Sunday, 10 July 2022

संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण २२ वे l चोखोबाराय आणि आंबेडकरवादी चळवळ

   संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण २२ वे l 
चोखोबाराय आणि आंबेडकरवादी चळवळ

                                २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले. खऱ्या अर्थाने सर्व शोषीत, पिडीत,अस्पृश्यांना  स्वतंत्र्य  मिळाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुक्त संचार स्वातंत्र्य, दर्जा आणि समान संधी अशा कित्तेक मानवी हक्काच्या गोष्टी,  हजारो वर्षे मुक्तीदात्याची वाट पाहुन अस्पृश्य जातींच्या पदरात पडल्या होत्या. 'अभिव्यक्तीचे' स्वतंत्र्य काय असते हे नव्या पिढीला कळणार नाही.केवळ देवाच्या दारात उभे राहुन अभंग का म्हनतो म्हणून अनेक यातना दिले गेलेले संत चोखोबाराय डोळ्यासमोर ठेवले की किंवा "घोकाव्या अक्षर मज नाही अधिकार " म्हणनारे तुकोबाराय डोळ्यासमोर ठेवले की अभिव्यक्त होण्यावर सुद्धा या देशात बंदी आसल्याचे, अभीव्यक्तीवर कडेकोट पहारे बसवले गेल्याचे आपल्या लक्षात येते. मराठ्याच्या , कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांना जर अक्षरे  घोकु दिली जात नसतील तर संत चोखोबारायांसारख्या अस्पृश्यांचे काय हाल असतील ? याचा अंदाज आपण बांधु शकतो. म्हणून मध्ययुगीन भारताच्या जातीव्यवस्था कठोर असल्याच्या काळात संत चोखोबांच्या परिवाराने अभिव्यक्त होने धाडसाचेच म्हणावे लागेल. भागवत धर्माच्या वाटेने एकच चोखोबा अभिव्यक्त होऊ शकला, त्याचा उद्धार संत नामवादी संतांनी केला. पण हजारों अस्पृश्य, हजारो चोखोबा अभिव्यक्तीसाठी, बरोबरीचा दर्जा मिळण्याची वाट पहात होते.
                         पुढील काळात संविधान देवून , करोड़ो चोखोबारायांना समतेच्या प्रवाहात आनुन, सर्वांच्या बरोबरीला बसवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. करोडो चोखोबारायांना अस्पृश्यतेच्या जाचक गुलमगिरीतून बाबासाहेबीना मुक्त केले. "आम्ही अस्पृश्य का ? " आमचा विटाल का पाळता? असे म्हणनाऱ्या चोखोबारायांना बाबासाहेबांनी न्याय मिळवून दिला. २६ जानेवारी १९५० रोजी संत चोखोबारायांना न्याय मिळाला.
                             डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत चळवळीचे नाते जवळचेच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  वडील रामजी आंबेडकर हे कबीरपंथी होते बाबासाहेबांच्या लहानपणी त्यांच्या घरामधे अभंग, दोहे यांचे वाचन होत असे. त्यामुळे संत चळवळीची पहिली ओळख बालवयातच बाबासाहेबांना झाली होती. "त्यामुळे त्यांनी बुद्ध आणि फुले आपले गुरु मानले, त्यात संत कबीर यांना सुद्धा गुरू म्हणुन " स्थान देऊन संत चळवळीशी आपला धागा कायम ठेवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनेक भाषणांत 'संतांचे अभंग दाखले देण्यासाठी वापरत असत. २० जुलै ११९४२ ला नागपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहिंसेची समर्पक  व्याख्या सांगताना 
                             " दया तिचे नाव भुतीचे पालन ।
                             आणिक निदालन कंटकाचे "
                            
                 या अभंगाच्या ओळी वापरल्या होत्या. संत तुकोबारायांच्या याच्या ओळी वापरून डॉ. बाबासाहब आंबेडकर त्यांनी सविस्तर भुमिका सुध्दा मांडली होती. या देशात शुद्र अतिशुद्र मुके आहेत. त्यांना अभिव्यक्ती  स्वतंत्र्य सुद्धा नाही, हे लक्षात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले. मुकनायक हे पाक्षीक होते. या मुकनायकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० ला काढण्यात आला होता.  मुकनायक या शिर्षकाचा शब्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  संत तुकोबारायांच्या अभंगातून घेतला होता. त्या अभंगाची ओळ  या मराठीतील पहिल्या पाक्षीवर छापली गेली ती अशी

काय करू आता धरूनिया भीड । निशंक हे तोंड वाजविले ॥
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ।।

                   आशा पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्यांचा नायक बनले. त्यानंतर त्यांनी ३ एप्रिल १९२६ रोजी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढले. या वृत्तपत्राच्या हेडींगला संत ज्ञानेश्वर  महाराजांच्या स्वलिखीत ओळी दिलेल्या असायच्या.

                  आशा रितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संत  चळवळीशी चांगला संबंध होता. त्यांनी या संत चळवळीतील अस्पृश्य ठरवलेल्या संतांचाही अभ्यास केला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांचे पहिले प्रतिनीधी म्हणून संत चोखोबाराय, संत रवीदास तथा संत नंदनार या तिन संतांचा  उल्लेख करुन त्यांची ओळख जगाला करून दिली. त्यांनी आपला अनटचेबल्स हा ग्रंथ या तिन संतांना अर्पण केला आहे. त्या आपण पत्रिकेत बाबासाहेब म्हणतात 
                  " आपल्या निष्ठायुक्त कृत्य, संयमी व न्यायी वृत्ती यामुळे ते सर्वांपेक्षा उच्चतम आदरास पात्र ठरले. त्या तीन संताच्या स्मृतीस अर्पण "

                           यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत चळवळीचा एवढा व्यापक संबंध होता लक्षात येते.परंतू ही संतांची चळवळ जनमानसात रुजल्यानंतर ती समतावादी न राहू शकल्यामुळे बाबासाहेबांनी चोखोबारायांच्या भक्तीपंथाच्या आध्यात्मिक मार्गाने जाने नाकारले. वारकरी पंथात पाळली जाणारी अस्पृश्यता, भेदाभेद ,जातीभेद पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वारकरी, भागवत धर्म सोडून बोद्ध धम्म स्विकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांनी  पंढरपुरला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिथे मंदिरात येऊ दिले जात नाही, भेदाभेद पाळला जातो, हे बाबासाहेब जानुन होते. म्हणुन बाबासाहेबांनी रमाईला पंढरपुरला नेण्यास नकार दिला आणि आपण आपले स्वतंत्र पंढरपुर उभे करू असा असा शब्दही दिला होता. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपुरला बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन स्वतंत्र पंढरपुर वसवून दाखवले.हे बघायला रमाई मात्र नव्हत्या.पुण्यातील देहू रोडला चोखोबारायांचे मंदिर बांधण्याची तयारी करत असलेले काही अस्पृश्य कामगार " बाबासाहेबांकडे  गेले होते. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाचे मंदिर बांधायला लावले आणि उद्घघाटनाला गेले सुध्दा. बाबासाहेबांनी भक्तीच्या मार्गाने जाने नाकारून बुध्दाच्या मार्गाने अस्पृश्य जातींना मुक्ती मिळवून दिली.अस्पृश्यता जातीव्यवस्था नाकारणाऱ्या  धम्मात त्यांनी अस्पृश्य मानले गेलेल्या जातींना नेवुन मुक्ती दिली. परंतू एक गोस्ट चर्चेत कार्यक्षेत्रात येने महत्वाचे आहे की , बाबासाहेब संत चळवळीला आणि संत चोखोबारायांना नाकारणारे होते का ? त्यांचे योगदान त्यांना मान्य होते की नाही ? तर बाबासाहेब चोखोबारायांना नाकारणारे नव्हते. केवळ पून्हा त्या मार्गाने जाने त्यांनी नाकारले.अस्पृश्यांचा उध्दार करणारी भक्ती परंपरा नको तर संपूर्ण अस्पृश्यांचा उद्धार करणारा धम्म बाबासाहेबांनी पुढे केला.अलिकडच्या काळात अनेक पुरोगाम्यांनी, चोखोबारायांना जाहिर नाकरले आहे. आशांना एक प्रश्न आहे. त्याकाळातीले जातीव्यवस्था अस्पृश्यता वाईट होती की चोखोबाराय ? ब्राम्हणी व्यवस्था नाकारणार की चोखोबाराय ? बाबासाहेबांनी चोखोबारायांना ग्रंथ आर्पण केला पण चोखोबारायीचा मार्ग नाकारला होता.तुम्ही पुरोगामी चोखोबाराय नाकारणार की तो मार्ग ? त्या काळातील जातीव्यवस्था,अस्पृश्यता, ब्राम्हणी विटाळ या संकल्पना जाहीरपणे मांडणे हे पाप होते का ? हे मांडल्या बद्दल चोखोबारायांचा सन्मान व्हायला हवा की त्यांना दुर्लक्षित करुन मारणार. त्यांना दुर्लक्षीत करून ब्राम्हणी छावणीला मदतच करण्याचे काम पुरोगामी काही करत आहेत. संत चोखोबाराय चर्चेत आनले आसते तर जातीवादी समाजव्यवस्था उघडी पडली असती.हे पुरोगामी लेखक मंडळीला करावेसे वाटले नाही.उलट संत चोखोबारायांना चर्चेत आनुन जातीव्यवस्थेच्या विरोधात लढाई उभी करता आली असती.आज घडीला दलित आत्मकथने चर्चेला घेतली जातात.त्यावर समीक्षा येतात.मोठे धुमसान होते. पण देशातील पहिले दलीत आत्मकथन लिहीनारा चोखोबा मात्र  दुर्लक्षीत असतो.भारतातील पहिले दलीत आत्मकथन संत चोखोबारायांचे आहे. याकडे दलीत आत्मकथाकारांनी कानाडोळा केला आहे. दलीत कवितेचा इतिहास चोखोबारायांपासूनच खुरु होतो. तर दलीत स्त्रीवाद संत सोयराबाई, संत निर्मळा यांच्यापासून सुरु होतो. परंतु यावर पुरोगामी म्हणूवुन घेनारे फुले शाहु आंबेडकरवादी प्रवाह चर्चेला तयार नाहीत. संत चोखोबाराय त्यावेळी बाहेर ठेवले ते ब्राम्हणवाद्यांनी आणि आता वाळीत टाकले ते चोखोबारायांच्या आप्तस्वकीयांनी.
                           म्हणून स्वच्छ मनाने एकदा विचार करुया. त्याकाळी मिळतील त्या साधनांचा वापर करून, अतिशय बिकट परिस्थितीत आपला विद्रोह मांडल्या बद्दल आपण चोखोबारायांचा सन्मान करूया. त्यांना जातीअंताच्या मर्गावरील एक प्रतिक म्हणून स्विकारूया.अस्पृश्यतेचा गंभीर प्रश्न सर्वात आधी उभा केल्या बद्दल त्यांचे साहित्य स्विकारूया.चोखोबारायांना घेवून  समतेच्या हक्क अधिकारांसाठी प्रस्थापीत ब्राम्हणी व्यवस्थेशी भांडुया. वारकरी पंथात सर्व संतांप्रमाणे अधिकृत, नोंदनीकृत गुणवान,वैचारिक, प्रगल्भ महान संत म्हणुन चोखोबाराय सर्व संतांनी मान्य केलेले आहेत. त्या चोखोबारायांनी अस्पृश्यांच्या शोषण, पिडण, दमन आणि वेदनेचे डॉक्युमेंटेशन केल्या बद्दल त्यांच्याप्रती नतमस्तक होऊया. तसे न करणे आपल्या इतिहासपुरुशासी बेईमानी केल्यासारखे होईल. चांगले काम केलेल्या आपल्या पुर्वजाची आठवण सुद्धा न काढणे नतदृष्टेपण  ठरेल. तसे आपण करू नये एवढेच !

नितीन सावंत परभणी
9970744142

No comments:

Post a Comment