संत सोयराबाई आणि संत कर्ममेळा
आमची तो दशा विपरीत झाली। कोण आम्हा घाली पोटामध्ये ll आमचें पालन करील बा कोण l तुजविण जाण दुजे आता ।l कळेल तें करा तुमचे उचित l माझी तो नित निवेदली ||
सोयरा म्हणे माझा जीवप्राण तुम्ही । आणिक तो आम्ही कोठे जावे ।।
- संत सोयराबाई
संत चोबोबारायांच्या मृत्यू पश्चात आपल्या कुटूंबाची काय दशा झाली आहे, ते या अभंगात सोयराबाईनी मांडले आहे. त्यांचा मुलगा आणि कर्ममेळा अगदी पोरके झाले होते. संपूर्ण कुटूंब रस्त्यावर झाले होते. म्हणुन सोयराबाई म्हणतात, चोखोबारायांच्या जाण्याने आमची दशा विपरीत झाली आहे. आता आम्हाला कोण पोटासी घेईल ? आमचे पालन पोषण कोण करील ?. अत्यंत हृदयद्रावक आर्त अशी वेदना या भंगातून सोयराबाईनी मांडली आहे.
सोयराबाईचे एकुण ६२ अभंग उपलब्ध आहे. तर कर्ममेळा यांचे २६ . या दोघा मायलेकरांचा सर्वात मोठा आधार चोखोबाराय होते. या दोघांच्या एवढ्याच तोकडया अभंगांवरून आपल्याला इतिहासाच्या धुंडाळा घ्यायचा आहे.संत सोयराबाई संत , कर्ममेळा यांचे बहुतंश अभंग नष्ट केले गेले आहेत.आज उपलब्ध असलेल्या या थोड्या का होइना अभंगांवरून सोयराबाई आणि बंका यांची माहिती घेऊया.
सोयराबाई ह्या संत चोखोबारायांच्या खांदयाला खांदा लावून साथ सहयोग देणाऱ्या पत्नी होत्या. त्यांनी आपली ननंद निर्मळा हिच्याशीही युष्यभर अत्यंत सलोख्याचे संबंध ठेवले होते. आपल्या नवऱ्याला बडव्यांनी त्रास दिल्यानंतर त्यांनी विठ्ठलाला लाज वाटावी असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
"खाईले जेविले त्याचा हा उपकार l दुबळी भ्रतार मारू पाहाशी "
आमच्या घरी खाल्लेल्या अन्नाला तरी जाग. या दुबळीचा नवरा मारू पहातोस काय ? हा थेट सवाल सोयराबाईनी विठ्ठलाला विचारलेला आहे. प्रत्येक वेळी त्या आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. सर्व संत मंडळ आणि नामदेव चोखोबारायांना भेटायला आल्यानंतर सोयराबाईनी सर्वाना जेवायला घातले. चोखोबाराय गेल्यानंतर त्यांच्या घरावर दुखाचा डोंगर कोसळला होता. पण नामदेव महाराज चोखोबारायांचे स्मारक बांधत आहेत म्हटल्यानंतर त्या सुखावल्या होत्या. समाधी बांधल्यानंतर त्या आपल्या गावी निर्मला आणि बंका यांच्याकडे गेल्या. कर्ममेळा भाणि सोयराबाई मेव्हणपुरीला जावून राहिल्या होत्या.
कर्ममेळा हे चोखोबारायांपेक्षा विद्रोही मानले जातात. सर्वच लेखक साहित्तीकांनी परखड व्यक्तीमत्व म्हणून कर्ममेळा यांचा गौरव केला आहे.त्यांचा हा अभंग अत्यंत चर्चीला गेलेला आहे.
आमुची हिन केली याती l तुज का न कळे श्रीपती॥
जन्म गेले उष्टे खाता । लाज न ये तुमचे चित्ता ॥
आमचे घरी भात दही । खावोनी कैसा म्हणसी नाहीं ॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा l कासया जन्म दिला ll
पांडुरंगाच्या माध्यमातून प्रस्थापीत समाजववस्थेची लाज काढणारा हा अभंग आहे. आमुचे आयुष्यच तुमचे उष्टे, खरकटे खाण्यात गेले आहे.तुमच्या जीवाला थोडीतरी लाज वाटते का ? असा विद्रोही सवाल संत कर्ममेळा यांनी विठ्ठलाला उपस्थित केला आहे. हा प्रश्न सर्व समाजव्यवस्थेने समजून घ्यायला हवा होता. निदान महाराष्ट्रातील सर्व वारर्यांनी तरी संत चोखोबारायांच्या आणि कर्ममेळा यांच्या वारकरी परंपरेतील योगदानाला लक्षात घेवुन नंतर कोण्याही अस्पृश्य व्यक्तीला सडके कुजके उष्टे उरलेले शिळेपाके द्यायला नको होते . स्वातंत्र्य मिळेपर्यंत, माजी अस्प्रश्य जातींना, भटक्या विमुक्त जातींना उरलेले, सडके, कुजके , नासके, उष्टे, खरकटेच खायला दिले गेले आहे. आजूनही भटक्या विमुक्त जातीच्या वाट्याला हेच जगणे आहे. म्हणून चोखोबारायांपेक्षा पुढची प्रकार भुमीका कर्ममेळा यांनी घेतली होती. दुदैवाने त्यांचे संपूर्ण अभंग आज उपलब्ध नाहीत.
त्या काळाच्या मर्यादा लक्षात घेता, लाज काढण्यापर्यंत जाने पुरेसे आहे. संत कर्ममेळा यांची ही भूमिका विषमतावादी विचारप्रवाह नाकारणारा मोठा विद्रोहच आहे.
निर्माळा आणि बंका यांनाही इतिहासात अजरामर होत आले, ते चोखोबारायांच्या नामदेवांच्या सहवासामुळे. निर्मला ही चोखोबारायांची बहीन तर बंका हे मेव्हणे होते. संत बंका यांचे ४१ तर निर्मळा यांचे केवल २४ अभंग आज उपलब्ध आहेत. या दोघेही पती पत्नीने आपल्या अभिव्यक्तीचे श्रेय चोष्योबारायांना दिले आहे.एवढे एकात्म कुटूंब दुसरीकडे सापडणार नाही.
ही संत मंडळी जेव्हा अभंग रचत असत,त्या स्वलिखीत अभंगाला संत मंडळात सादर केले जाई. तेव्हा ऐकणारी जनता तो अभंग पाठ करून ठेवत असत.म्हणून तर आजही अनेक संतीचे अभंग गाथ्यात नाहीत पण लोक नेहमी म्हणतात असे आपल्याला निदर्शनास येईल. संत चोबारायांची अभंगगाथा सर्वप्रथम स.भा कदम यांनी उजेडात आली. त्या गाथेचे नंतर भालचंद्र नेमाडे यांनी संपादन केले. आहे. चोखोबारायीचे संपूर्ण कुटूंब निरक्षर मग हे अभंग कुणी उत्तररून घेतले ? लिहुन घेतले?
अनंतभट हा चोखोबारायांचा लेखक. ब्राम्हण असुनही कुणाचीही पर्वा न करता एका अस्पृश्य संताचे अभंग शब्दबध्द, अक्षरबध्द करण्याचे काम अनंतभट्ट यांनी केले होते. कोण कोणत्या संताचा लेखक कोण कोण होते, याबददल संत जनाबाईचा अभंग पुरावा मानला जातो.
संत जनाबाई म्हणतात.
ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा । चिदानंद बाबा लिही त्यास ll निवृत्तीचे बोल लिहीले सांगावे | मुक्ताईची वचने ज्ञानदेव ।l चांग्याचा लिहीणार शामा तो कासार । परमानंद खेचर लिहीत असे ll
सावत्या माळ्याचा काशीबा गुरव l कुर्म्याचा वास्तुदेव काईत होता ll
चोखामेळ्याचा अनंतभट अभ्यंग | म्हणोनी नामयाचे जनीचा पाडुरंग ॥"
याद्वारे चोखोबारायांचे अभंग उतरून घेण्याचे पहिले श्रेय अनंत भट यांच्याकडे जाते. चोखोबारायांची भाषा त्याकाळातील ग्रामीण बोली होती. ती बोली अनंतभट यांनी आपल्या शब्दात शब्दबद्ध केल्याचे अभंगांवरून लक्षात येते.
त्या काळी चोखोबारायांच्या जीवावर उठलेले लोक पहाता, अनंत भट यांनाही खुप त्रास दिला असणार आहे. तरीही अनंत भट यांच्या धाडसी कृतीमुळेच संत चोखोबारायांसह त्यांचे संपूर्ण कुटूंब इतिहासाच्या पटलावर अजरामर झाले. नामदेवादी संत मंडळींच्या शिकवणुकीतून अनेक लोक भेदाभेद मोडयला पुढे आले होते . हे संतांच्या कार्याचे यशच म्हणायला हवे.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment