Tuesday, 12 July 2022

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २६ वे चोखोबारायांचा अनोखा वारसदार

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २६ वे 

चोखोबारायांचा अनोखा वारसदार

" अंत्यविधी म्हणजे शेवटचा निरोप ! "
                      -  कृषीभुषण कांतराव काका देशमुख.

        झरी हे परभणी जिल्हयातील , परभणी -  जिंतूर रोडवरील  २० हजार लोकसंख्येचे गाव. झरी हे गाव म्हणजे भारताची छोटी प्रतिकृतीच. या गावात सर्व जातींचे घरे, लोकवस्त्या आहेत. या गावच्या विकासात कृषीभूषण कांतराव काका देशमुख यांचा फार मोठा वाटा मानला जातो. आज घडीला ६८ वर्ष वय असलेले काका हे अनेक चांगल्या कामांमुळे महाराष्ट्रभर लोकप्रिय आहेत. त्यात त्यांनी केलेले शेतीविषयक प्रयोग असतील, किंवा निसर्गाचे जतन संवर्धन असेल. जलसंधारणाची कामे असतील किंवा ' एक गाव एक स्मशानभुमी' ही त्यांची लोकचळवळ असेल.विधवा भगीनींची भाऊबीज घेने असो किंवा वृक्षलागवडीची चळवळ उभारणे असो.अशा अनेक गोस्टींमुळे काका लोकप्रिय आहेत.
                        त्यांच्या इतर कामावर अन्यत्र चर्चा करता येईल. आज त्यांच्या समतेच्या , बंधुभावाच्या , जातीअंतक, माणुसकीच्या कामाचा आढावा घ्यायचा आहे.
                    भारतात लोकशाही आल्यानंतर पटापटा भेदभाव अस्पृश्यता कमी होईल असे वाटले होते. पण ते तितकेसे वेगाने झाले नाही. गावगाड्यांत भेदभेद,अस्पृश्यता तसीच राहीली.जन्मभर हिनत्वदर्शक वागणूक आणि मृत्यूनंतरही प्रेतांची विटंबना होत राहिली.आजही गावोगाव भटके विमुक्त , आदिवासी आणि माजी अस्पृश्य जातींना भेदभावी वागणूक तर मिळतेच शिवाय त्यांना प्रेते जाळण्यासाठी हक्काचे , स्वच्छ मसनवाटे सुद्धा नाहीत.शेतकरी जातीतल्याही गरिब शेतकऱ्यांचे हेच हाल आहेत.गरिबांना प्रेत उचलायला खांदेकरीही मिळत नाहीत.प्रेतांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीवरच्या वादांवरल्या बातम्या रोजच पेपरात झळकतात.
                    कांतराव काका देशमुख हे झरी गावचे सरपंच म्हणून वयाच्या २२ व्या वर्षी गावच्या कारभारात हस्तक्षेप करायला सुरुवात करतात.तेव्हापासून गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात न चुकता आवर्जून सहभागी होने हे त्यांचे कर्तव्य बनते.आपला गावकरी म्हणून ते प्रत्येक अंत्यविधीला जातीपातीचा विचार न करता जेव्हा हजर होतात, तेव्हा त्यांना पहायला मिळते ते जातीजातींचे स्वतंत्र मसनवाटे आणि हगंदरीत होनारी प्रेतांची विटंबना.गरिब जातीला प्रेत जाळण्यासाठी पुरेसे लाकडे मिळत नसत.घानीने भरलेले लाकडे टाकुन तसेच प्रेत जाळले जायचे.
                    नदिपात्रात प्रेत जाळत असताना पुर आला तर अर्धवट जळालेले प्रेत वाहुन जायचे.सलग पावसाळ्यात उघड्यावर जाळलेले प्रेत तिन तिन दिवस आर्धवट भिजत पडुन रहायचे.गरिब जातींच्या या प्रेतांना कुनीही वाली नसे . कुनी मदत करत नसे . यामुळे प्रेतांची विटंबना होइ.काही वेळेला टायर टाकुन प्रेत जाळले जाई. काही गरिब जातींना प्रेत जळण्यासाठी हक्काची जागाही नसे.गावातील श्रीमंत लोक पावसाळ्यात नदीपात्रात अंत्यविधी करता येत नाही म्हणून आपल्या स्वताच्या शेतात अंत्यविधी करत असत, परंतु ज्या जातींना शेतच नसे त्यांच्या प्रेताचा जाळण्याचा प्रश्न नेहमी उभा राही.
                    तारुण्यात या सरपंच झालेल्या युवकाच्या मनावर ही समस्या अत्यंत खोलवर घर करुन गेली आणि त्यांनी तेव्हाच एक संकल्प सोडला की, भविष्यात आपल्या गावात सर्वांत सुंदर, स्वच्छ, रमणीय आणि अंत्यविधीला आलेले लोक शांततेत बसुन शकतील अशी एक स्मशानभूमी बांधायची.
                    पुढील काळात त्यांनी गावात दवाखाना आनला,गावच्या विकासासाठी अनेक संस्था, सरकारी कार्यालये गावात आनली.त्यात काही वेळा जमीन दानही द्यावी लागली.पुढील काळात मात्र त्यांना स्वप्नातील आदर्श स्मशानभूमीच्या उभारणीसाठी गावात सरकारी किंवा गायरान असलेली जमीन काही उपलब्ध झाली नाही.साडे बारा हजार एक्कर शेती क्षेत्रफळ असणाऱ्या या झरी गावाला गायरान जमीन किंवा सरकारी जमीन नव्हती.गावात सर्वप्रकारच्या सेवा सुविधा आल्यानंतर काकांनी या स्मशानभूमीच्या उभारणीला हात घातला.काकांनी स्वखर्चाने एक एक्कर जमीन विकत घेवुन भव्यदिव्य अशी भली मोठी स्मशानभूमी बांधुन काढली.नेहमी सरपंच असणाऱ्या काकाकडे नेमके यावेळी सरपंच पद नव्हते.तसे ते २५ वर्षे सरपंच पदावर होते.यावेळी मात्र गावासाठी हे महत्वाचे काम करायचे आहे म्हणून त्यांनी सरपंच पद नसतानाही फार मोठा खर्च केला.ह्या स्वखर्चाने विकत घेतलेल्या जमीनीवर, बांधलेल्या स्मशानभूमीत त्यांनी देशी वृक्षांची लागवड केली.वड , पिंपळ , चिंच , कवठ , कडुलिंब, बेल , चंदन ही ऑक्सिजन देनारी झाडे त्यांनी बांधलेल्या स्मशानभूमीत लावली.ऑक्सिजन पार्क त्यांनी उभा केला.अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्यांना शांततेत बसता येइल यासाठी त्यांनी स्मशानभूमीत भरपूर बाकडे टाकले.शेवटचा निरोप देताना लोकांना आरामात बसता येइल , याप्रकारची व्यवस्था काकांनी केली.कंपाऊड वालवर म्हणी पेंट केल्या. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.स्मशानभूमीत देखरेखी साठी पगारीवर एक कुटुंब नियुक्त केले.ज्या जातीत दफनविधी केले जातात त्यांनाही काकांनी जमीन उपलब्ध करुन दिली. प्रेते जाळण्यासाठी जास्त लाकूडफाटा लागु नये , विनाकारण वृक्षतोड होऊ नये म्हणून त्यांनी अंत्यसंस्कार होताना शवदाहिनीची व्यवस्था केली. ही स्मशानभूमी बांधताना त्यांनी पुढील ५० वर्षाचा विचार करुन ही उभारणी केलेली आहे.त्यांच्या गावी आज घडीला एका वर्षात  ६२ ते ६३ लोक मृत्युमुखी पडतात.एका प्रेताचा अंत्यविधी होऊन राख उचलेपर्यंत किमान तिन दिवस लागतात.मग पुढील काळात ही संख्या वाढनार म्हणून त्यांनी एकाचवेळी पाच ते सहा प्रेते जाळता येतील अशीही व्यवस्था केलेली आहे. आणि याप्रकारे राज्यभर कौतुक होइल अशी सुंदर स्वच्छ स्मशानभूमी काकानी उभी केली.सर्व वृत्तपत्रे , चायनल एवढेच काय बीबीसी मराठीनेही त्यांच्या या माणुसकीच्या, निस्वार्थी कामाची दखल घेतली आहे.
                    एकदा सहज रस्त्याने जाताना स्वखुशाली विचारण्यासाठी काकांनी एकजनाला काय चाल्लेय ? कसे आहात ? हा प्रश्न केला.तेव्हा ती व्यक्ती म्हनाली वडिल वारले आहेत, परंतू अंत्यविधीचे सामान बांबू वगैरे आनण्यासाठी पैसे नाहीत.त्या अंत्यविधीला काकानी त्वरीत मदत केली. आणि लाकडी दांड्यांवर आणि बांबूवर होणारा खर्च टाळण्याच्या दृष्टीने काकानी गावला स्टीलची तिरडी तत्वरित दान दिली.  परंतू त्यांच्या लक्षात आले की स्मशानभूमी दुर अंतरावर आहे.तिरडीवर प्रेत नेण्यासाठी खांदेकरी तयार होत नाहीत.आणि अल्पसंख्याक जातींना तर खांदेकरी मिळने मुश्किल.मोठ्या जातीतले कुनी वारले तर ते लोक शहरातून स्वर्गरथ मागवायला लागले.त्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागत.गरिबांना स्वर्गरथ कुठून परवडनार.हा सर्व वृत्तांत जानुन काकांनी गावाला स्वर्गरथ दान देण्याचे ठरवले.परंतू पुढे त्यांच्या मुलिने म्हणजे जिजामाता कृषीभुषण मेघा विलासराव देशमुख यांनी आपल्या दिगवंत पतीच्या नावे गावाला स्टिलचा मजबूत असा ' विलासरथ' नावाने स्वर्गरथ दान दिला.
                    पुढे ठरले असे की काकांच्याच पेट्रोल पंपावरुन स्वर्गरथाच्या ट्र्याक्टर मधे फ्रीमधे पेट्रोल भरुन , काकांनीच उभारलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे आणि मृत व्यक्तिला शेवटचा हार कांकाच्या काकाकडून राहिल.
                    ज्यांना स्मशानभूमी नव्हती त्यांना हक्काची स्मशानभूमी तर काकांनी दिलीच.परंतू ज्यांना आयुष्यभर कुनी हारही घातला नसेल आशा गरिब ,वंचीत,शोषीत,शेतकरी , शेतमजूर पिडीताला शेवटचा हार मात्र काकांचाच असतो.हे फार मोठे आणि प्रेरणादायी काम आहे.मंगळवेढ्याच्या वेशीतील ढिगार्यातून संत चोखोबारायांचे हाडे शोधुन आनुन पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात संत नामदेवांनी चोखोबांची समाधी बांधली.आणि त्या समाधीवर पहिला हार संत नामदेवांनी घातला.कृषीभुषण कांताराव काका देशमुख म्हणजे आधुनिक नामदेवच. निराधार , गरिब, शोषीत , वंचीत समुहातील हजारो चोखोबांचे अत्यंत सन्मानाने अंत्यसंस्कार करणारे काका हे खरे वारकरी होत.संत चोखोबाराय ज्या आत्मसन्मानाची लढाई लढत होते. त्या लढाईला कांताराव काका देशमुख यांनी आपल्या हाती घेतले आहे. चोखोबारायांराख्या कलंकित जीवन वाट्याला आलेल्यांना मरताना तरी कलंकित्वात मरु देवु नये म्हणून काकांनी केलेले काम अत्यंत उंचीवरले आहे.
                    सुरुवातीला लोकांचा गैरसमज असा झाला की , ही उभारलेली स्मशानभूमी केवळ स्वजातीसाठीच आहे.गावात तशाप्रकारची सुप्त चर्चा होत राहिली.पुढे गावात बोद्ध समाजातील ग्रहस्थ होनाजीराव सावंत वारले. काका तेव्हा मुंबईतला होते.हातातील कामे टाकुन ते मुंबईतहुन गावी आले आणि होनाजीराव यांच्या कुटूंबातील सदस्यांशी बोलुन नव्या स्मशानभूमीत पहिला अंत्यविधी केला.पुढे लोक पुन्हा म्हनायला लागले की ही स्मशानभूमी मागासवर्गीयांसाठी बांधली आहे . नंतरच्या काळात काकांच्या कुटूंबातील व्यक्ती म्हणजे सख्खे भाऊ प्रसादराव देशमुख वारले.हा दुसरा अंत्यविधी करुन काकांनी ही स्मशानभूमी सर्वांसाठी आहे हे सिद्ध केले.त्यानंतर सर्वांचे अंत्यसंस्कार या स्मशानभूमीत व्हायला लागले.काकांच्या या स्मशानभूमीत पहिला अंत्यसंस्कार माजी अस्पृश्य जातीतला झाला, हे फार मोठे समतेचे माणुसकीचे पाऊल आहे.कारण याच परभणी जिल्ह्यात आजही मातंग , बोद्ध , चर्मकार, आणि भटक्या विमुक्त जातींना हक्काच्या स्मशानभूमी नाहीत.प्रेते जाळण्यासाठी सतत संघर्ष होतो.तासनतास प्रेत तसेच ठेवुन प्रचंड वाद होणाऱ्या घटना आजही घडतात.भांडणे विकोपाला जातात.त्या दृष्टीने हे काम मोठे महत्वाचे माणुसकीचे आहे.
                    दोन हजार साली सुरु केलेले हे काकांचे काम आज परभणी आणि मराठवाडाभर लोकचळवळ  बनले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावांत आता 'एक गाव एक स्मशानभूमी' ही संकल्पना राबवली जात आहे.यासाठी अनेक गावांनी पुढाकार घेतला आहे.८० ते ९० गावांत या दृष्टीने काम सुरु आहे.झाडे लावुन , शवदाहिनी बसवुन , सर्व जातींना प्राधान्य देनार्या आणि काही अटिंची पुर्तता करणाऱ्या गावातील स्मशानभूमीला काकांनी १ लाख रुपयाचे बक्षिसही जाहिर केले आहे.खरे तर ही लोकचळवळ राज्यदरबारी जावी.बाबा आढाव यांच्या एक गाव एक पानवठा या लोकचळीसारखी याही संकल्पनेची दखल घेतली गेली पाहिजे.कृषीभुषण कांतराव काका देशमुख यांचे नाव देवुन एक गाव एक स्मशानभूमी ही योजना सरकारने कायदेशीररित्या राबवावी.प्रत्येक जातीच्या स्मशानभूमीला स्वतंत्र निधी देवुन जातीजातीत फुट पाडनारे जातीवादी काम सरकारने थांबवावे.आणि गाव तिथे एक स्मशानभूमी उभारणीला, समतेच्या मार्गाला सरकारने स्विकारावे.कांताराव काका देशमुख यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रभुषण देवुन त्यांचा सन्मान करावा.
                    काका म्हणतात " आपण जन्माला येताना काही कुठे अर्ज केला नव्हता की मी अमुक जातीतच जन्माला यावे.कोण्या जातीत जन्माला यावे हे आपल्या हतात नसते.जात ही अपघाताने मिळालेली असते.ती काही कर्तबगारी नव्हे.म्हणून ती मिरवण्याची गोस्ट नाही. जातीभेद करु नये.आणि मरताना कुणाच्याही प्रेताची विटंबना होऊ नये.मृत पावलेल्या देहाचे अत्यंत सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावेत या मताचा मी आहे. अंत्यविधी म्हणजे शेवटचा निरोप ! "
                    काकांच्या या विचारांना साष्टांग दंडवत..
                    काकांचा संपर्क : मो : 9423776600

नितीन सावंत परभणी
9970744242

No comments:

Post a Comment