संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण २० वे
देव बाटवीला त्याने ?
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ||
त्याचा जाला म्हणीयारा । राहे धरी धरी थारा ।।
देव बाटविला त्याने । हासे जनी गाय गाणें ॥३॥
- संत जनाबाई
असे म्हणतात की ईश्वराला जात नाही. देवाच्या समोर सगळे सारखेच. त्याच्या समोर तो भेदाभेद करत नाही. मग एखादया अस्पृश्य ठरवले गेलेल्या व्यक्तीच्या स्पर्शाने देव (देवाची मुर्ती) बाटावी का ? त्या देवाला विटाळ व्हावा का? आणि त्यातल्या त्यांत देवाच्या लाडक्या भक्ताने देवाला स्पर्श केल्यानंतर देव आधिक आनंदी, समाधानी व्हावा की विटाळग्रस्त व्हावा ? आनखी असे की साधारण अस्पृश्य व्यक्तीचा स्पर्श देवाला झाला तर देवाच्या तेजाने ती व्यक्ती उजळून निघावी की देवच अस्पृश्य विक्तीच्या विटाळाने काळवंडावा ? मग तर अस्पृश्यता मोठी झाली आणि देव लहान. असे कुठे असते काय ? पण ब्राम्हणांच्या वैदिक धर्मशास्त्राप्रमाणे देव बाटतो. त्याला विटाळ होतो.अस्पृश्यांनी भक्ती केली तरीही त्यांनी मुर्तीला स्पर्श करू नये. म्हणूनच चोखोबांनी देव बाटवला म्हणून त्यांना दोनवेळा शिक्षा देण्यात आल्या होत्या. ही गोष्ट जेव्हा संत जनाबाईंना कळली तेव्हा त्या म्हणतात की " चोखोबारायांच्या स्पर्शाने देव बाटतो , याचे तर मला हसूच येत आहे. देव कुठे बाटत असतो का?" अशी संत जनाबाईंची भूमीका आहे.एका स्त्रीने अस्पृश्यता नाकारावी,तिचा मजाक उडवावा हे धाडसाचे काम आहे.संत जनाबाई आजही ग्रामीण भागात अस्पृश्यता पाळणार्यांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या स्त्रीसंत आहेत.
चोखोबारायांच्या बाबतीत बडव्यांनी काही नमती भुमीका घेतली नाही. आणि भविष्यात त्यांनी माफीही मागीतलेली नाही. उलट त्या नंतर कधीही कुठल्याही अस्पृश्याला विठ्ठल मंदिरात येवू दिले गेले नाही. चोखोबारायांनी बलीदान देवूनही मंदिर काही उघडले नाही. मग विठोबा सर्वांसाठी उपलब्ध झालाच की नाही? झालाना! त्यासाठी १९४७ हे साल उजडावे लागले. गोष्ट अशी की " १ मे ते १० मे १९४७ रोजी साने गुरुजींनी पंढरपुरातील तनपुरे महाराजांच्या मठात प्राणांतिक उपोषण केले. ते उपोषण सर्व अस्पृश्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा या यासाठी होते."
या आस्पृश्यांच्या विठ्ठल मंदीरातील प्रवेशाच्या मागणीला प्रखर विरोध झाला. आजरेकर फड सोडता जवळपास इतर बहुतांश फडांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाला विरोध दर्शवला होता.त्यात महाराष्ट्रातील नामवंत किर्तकार मंडळीही विरोध करायला कंबर बांधुन उभी होती. पंढरपुरात रान उठवले होते. तरीही सरकारने साने गुरुजींच्या बाजुने निकाल दिला होता.पहिल्यांदाच विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले. ते देखील सर्व वारकरी किर्तनकारांनी स्वखुशीने खुले केले नाही तर साने गुरुजींना जीव पणाला लावावा लागला. चोखोबारायांना त्या काळी जीवंतपणी विठ्ठललाला कडकडुन मिठी मारता आली नाही.त्यांना मंदिरात जाण्यासाठी न्याय मिळाला नाही. पण साने गुरुजींच्यामुळे चोखोबारायांच्या अस्पृश्य समाजाला मात्र मंदिर खुले झाले. आता गोष्ट ईथवर घडली असती तर झाले गेले गंगेला मिळाले आता आपण एकत्र नांदू असे म्हणता आले असते. पण तसे झाले नाही.त्या दरम्यान पंढरपुरातील ब्राम्हणांनी आनखी एक माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट केली होती. अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळाला तर देव बाटेल म्हणून "१० नोव्हेंबर १९४७ रोजी सर्व सनातनी मंडळींनी श्रीविठ्ठलाची पुजा करून विठ्ठलाचे तेज-चैतन्य पाण्याच्या घागरीत साठवून घेतले." त्यांच्या दृष्टीने देवाचे प्राण घागरीत आणि प्राणहीन मुर्ती मंदिरात होती.
तुम्ही चोखोबारायांना पुढे करून बरोबरीचे हक्क अधिकार मागत आहात. त्याकाळी त्यांना एकटा चोखोबाही स्विकारावासा वाटला नाही. आता सबंध समाज मंदिरात आलेला कसा चालेल. त्यासाठी त्यांनी देवाचे प्राणही घागरीत बंदिस्त करायला कमी केले नाहीत. देवालाही हवीतशी वागवणारी ही सनातणी वर्णाश्रमधमी ब्राम्हण मंडळी तुम्ही चोखोबारायांचे काय घेऊन बसलात. ही घागर पंढरपुरातील धारूरकर ब्राम्हणाच्या घरी ठेवली गेली होती. मुख्य विठ्ठलाला आणि विठ्ठल मंदिराला वाळीत टाकून सनातनी ब्राम्हण आणि भटाळलेले कीर्तनकार नियमीतपणे त्या घागरीचे दर्शन घेत असत. काहीजन मरेपर्यंत विठ्ठल मंदिरात गेले नाहीत. पुढे तर या सनातणी मंडळींनी १९९७ हे वर्ष 'शोकवर्ष' म्हणून पाळले अस्प्रश्यांना मंदिर प्रवेश दिल्यानंतरही ५० वर्षानंतर सुद्धा सणातन्यांच्या डोक्यात चोखोबाराय घुसले नाहीत.किंवा जनाबाईंचा अभंग आठवला नाही.
"अग्निहोत्री भीमाचार्य वरखेडकरांनी १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर १९९७ या काळात "ज्ञानयज्ञ" करून घागरीत साठवलेल्या विठोबाची सुवर्णजयंती कली" म्हणजे आपण केलेल्या चुकीच्या कृत्याची सुद्धा सणातण्यांनी सुवर्णजयंती साजरी केली होती.
याबद्दल वा.ल. मंजुळ आपल्या. संत चोखामेळा विविध दर्शन या एलिनॉर झेलियट सोबत संपादीत केलेल्या ग्रंथातील लेखात म्हणतात "असो ! हा सगळा शुद्ध वेडेपणाच म्हणावा लागेल. एक दिवस पं. धारुरकरांच्या घरातील ही पाण्याने भरलेली, देवघागर एका भाविकाने ठेवलेल्या नैवेदयावर मांजरीने घातलेल्या झडपेमुळे लवंडली. देवत्व वाहुन गेले. ती पुन्हा भरून ठेवली. घागरीत चैतन्य पहाणारांना हा प्रकार कसा मान्य झाला ? सुरवातीला काही दिवस सनातनी मंडळींच्या घरचे नैवेंद्रय मंदिरातील विठ्ठला ऐवजी घागरीलाच दाखवायला येत."
आशाप्रकारे समतेचे प्रतिक असणारा पांडुरंग ब्राम्हणांनी कैद केला. खरे तर चोखोबारायांच्या भक्तीची जाणीव ठेवून त्या काळातच ब्राम्हणीनी स्वतः पुढाकार घेऊन .विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करायला हवे होते. किंवा १९४७ रोजी तरी सर्व ब्राम्हणांनी साने गुरुजींच्या उपोषण स्थळी जावून त्यांचे पाय धरून माफी मागत मंदिर खुले करून द्यायला हवे होते. पण ब्राम्हणांनी उदारपणा दाखवल्याचे इतिहासात उदाहरण नाही. या ब्राम्हणांना कॉपी करण्याच्या नादात, अनेक वारकरी, किर्तनकारही अस्पृश्यतेच्या समर्थनात 'संत चोखोबारायांचा अपमान करायला लागले होते. प्रश्न पडतो काय मिळाले चोखोबारायांना ? जीवंतपणीही अवहेलना, मृत्यूनंतरही अवहेलनाच. चोखोबारायांच्या नंतर अस्पृश्यांमध्ये विद्ववान, अभंगकर्ते होऊच नयेत आशा पद्धतीची तजवीज केली गेली. चोखोबाराय 'सदैव बाहेरच ठेवले गेले. मंगळवेढयाच्या वेशीत, पंढरपुरच्या पायरीला एवढेच त्यांचे स्थान. येथे चोखोबारायांनाचा संपूर्ण न्याय मिळाला नाही मग बाकी अस्पृश्यांचे काय?
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment