तांत्रिकी : आंधारातील एक विश्व
---- नितीन सावंत परभणी
9970744142
तंत्र आधी की ज्ञान आधी ? म्हणजे टेक्निक आधी की नॉलेज आधी ?
या प्रश्नाचे उत्तर तंत्र आधी आसे आहे. आधी टेक्निक मग नॉलेज. म्हणून तंत्रज्ञान हाच शब्द योग्य आहे. तंत्राचेच पुढे ज्ञानात रुपांतरण होते. म्हणजे अगदी सोपे सांगायचे झाले तर आदिमानवाने अन्न मिळविण्यासाठी आधी तंत्र (technique) निर्माण केले आणि मग त्याने ते तंत्र इतरांना सांगत पिढीदरपिढी तंत्र विकसित केले पुढे त्याचे ज्ञानात रूपांतरन केले.
*तंत्र शब्दाचा अर्थ शेती असा होतो* '१
म्हणजे आधी शेतीचे तंत्र अवगत झाले. आणि पुढे त्याचे ज्ञानात रूपांतरण झाले. वेदांना ज्ञान म्हटले जाते. हे ज्ञान संकलीत आहे. आणि हे ज्ञान (विशेष) 'तांत्रिकी'तुन उसने घेतलेले आहे .
आज आपल्याला माहिती आहे ती फक्त वैदिकी श्रृती. मार्क्सच्या द्वंद्वात्मक भौतिकवादी सिद्धांतानुसार जर एक वैदीकी श्रृती आस्तित्वात आहे तर तिचे विरोधी द्वंद्व बाळगणारी दुसरी श्रृती कुठेय ? आणि ती कोणती ??
या संदर्भात प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील म्हणतात "आद्य धर्मसुत्रकारांपैकी एक हरीत हा, आगोदर दाखवल्याप्रमाणे मातृवंशक होता. त्याच्या वैरी ब्राम्हण धर्मशास्त्र्यांनी त्याला पुढीलप्रमाणे उध्द्वत केले आहे . *श्रृतिशच् द्विविधा, वैदिकी तांत्रिकी च् *
म्हणजेच श्रृती एक नाहीतर दोन आहेत. एक वैदिकी व दुसरी तांत्रिकी. तांत्रिकी म्हणजे स्त्रीसत्तावादी. चातुर्वर्ण्य पितृसत्ताक वैदिकीने हिंसक विजय मिळवल्यानंतर तांत्रिकीला बदनाम व विकृत केले. स्त्रीसत्ता व तांत्रिकी श्रृती नेणीवेत फेकल्या गेल्या आणि वैदिकी श्रृतीच इतिहासाची जाणीव बनली* '२
या तांत्रिकी श्रृतीचा जन्म वैराज स्त्रीराज्यातून झाला. आणि या वैराज स्त्रीराज्याची गणराणी होती निर्ऋती. ही निर्ऋती हाती धान्य घेवून केस मोकळे सोडुन चौपटावर नाचत धान्यपेरणी करत असे. पुढे पुरुषसत्ताक व्यवस्था आल्यावर मांत्रीकाने मात्र आपला वेष स्त्रीवादीच ठेवला .
*तांत्रिकी श्रृती तंत्रावर म्हनजे प्रयोगांवर आधारलेली होती. पुढे वैदिकांनी निऋतीला क्रूरे घोरे असे संबोधुन करून व्यक्तीगत दुष्ट नेनीवेत ढकलले*.'३
हा तांत्रिकीचा अख्खा तंत्रयाणी लोकप्रवाह पुढे वैदिकांनी सामुहिक दुष्ट नेणीवेत ढकलला. या बाबतीत पंच 'म' कारच्या संदर्भात लोकांमध्ये ब्राम्हणी प्रचार करुन तंत्रयाणी बदनाम केले गेले. परंतू पंच म कार हे ब्राम्हणी आहेत. ग्रहस्ती शाक्त , शैव , तंत्रयाणी कशाला पंच म कार करत असतील .
या तांत्रिकी श्रृतीचे आनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत. नवरात्रोत्सव हा निर्ऋतीपुत्री दुर्गेचा उत्सव आहे. तो शाक्त परंपरेतील अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. त्या परंपरेचे काही अवशेष खेड्यात बघायला मिळतात. खेड्यात जी घटस्थापना केली जाते तो सण हा प्रयोगावर आधारलेला कृषीसण आहे. म्हणजे कमी पाण्यावर, कमी उजेडात कोणते पिक यावर्षी चांगले येइल. हे या प्रयोगाद्वारे तपासले जाते. म्हणजे यावर्षी कोणत्या पिकासाठी वातावरण अनुकूल आहे हे घटस्थापना करुन नऊ दिवस तपासले जाते. या तांत्रीक प्रयोगात आंधार्या खोलीत कडधान्ये मिसळलेल्या मातीवर पाण्याने भरलेले गाडगे ठेवले जाते. गाडग्यातून पाणी पाझरुन नऊ दिवस त्या कडधान्याची रुजने, कोंब निघने, किंवा थोडी वाढही होते. शेवटच्या दिवशी जे धान्य उंच वाढले ते उपटुन काहीगावांत फेट्यात, टोप्यांत खोवून गावभर मिरवले जाते. म्हणजे दहावा दिवस अर्थात दसऱ्याला गावची पंच मंडळी ठरवते की यावर्षी सर्वाधिक फेट्यात कोणते धान्य जास्त दिसले, ते धान्य सर्वांनी पेरायचे. किंवा इतर काही धान्यांसाठी सुद्धा यावर्षी चांगले वातावरण आहे हा प्रयोगांती निष्कर्ष लावला जातो.
अशापध्द्तीने जीवनवादी गरजांना महत्व देनारा तांत्रिकी श्रृतीचा मोठा भौतिकवादी प्रवाह या देशात अस्तित्वात होता.या तांत्रिकी श्रृतीला जरी नेणीवेत ढकलेले असले तरी तिने प्रसवलेले सर्वच्या सर्व लोककलावंत आजही भौतीकवादी म्हणजे इहलोकीचेच भले करुन घेनारी गीते प्रार्थना,भारुडे, कवणें,अभंग,दोहे, गातात.पारलौकिक,आध्यात्मिक अर्थात मृत्यूनंतरच्या जीवनावर तंत्रयानी प्रवाहात फारसे काही सापडणार नाही.शेती चांगली पिकू दे,खरुज जावू दे,मुल होऊ दे,यंदा पाऊस पडु दे,अशा हिशोबाचे त्यांचे गिते कवने असतात.आदिवासी समुदायात अशा प्रार्थाना आजही गायल्या जातात.मोक्ष मिळू दे,स्वर्ग मिळु दे हे लालची लोकांचे वैदिकीचे तत्वज्ञान.भाकरीच्या तंत्रयाणी तत्वज्ञानात त्याला जागा नाही.
म्हणजे काय तर तांत्रिकी श्रृती ही भौतिकवादी तत्वज्ञानाचा भारतीय नामनिधानातला भाग.आणि वैदिकी श्रृती ही आध्यात्मवादी तत्वज्ञान.तंत्र करुन आपले जीवन सुखकर बनवनारे प्रयोगशील म्हणजे तंत्रयाणी.
हा तंत्रिकीचा प्रवाह सिंधू नदीच्या खोऱ्यातील निर्ऋतिच्या भातशेतापासून सुरु होतो.तिथे तिने अन्यधान्याचे समान वाटप करुन समता,स्वातंत्र्य आणि मित्रता जन्माला घातली. हा प्रवाह पुढे मराठवाड्यातील तेरणा-मांजरेच्या किनाऱ्यावर तुळजाई पर्यंत चालत होता.येथेही *ही जुळजा आपल्या प्रजेला 'परडीने' धान्याचे समसमान वाटप करत असे. पुढे तिने आपल्या गणभुमीचीही आपल्या चार ज्ञांतीमधे ( लेकींमधे ) समान वाटणी केली .तुळजा म्हणजेच तुला अर्थात तुळा करनारी समान वाटप करणारी होय.महाराष्ट्रातीच ९६ कुळांची ती कुळस्वामिनी आहे. नंतर कुळांचे कुळामध्ये भ्रष्टीकरण झाले.ह्या शेतीची समान वाटणी ती चौपटावर करत असे*'४
म्हणजेच तांत्रिकीचा हा भौतिकवादी प्रवाह भारतभर कार्यरत होता.मध्य *आशियातील बलुचिस्तान प्रदेशातील मकराण या ठिकाणावरल्या हिंगलाज मातेपासुन*'५ ते नेपाळ पर्यंत आणि जम्मुकाश्मीर पासुन ते कन्याकुमारी पर्यंत हा भारतीय परिप्रेक्षातला तांत्रिकीचा प्रवाह कार्यरत होता.आनेक मंदिरांच्या समोर आसनारे कल्लोळ,बारवा,कुंड हे स्त्रीसत्तेची प्रतिके आणि पुरावे आहेत ज्यामध्ये पुरुषांना आंघोळ घालून गणसभासद बनवले जाई.याला अभिक्तसिंचन विधी म्हनत.पुढे या तिर्थकुंडांना पुण्य कमावण्याच्या सुष्ट नेनीवेत ढकलून मिथकबंद करण्याचे काम ब्राम्हणी व्यवस्थेने केले.
या भौतिकवादी तांत्रिकी तत्वज्ञानाचा सर्वात भरभराटीचा काळ हा ६४ योगीनींचा काळ होता.ज्या काळात चौसष्ट योगीनी आपले स्वतंत्र तत्वज्ञान स्थापून भारतीय संस्कृतीला सुबत्तेच्या,सुपीकतेच्या आधिक उंचीवर नेत होत्या. मानवी मनाचे द्वैती तत्वज्ञान त्यांनीच मांडले.पुढे अनेक बौध्द पंडित आणि आनेक आचार्यांनी या चौसष्ट योगीनींशी चर्चा करुन बौद्धतत्वज्ञान कालपरत्वे अपडेट केले.सौदामिनीशी चर्चा करुन बौद्धमहापंडीत आचार्य दिग्नाग यांनी जानीव नेनीवेचा अभ्यास करुन स्वलक्षणवादाचा सिद्धांत मांडला.त्याआधी त्यांचे गुरु *चौथ्या शतकातील वसुबंधुनी त्याच्या अभिधम्मकोषात मेंदुची द्वैती रचना चित्त संप्रयुक्त (जाणीव ) व चित्त विप्रयुक्त (नेणीव) या संज्ञेखाली मांडली होती* '६
या तांत्रिकी श्रृतीचे मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठे शक्तीपीठ हे श्रीशैलमला येथे होते.तिथे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जावून आलेले आहेत.
पुढे या तांत्रिकीच्या प्रवाहातच शाक्त आणि शैव हे दोन प्रवाह बनले.गणमातांचे उपासक ते शाक्त आणि शिवाचे उपासक ते शैव बनले.
*शेतीच्या सुफलीकरणासाठी केले गेलेले विधी म्हणजे यातूविधी.हे विधी स्त्रीयांनी करायचे असतात.कारण प्राथमिक पातळीवरील शेतीचा शोध स्त्रीयांनी लावला.तंत्र या शब्दाचा अर्थ शेती हा होतो हे कॉ शरद पाटील यांनी सिद्ध केलेले आहे. तंत्रसाधना ह्या स्त्रीप्रधान आहेत.म्हणून त्यांना वामाचारी म्हटले आहे.या साधनेने शक्ती या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.... शक्तीला माननारा तो शाक्त सांप्रदाय तंत्रमार्गाची देणगी आहे* '७
या शाक्त परंपरेत योनीपुजा होइ.योनीपुजेच्या मुर्ती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सापडलेल्या आहेत. महाराष्ट्रातील याचे उदाहरण म्हणजे लज्जागौरी.ही लज्जागौरी नांदेड जिल्ह्यातील कंदाहार तालुक्यातील भाई केशवराव धोंडगे यांच्या गावी बहाद्दरपुऱ्यातही पहायला मिळेल.स्त्रीयोनी ही सुपिकतेचे प्रतिक मानले जायचे. ही तुलना पृथ्वी आणि आकाशाशी केली जाई.म्हणजे ज्याप्रमाणे आकाशातून जमीनीवर पाऊस पडतो त्यामुळे पिके येतात. जमीनीवर आकाशाचे विर्य पडते.आणि सुपीक जमीनीतुन पिके येतात सुबत्ता येते.अगदी त्याच प्रमाणे स्त्रीयोनी ही सुपीक मानली जाई.
पुढे जेव्हा मानवाला पाहिल्यांदा हे कळले की स्त्रीला संतती व्हायला आपन पुरुष काऱणीभुत असतो. आपल्यामुळेच हिला अपत्य होते,तेव्हा पुरुषप्रधानता यायला सुरुवात झाली.आणि यातूनच लिंगपुजा सुरु झाली. वायुपुराणात अशीच शिवाच्या लिंगाची कथा येते.शिवाच्या लिंगाचा शोध घेण्यासाठी त्याचे टोक गाठण्यासाठी ब्रम्हा आकाशाच्या दिशेने जातो आणि विष्णु पाताळाच्या दिशेने जातो. शेवटी दोघेही थकून परत येतात पन शिवलिंगाचा अंत लागत नाही.म्हणून आज मंदिरात जी शिवपिंडी दिसते तिचा खालचा भाग हा स्त्रीयोनीचे प्रतिक आहे तर वरचा भाग हा पुरुष योनीचे प्रतिक आहे. हा शैव शाक्तांच्या एकत्रीकरणाचा युतीचा काळ म्हटला पहिजे.असेच आनेक शिल्पामध्ये आपल्याला शिवाच्या मांडीवर पार्वती बसलेली दिसते.अशी शिल्पे आंबेजोगाई येथे सुद्धा आहेत.म्हणजे हे शाक्त शैव पुढे एकत्र येवून वैष्णवांच्या विरोधात लढले.
थोडक्यात काय तर ह्या तांत्रिकीच्या प्रवाहातील शैव शाक्त हे दोन प्रवाह सुद्धा भौतिकवादी गोष्टींनाच महत्व देत होते.या प्रवाहात सुरुवातील कुठलेही आध्यात्म आणि आध्यात्मिकता नव्हती.
हा तंत्रमार्ग किती महत्वाचा होता हे डॉ आशोक राणा यांंच्या खालील विधानांवरुन लक्षात येइल. ते म्हंतात *तंत्रमार्गाने स्त्रीयांना धर्मकार्यात महत्वाचे स्थान दिले,असच वर्णव्यवस्थेत खालच स्थान मिळेल्या शुद्र तसेच अतिशुद्रांनाही दिलं म्हणून सामाजिक समतेचा संदेश देनारा हा भारतातील प्राचीन सांप्रदाय आहे असं म्हणावं लागत*'८
अशा पद्धतीने हा तंत्रयाणी प्रवाह छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापर्यंत कार्यरत होता.अगदी तुकोबाराय यांची शिष्या बहिणाबाई पाठक शिऊरकर ह्या शाक्त असल्यामुळे संस्कृत शिकु शकल्या.
आज मात्र हा तंत्रयाणी तांत्रिकी श्रृतीचा लोकप्रवाह समुहगत दुष्ट नेनीवेत फेकलेला दिसून येतो.या प्रवाहाचे आज अवशेष आहेत ते लोककलांच्यामधे आणि बोलीमधे.गोंधळी,भारुडकार,सोंगाडे,शाहिर कीर्तनकार, वासुदेव,पिंगळा,यांनी आपल्या कलेतुन तांत्रिकीचा इतिहास पिढीदरपीढीगत जपला आहे.लोककलावंत त्यांचे पोशाख आणि त्यांनी जपलेल्या मौल्यवान कलांचा ठेवा आपन अभ्यासाला पाहिजे.त्या कलांचे जतन संवर्धन झाले पाहिजे. भारतीय वैदिकांच्या वैदिकी श्रृतीला चारी मुंड्या चित करुन जातवर्गस्त्रीदास्यांताचे तत्वज्ञान ही तांत्रिकी श्रृती देते. तिचे हे समतावादी तत्वज्ञानच भारतात समता बंधुता आणि मित्रता आनेल.
-------------------------------------------------------------
संदर्भसूची:
१.कॉ शरद पाटील, जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती.पान क्र .१७ आवृत्ती नोव्हेंबर २००३
२.कॉ शरद पाटील, प्रिमीटीव्ह कम्युनिझम मातृसत्ता - स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद... पान क्र.५ आवृत्ती पहिली २०१२.
३. कॉ.शरद पाटील, रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष पान क्र.दोन आवृत्ती तिसरी २०१४
४. पहा तुळजापूर येतील भारतीबूवांच्या मठातील चौपट.
५. ऱा.ची.ढेरे.श्रीक्षेत्र तुळजापूर पान क्र.१३ आवृत्ती द्वितीय.
६. शरद पाटिल उक्त.पान क्र.२१
७. डॉ अशोक राणा,देव धर्म पान क्र.६८ आवृत्ती २०१४
८. डॉ अशोक राणा,उक्त पान क्र.५६
---------------------------------------------------------------
नितीन सावंत, परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment