♦️संत चोखोबारायांचे चरित्र
प्रकरण ८ वे
ll धन्य धन्य नामदेव... ll
धन्य धन्य नामदेव । माझा निरसला भेव ।।१।।
विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी । खुण सांगितली निर्धारी ।।२।।
ठेवोनी माथां हात । दिले माझें मज हित ।।३।।
दावियेले तारू। चोख्या म्हणे माझा गुरु।।४।।
- संत चोखोबाराय
संत चोखोबारायांच्या नवीन उपलब्धीसह एकुन ३५८ अभंगापैकी एकुन ३२ अभंगात संत चोखोबारायांनी संत नामदेव यांचे गुणगान केले आहे. नामदेवांचा सर्वांत मोठा प्रभाव संत चोखोबारांवर होता.नामदेवांचा सहवास चोखोबारायांचा उद्धार करणारा ठरल्याने चोखोबाराय वारंवार नामदेवांचे ऋण व्यक्त करतात. त्यांनी हे केलेले नामदेवाचे गुणगान धन्यवाद व्यक्त करणारे आहे.नामदेवांच्यामुळेच संत चोखोबारायांना माणुसपणाचा दर्जा मिळाला होता. नव्याने जगण्याची प्रेरणा संत नामदेवानी चोखोबारायांना दिली होती.
संत चोखोबारायांच्या जिवनाचे शिल्पकारच संत नामदेव होते. संत नामदेवाचे मोठेपण सांगताना अनेक उदाहरणे देत चोखोबा व्यक्त होतात. नामदेवाचे वर्णन करताना चोखोबाराय उत्साही आनंदी असल्याचे दिसते. ते म्हणतात ''संध्याकाळी बाजार बंद व्हायच्या वेळेला गिर्हाईक निघुन जाते हा नवलाचा प्रसंग मला नामदेवांच्या शिकवणीतून बघायला मिळाला आहे. " म्हणजे काय तर आयुष्याच्या मावळतीला तुमच्या ऊभ्या केलेल्या वैभवाच्या बाजाराला तुम्हाला कोणीही विचारत नाही. सर्वजन सोडुन जातात.
आपले सुख आपणच भोगावे, वेडगळांना ह्या सुखाच्या गोष्टी सांगून काय फायदा. ज्यांच्या मनात भाव नाही त्यांना अख्खे जग ओस पडलेले असते. हे सर्व ज्ञान मला सुजान नामदेवांच्यामुळे झाले आहे."
"सर्वत्र संचार करणारे मन, एकत्र आणि एकचित्त कसे ठेवायचे हे संत नामदेवानी शिकवीले आहे.आणि आज ते फळा आले आहे." असे संत चोखोबाराय विविध अभंगात आपले मत व्यक्त करताना दिसतात.पुढे ते म्हणतात " मला सुख जर कोणी दाखविले असेल तर तर ते संत नामदेवांनी,त्यांच्याकृपेमुळे मी पावन झालो आहे. मला तर नवल वाटत आहे की ह्रदयातच त्यांनी देव दाखवीला. नामदेवांच्यामुळेच मला जगण्याचे बळ मिळाले आहे. हे नामदेवा तुम्ही मला हा सुखाचा आनंद सोहळा दाखवीलात. तुमच्या प्रेमाच्या या वर्षावाने मी पुरता गुदमरलो आहे. मला तोंडातून शब्द फुटत नाहीत. हे गुरुवर्या नामदेवा आपण धन्य आहात माझ्या जिवनातला अंधकारच तुमच्यामुळे दुर झाला आहे."
एका अस्पृश्य व्यक्तीला त्यांच्या कुटुंबियांच्यासह आपल्या संत मंडळात दाखल करुन घेने , सर्वांच्या बरोबरीला बसवने , तसी बरोबरीची वागणूक देने हे खरच मोठपणाचे आणि क्रांतिकारी काम संत नामदेवांनी केले होते. वैदिक ब्राम्हणवाद्यांच्या दबावाला , विरोधाला आणि छळाला न जुमानता संत नामदेवांचे समतावादी संत मंडळ संत चोखोबारायांच्या घरी सहभोजन करत होते.ह्या सर्व गोस्टी बघुन संत चोखोबाराय भारावून गेले होते. म्हणून संत नामदेवांचे एवढे गुणगान करताना चोखोबाराय सर्वोच्च उपाधी वापरतात ती आईची.
"चोखा म्हणे तुम्ही माय हो माऊली।
कृपेची सावली नामदेव।।
आई पेक्षा मोठी उपाधी काय असु शकेल.संत चोखोबारायांना संत नामदेव आई प्रमाणे वाटतात.इतका जीव संत चोखोबारायांचा संत नामदेवांवर होता.
संत नामदेवांनी उपकार केल्याची भावना चोखोबांची आहे ते म्हणतात
" नामदेवें आजी उपकार केला ।
हाटाचा हाट चौबारा ठेला ।।
संत नामदेवांच्यामुळे संत चोखोबारायांना संत मंडळात जागा मिळाली. सर्व संत चोखोबारायांना आदराने वागवायला लागले. संत मंडळात जातिभेद अस्पृश्यतेला थाराच नसल्यामुळे सर्व संत चोखोबारायांच्या झोपडीसमोर एकत्र जेवायला बसत असत.अख्खे जग ज्याला दुर हो म्हणत आहे, ज्याचा विटाळ मानला जातो, ज्याचा तिरस्कार केला जातो आशा व्यक्तीला संत नामदेवांच्या अनुग्रहामुळे एक नवे जीवन मिळले. नामदेवांच्यामुळे सर्व संत चोखोबारायांना सामावून होत असतील तर संत मंडळातील नामदेवांचे मुख्य नेतृत्व आधोरेखीत होते.
या गोष्टीचा आनंद हर्ष चोखोबारायांना होने नैसर्गिकच आहे.हे नवल, हा आनंद कुणाला सांगावे असे चोखोबारायांना झाले आहे. नामदेवांचे पाय जन्मोजन्मी धरून ठेवावे असे त्यांना वाटते. नामदेवांची भेट होने चोखोबारायांना सोन्याचा दिवस वाटतो. या भल्या नामदेवाने मला व्यापक अनुभव दिला असे चोखोबांचे म्हणने आहे ऐके ठिकाणी त्यांनी 'सुजान' ही उपाधी वापरली आहे.खरच मध्ययुगीन भारतात नामदेवच सुजान होते.ऐवढे आर्त, गोड, भरभरून, व्यापक नामदेवांचे वर्णन केल्यानंतर संत चोखोबाराय म्हणतात
'म्हणोनी नामयाचे धरियेले पाय ।
आठविता होय समाधान ।।
'चोखा म्हणे माझा नामदेव प्राण ।
घालीन लोटांगण जीवें भावे ।।
संत नामदेवांना आपल्या प्राणापेक्षाही चोखोबाराय मोठे मानतात. त्यांना जीवेभावे लोटांगण घालीन असे चोखोबा म्हणतात.
संत नामदेवांच्याबद्दल प्रगट केलेल्या या आदरभावात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो चोखोबारायांच्या गुरुचा. संत चोखोबारायांनी तिन अभंगात माझे गुरू नामदेवच असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे संत चोखोबारायांचे गुरू 'संत नामदेव होते.
'न करी न करी आनिक साधन।
नामयाने खुण सांगितली ।।
संसार सागर भरला दुस्तर ।
तारक निर्धार विठ्ठल हा मंत्राचा ll
मंत्र त्रिअक्षरी सोपा ।
तुटताती खेपा जन्म मरण ll
चोखा म्हणे माझा धन्य गुरुराव ।
दाखवीला देव ह्रदयी माझ्या ।।
संत चोखोबारायांच्या हिनदिन जीवनात ज्ञानाचा, समतेचा प्रकाश घेऊन जाणारे नामदेव होत.
नामदेवांच्यामुळे संत चोखोबाराय आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला अभिव्यक्त होता आले. एवढे महान काम करणारे नामदेव मात्र उच्चजातवर्गीयांनी उपेक्षितच ठेवलेले आहेत.नामदेवांचे महत्व कमी करण्यासाठी त्यांना उपेक्षेच्या खाईत लोटले. तरीही त्या काळात आपल्या जीवनात ज्ञान प्रकाश उधळणारा नामदेव संत चोखोबारायांनी चित्रीत करून ठेवला आहे. संत चोखोबारायांच्या साहित्तिक विश्वास संत नामदेव जीवंत आहेत. संत नामदेवही संत चोखोबांना जिवाभावाचा मानत असत.संत चोखोबारायांच्या मृत्युनंतर त्यांच्या आस्थी मंगळवेढ्यातील वेशीच्या ढिगार्यातून काढून पंढरपुरात विठ्ठलाच्या पायरीसमोर अजरामर होणारी चोखोबांची समाधी बांधणारे संत नामदेवच होते. संत चोखोबारायांना सर्व वारकर्यांच्या नजरेसमोर सदैव ठेवण्याचे महत्वाचे काम नामदेवांचेच. संत नामदेवांच्यामुळे वारकऱ्यांचा गणपती चोखोबाराय बनले.संत चोखोबारायांच्या समाधीच्या दर्शनाशिवाय मुख्य विठोबाचे दर्शन होत नाही.याचे श्रेय संत नामदेवांना जाते.संत चोखोबारायांचा सर्वात मोठा सन्मान संत नामदेवांनीच केला.
संत नामदेव चोखोबारायांबद्दल म्हणतात.
"चोखा माझा जी चोखा माझा भाव ।
कुळधर्म देव चोखा माझा ।।
काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती ।
मी हि आलों व्यक्ती तयासाठी ।
माझिया चोखियाचे करिती जे ध्यान ।
तया कधी विघ्न घडो नेदी ।।
नामदेवें आस्थि आणिल्या पारखोनी ।
घेत चक्रपाणी पितांबरी ।।
आशाप्रकारे संत चोखोबारायांचे उद्धारकर्ते , मार्गदर्शक आणि गुरु संत नामदेव होत.
नितीन सावंत परभणी
9970744142
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
No comments:
Post a Comment