Friday, 16 July 2021

♦️टेंगूळ - अविकसीत समाजव्यवस्थेचे

 ♦️टेंगूळ - अविकसीत समाजव्यवस्थेचे 

        नितीन सावंत परभणी 
        9970744142

           संपूर्ण शरीर नैसर्गिक वाढ झालेले , सुबक असावे असे प्रत्येकाला हवे असते. शरीराची त्वचा आणि सर्व अवयव निटनिटके असावेत हा सर्वसामान्य नियम. एखाद्या वेळी संपूर्ण सुंदर चेहऱ्यावर एखादे टेंगूळ आले असेल तर ते लगेच लक्ष वेधून घेते. ते बघताना, ते घेऊन इतरत्र वावरताना ऑड वाटते. नको तिथे , विनाकारण आलेले टेंगूळ शेवटी नकोसा भाग बनून जाते. 
            
             समाजव्यवस्थेचेही अगदी तसेच आहे. जातीव्यवस्था संपून वर्गव्यवस्था पूर्णपणे लागु व्हायला हवी होती. संपूर्ण सरंजामशाही संपून पूर्णपणे भांडवली लोकशाही लागु असायला हवी होती. त्यामुळे नव्या आलेल्या व्यवस्थेच्या नियमावलीत व्यवस्थित वागता आले असते. ही आलेली नवी व्यवस्था जरी परिपूर्ण नसली, तरी ती रेखीव-सुबक तरी असायला हवी होती. पण ही व्यवस्था पुर्ण विकसीत न झाल्याने जागोजागी वर्गस्तरामूळे अर्धविकसित टेंगूळ आलेले आहेत. आणि हा नकोसा भाग लगेच उघडा पडतो.

              वागताना, भांडवली मुल्ये पाळून निट जगता येत नाही, ना सरंजामी मुल्ये आज घडीला मिरवता येत नाहीत. असा प्रत्येकजन अर्धा शहरी असतो, अर्धा गावठी. कला साहित्यात ,भाषेत, समाजव्यवस्थेत, राजकारणात सर्वत्र हे टेंगूळ आलेले आहेत. तो भाग लगेच ओळखू येतो, दिसतो.
 
            पिकलेल्या अांब्याचा रस करता येतो , तर कच्च्या अंब्याचे लोणचे करता येते. परंतू, अर्धा पिकलेला , अर्धा कच्चा ज्याला #अर्धा_गाभुळा म्हणतात आशाचे काहिच करता येत नाही. भारतीय समाजव्यवस्थेचे नेमके हेच झाले आहे. हि समाजव्यवस्था ना पिकलेली आहे , ना कच्ची ती आर्धगाभुळी बनली आहे. 
            
             भांडवलशाहीला भारतीय भुमीवर तर खुपच वाकावे लागले आहे. कुठलाही प्रोडक्ट हा अभिजन वर्गाला नजरेपुढे ठेवून काढलेला त्यांना पाच दहा रुपायाच्या किमतीपर्यंत आनुन ठेवावा लागतो. दात घासायच्या पेस्ट , बिस्कुट पुडे , भांडे घासायची घासणी , बऱ्याच साबणा आगदी पाच दहा रुपायापर्यंत त्यांना विकाव्या लागतात. अगदी अभिजनाची म्हणावी अशी केसाची ब्रेलक्रीम, डिअोडरंट, फेअर अँड लव्हली पण सॅशेमध्ये २-५ रु.वर विकावी लागतात. बाजारपेठच जातिव्यवस्था बनवू देत नाही.

                   हे कशाचे द्योतक आहेत ? तर येथे आर्थिक क्रांती , उत्पादन वाढीची क्रांती न झाल्याचे , समाजव्यवस्था कुपोषित असल्याचे उदाहरण आहे. या व्यवस्थेत जागोजागी कुपोषणावर वर्गस्तराच्या खूरटलेल्या प्रगतीचे टेंगूळ आलेत. वाढ निट न झालेल्या समाजव्यवस्थेतील टेंगूळ ओळखून पडलेले आहेत . 

वेशभूषेतले टेंगूळ : 

                   बरेच जन शहारात गेल्यानंतर संपूर्ण शहरी लुक लगेच अवलंबतात. तसा पेहराव करतात.अगदी त्यात फिट्ट बसण्याचा ते खुप कसुन प्रयत्न करतात. कधीकधी असे वाटते की यांच्या किमान दोन पिढ्या तरी शहरातीलच असाव्यात.पण हे लोक जेव्हा बोलायला लागतात, तेव्हा मधेमधे एक दोन असे जुने ग्रामीण बोलीतील शब्द ते वापरतात की ते बिंग लगेच फुटते.लगेच लक्षात येते हे बेनं गावाकडचंच. भ्रमाचा भोपळा फुटुन आलेले टेंगूळ दिसते.त्यांच्या वागण्यातील विसंगती उघड होते.वेशभूषेतले टेंगूळ आलेल्याची खुप उदाहरणे आहेत.शेती करणाऱ्या नवरदेवाला भांडवली तथा इंग्रजांच्या वेशभूषेतला कोट घालून लग्नात का सजवत असतील.त्या कोटाचा पुढे आयुष्यभर तरी वापर होतो का ? प्रचंड गर्मी होत असताना तेवढा जाड कोट मिरवून कोनते सौंदर्य निर्माण होते, उलट ते ऑड वाटु लागते. बुजगावण्याला घातल्यागत तो कोट दिसतो.हा प्रकार टेंगूळच वाटु लागते. मेट्रो सिटीत रहाणाऱ्या बऱ्याच जणांच्या घरातील लिव्हिंग स्टाइल अगदी हायफाय असते.घरातील नोकरी करणारे साहेब सुट बुट टाय वापरतात.चकचकीत कपडे घालून ऑफिसला जातात.असेच कधीतरी ऑफिसची मंडळी घरी आली की घरी भारतीय बैठकीत फरशीवर बसलेली , कपाळी मोठे कुंकु लावलेली किंवा शरीरावर गोंदन असलेली आई दिसते आणि साहेब गावगाड्यातील मागास वर्गातून आल्याचे टेंगूळ उघडे पडते. 

भाषेतील टेंगूळ : 

               भाषेतील घुसलेले अ-वास्तव शब्द , मिक्स भाषा त्यातून भावना पोहंचवताना निर्माण झालेले आडथळे आणि त्यात निर्माण झालेली विसंगती. यामुळे भाषेतही जागोजागी टेंगूळ आले आहेत. बऱ्याच गावात अनेकांची टोपन नावे असेच वागण्यामुळे पडलेली असतात. 

          गावकरी विचारतात. कोणता रामा? तर शुद्ध रामा. म्हणजे गावात सर्वजण गावठी बोलत असतात तर हा एकटाच शुद्ध हनायला बघतो. त्याचे वर्तन टेंगूळ आल्यासारखे सर्वांच्या नजरेत भरते, त्यातून त्याची चिड पडते शुद्ध रामा. गावात एकाच नावाचे जस तात्या नावाचे खुप जन असतील तर, कोणता तात्या? तर इंग्लिश तात्या. यांना कुठेही इंग्लिश शब्द घुसवायची सवय असते. त्याचे टेंगूळ बनते आणि ते हसण्याचा विषय बनतात.

                 मराठीत हेड्याक शब्द इंग्रजीतून घेतला आहे.काहीजण बोलताना  म्हणतात डोक्याला लै हेड्याक झालाय." यात डोके हा शब्द दोनदा आल्याने ते अनावश्यक असल्याने येथे भाषेला टेंगूळ आल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. "आत्ता परत रिटर्न आलो " असेही वाक्ये आपण एकेलेले असतील.परत रिटर्न हे टेंगूळ आहे. 

राजकीय क्षेत्रातील टेंगूळ : 

             सर्वच क्षेत्रात पुर्ण विकास न झाल्यामुळे, समाजव्यवस्थेतील शेवटच्या घटकाचा पूर्णपणे प्रगल्भतेने विकास न झाल्यामुळे हे विकृतीचे टेंगूळ आलेले आहे.
राजकीय क्षेत्रात बघा माथाडी कामगाराचा नेता म्हटले की ब्राम्हण , शेतकरी संघटनेचा नेता म्हटले की ब्राम्हण , शेतमजूरांचा नेता म्हटले की ब्राम्हण , पारध्यांच्या संघटनेचा नेताही ब्राम्हण, आदिवासी नेता म्हटले की ब्राम्हणच. जातीव्यवस्थेमूळे नेतृत्व गुण विकसीत न झाल्यामुळे राजकीय क्षेत्रातही जातीव्यस्थेचे टेंगूळ आपल्याला दिसते.

                 राजकीय कारभारासाठी पात्र नसलेला, समाजव्यवस्थेची काहीही जानीव नसलेला राजकारण्यांचा पोरगा वंशपरंपरेने देश चालवण्यासाठीच्या लोकशाहीच्या मोठमोठ्या पदांवर जेव्हा आरूढ होतो तेव्हा राजकीय व्यवस्थेला , समस्त देशाला टेंगूळ आलेले आहे असे समजावे. किंवा पक्षाच्या मुख्य पदावर उच्चजातीय आणि वेगवेगळ्या जातीतून आलेले मात्र त्या जातीच्या सेलवर नियुक्त करणे हे त्या अल्पसंख्य जातीला गुणवान न मानण्याचा प्रकार आहे. अल्पसंख्यांक कितीही गुणवान असला तरी तो एका सेलमधे बंदिस्त, हे विकृतीचे टेंगूळ आहे. 

कला साहित्यात : 

                 साहित्यातील विकृत मांडणी , द्वेषजनक मांडणी , तुमचे तसे तर आमचे असे ही मांडणी प्रगल्भता न आल्याचे लक्षणे आहेत. हेच आनावश्यक टेंगूळ साहित्यातही जागोजागी पहायला मिळेल. 

                 पाश्चिमात्य इंग्रजी चित्रपटे , जशाला तसे कॉपी करणे तिकडील गाणे कॉपी करणे , इंग्रजी नाटके चोरुन कांदबऱ्या आणि साहित्य लिहीने, हे कला साहित्यातील टेंगूळ आहे. 
पुर्वी ग्रामीण भागात यात्रेत चित्रपट आल्यानंतर बाहेरील पोस्टरवर आनेक चित्रपटातील पोस्टरचे तुकडे, स्टिकर एकत्र चिकटून एक मोठे पोस्टर तयार केले जायचे . पोस्टर पाहून वाटायचे एवढे भरपूर हिरो या पिक्चर मधे आहेत.खुप फायटिंग दिसतेय.पिक्चर बघून आल्यानंतर पोस्टरवरला एकही सिन त्यात नसल्याचे लक्षात येते.लोकमन ताब्यात घेनारी कलाकृती बाजारात न आल्याने , उस्फूर्त पब्लिक पिक्चरसाठी मिळत नसल्यामुळे , लोक बळजबरीने आपल्याकडे वळवण्यासाठी बनावट पोस्टर वापरून चित्रपट चालवला जाणे टेंगूळच आहे.

 गावगाड्यात ? 

              मुलगी डॉक्टर झाली. तिला जातीव्यवस्थेतीलच स्थळ आणि ते ही पारंपरिक पध्दतीने शोधायची सुरुवात झाली.मग त्या मुलीला गावातील फोटो स्टुडिओवर घरातील कर्तीधर्ती महिला सोबत पाठवून साडी नेसलेल्या स्थितला फोटो काढून आनायला लावला आणि मग बायॉडाटा आणि फोटो पुढील पार्टीकडे पाठवला गेला. 

             ती मुलगी डॉक्टर होइपर्यंत मुक्त स्वतंत्र वागली नसेल का मग  गावात वागताना एवढे बंधणे का ?  स्थळ दाखवताना साडीवरलाच फोटो का म्हणून ? ती डॉक्टर होऊन घरी येइपर्यंत साडीतच वावरली असेल का ?  शिवाय क्रॉस हायब्रडायझेशन , उत्पादन वाढीसाठी केले जानारे कलम प्रकार माहिती असलेल्या डॉक्टरिनबाईसाठी जातीतलाच आणि त्यातल्या त्यात पोटजातीतलाच मुलगा शोधने हे मोठे टेंगूळच आहे. हुंडापध्दती सुद्धा टेंगूळ आहे. 

              आशापध्दतीने भांडवलशाही, साम्राज्यशाही दाराशी उभी आहे. आणि येथे मात्र व्यापक समाजमन विकसीत झालेले नाही. सार्वजनिक समस्येसाठी लोक रस्त्यावर येत नाहीत. प्रत्येकजन व्यक्तिगत विचार करणारा असल्यामुळे , मला काय त्याचे घेने का देने हा विकृत विचार नुकसानदायक ठरलेला आहे. पिकविम्याची समस्या , शेतकरी विरोधी तिन कृषीकायदे , शेतमालाला भाव नसणे यातून शेतकरी इतका रसातळाला जावुनही तो तो एकत्र न येण्याचे कारण म्हणजे त्याच्या मनाची शेतकरी म्हणून सामुदायिक जडणघडण झालेली नाही. तो जातीगतच व्यक्तिगत महत्वाकांक्षीच राहिलेला आहे. 

                  भटके विमुक्त , आदिवासी जमाती आणि माजी अस्पृश्य जातीतही व्यापकतेचा , सर्वसमावेशकतेचा आभाव आहेच. परंतू शेतकरी जातींपेक्षा जरा कमी. हे विकृतीचे टेंगूळ जात्यंत करुन समाजव्यवस्थेचा जागोजागी आणि सर्वत्र विकास केल्यानंतरच जाइल. 

नितीन सावंत परभणी 
9970744142 
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

No comments:

Post a Comment