Monday, 12 July 2021

ll परात्मतेचा परमोत्कर्ष ll

ll परात्मतेचा परमोत्कर्ष ll


                 नितीन सावंत , परभणी

                 9970744142

               वयाच्या पंचवीसाव्या वर्षी कोसला लिहून नेमाडेंनी आर्थिक सर्वहरा वर्गाची अर्थात शेतकरी मध्यम जातींची परात्मता मांडायला सुरुवात केली. पुढे त्यांनी झुल, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, बिढार, जरिला या आपल्या साहित्याविष्कारातून ही परात्मता अफलातून रेखाटली आहे. या नेमाडेंच्या समग्र साहित्याची नस पकडली ती कॉ शरद पाटलांनी *परात्मतेचा परमोत्कर्ष* या एकाच विधानात.

                 याबद्दल कॉ.राजकुमार घोगरे म्हणतात " परात्मभाव शेतकरी वर्गातील मध्यम जातींच्या कोषातील घुसमटीचा अविष्कार आहे. नेमाडेंच्या अभिजात कादंबऱ्यातून तो ज्या पध्दतीने चितारला गेला तो थोरच आहे. क्रांत्योत्सूक काॅ. शरद पाटील, जात्यंतक तत्वज्ञ, ते न टिपतील तर नवलच झाले असते. आपण तर काॅ. शरद पाटलांच्या जात्यंतक तत्वज्ञानाचे वारसदार. आपण आपल्या प्रबोधनाची मुख्य धारा या शेतकरी समुहातील मध्यम जातींच्या परात्मतेला बनवली, हा प्रयास आर्थिक सर्वहारांच्या सामाजिक सर्वहारा जातीसमुहाशी 'ग्रँड युनियन' बनन्याकडे आपल्याला घेउन जाईल.हे ग्रँड युनियन बनवण्याचे महान कार्य भारताच्या अपूर्ण क्रांतीचा न टाळता येणारा टप्पा आहे."

                    शरद पाटील यांच्या मांडणीला पुढे नेताना कॉ घोगरे शेतकरी मध्यम जातींच्या या परात्मभावाला जाणून घ्यायला शिकवतात. वर्णजातीव्यवस्थेत परार्थीकरण तर भांडवलशाहीत परात्मीकरण. आणि ह्या परात्मीकरणाचा सर्वात मोठा बळी पडलेला वर्ग म्हणजे शेतकरी मध्यम जाती होत. त्यांच्या भावभावनांचे तंतोतंत चित्रण नेमाडे या व्यक्तिने प्रथमच न संकोचता, तथा हाथ आखडता न घेता, मुक्तपणे ही मांडणी केलेली आहे. 

                      परात्मतेबद्दल राम बापट यांनी संपादित केलेल्या ग्रंथात 'परात्मभाव' या प्रकरणात संजय पळशीकर भांडवलशाहीत झालेले बदल मांडताना म्हणतात " १) माणूस निसर्गापासून दुरावला आहे. २) माणूस स्वताला पारखा झाला आहे. ३) माणूस त्याचे वैशिष्ट्य गमावून बसला आहे.४)माणूस इतर माणसांपासून तुटला आहे. " बापट म्हणतात त्याप्रमाणे परात्मभावाची हिच प्राथमिक लक्षणे आहेत. 

            कोसलाच्या समिक्षेत कॉ शरद पाटील म्हणतात *कोसला म्हणजे सुरवंटाचा कोष.पांडुरंग सांगवीकरला वर्गीय- जातीय समाज कोषातच मारतो. त्याच्या मध्यम जातीयतेमुळे तो जातीविद्रोहाचे फुलपाखरू बनून बाहेर पडु शकत नाही. देवाचे अन्न सर्वत्र पसरलेले आहे. पण तो प्रेत बनल्याने त्याला ते खाता येत नाही*

            भालचंद्र नेमाडे , रा.ची. ढेरे, कॉ शरद पाटील सोडता बाकी मध्यम जातवर्गीय साहित्यीकांचे साहित्य सुद्धा परात्मभाव निर्माण करते. एकांगीपणा आनते. त्याला ते गोंडस शब्दात निकोप जीवनशैली वगैरे म्हणतात. असल्या निकोप जीवनशैलीवाल्या साहित्तीकांचे साहित्य वाचून विद्रोही बंड तर होऊ शकत नाही उलट वाचक स्वार्थी, स्वकेंद्री बनतात. म्हणून राजकुमार घोगरे म्हणतात की शेवटी शरद पाटील म्हणायचे नेमाडेंना जपा. त्यांना डिवचू नका. त्यांची साहित्याची पुढची मांडणी त्यांना करु द्या. नेमाडे,ढेरे शपा एकाच काळात एकमेकांना न भेटलेले तिन महारथी आहेत.

           कोसला या शब्दाचे यथोचित वर्णन करुन शरद पाटील नेमाडेंच्या मांडणीचा केंद्रबिंदू पकडतात. परात्मता म्हणजे तुटलेपणा, व्यवस्थेपासुन स्वताचे झालेले अलगीकरण. ही परात्मता अलीकडल्या काळात शेतकरी जातीमंध्ये परमोत्कर्षाला पोहंचली आहे. मावळतीच्या सरंजामशाहीतून शेतकरी जातींच्या नव्या पिढ्या जेव्हा महाकाय भांडवलशाहीत प्रवेश करतात आणि ते नव्या जगाला जुळवून घेता घेताच हा परात्मतेचा संसर्ग त्यांना होतो. गावगाडा आणि त्यातील चिवचिवाट संपत जावून भांडवली शिक्षण व्यवस्थेतून शिकुन आलेल्या नव्या पिढ्या गावोगाव ओट्यावर बसुन एकलकोंडेपणाचा, तुटलेपणाचा रोग गावाला लावत आहेत. मग नेमाडे वेगळं काय मांडतात ? हेच तर पारंपरिक साहित्यप्रकाराला धक्के देत काहिच वेगळे न मांडता, आहे तेच मांडणे हे नेमाडेंचे वेगळेपण आहे. 

            कोसलातला पांडुरंग सांगवीकर परात्मता आल्यावर शेवटी लग्नाच्या बोहल्यावर उभे रहायला तयार तरी होतो. तो गावी जावून रहातो तरी. पण आज मात्र शेतकरी जातीतील तरुणांना विचारा काय करतोस सध्या ? तरुणांची उत्तरे  mpcs , upcs ची तयारी करतो किंवा स्पर्धा परिक्षेची तयारी करतो अशी उत्तरे असतात. ग्र्याज्युअशन करुन परात्मता आलेले बहुतांश तरुण पुणे , औरंगाबादला तयारीच्या नावे वयाची बत्तीशी ओलांडे पर्यंत एकात्म एकलकोंडे जीवन जगत असतात. गावी जावे तर ग्रामीण जीवन, ती संस्कृती आपल्याला स्विकारत नाही. त्यात आपण संस्कार झाल्यामूळे फीट होत नाही. हे परात्म जीवन त्याला नको झाले आहे. म्हणून शहरातच रहाणे पसंत करुन तो कुटुंब, लग्न याला पिडा मानायला लागतो. हे पीडन काळीज तोडून टाकणारे आहे. त्याची एक स्वतंत्र व्यथा आहे. शोषितांच्या-पिडीतांच्या शोषणपीडनाच्या पातळीवर ती सामाजिक सर्वहाराची १ ते१० मध्ये १० असेल तर आर्थिक सर्वहाराची ती ५ तरी असेल का नाही. सामाजिक चळवळींना ही व्यथा समजून घ्यावी लागेल.

          दुसरी परात्मता आलीय ती मध्यमवर्गीय टामटुम शहरी वर्गात. त्यांनी व्यवस्थेची झुल पांघरली आहे. नेमाडेंच्या झुल मधे आहेच की हे. झुल म्हणजे तरी काय ? बैलाच्या पाठीवर झुल टाकून त्याला कधीतरी नावाजायचे , कौतुक करायचे आणि मग वर्षभर तो आहे तसे चालु ठेवनार. कोसायचे नाही , कुथायचे नाही, आहे ते गोड मानुन बैलासारखे राबायचे. हे  विद्रोह मारण्याचे काम शिक्षणव्यवस्थेतूनच होत आले आहे. याबद्दल नेमाडे झुलमधे ऐके ठिकाणी म्हणतात *हि शिक्षणपद्धती म्हणजे देशातल्या तरण्याबांड पोरांना हिजडे बैल बनवनारी धुर्त युक्ती आहे* आणि अगदीच खरे आहे हे. म्हणून प्राध्यापक हे झुल पांघरलेले ,आंडे ठेचलेले बैलच आहेत. त्यांच्या आंगावर टाकलेली सत्काराची शाल, पारितोषिके ही झुलच आहे. नक्षीदार झुल .

            आदिवासी,दलीत जातीमध्ये गावोगाव ही परात्मता आलेली नाही. या जातवर्गातील ज्यांचे शहरीकरण, ब्राम्हणीकरण झालेले आहे, ते मात्र परात्मच जीवन, तुटलेले जीवन जगतात.

           मी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या परिसरात व्याख्यानाला गेलो होतो. तिथे मुक्कामी थांबलो होतो.सकाळी उठल्यावर आयोजकांच्या आंगणात बसलो असता,समोरून एक अहिराणी भाषा बोलत एक व्यक्ती आली.हतात रिकामी पाण्याची बाटली होती.बोलण्याच्या हावभावरुन कळले की त्यांना पेट्रोल हवे आहे.गाडी बंद पडली आहे. मी ज्यांच्याकडे थांबलो ते राजेंद्र पगार यांनी आपल्या गाडितील पेट्रोल काढून त्यांना दिले.ते व्यक्ती  निघून गेले.त्यांनी मदत म्हणून मोबदला न घेता स्वताच्या गाडीतले पेट्रोल काढून समोरच्याला दिले,त्यांना स्वताच्या गाडित पेट्रोल टाकायचे झाल्यास तालुक्याला जावे लागते. या न-तूटलेल्या, अ-परात्मभावात मदतीची, सहकार्याची भावना आणि उत्साह असतो. आता मी हा प्रोग्राम करुन आल्यावर दुसऱ्याच दिवसी आमच्या नातेवाईकांना भेटायला गेलो.तिथे मधल्या खोलीत स्कुटी झाकून टाकली होती. कारण स्कुटीवाल्या ताईंची डिलीव्हरी झाली होती. घरात इतर दोन- तीन जन स्कुटी वापरु शकत असूनही कौटुंबिक तूटलेपणातून, या परात्मभावातून ती स्कुटी झाकून टाकून प्याक करुन टाकली होती. भांडवलीकरणाच्या आघाताने निर्माण नव्या जात-वर्ग  झालेल्या समाजात परात्मभाव येतो आणि तिथे प्रत्येक गोष्टीत नफ्यातोट्याचा व्यवहार असतो. त्यामूळे, इतरांना मदत, सहानुभूती, सहकार्य या तर दुरच्या गोस्टी. 

             आदिवासी भागात मदतीसाठी सहज पुढाकार घेतला जातो. येथे मात्र शहरीकरण झालेल्यामध्ये कुटुंबात सुद्धा मदतीची भावना राहिली नाही. हे भयावह वास्तव आहे.

             एकाच कुटुंबात शिकलेले शहरी भाऊ -भाऊजई आणि शेती करणारे गावाकडे रहानारे शेतकरी जोडपे. ही अ-परात्म व परात्मभावाची उदाहरणे आहेत. जीवजाईपर्यंत राबनार्या गावाकडच्या जावू बाईं आणि त्यांचा शेतकरी नवरा  शहरात गेल्यानंतर शहरी भाऊ आणि शहरी जावूबाई ह्या ग्रामीण भागातून आलेल्या त्या जोडप्याला कशा वागवतात, तर अगदीच चहा पोहे एवढ्यावर भागवून सर्व मोजमापात असते. या उलट त्याच शहरी जाउबाई आणि त्यांचे शिकलेले मिस्टर गावाकडे गेल्यावर त्यांना गावकडील भाऊ भाऊजाई किती आनंदाने रोजच्यापेक्षा वेगळे स्पेशल जेवन करुन घालतात. ग्रामीण जोडपे उत्साही असते. शहरी जाऊबाई गावाकडे आल्यानंतर स्वयंपाकात मदतही करत नाहीत. शहरी जाऊबाई गावाकडे गेल्यानंतर त्या फक्त मिरवतात कुटूंबातील कामे , चुलीची कामे त्यांना नसतात. ही एकाच कुटूंबातील शहरी ग्रामीण परात्मता - अपरात्मतेची उदाहरणे आहेत. 

           ही आर्थिक सर्वहारा जाती अंतर्गत परात्मता कोण मांडनार की नाही? त्याशिवाय जात्यंताची कोंडी फुटू शकत नाही.

           कोसलाच्या समिक्षेत शरद पाटील म्हणतात "मध्यमजातीयांपाशी विद्रोहाच्या अंगाराएवजी राहिली आहे परात्मतेची राख ! निमभांडवली विकासात कुटुंबबंध विघटीत झाले असून मध्यम जातींचे प्रस्थापित हे जातीवादाचा उपयोग केवळ स्वगोतावळ्याच्या स्वार्थासाठी करीत आहेत. अशा अनंत व असहाय पोकळीत पांडुरंग सांगवीकर व चांगदेव पाटलांसारखे मध्यम जातीय उभे असल्याने त्यांच्या परात्मतेचा परमोत्कर्ष झालेला आहे.

           पुढे शरद पाटील म्हणतात,"मध्यम जातीयांच्या या षंढ परात्मतेचा अभूतपूर्व व अनन्य साहित्यिक आविष्कार नेमाडेंनी केला आहे. त्यांचा प्रतिनायक (antihero) वर्गजाती व्यवस्थांतक पॉझिटिव्ह हिरोमध्ये परकायाप्रवेश करण्यासाठी भटकतो आहे भूत बनून."

           हा शपांना अपेक्षीत असलेला वर्गजातीव्यस्थांतक पॉझिटिव्ह हिरो आम्ही घडवनार सौत्रांतिक मार्क्सवाद घेवून मानव मुक्ती मिशनच्या माध्यमातून. 

आणि तुम्ही नेमके नेमाडेलाच वगळायला निघालात. मग या मराठी साहित्यविश्वात  सामाजिक व आर्थिक सर्वहाराच्या ग्रँड युनियन बनविण्यासाठी नेमके काय उरेल तिथे ? तुमच्या नकारात्मक शेरेबाजीच्या परात्मतेची राख, किती जनांना पुसणार ही नकारात्मकतेची राख ? 

             लक्षात घ्या. कोणतीही एक जात जातीअंत करुन जातीव्यवस्थेतून सुटका करुन घेऊ शकत नाही. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा Castes अनेकवचनात मांडण्याचा प्रयत्न आपण नकारात्मकतेने दूर्लक्षिला नाही पाहिजे. या! जरा मैदानावर, शेतकरी मध्यम जातीयांना फुलपाखरू बनायला मदत करु. नवनिर्मीतीत आनंद आहे. मुक्तीचा मार्ग आहे.


नितीन सावंत परभणी.                                             9970744142

No comments:

Post a Comment