Monday, 10 January 2022

♦️संत चोखोबाराय चरित्र ll प्रकरण ५ वे ll गुणदोष मांडणारा डिकास्ट संत

♦️संत चोखोबाराय चरित्र 

ll प्रकरण ५ वे   ll 

गुणदोष मांडणारा डिकास्ट संत 

बहुत प्रकार बहुत या जगाचे। काय वानूं त्याचे गुणदोष ।। 
नीच हे याती अनामिक नांव । तेथे भावाभाव कोण कैचा। 
चाहाड, चोर, जार, भ्रष्ट ते साचे। हीनत्व जन्मांचे पदरी ओह।। 
चोखा म्हणे त्यांचे संगती पहिलो। बहु हे पीडीलो वियोगाने।। 
                       - संत चोखोबाराय 
                       - ( श्रीसंत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र - प्राचार्य डॉ.आप्पासाहेब पुजारी प्रथम आवृत्ती सोमवार ११ जुलै २०११ , अभंग क्रमांक २९५ ) 

                             भारतात तथागत बुध्दाच्या वर्णांताच्या क्रांती नंतर जातीव्यवस्था जन्माला आली. या जातीव्यवस्थेच्या काळातच काही जातींना जाचक नियम लावून अस्पृश्यतेत लोटण्यात आले होते. वर्णव्यवस्थेच्या काळात, बुध्द काळात चांडाळ, शोपज, भंगी जातींचा ऊल्लेख सापडतो, परंतु पुढील काळात जातीव्यवस्था जशजशी जटील होत गेली तस तशा जातींच्या विविध लक्षणांसह भेदरेषा आनखी गडत होत गेल्या. पुढील काळात अस्पृश्य ठरवल्या  गेलेल्या जातींना गावगाड्यातून अलग, वेगळे करण्यात आले.गावाबाहेर स्वतंत्र अश्या अस्पृश्यांच्या वस्त्या बनवल्या गेल्या. या अस्पृश्य वस्त्यांवर कठोर धार्मिक नियमावली लादून देव आणि धर्मशास्त्राचा हवाला देण्यास सुरुवात करण्यात आली. या अस्पृश्य जातींवर धर्मपुरोहीत अत्यंत कठोर जाचक नियम लादून लक्ष ठेवत असत. या अस्पृश्य जातींचे जगण्याचे, वागण्याचे बोलण्याचे खाण्यापिण्याचे कपडे घालण्याचे, अभिव्यक्त होण्याचे, सर्वच  अधिकार श्रौतस्मार्त धर्माकडे होते.आणि ह्या धर्माचे सर्वेसर्वा होते ब्राह्मण.इ.स.च्या १२ व्या शतकापर्यंत अस्पृश्य जातींवर सर्वच प्रकारचे बंधने आनली गेली होती. अस्पृश्य जातीनी अभिव्यक्ति होने , प्रश्न उपस्थित करणे घोर अपराध होता.  मनुस्मृती नावाचा कायदेग्रंथ घेऊनच धर्मपुरोहीत शिक्षा देण्यासाठी फिरत असत.हे सर्व झाले ते कष्टकरी गणांच्या हातून उत्पादनाची साधने आणि त्यावरील मालकी हक्क काढुन घेण्यातून पुढे ते अस्पृश्य बनले.
                                   अशा कर्मठ बनलेल्या जाती,धर्मव्यवस्थेच्या काळात आपली शोषण पिडणाची अभिव्यक्त होण्याची भुमीका घेऊन संत चोखोबाराया नावाचा एक अस्पृश्य जातीतला संत ऊभा राहिला होता.
                                    संत चोखोबारायांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील मेहुनराजा गावी झाला.ते संत नामदेव यांच्या समकालीन होते. संत चोखोबाराय आणि त्यांचे कुटुंब मेहुणराजा गावचे असल्याचे अनेक उल्लेख, संदर्भ त्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबातील सर्वच सदस्यांच्या अभंगात सापडतात. संत चोखोबारायांच्या जन्माच्या तारिख किंवा तिथीचे थेट पुरावे मात्र ऊपलब्ध नाहीत. मात्र अलीकडील काळात मेहुनराजा येथे संत चोखोबारायांचा जन्मोत्सव सुरु केला आहे. दरवर्षी १४ जानेवारी रोजी मेहुणा गावी संत चोखोबारायांचा जन्मोत्सव साजरा होतो. ही तारीख स्विकारली तर चोखोबारायांचे जन्मवर्ष १४ जानेवारी ११९० हे होय. प्रा.देविदास इथापे यांनी ही तारीख शोधली आहे, असे संदर्भ दिले जात आहेत.संत चोखोबारायांचे निर्वाण शके १२६० गुरुवारी वैशाख वद्य पंचमीला झाले. संत सोयराबाई ज्या चोखोबांची पत्नी होत.त्यांनी आपल्या अभंगात मेहुणराजा गावचा उल्लेख केल्याचा पुरावा उपलब्ध आहे. चोखोबारायांनीही मेहुणपुरीचा केलेला ऊल्लेख हे चोखोबारायांच्या जन्मगावची निश्चिती करनारे ठोस पुरावे म्हनता येतील.
                                    संत सोयराबाईंचा अभंग खालीलप्रमाणे आहे. 
                                    
निर्मळेसी करतां स्नान। कोटी प्रयाग समान।।१।। 
तेथे करितां अन्नदान। स्वयं तुष्टे नारायण।।२।। 
तेथे करिता प्रदक्षिणा। कोटी तीर्थे घडली जाना।।३।। 
ऐसी विख्यात मेहुनपुरी। म्हणे चोखीयाची महारी।।४।।

                           यामुळे संत चोखोबारायांचे जन्मस्थान निर्विवादपणे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणराजा हे गाव होय. 
                      प्रस्तुत अभंगात जो सुरुवातीला दिला आहे. या चोखोबारायांनी स्वता:च्या समाजाचे वर्णन केले. "या जगात वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. जगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या जगात नाना तर्हेचे, प्रकारांचे लोक आहेत. त्यांचे आपण काय गुण दोष वर्णन करावेत? मी ज्या जातीत जन्माला आलो तिला हे जग हीन जात म्हणते. अशा हीन,अनामिक जातीत जन्मलेलो आम्ही आहोत.येथे भाव अभाव आणि  कोण कसा आहे हे सांगता येणार नाही. सर्वच प्रकारचे लोक माझ्या समाजात आहेत. चहाडी लावणारे, चोरी करणारे, भ्रष्ट सगळेच आहेत येथे. माझ्या समाजाच्या पदरी सदैव हिनत्वच आहे. या हिवत्व मानल्या गेलेल्यांच्या संगतीत मीही आहे. त्यामुळे माझेही पीडन शोषण होतेच. चालूच आहे."
                       स्वत:च्या समाजाचे गुणदोषांसहीत वर्णन करणे डिकास्ट माणसाचे लक्षण आहे. संत चोखोबाराय हे वर्णन करुन ते स्वता डिकास्ट असल्याचा पुरावा आपल्याला देतात. त्यांना आजुबाजुला जे दिसते ते लपवावेशे वाटत नाही. ते निर्भिडपणे मांडतात.स्वजातीच्याही उणीवा मांडणारा हा निर्भीड संत होता.  
                      संत चोखोबाराय जातीने 'महार' होते. महार ही जात गांवकुसाबाहेरची अस्पृश्य ठरवलेली जात असल्याने प्रचंड यातनामय जगणे या जातीतील लोकांच्या वाट्याला आलेले होते. सरंजामशाहीत महारांच्या वाट्याला जी कामे दिली गेली होती ती अत्यंत निकृष्ट दर्जाची, अमानवीय स्वरुपाची होती.
                     संत चोखोबारायांचे नाव चोखामेळा हे होय. चोखा आणि मैळा या दोन शब्दांपासुन चोखामेळा हे नाव रुढ़ झाले. मैळा म्हणजे घान, केळकचरा, सडके, कुजके, वास सुटलेले टाकावू घटक होत. म्हणून चोखोबांच्या नावामागे लागलेले मेळा (मैला) हे गावकीची साफसफाई करणारा, घान साफ करणारा, परंपरागत व्यक्ति ह्या अर्थाचे आहे. संत चोखोबाराय संत पदाला पोहचले होते. तर त्यांचा नावामागे आजही मेळा का लावले जाते? गावगाढ्यात ही मैला उचलण्याची कामे अस्पृश्य मानल्या गेलेल्या महार ह्या जातीच्या वाट्याला दिलेली असत. गाव साफ करणे, नाल्या, गटारे साफ करणे, मेलेली जनावरे ओढून नेने, बांधकाम करणे, विहिरी खोदने, रात्रभर गावाबाहेर पाळत ठेवणे, वेसकरकी करणे, मृतांचा सांगावा पाई पळत जाऊन नातेवाईकांच्या गावी सांगणे, लाकडे फोडुन देने, ओझी उचलणे, ह्यांसारखी अनेक हिनत्वदर्शक कामे अस्पृश्यांमध्ये महार ह्या जातीच्या वाट्याला होती. या श्रमाचा मोबदला काय? तर उरलेले शिळेपाके, सडलेले, नासलेले, विटलेले बुरा आलेले अन्न किंवा खराब झालेली किडा लागलेली ज्वारी , बाजरी. 
                      चोखोबारायांच्या नावातील मेळा (मैला) याबद्दल आपण विचार केला. आता चोखोबांच्या नावातील चोखा हा शब्द पाहुया. चोखा म्हणजे स्वच्छ, निर्मळ अर्थात चोख होय. चोखोबा म्हणजे चोख कृती करणारा , अंतकरणातून निर्मळ वागणारा मनुष्य होय. चोखोबारायांचे चोखोबा हे नाव घरच्यांनीच ठेवले होते. या नावाबद्दल एक खोटी कथा सांगितली जाते तिला कुठलाही आधार नाही.बनवाट ब्राम्हणी कथा आहे ती. मैला उचलणारा अस्पृश्य व्यक्ति संत नामदेवांच्यामुळे चोखा (निर्मळ) झाला.
अर्थात जातीव्यवस्थेने संत म्हणून नावलौकीकला पोहलेल्या चोखोबाला पावलोपावली त्रासच दिला. 
                      संत चोखोबारायांच्या जन्माबद्दल काही चमत्कारीक मिथक कथा आहेत.त्या जशाला तशा स्विकारता येत नाहीत. चोखोबारायांच्या जन्माबद्दल एक मिथक कथा अशी आहे की चोखोबारायांचे आई-वडील गावच्या पाटलाने दिलेले आंबे घेऊन पंढरपुरला निघाले होते. हे आंबे विठ्ठलाला अर्पण करण्यासाठी दिले होते. रस्त्यात एक भूकेला ब्राह्मण भेटला तर चोखोबारायांची आई सावित्रीबाईंनी डोक्यावरील टोपल्यातील एक आंबा ब्राम्हणाला दिला. ब्राम्हणाने तो आंबा चोखला आणि आंबट आहे म्हणून त्याने तो परत दिला. सावित्रीबाईंनी तो आंबा पदरात टाकला.सुदामा आणि सावित्री हे जोडपे पंढरपुरात बडव्यांकडे आले, त्यांनी आंबे आणि चिठ्ठी बडव्यांना  दिली. बडव्यांनी आंबे मोजुन पाहिले,एक आंबा कमी भरला. त्याने सुदामा आणि सावित्रीबाईला विचारले सावित्रीबाईंनी हकीकत सांगीतली आणि पदरातील आर्धा चोखलेला आंबा दाखवण्यासाठी पदरात हात घातला तर पदरात आंबा न निघता मुल निघाले. ब्राम्हणाने चोखून दिलेल्या आंब्यापासून झाला म्हणून त्या मुलाचे नाव "चोखा" असे ठेवण्यात आले. 
                ही कथा ब्राह्मण महात्म्य वाढवणारी आहे. शिवाय पदरातुन आंब्यापासून मुल होत नसते. त्यामुळे चोखोबारायांचा जन्म चमत्कारीकरीत्या झालेला नसुन सुदामा आणि सावित्रीबाईंच्या पोटी झालेला आहे. हेच त्यांचे आईवडील आहेत.पदरातील एका छोट्या आंब्यापासून एक मुल तयार होईपर्यंत त्याचे वाढले वजन सावित्रीबाईंच्या लक्षात आले नसेल का ? बडव्यांना समोर चोखुन दिलेला पदरातील आंबा काढुन देताना आचनक आंब्याच्या ऐवजी बाळ हताला लागावे हे न पटनारे अवास्तव वर्णन आहे. शिवाय आपला जन्म 'ब्राह्मणाने चोखून दिलेल्या आंब्यापासून' झाल्याचे चोखोबारायांनी कधीही म्हटलेले नाही. समकालीन इतर संतानीही असे म्हटलेले नाही. एखादी व्यक्ती मोठी झाली, महान झाली की त्या व्यक्तीच्या जीवनचरीत्रात कोण्यान कोण्या रुपाने ब्राह्मण घुसवलाच जातो. ही पुर्वापार चालत आलेली ब्राह्मणी पध्दती आहे. यातून ब्राम्हणांच्या उष्ट्या पासुनही ईश्वर भक्ती करणारे जन्माला येतात असा ब्राम्हण माहात्म्य वाढवणारा ब्राम्हणी डाव आसतो. 
                         संत चोखोबारायांच्या कुटुंबात त्यांची बायको संत सोयराबाई, त्यांचा मुलगा कर्ममेळा, त्यांचा मेव्हणा संत बंका त्यांची बहिण संत निर्मळा शिवाय बंका आणि निर्मळा यांच्या हरि या मुलाचाही ऊल्लेख सापडतो. हे सर्वच्या सर्व कवित्व करीत असत.यांनीही कधीही संत चोखोबाराय आंब्यापासून झाल्याचे म्हटलेले नाही.
                             संत चोखोबारायांच्या अभंगांच्या एकुण रचणांमध्ये सांसरीक शब्द, घरातील वस्तु वगैरे येत नाहीत. त्यामुळे त्यांचे घर कसे होते,याचा फक्त अंदाज बांधावा लागतो. 
                             म्हणून संत चोखोबारायांचा जन्मगाव मेहुणराजा जिल्हा बुलढाणा, त्यांचे आईवडील सुदामा आणि सावित्री. बायको सोयराबाई , मुलगा कर्ममेळा तर बहिण निर्मळा आणि मेव्हणा बंका होत.एवढे ठोस पुराव्यांच्या आधारे आपल्या हाती लागते.एका गुणवान अस्पृश्य कुटुंबाची एवढी नोंदही इतिहासाने ठेवणे मोठेपणाचे आहे. 


                               चोखोबारायांची कर्मकहानी सुरु होते ती मेहुणराजातुन पुढे त्यांचे वास्तव्य असते पंढरपुरात आणि शेवट होतो मंगळवेढ्यात. मध्ययुगीन भारतात एव्हढ्या कठोर अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेच्या काळात संत चोखोबारायांसारखे संत आपल्या स्व अस्तित्वाचा, उच्चतम अभिव्यक्तिचा ठसा समाजमनावर उमटवून गेले हे अत्यंत प्रेरणादायी आहे. गुलामीत जगणार्या आणि गुलामगिरीत खितपत पडलेल्या अस्पृश्यांचे नेतृत्व चोखोबाराय आहेत. गुलामांच्या व्यथा जागतिक पटलावर मांडणारे नेते चोखोबाराय होत. जगभरात एव्हढा जुना गुलामगिरीची मांडणी करणारा डोळस नेता क्वचित ठिकाणी सापडेल. भारतात मात्र साडेसातशे वर्षांपुर्वी धार्मिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात गुलाम समाजाचे नेतृत्व करायला चोखोबाराय पुढे आले होते. 'बाप से बेटा सवाई' या उक्तीप्रमाणे 'विद्रोही' नेतृत्व म्हणून कर्ममेळाही आपल्या वडीलांचा वारसा चालवत होते. संत नामदेवांच्या परीस स्पर्शाने संत चोखोबारायांच्या कुटुंबाचे सोने झाले होते. आज संपुर्ण कुटुंब जागतीक पटलावर अजरामर झाले आहे. जगभरातील संशोधक संत चोखोबारायांच्या रचना संदर्भ म्हणून वापरतात. मध्ययुगीन भारतातील अस्पृश्यांची स्थिती, जगणे, वागणे, व्यवहार, लोकजीवन समजून घेण्यासाठी संत चोखोबाराय प्रमुख आहेत. भारतीय जातीव्यवस्था, अस्पृश्यता, गैरबराबरी, विषमता अभ्यासताना संत चोखोबारायांना वगळून ते शक्य होणार नाही. सर्वात मोठे पुरावे, मोठे संचीत संत चोखोबारायांनी देऊन ठेवले आहे.


नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment