Monday, 10 January 2022

श्रद्ध अंधश्रद्धच्या पलीकडील ग्रामीण निरीक्षणे..

श्रद्ध अंधश्रद्धच्या पलीकडील ग्रामीण निरीक्षणे..

                      माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे.हल्ली आपण हे वास्तव विसरत चाललो आहोत.परंतू फार मोठा काळ माणूस हा निसर्गाला कॉपी करत आलेला आहे. माणूस निसर्गातील निरिक्षणांच्याद्वारे आपल्या दैनंदिन जीवनात मार्गक्रमण करत असे,आपलं जीवन सुखकर बनवण्यासाठी माणसाने निसर्गातील अनेक बदलांचा अभ्यास बारकाव्याने केलेला आहे.विज्ञानाचा विकास फारच अलीकडचा आहे.परंतु सगळं काही सायंटिफिक होण्याच्या अगोदर आपण निसर्गातील निरीक्षणांच्या,नोंदींच्या,अनुभवांच्या द्वारेच आपले जीवन व्यतीत करत असू.आजही ग्रामीण भागात संपूर्ण ग्रामीण जीवन निसर्गातील अनेक नोंदींवरून चालतं.

                               ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरीवर्ग पावसाच्या आगमनाचे अंदाज आजूबाजूच्या निरीक्षणावरून लावत असतात.पावसाळा सुरू होणार आहे,तर उर्वरित शेतीची कामे उरकून घेतली पाहिजेत.हे ठरवण्यासाठी जे काही अंदाज होते त्यामध्ये मुंग्या तोंडामध्ये पांढरी अंडी घेऊन जात असतील तर असं समजलं जातं की आता पाऊस होणार आहे,किंवा पावसाळा जवळ आलेला आहे.
त्याचबरोबर सरड्याचे तोंड लाल होणे हेसुद्धा पावसाळा जवळ आल्याचे लक्षण मानले जाते. त्याचबरोबर पंख असलेल्या एक प्रकारच्या उडणार्‍या मुंग्या दिसायला लागल्या की समजावं पावसाळा सुरू होतो आहे.आनखी एक पक्के निरीक्षण म्हणजे शेतामध्ये पावश्या नावाचा एक पक्षी, विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो, सूर लावतो त्यावरूनही शेतकरी अंदाज बांधतात की पावसाळा जवळ आलेला आहे. किंवा उंच फांदीवर घरटे बांधले की पाऊस विरळ होनार आहे आणि दाट फांदीवर खाली घरटे बांधले की पाऊस भरपूर होणार असल्याचे समजले जाते.अशा निरीक्षणांच्या द्वारे शेतकरी वर्गाने आपले बहुतेक जीवन सुखकर केलेले आहे.

                               मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाला एक काळ्या रंगाचा किडा निघतो.सर्वत्र दिसु लागतो.त्याच्या आगमनानेच पाऊसाला सुरुवात होते.म्हणून या किड्याला मिरगा किडा सुद्धा म्हणतात.या किड्याच्या पुजनाने पावसाळा सुरु होतो.विदर्भ मराठवाड्यात आजही या मिरग्या किड्याचे हळदी कुंकू टाकून पुजन केले जाते.

                              शेतकऱ्यांची आत्तापर्यंत शेती करण्याची जी पद्धती आहे,ती नक्षत्रांच्याद्वारे चालत आलेली आहे.नक्षत्र परंपरा ही काही वैदिकांची नव्हे,ती शेतकऱ्यांची आहे.कोणत्या ऋतूत पाऊस पडेल,कोणत्या काळात तो सर्वाधिक असेल, कोणत्या काळात रिमझिम पाऊस होईल,या पावसांच्या सुद्धा कमी अधिक पडण्याच्या नोंदी शेतकऱ्यांनी नक्षत्राद्वारे शोधून ठेवलेल्या आहेत.ग्रामीण भागात या नक्षत्रांना म्हणींमध्ये बंदिस्त केलेले आहे ज्यामुळे तो अनुभव एकापिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करता येइल.आजही ग्रामीण भागात विविध नक्षत्रांच्या विविध म्हणी तुम्हाला बघायला मिळतील.जसे की "पडला हस्त तर धनी मगर मस्त नाहीतर गल्या गस्त " म्हणजे हस्त नक्षत्रात चांगला पाऊस पडला तर धणी म्हणजे मालक मस्तीत राहतो, चांगलं जीवन जगतो. पण पाऊस नाही पडला तर त्याच्यावर वाईट वेळ येते.

                             मघा नक्षत्रात झडीचा म्हणजे मुसळधार पाऊस होतो.हे निरीक्षण 'मघा चुलीपशी हगा नाहीतर वर बघा' या म्हणीत पुर्वजांनी बंदिस्त केले आहे.उत्तरा हे नक्षत्र भाताच्या पिकासाठी चांगले मानले जाते.त्या नक्षत्रात पाऊस पडला तर साळ चांगली येते.म्हणून त्याची नोंद " उत्तरा भात खाईना कुत्तरा नाहीतर मिळेना पित्तरा " या म्हनीत करुन ठेवलेली आहे.

                                   पोळ्यानंतर पावसाळा थांबतो.म्हणून लोक म्हणतात " "पोळा आन पाऊस झाला भोळा".म्हणूनच पोळ्याला बैलांना स्वच्छ धुवुन घेतले जाते कारण शेतीची चिखलातली कामे संपलेली असतात.

                         महापूर सुनामी यांसाठी नैसर्गिक संकटांची चाहूल आगोदर पक्षांना प्राण्यांना लागते.त्यामुळे जपानमधे एक विशिष्ट प्रकारची चिमणी आपल्या गावातून दिसेनाशी झाली की भूकंप येनार असे मानले जाते.नव्हे ते सत्य आहे.या चिमनीला २४ तासांच्या आत भूकंप येणार असल्याचे माहिती पडते हे सिद्ध झाले आहे.

                              याचपद्धतीने व्यापारी लोकं,जगभर प्रवास करणारे प्रवासी,वाळवंटांतून रस्ते शोधत जानारे प्रवासी,समुद्र सफारी करणारे खलाशी हे लोकं रात्रीच्या चंद्र ग्रह  ताऱ्याचे निरीक्षणे करुन रस्ते निश्चित करत असत.
कोल्हापूर,कर्नाटक तथा उस्मानाबाद जिल्हातील तेर यांचा थेट व्यापार युरोपात होत असे.ते एवढ्या दुरचा मार्ग आशाच नैसर्गिक निरिक्षणांच्या,ग्रह तारे पाऊसाचे अंदाज यांद्वारे निश्चित करत असत.

                              भारतीय कालगणना, ऋतू,दिशा, उपदिशा,पंचांग,ग्रहांच्या नोंदी आणि नक्षत्रे हे अब्राम्हणी परंपरेतील आहे.त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मोठ्या वारस्यापासून मुकणे ठरेल.ब्राम्हणी छावणीने त्याला पवित्र अपवितेत बसवल्याने आपण त्याला टाकून देवु नये.शुभ अशुभाच्या कल्पना ब्राम्हणी देन आहे ती बाजुला सारली पाहिजे.

                              नाथ या ब्राम्हणी परंपरेने ग्रहणाचा काळ रसविद्या शिकण्यासाठी उपयोगात आनलेला आहे.विविध औषधी जडीबुटींचा रस करुन गरम पाण्याच्या कुडांच्या जवळ या रसविद्येचे भौतिक प्रयोग हे नाथ,योगी,सिद्ध करत असत.याद्वारे त्यांनी अनेक रोगांवर उपचार पध्दती शोधल्याचे लक्षात येते.

                                म्हणून भारतीय सर्व परंपरा,संस्कृती, सभ्यता तुच्छ टाकावु अगदीच अंधश्रद्ध वगैरे मानुन आंघोळीच्या पाण्याबरोबर बाळही टाकून देण्याचा हा प्रकार आहे.तो चुकीचा आहे.पाश्चात्त्य ते सर्व सायंटिफिक आणि भारतीय ते सर्व अंधश्रद्ध हे शिक्के मारणारे धोरण आम्हाला अमान्य आहे.

नितीन सावंत परभणी
९९७०७४४१४२ 
दि,२१ जून २०२०

No comments:

Post a Comment