संत चोखोबारायांच्या साहित्यातील मिथके
भारतीय इतिहास हा संघर्षाचा, द्वेताचा इतिहास आहे. प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील या द्वैताचे विभाजन वैदिकी श्रृती विरुद्ध तांत्रिकी श्रृती असे करतात. भारतात वैदिकीचा इतिहास लिखीत स्वरूपात आला तर तांत्रिकीचा इतिहास अलिखीत स्वरूपात लोककला, परंपरा, उत्सव आणि मिथकांच्याद्वारे आला. भारतात ब्राम्हण सोडून इतरांना लिखानाचे अधिकार नसल्यामुळे शुद्रातिशुद्रांनी आपला इतिहास पिढीदर पीढीगत मौखीकरित्या जपला. हा इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पास होत असताना त्याला अनेक चमत्कारांच्या छटा लागल्या किंवा काही वेळेला लावल्याही गेल्या. माणसाने गुढ,अगम्य, चमत्कारीक कथांचा वापर आपल्या अभिव्यक्तीसाठी केला होता. याच अलौकिक गूढ, अवैज्ञानिक, चमत्कारीक कथांना मिथके असे म्हणतात. ही मिथके संत साहित्यात आहेत. संत साहित्यात अनेक चमत्त्कारीक कथा आहेत. या चमत्कारीक कथांचे अर्थात मिथकांचे सर्वहरांच्या, शुद्रातिशुद्रांच्या सभ्यतेवर लाखो उपकार आहेत. कारण या चमत्कारीक कथा अर्थात मिथके निर्माण झाली नसती तर सर्वहरांचा, शुद्रातिशुद्रांचा इतिहास जपलाच गेला नसता. त्यामुळे चमत्कारीक कथा टाकावू नाहीत. साहित्यात, इतिहासात आलेले चमत्कारांचे वर्णन अभ्यास विषय आहे. तो नाकारून चालणार नाही. संपूर्ण संत साहित्य चमत्कारीक कथांनी गच्च भरलेले आहे. या चमत्कारांचा , मिथकांचा उलगडा करून, प्राप्त परिस्थितीचा विचार करून , अन्वयार्थ लावायचा असतो. ते मिथक का निर्माण झाले याचा शोध घ्यायचा असतो. किंवा मिथकातून कुठला म्यासेज पास केला गेला आहे, तो धागा पकडून निष्कर्ष मांडायचे असतात. वारकरी परंपरेत एकेका संताने आपल्या समकालीन किंवा भुतकालीन संताच्या नावे अनेक मिथकीय कथा निर्माण करुन ठेवलेल्या आहेत. त्या कथा वैज्ञानिक कसोट्यांवर किंवा नास्तिकतेच्या कसोट्यांवर पडताळून पहाता येनार नाहीत.किंवा अवैज्ञानिक आहेत म्हणून टाकुन देता येनार नाहीत.तर त्याचा अन्वयार्थ लावावा लागेल.
सध्याला आपल्याला पहायचे आहेत संत चोखोबारायांच्या साहित्यातील मिथके. या मिथकांचा उलगडा करताना, वास्तवाच्या सर्वाधीक जवळचा निष्कर्ष आपल्याला मांडायचा आहे. त्यामुळे चोखोबारायांच्या साहित्यात संत नामदेवांनी वर्णन केलेले एक दोन महत्त्वाची मिथके आहेत. त्यात पहिले मिथक असे की संत चोखोबारायांनी विठ्ठलाला दही पाजल्याचे वर्णन आहे. त्या अभंगाची सुरवात अशी आहे की,
चोखामेळ्याने पाजियेलें दहीं। पडों दिले नाही उणे त्याचे ||१||
तयाचे चरित्र परिसावे सादर | करितो नमस्कार संत जना ||२|| "
या अभंगात संत चोखोबारायांकडे विठ्ठल दही खायला यायचा या प्रकारचे वर्णन आहे.हे मिथक अनेकांनी आजतागायत पिढीदरपिढीगत सांगितले आहे. अनेक संतांनीही वर्णन केले आहे. त्यामुळे या मिथकावर चर्चा होने महत्त्वाचे आहे।
गोष्ट अशी होती की 'संत चोखोबारायांना पंढरपुरातील सनातनी ब्राम्हण वर्ग कोण्या न कोण्या कारणाने मारत होता, सतत त्रास देत होता. सनातनी कर्मठ ब्राम्हणांनी चोखोबारायांना चंद्रभागेच्या पलिकडे हकलून दिले होते. तिथेही सर्व संत चोखोबारायांना भेटायला जायला लागले होते. उत्सव साजरा करायला लागले होते. हे सर्व पुन्हा सनातनी ब्राम्हणांना बघवले नाही. त्यांनी चोखोबारायांवर पुन्हा देव बाटवल्याचा आरोप लावून बैलाला जुंपून ओढण्याची शिक्षा सुनावली. तेव्हा लोकं विचारू लागले की चोखोबाराय तर नदीच्या पलीकडे रहातात. मंदिरात येऊन देव बाटवतील कशे? ब्राम्हणांच्या करस्थनाला आध्यात्मिक भाषेत उत्तर देताना संत नामदेव, संत सोयराबाईंनी प्रचार केला की ब्राम्हण मंदिरात येवू देव नाहीत म्हणून पांडुरंगच संत चोखोबारायांच्या हताने दही खायला येतो. संत सोयराबाई सुद्धा म्हणाल्या आहेत.
खाईले जेविले त्याचा हा उपकार |
मज दुबळीचा भ्रतार मारू पहाशी ||
संत चोखोबारायांचे महत्व वाढवण्यासाठी संत मंडळातील संतांनी या प्रकारे प्रचार केला की जरी विठ्ठल मंदिरात चोखोबाला येवु दिले जात नसेल, परंतू भक्तिभावाचा भुकेला विठ्ठल मात्र स्वतः चोखोबाच्या घरी अस्पृश्याच्या हातचे जेवन जेवतो.देवाला अस्पृश्यांच्या घरी जेवायला पाठवनारे संत एका समतेच्या विश्वाची कल्पना जगासमोर ठेवत होते.देव जातीभेद करत नाही तर तुम्ही जातीभेद का पाळता ? हा या कथेचा अन्वयार्थ.
पुढील काळात झालेल्या अनेक संतांनी या मिथकाचा स्विकार केलेला आहे. संत तुकोबारायांनी सुद्धा 'उंच नीच कांही नेने भगवंत' या अभंगात विठ्ठल चोखामेळ्यासंवे ढोरे ओढी असा उल्लेख केला आहे. पंढरपुरचा पांडुरंग संत चोखोबारायांच्या संगे गुरेढोरे चारायला नेतो. वरील दोनही मिथकांचा संदेश संत या प्रकारे देतात की "ईश्वर भेदाभेद करत नाही, देवाला अस्पृश्यता मान्य नाही " म्हणुन देव चोखोबारायांच्या घरी जावून दही खातो, त्यांचे गुरे ओढतो. वैदिक छावणी, ब्राम्हण मंडळी जेव्हा धर्मग्रंथ लिहून शुद्रातिशूद्रांना हक्क अधिकार नाकारत होती, तेव्हा संतांनी ईश्वर भेदाभेद करत नाही, तो अस्पृश्यता पाळत नाही मग तुम्ही कोण लागून गेले दलाल ? हा प्रश्न उपस्थित केला होता. ब्राम्हणी छावणीच्या भेदाभेदाच्या नियमावलीला उत्तर देण्यासाठी संतीनी जानिवपूर्वक मिथके जन्माला घातली होती. ईवर भेदाभेद मानत नाही, भेदभेद तुम्ही करता ही संतांची मांडणी होती.त्यासाठी त्यांनी देव कामे करतो , शेनाच्या गवर्या लावतो , भक्तांच्या शिव्या खातो , स्त्रीवेशात अस्पृश्य घरी बाळंतपण करायला जातो.याप्रकारची मिथके जन्माला घातली गेलीत.
संत नामदेव यांनी संत चोखोबांच्या स्त्रीच्या बाळंतपणाला पांडुरंग जातो.या पध्दतिचे वर्ण करणारा अभंग लिहीला आहे. संत नामदेव यांनी
"चोखोबाची कांता असे ती गर्भिण|
झाले तीस पूर्ण नव मास ||"
या स्वरूपाची कथा आपल्या अभंगातून व्यक्त केली आहे. हा अभंग अत्यंत विस्ताराने लिहीलेला आहे. या अभंगाचा सारांश असा की
'संत सोयराबाईंच्या, बाळीतपणाचे दिवस निकट आलेले आहेत. सोयराबाई चोखोबारायांना निर्मळा यांना बाळांतपणासाठी आनायला पाठवतात. तेव्हा चोखोबाराय आपली बहिन निर्मळा यांना आणण्यासाठी मेहूणराजाला जातात. तर इकडे चक्क पांडुरंग चोखोबारायांच्या बहिणीचे रूप घेऊन सोयराबाईचे बाळीतपण करतो"
अशी कथा संत नामदेवांनी लिहीली आहे. यात विठ्ठलाने स्त्रीरूप धारण करून केलेल्या बाळंतपणात संत कर्ममेळा जन्माला आले.
या मिथकातून जो संदेश नामेदव महाराज देवु पहातात तो अप्रतिम आहे. स्त्रीचे बाळंतपण विटाळ मानला जातो. ब्राम्हणी संस्कृती बाळतपणाच्या काळात विटाळ पाळते. तर अस्पृश्यता सुध्दा विटाळग्रस्तच ! संत नामदेव महाराज एक अस्पृश्य स्त्रीचें बाळंतपण पांडुरंगाने केले हे सांगून दोनही प्रकारचा विटाळ धुडकवून लावतात. आमचा पांडुरंग कुठलाच विटाळ पाळत नाही. तसा विटाळ कुनीही पाळू नये हा संत नामदेवांचा संदेश आहे, आजही लोक या कथा जशाला तशा घेतात.पण त्यातील महत्त्वाचा संदेश दुर्लक्षीत करतात. स्त्रीबाळंतपण आणि अस्पृश्य स्त्रीची अस्पृश्यता नाकरणारे दोनही विटाळ विठ्ठल धुडकावून लावतो. हे संत नामदेव एक मिथकाच्या द्वारे सांगतात.
संत नामदेवांपासुन पुढील काळातील सर्वच संत या कथांच्या द्वारे बंधुभाव, समता या तत्त्वाचा प्रचार करत होते. भेदाभेद, अस्पृश्यता पाळू नये हे सांगण्यासाठी त्यांनी पांडुरंगाचा आधार घेतला होता.
एका मिथकात तर चंद्रभागेच्या तिरावर गर्दीतून जाताना विठ्ठल म्हनतो की मला शिवु नका .लोक म्हणतात का शिवु नये तर विठ्ठल म्हनतो मला संत चोखोबाचे सुतक आहे.याही प्रकारचे एक मिथक आहे.अस्पृश्य संताच्या मृत्यूचे सुतक पाळणारा विठोबा होता.इतका ग्रेट संदेश हे मिथक देते.
एक कथा तर अशी आहे की , एकदा इंद्र दरबारातील अमृत नासले.इंद्र नासलेल्या अमृताचा कलश घेवुन स्वर्गातील ब्राम्हा , विष्णु आदिंकडे जावुन आला.सडलेले अमृत शुद्ध करुन द्या म्हणून इंद्र सर्वत्र फिरत शिवाकडे गेला.शिव म्हनाले की कलयुगात विठ्ठल सर्वश्रेष्ठ दैवत आहे.तेच तुझ्या समस्येचे निराकरण करतील.इंद्र स्वर्गातून पंढरपुरी विठ्ठलाकडे आला . विठ्ठल म्हनाले चंद्रभागेच्या पलीकडे चोखोबा नावाचा माझा भक्त रहातो तो तुझे अमृत शुद्ध करुन देइल.इंद्र चंद्रभागेच्या पलिकडे चोखोबांच्या झोपडी समोर येवुन उभा राहिला.आवाज दिला.संत चोखोबाराय झोपडी बाहेर आले.त्यांची दृष्टी इंद्राच्या हतातील अमृत कलशावर पडली.आणि चोखोबारायांच्या भक्तीच्या , प्रेमाच्या, समतेच्या एका दृष्टीक्षेपाने कलशातील सडलेले अमृत शुद्ध झाले.स्वर्गाचा राजा इंद्र अस्पृश्य संताच्या पाया पडुन स्वर्गी निघून गेला.
यातील मिथककर्त्याच्या कल्पनेला दंडवत केला पाहिजे.मिथकातून काय संदेश दिला गेला आहे.तर वैदिक धर्मीयांचे , इंद्राच्या संस्कृतीचे तत्वज्ञान सडले आहे.कुजले आहे.ते तत्वज्ञान एका वर्गापुरते बंदिस्त झाले आहे.हे अमृतरुपी ज्ञान सर्वांना न खुले केल्यामुळे त्याचा वास सुटला आहे.परंतू कलयुगात विठ्ठलाच्या संतांनी नवा भक्तिमार्ग खुला करुन , बंदिस्त अमृतरुपी ज्ञान सर्वांना खुले केले.चोखोबासारख्या एका अस्पृश्य संताने अनादी निर्मुळ वेदांचे ते मुळ l परब्रह्म सोज्वळ विटेवरी ll म्हनत इंद्राचे अमृत तात्विक पातळीवर शुद्ध करुन दिले. त्यामुळे अमृत शुद्ध करणारा एक अस्पृश्य संत दाखवणे अत्यंत ग्रेट बाब आहे.त्यातल्या त्यात देवांच्या राजा अस्पृश्य संताच्या दारात उभा करणे हे तर फारच महत्वपूर्ण आहे.
म्हणून या मिथककथा समतेचा संदेश देण्यासाठीच निर्माण झाल्या होत्या. वैदीकांचे, ब्राम्हणांचे कायदेग्रंथ जातीव्यवस्था, अस्पृश्यता पाळयला लावतात तर संतांच्या मिथककथा समतेचा आग्रह धरतात. वारकरी चळवळीतील मिथके १) माणुसकी शिकवणारी २) कार्य हाच ईश्वर सांगणारी ३) आईवडीलच देव हे शिकवणारी ४) मोक्ष पुनर्जन्म नको भक्तीतच राहू दे सांगणारी आणि ५) सर्व काही विठ्ठलच हे सांगणारी आहेत. अशी पाच प्रकारची मिथके संपूर्ण संत साहित्यात जागोजागी सापडतील. ही मिथके, न अभ्यासता दूर लोटणे म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास स्वता पाण्यात बुडवण्यासारखे होईल.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment