणजेच संत चोखोबाराय होय.संत चोखोबाराय भारतीय अस्पृश्य मानलेल्या गुलामांचे पहिले नेते मानले पाहिजेत.
संत नामदेवांच्यावर भरोसा ठेवून चंद्रभागेच्या तीरावर सर्व संतांत मुक्तपणे सहभागी होण्याचे धाडस संत चोखोबारायांनी केलेले आहे. त्यांनी अभंग लिहून धार्मिक गुलामगिरी मोडण्यासाठी पहिले पाऊल टाकले.आजच्या दृष्टीने ही गोष्ट, ही कृती नगण्य, छोटी जरी वाटत असेल तरी ते धाडस खूप मोठे होते. संत चोखोबाराय यांनी अभंगातून अभिव्यक्त होऊन गुलामांचे नेतृत्व केले तर संत सोयराबाई आणि कर्ममेळा यांनी व्यवस्थेला थेट प्रश्न करून बंडखोरी केली.
बाहेरच्या जगात गुलामांचा बंडखोर नेता म्हणून स्पार्टकस अजरामर झाला. स्पार्टाकसला ती लढाई तलवारीनेच लढावी लागली .भारतीय गुलामगिरीत अस्पृश्यांना तलवारी घेवुन बंड करता येनार नव्हते.तसे प्रयत्न झालेही परंतू उच्चजातीय समाजव्यवस्थेने अस्पृश्य वस्त्या जाळल्या , सामूहिक शिरकान केले गेले. म्हणून भारतीय गुलामगिरी शस्त्रास्त्राने संपणारी नव्हती, नाही.ही गुलामगिरी वैचारिक प्रभोनात्मक मार्गानेच संपणार असल्यामुळे येथे तलवारीची लढाई लढता येनार नाही. म्हणून संत चोखोबाराय जी भूमिका घेतात ती स्पार्टाकसच्या तोडीचीच आहे.भारतीय गुलामगिरी ही वैचारिक प्रबोधनानेच संपनार आहे.तो बरोबर मार्ग संत चोखोबाराय पकडतात. ते गुलामगिरीच्या इतिहासात अभिव्यक्त होणारे अस्पृश्यांचे प्रतिनीधी म्हणून मैलाचा दगड बनले आहेत.
संत चोखोबारायांची प्रेरणा पुढील काळात अस्पृश्यांसाठी काम करणाऱ्या सर्वच नेत्यांना मिळाली. विदर्भातील किसन फागुजी बनसोड हे स्वातंत्र्यपूर्व काळात संत चोखोबा यांच्या नावे वृत्तपत्र चालवत असत.त्यांनी संत चोखोबारायांच्या नावे वसतीगृहही काढले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपला एक ग्रंथ संत चोखामेळा यांना अर्पण केला आहे.दोन्ही उदाहरणांच्या द्वारे हे सिद्ध होते की संत चोखोबाराय हे अस्पृश्यांवर लादलेल्या गुलामगिरी विरोधात लढणारे नेते होते. ते अस्पृश्यांचे पहिले बुद्धिजीवी होते. अस्पृश्यतेच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या समुदायाचा नेता म्हणून चोखोबारायांची अनेकांना दखल घ्यावीच लागेल.
भारतात ब्राम्हणी व्यवस्थेने माणुस म्हणून एका जातवर्गाची जगण्याची सर्व साधने हिसकावून घेतली होती.आपल्याला हिशोबशीर धर्म निर्माण करुन त्याचे धर्मपुस्तकही ब्राम्हणी जातवर्गाने काढले होते. त्याद्वारे ते कारभार करत.आपल्या जगण्याची सर्व साधने हिसकावून घेतलेली हडामासांची माणसासारखी माणसे पाच नव्हे दहा नव्हे हजारो वर्षे मेलेल्या जनावरांचे मांस खात होते.
कार्यकतृत्व सुद्धा आम्हीच गाजवनार , कलाकारी आदाकारी आमचीच मक्तेदारी,ज्ञानभांडाराच्या चाव्या आमच्याच जानव्याला म्हननार्या जात्यांध वर्गाने या देशाचे हजारो वर्षे सांस्कृतिक कुपोषण केले.तरी संत चोखोबारायांच्यासारखे संत ही मक्तेदारी मोडुन काढण्यासाठी पुढे आलेच.त्यांनी आंधारात एक प्रकाशकिरण निर्माण केलाच. वरिल अभंगात संत चोखोबाराय म्हणतात " ऊस वाकडा असला म्हणून काय त्याचा रसही तसाच असेल का ? म्हणून वरच्या रंगाला भुलू नका.धनुष्य बानाची कमान वाकडी असते म्हणून काही तिर वाकडा नसतो.नदी वेडीवाकडी वळने घेत प्रवाही रहाते म्हणून काही तिचे पाणी वाकडे नसते.म्हणून वरवरच्या देखाव्याला भुलू नये.हा चोखोबा तुम्हाला हिन अस्पृश्य वाटत असेल पण त्याचा भाव तुम्ही पहावा.त्याची गुणवत्ता लक्षात घ्यावी.जातीवरुन हिनवु नये.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment