Tuesday, 12 July 2022

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २३ वे मुसलमान संताची जातीअंतक भुमीका

 संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २३ वे 
मुसलमान संताची जातीअंतक भुमीका

देवाची भक्ती चोखामेळा करी | त्यास लोक धरिती दुरी ।
"वैकुंठी  महारवाडा वेगळा करी । नांदावया तयासी ? ॥
ऊँच-नीच नदीत शिरोन । बाहेर निघती कुंभ भरोन् ।
मग म्हणती, स्पर्शो नका , चला दुरोन' |
उदकांत उभयता उभी होती ॥
                    - संत शहामुनी, (संदर्भ:- मुसलमान मराठी संतकवी. रा. चिं. ढेरे आवृत्ती २१जुलै २०१४ पान १२२ )

                              भारतातील पहिली मस्जिद इ.स. ६२९ च्या कालखंडातील.ही मस्जीद केरळ राज्यात कोर्डगलूर तालुक्यातील मेयला या गावी आहे. ही मस्जीद हिंदू (द्रवीड) चेरामन पेरुमल यांच्या नावे आहे. हे चेरामन खुद्द  रसुल्लला सल्लल्लाहु वल्लेही अस्सलम अर्थात मुहम्मद पैगंबर यांना भारतातून भेटायला गेले होते.भेट घेवुन भारतात येताना ते वारले.सहाबा लोक आणि चेरामन यांच्याद्वारे इस्लाम भारताच्या किनाऱ्यावर आला. त्यामुळे भारतात पहिले इस्लामचे आगमन दक्षिण भारतात झाले.ते काही नंग्या तलवारी हतात घेवुन नव्हे.त्याप्रमाणे खैबर खिंडीतूनही अनेक सुफी संत भारतात आले. राजस्थानमधील आजमेरचे  सूफ़ी मोइनुद्दीन चिश्ती ख्वाजा गरीब नवाज(११४१ - १२३६ ई॰) हे थेट मक्केहून भारतात आले होते. उत्तर भारतातूनही दोन वेळा सातशे , सातशे अशा चौदाशे सुफी संतांच्या पालख्या महाराष्ट्रात आल्या होत्या.
                             दक्षिणेस केरळमधे आलेले सहाबा आणि उत्तर भारतात उतरलेले सुफी या ईस्लामच्या संतांनी भारतात आल्यानंतर सर्वप्रथम अस्पृश्यता ही मनुष्यनिर्मित आहे, हे जगजाहीर सांगितले. त्यांनी जातीव्यवस्था अस्पृश्यतेला कडाडून विरोध केला.ते अस्पृश्यांच्या सोबत एका ताटात जेवायला लागले.अस्प्रश्यांना कडकडून अलिंगण द्यायला लागले.अस्पृश्यांच्या जखमा धुवून त्यांना मलमपट्टी करुन त्यांची सेवासुश्रृषा करण्याचे काम सुफी संतांनी केले होते.  भारतात सुफी संत येण्या अगोदर अस्पृश्यता ही  ईश्वर निर्मात मानली जायची. हे सर्व पुर्वजन्मीचे भोग आहेत असे अस्पृश्यांच्या मनावर बिंबवले जायचे.त्यांना गुलाम बनवलेले होते.
                                 सुफी संतांनी या खोट्या आफवा धुडकावून लावल्या. आणि माणुसपणाची शिकवण द्यायला सुरुवात केली.म्हणूनच जातीव्यवस्था अस्पृश्यतेला कंटाळलेल्या मोठ्या जनसमुदायांनी या देशात धर्मांतर केले.महाराष्ट्रात सुफींचे प्रचारक आणि वारकरी संत यांचा एकमेकांवर मोठा प्रभाव आहे. वारकरी सांप्रदायावर सुफींचा एकेश्वरवाद मोठा प्रभाव टाकुन गेलेला आहे. शिवाय संत तुकोबारायांनीही कबीर ,लतिफ, मोमीन या तिन मुस्लीम संतांचे आदाराने उल्लेख केलेले आहेत. व्यावसायावरुन हिन लेखु नका असे सांगताना "  आमचा विठ्ठल सज्जन कसाया सोबत मांस विकू लागतो " असेही तुकोबाराय म्हणाले आहेत. संत एकनाथ महाराजांचे गुरू संत जनार्धन स्वामी. आणि  संत जनार्धन स्वामी , यांचे गुरु संत चांदबोधले होते.हे संत चांदबोधले  सुफी परंपरेतील होते. संत चांद बोधले यांना दोन लोकप्रिय शिष्य लाभले.एक म्हणजे संत जनार्धन स्वामी आणि दुसरे म्हणजे श्रीगोंद्याचे  शेख मुहम्मद महाराज श्रीगोंदेकर होत. या शेख मुहम्मद महाराज श्रीगोंदेकर यांचे आणि  तुकोबारायांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते.
                             याच सुफींच्या प्रभावक्षेत्रातील आनखी एक नाव म्हणजे संत शहामुनी होत. संत शहामुनींचा जन्म श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावला इ.स. १६४८ला झाला आणि त्यांचा शेवट शहागड (जि. जालना ता. अंबड) ला १८०८ला झाला. शहागडला त्यांची समाधी आहे. है संत शहामुनी मुस्लीम संत होते त्यांनी महानुभावांच्या शिकवणुकीला साजेल असा सिद्धांतबोध हा ग्रंथ लिहीला आहे. हा ग्रंथ महानुभव पंथात सर्वाधीक लोकप्रिय आहे. आजही महानुभव या ग्रंथाचे पारायणे करतात.
                              याच महानुभव मुस्लीम संताने वारकरी परंपरेवरही लिहीले आहे.सुफी, महानुभव आणि वारकरी यांच्यातला समन्वय साधनारे संत शहामुनी होत. संत शहामुनी यांनी आपले कार्य आणि साहित्यनिर्मीती करताना भारतीय उच्चजातीयांचे  जातीवादी मुल्ये थेट नाकारली आहेत.अस्पृश्यता  ही,  ईश्वर निर्मीत नाही.हे त्यांनी ठणकावुन सांगितले. जातीभेदाला, अस्पृश्यतेला त्यांनी विरोध केला होता.अस्पृश्य  जातीतून आलेल्या संत चोखोबारायांची त्यांनी सन्मानपूर्वक बाजु घेतली.जातीवाद करणाऱ्या समुहाला संत शहामुनी यांनी काही प्रश्न विचारले आहेत.ते म्हणतात की " ईश्वर भक्ती करणाऱ्या संत चोखामेळ्याला वैकुंठात वेगळा महारवाडा असेल काय ?" उच्च -निच भेदभाव पाळता, स्पर्श करू नको दुर हो म्हणता मग ईश्वर भेदभाव पाळतो का? त्याच्याकडे स्वर्गात अस्पृश्यांसाठी वेगळी वस्ती आहे का?.नदीच्या पाण्यात भेदभाव असतो का ? तिथे तर सर्वजातीपातीचे बुडतात , ओले होतात.नदी आणि पाणी भेदभाव करत नाही.एकाच पाण्यात स्पृश्य आणि अस्पृश्य आंघोळ करतात.आणि वर आल्यानंतर म्हणतात तु अस्पृश्य आहेस मला शिवु नकोस.हे कसे चालेल ? हे संत शहामुनी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एक मुस्लीम संताने अस्पृश्यांची बाजू घेऊन व्यक्त केलेला निर्भीडपणा वाखाणण्याजोगा आहे. त्यावेळी उच्चजातीयांना नक्कीच हे झोंबले असेल. स्पेशली धर्मपुरोहीत वर्गाच्या काय प्रतिक्रिया असतील याचा अंदाज आपन बांधु शकतोत.
                         संत शहामुनींच्या आधी साधारण पाचशे ते साडे पाचशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या संत चोखोबारायांवर अभंग लिहुन त्यांची वेदना समाज पटलावर ठेवणे हे मोठे गौरवाचे काम आहे. संत चोखोबारायांचा, संत नामदेवांचा जातीअंताचा "लढा संत शहामुनी पुढे चालवत होते. एक मुस्लिम संत अस्पृश्यांसाठी लढत होते.प्रस्थापीत मिरासदार, सरंजामदारांच्या व ब्राम्हणशाहीतील कर्मठ ब्राम्हणवाद्यांच्या विरोधात जावे लागले तरी हरकत नाही या भुमीकेतून त्यांनी संत चोखोबारायांचे दुःख, पिडन पुन्हा चर्चेत आनले होते.

                                 अहमदनगर, बिड, जालना या भागात संत शहामुनी यांनी अस्पृश्यतेला विरोध करणारे प्रबोधन केल्याचे वरील अभंगावरून लक्षात येते. माणुसकीचा उपदेश त्यांनी सर्वांना केला होता. संत जगाबरोबर वहात जात नाहीत , तर त्यांना दिसलेल्या खोट्या गोष्टींना ते विरोध करतात. ते जग बदलवतात.जगाला दिशा देतात. संत चोखोबारायांचे थेट नाव घेवुन संत शहामुनी यांनी आपली नाळ वारकरी परंपरेशी जोडली आहे. जातीअंताचा मार्ग त्यांनी चोखोबारायांना चर्चेत आनुन निवडला आहे. संत नामदेव , संत चोखोबारायांसारखाच  माणुसकीचा धर्म शहामुनी सांगत होते. आपणही संत चोखोबारायांचा, संत शहामुनी यांचा भेदभाव विरहीत  माणुसकीचा धर्म जोपासुया, वाढवूया.

नितीन सावंत परभणी
9970744142



No comments:

Post a Comment